मराठी ही ज्ञानभाषाच!

​सुचिकांत वनारसे
बुधवार, 19 जुलै 2017

उच्च शिक्षणात मराठी - मराठीच्या संवर्धनासाठी, अधून मधून मराठी विद्यापीठाची मागणी मराठीप्रेमींमध्ये होत असते. हे व्हायला हरकत नाही, पण जर या विद्यापीठाला लोकांचा प्रतिसाद नाही मिळाला तर काय? तर हजारो कोटींची गुंतवणूक काय करायची? याची उत्तरे मात्र कुणाकडे नसतात.

`मला मराठी आवडत नाही कारण त्यात किती ते उकार- काना- मात्रा` अशी तक्रार करणाऱ्या मुलाचा एक व्हिडीयो सध्या सोशलमिडियावर व्हायरल होतोय. मराठी शिकून करायचं काय, ती भाषा काय नोकरी देते? असा सवाल केला जाणंही काही नवीन नाही. मराठीविषयीची अप्रिती निर्माण करण्याचे असे प्रयत्न जाणिवपुर्वक केले जात असतील किंवा नसतीलही, पण मराठीच्या संवर्धनासाठी जाणिवपुर्वक प्रयत्न करणे अत्यंत आवश्यक आहे हे या निमित्तानं लक्षात घ्यायला हवं. मराठीसाठी जाणिवपुर्वक धडपडणाऱ्या एका कार्यकर्त्याचा हा लेख त्याच प्रयत्नाचा एक भाग म्हणून प्रसिद्ध करत आहोत...  

भाषेच्या बाबतीत एक मतप्रवाह असा देखील आहे जो काहीही खटपट न करता, भाषेचं भविष्य वेळेच्या स्वाधीन करून गप्प राहून केवळ निरीक्षकाच्या भूमिकेत बसणे पसंत करतो. ललित साहित्यात रमणाऱ्या आणि त्यातून बाहेर पडण्याचे नावच न घेणाऱ्या या वर्गाला भाषिक प्रश्नाचं महत्त्व, त्याची झळ अजून पोहोचली नाही असं वाटत राहतं. या मराठीप्रेमींना मराठीत असलेलं बक्कळ ललित साहित्य हीच मराठीची श्रीमंती वाटते(जे खरं आहेच!) पण त्यामुळे मराठी सुरक्षित आहे, तिला काही होणार नाही या भाबड्या आशेवर ही मंडळी स्वतः निवांत असतात आणि इतरांना सर्व काही ठीक होईल, संक्रमणाचा काळ आहे, कशाला त्रास घेता म्हणून सल्ले देतात! याशिवाय पुन्हा ठरलेली वाक्य आमच्या तोंडावर मारली जातात ती म्हणजे, 'इतर भाषांचा द्वेष करू नका!'

साध्या सोप्या भाषेत समजावतो!

कार्बोहायड्रेट्स म्हणजे - ललित साहित्य.
प्रथिने म्हणजे - ज्ञान, विज्ञानपर साहित्य.

दोन्हींची गरज माणसाला, भाषेला असतेच. भाषेला जगवण्यासाठी ललित साहित्य हवेच, मराठीच्या श्रीमंतीत ललित साहित्याचं योगदान नाकारणे मूर्खपणा ठरेल, पण मराठीला काळानुरूप अधिकाधिक सक्षम बनवण्याकरता प्रथिनांनीयुक्त ज्ञान-विज्ञानपर साहित्य मराठीत यायलाच हवे. ललित साहित्य आतून आलेलं असतं, भावभावनांशी निगडित असतं, वैचारीक असतं, तर ज्ञान-विज्ञानपर साहित्य शोध, सिद्धांत, विज्ञान, संशोधनांवर आधारीत असतं. भाषिक अस्मिता तेवत ठेवण्याकरता ललित साहित्याचे महत्त्व वादातीत आहे. त्या अस्मिता जागृत असतील (जागृत आणि टोकदारमध्ये फरक आहे) तरच माणूस भाषेमध्ये नवनवीन प्रयोग करण्याकरता उत्स्फूर्तपणे पुढे येतो. भाषेला सिक्स पॅक्स पडलेले बघायचे असतील, पिळदार दंड बघायचे असतील, भारदस्त छाती बघायची असेल, तर ती ज्ञानभाषा म्हणून सक्षम  व्हायलाच हवी. इज्रायलच्या हिब्रूने फिनिक्स पक्षाप्रमाणे भरारी घेतली, एक मृत म्हटली जाणारी भाषा एका देशाची ओळख बनली मग आपण मराठीला त्या उंचीवर का नेऊ शकणार नाही? मराठी आजही एक सक्षम भाषा आहे, केवळ त्यावर अजून काम होणं गरजेचं आहे. जबर इच्छाशक्ती हवी, राजकीय आणि सर्वसामन्यांची देखील!!!

मराठी भाषा काळानुरूप अजून सक्षम करण्याच्या दृष्टीने काही मूळ मुद्द्यांवर काम करायला हवं असं प्रकर्षाने वाटतं, कारण यातच मराठी ज्ञानभाषा म्हणून अधिक सक्षम होण्याचा राजमार्ग दडलेला आहे...

अ) लोकभाषा मराठी
ब) उच्च शिक्षणात मराठी
क) युनिकोडिंग आणि युनिकोड फॉण्टस
ड) इंग्रजी अनुवाद
ई) मराठी शाळा

अ) लोकभाषा मराठी : आपल्या आजूबाजूला, खासकरून शहरांमध्ये, तालुक्याच्या गावांमध्ये आपण मोठ्या प्रमाणात इंग्रजी-हिंदीचा वापर बघतो, बँकांमध्ये-पतपेढ्यांमध्ये मिळणारे अर्ज, कंपन्यांकडून मिळणाऱ्या सेवा, शासकीय कार्यालयांमध्ये इंग्रजी-हिंदीचा मोठा वापर, घराबाहेर पडले की एकमेकाशी बोलतानादेखील सतत हिंदीचा वापर, टीव्ही-रेडीओ वरच्या जाहिराती, ई. अशा गोष्टींमुळे मराठीचा वापर लोकभाषा म्हणून होण्यात बाधा येते. हिंदी आपली राष्ट्रभाषा आहे, हा गैरसमज गेली ६० वर्षे आपल्या भारतात पद्धतशीरपणे पसरवला गेला त्यामुळे ठिकठीकाणी अनवधानाने का होईना पण आपल्या मातृभाषेला डावलणेदेखील अनेकांना गैर वाटत नाही. त्रिभाषा सूत्राच्या नियमात न येणाऱ्या मुंबई मेट्रोतदेखील आम्ही हिंदीची घुसखोरी मान्य करतो, अशी दिल्ली मेट्रोत मराठीची घुसखोरी खपवून घेतली जाईल का? मराठी आपल्या महाराष्ट्र राज्याची राजभाषा आहे, पण हिंदी आपल्या देशाची राष्ट्रभाषा नाही ही वस्तूस्थिती आहे!!! मुळात भारताला राष्ट्रभाषाच नाही!!! एक भाषा-एक राष्ट्रवर काट मारून, अनेक भाषा-एक राष्ट्रचा पुरस्कार आपण करायला हवा! स्वतः आदरणीय पंतप्रधान श्री. नरेंद्र मोदी परदेशात जाऊन आपल्या देशाची महती सांगतात त्यात आपल्या भाषिक वैविध्याचा आवर्जून उल्लेख करतात मग आपण हे वैविध्य जपायला नको का?

फक्त २ राज्ये मिळून ५३% प्राप्तीकर भरतात, अशा मथळ्याखाली काही दिवसांपूर्वी, फर्स्ट पोस्टला बातमी होती. पहिलं महाराष्ट्र आणि दुसरं दिल्ली! त्यातला महाराष्ट्राचा वाटा साधारण ४०% इतका जास्त आहे! पूर्ण भारतात सर्वाधिक कर भरणारं राज्य! आख्ख्या जगात जिसकी लाठी उसकी भैस, या तत्त्वावर भाषेचा प्रसार केला जातो, इथे आम्ही म्हणत नाही मराठीला राष्ट्रभाषा बनवा, आम्ही केवळ इतकच म्हणतोय की या महाराष्ट्र राज्याची राजभाषा असलेल्या मराठीचा योग्य सन्मान ठेवा आणि तिला डावलू नका, इतर भाषा जनतेवर लादू नका.

शासकीय कार्यालयांमध्ये हिंदी आणि खाजगी ठिकाणी इंग्रजी! कोणत्याही हेल्पलाईनला फोन करा त्यांचा प्रतिनिधी हिंदी नाहीतर इंग्रजीतून बोलायला सुरुवात करतो, तो मराठीत का बोलत नाही? मराठी वृत्तवाहिनीवर धडधडीत हिंदी बोललं जातं, हिंदी फुटेज दाखवलं जातं, कारण या सगळ्यांना माहिती आहे, इथे सर्वकाही खपवून घेतलं जातं!!! मराठी माणूस अशाच प्रकारे आपल्या भाषेपासून दूर लोटला जातो. मग तो का आपल्या भाषेचा अभिमान बाळगेल? का आपल्या भाषेत काही भव्य निर्मिती व्हावी, आपली भाषा जागतिक स्तरावर वेगळ्या उंचीवर पोहोचवावी म्हणून प्रयत्न करेल? 

ईस्त्राईलचे गोडवे गाणारे लोक इज्रायल कसा मोठा झाला, यावर कधी अभ्यास करतील का? ईस्त्राईलमध्ये आपल्या मुलांना हिब्रू भाषेतच शिकवलं जातं, विमानतळावर No English म्हणून फलक लावलेले असतात, त्यांना स्वभाषेचा प्रचंड अभिमान आहे, हिब्रू ईस्त्राईलची लोकभाषा आणि ज्ञानभाषा दोन्ही आहे!!! ईस्त्राईलला जसा स्वभाषेचा अभिमान आहे तसाच इतरांच्या भाषांचा देखील ते सन्मानच करतात. ईस्त्राईलच्या मुंबई दूतावासाच्या ट्वीटर हँडल वरून बहुतेकवेळा मराठी ट्वीट असतात, याची संख्या महाराष्ट्र सरकारमधील नेत्यांच्या ट्वीटरवरील मराठी ट्वीटपेक्षा कितीतरी जास्त आहे. आपल्या सोयीने ईस्त्राईल स्वीकारू नका...

उच्च शिक्षणात मराठी - मराठीच्या संवर्धनासाठी, अधून मधून मराठी विद्यापीठाची मागणी मराठीप्रेमींमध्ये होत असते. हे व्हायला हरकत नाही, पण जर या विद्यापीठाला लोकांचा प्रतिसाद नाही मिळाला तर काय? तर हजारो कोटींची गुंतवणूक काय करायची? याची उत्तरे मात्र कुणाकडे नसतात. आज मराठी विद्यापीठापेक्षा, प्रत्येक अभ्यासक्रमाची पुस्तके मराठीत अनुवादित होऊन येणे, शासनाच्या शैक्षणिक संकेतस्थळांवर युनिकोड स्वरूपात, गुगल सर्चेबल स्वरूपात ही पुस्तके येणे गरजेचे आहे. मराठीतून-देवनागरीतून गुगल करा म्हणून भाषा संचालनालयातर्फे विशेष जनजागरण मोहिमांची आखणी, जाहिरात गरजेची आहे. मराठी विश्वकोश, मराठी विकिपीडिया, MarathiBhasha.Org, मराठी विकासपिडीयाबाबत अनेकांना काहीच माहिती नाही, ती माहिती करून देणे गरजेचे आहे. 

शासनाने संकेतस्थळांच्याद्वारे मराठीकरणाला सुरुवात केल्यावर पुढची पायरी असेल त्याला प्रतिसाद किती मिळतो हे पाहणे, आणि पुरेसा प्रतिसाद मिळाल्यानंतर पुढची पायरी असेल, सर्व विद्यापीठांमध्ये सर्वच विषय मराठीतून शिकवण्याची सोय करणे, पुन्हा मराठीतून चालवलेल्या वर्गांना महाविद्यालयांमध्ये कसा प्रतिसाद मिळतो हे पाहून मराठीसाठी विद्यापीठ उभे करायचे की नाही यावर निर्णय घेणे. हा भाषेला सक्षम करण्याच्या दृष्टीने सर्वात अभ्यासू, व्यवहार्य, टप्प्याटप्प्याने जाणारा सुरक्षित मार्ग असेल असं मला वाटतं. विद्यापीठ शेवटची पायरी असेल पण सर्वच विषयांचे उच्च शिक्षणापर्यंतचे युनिकोडेड साहित्य शासनाच्या शैक्षणिक संकेतस्थळांवर आले, महाविद्यालयांमधून किमान आठवड्यातून काही विशिष्ट दिवशी मराठीतून विषय शिकवण्याची सोय करणे, एवढ्या गोष्टी जरी कोणत्या सरकारने केल्या तरी मायमराठी त्यांना भरभरून आशीर्वाद देईल. उच्च शिक्षण मराठीत आल्याने मराठीच्या शिरपेचात अजून एक मानाचा तुरा खोवला जाईल, हे काम कोणतं सरकार करणार याची उत्सुकता मराठी प्रेमींना नेहमीच राहील.

युनिकोडिंग आणि युनिकोड फॉण्टस - आज इंग्रजीत आपल्याला बक्कळ माहिती मिळते, पण याचा अर्थ मराठीत अशा माहितीपर साहित्याची निर्मिती झालीच नाही का? तर झाली! गेली १०० वर्षे ती होत आहे, पण आज धूळ खात वर्तमानपत्रांच्या गोदामात पडली आहे. शेकडो मासिके, वर्तमानपत्रे, त्यांच्या पुरवण्या, हजारो माहितीपर ग्रंथ, या सगळ्यात ही माहिती पडून आहे. माहितीचा विस्फोट झाला आणि हवं ते आंतरजालावर सापडू लागलं पण इंग्रजीतून! मराठीतून माहितीचा विस्फोट कधी होणार? या धूळ खात पडलेल्या साहित्याचं करायचं काय? ते असच कीड लागून संपून द्यायचं? हे पुन्हा मुख्य प्रवाहात आणणे सरकारचं कर्तव्य नाही का? मागील सरकारने मोठ्ठ काम केलं ते म्हणजे मराठी विश्वकोशाचे सगळे खंड संकेतस्थळावर आणले, त्यानंतर मराठीसाठी भरीव, भव्य काम झालेलं दिसत नाही. 

जसं युनिकोडिंग होणं गरजेचं आहे त्याचप्रमाणे आकर्षक मोफत युनिकोड फॉण्टस तयार होणे गरजेचे आहे. गुगलने आज जवळपास ५० आकर्षक युनिकोड फॉण्टस उपलब्ध करून दिले आहेत. त्यातील बालू, खांड हे सर्वाधिक लोकप्रिय आहेत. सर्वत्र अगदी वृत्तवाहिन्यांवरदेखील बालूतून लिहिलेलं आपल्याला दिसून येईल. युनिकोड फॉण्टस मध्ये मराठी लिहिणे सोपे असते, वेगवेगळे कळ-फलक लक्षात ठेवावे लागत नाहीत, त्यामुळे आपोआपच लोक मराठी लिखाणाकडे वळतात आणि आंतरजालावरील मराठीचा टक्का वाढतो.

इंग्रजी अनुवाद - इंग्रजी कशी मोठी झाली? तर इंग्रजीने तिच्या जडणघडणीच्या काळात फ्रेंच-लॅटिन मधून असंख्य शब्द उचलले, भाषांतरे केली आणि आपली भाषा समृद्ध बनवली. आज आपण जे इंग्रजी वापरतो त्यात अनेक शब्द फ्रेंच किंवा लॅटिन असतात. जरा एखादा इंग्रजी शब्द गुगलवर टाकून बघा, तुम्हाला गुगल क्षणार्धात त्या शब्दाचं मूळ कुठे आहे ही माहिती देईल. मग आपण मराठीला सक्षम करण्याकरता मोठे भाषांतराचे, अनुवादाचे उपक्रम का घेऊ शकत नाही? यावरदेखील विचार आणि कृती करण्याची गरज आहे. मराठीतून विज्ञानपर लेखनासाठी व्यासपीठ म्हणून स्पर्धा, विज्ञानपर लेखनासाठी मराठी मासिकांना प्रोत्साहन-विशेष सवलती, मराठी वृत्तपत्रांना विज्ञानपर लेखमालिका सुरु करण्यासाठी प्रोत्साहन, आवाहन, मराठीतून ज्ञान-विज्ञानाचा प्रचार-प्रसार करणाऱ्या संकेतस्थळांना विशेष आर्थिक सवलती, मदत, नवीन संकेतस्थळांकरता प्रोत्साहन, उत्कृष्ट संकेतस्थळांना सरकारतर्फे शाब्बासकी! अशा अनेक गोष्टी सरकारमार्फत केल्या जाऊ शकतात पण सरकारची तशी प्रबळ इच्छाशक्ती असायला हवी. सरकारने आत्ता मराठीसाठी काही भक्कम पावले उचलली तर येणाऱ्या काळात आपल्याला मराठीतून विज्ञानसंशोधनाच्या क्षेत्रात भरीव कामगिरीची अपेक्षा करता येईल. 

मराठी शाळा - हा सर्वात जास्त महत्त्वाचा मुद्दा! मराठी ज्ञानभाषा म्हणून सक्षम होण्यावर सरळ-सरळ प्रभाव टाकतो. गेली अनेक वर्षे मराठी शाळा संपल्या, हा चुकीचा भ्रम पसरवला जातो आहे, जे सत्य नाही! कधी कधी वाटतं असे भ्रम पसरवणे हा नियोजित षडयंत्राचा भाग आहे. आजही सरकारी आकडेवारीनुसार ८०% महाराष्ट्र, मराठी शाळांमध्येच शिकतो. मराठी शाळांकडेच पाठ फिरवली तर अर्थातच उच्च शिक्षणात मराठीचा मुद्दा मागे पडतो, आहे ना इंग्रजी! शिका त्यातून!!! ही भावना वाढीस लागते. मराठी शाळा ही लाखो शाळांची एक सरकारी यंत्रणा आहे. त्यात चांगल्या-वाईट-मध्यम दर्जाच्या शाळा, चांगल्या-वाईट-मध्यम दर्जाचे शिक्षक असणार, दरवर्षी काही बंद पडणार तर काही नवीन सुरू होणार! या साहजिक बाबींकडे दुर्लक्ष केले जाते. दुसरीकडे इंग्रजी शाळांचा दर्जा मात्र तपासला देखील जात नाही कारण त्यांना कसलेही सरकारी अनुदान असत नाही, झाकली मुठ सव्वा लाखाची असते. पण वेळोवेळी जेव्हा जेव्हा इंग्रजी-मराठी शाळा तुलना होते तेव्हा मराठी शाळा इंग्रजी शाळांच्यापेक्षा सरस सिद्ध होतात. याचं उत्कृष्ट उदा. म्हणजे जुन्नर पॅटर्न! इथे जि. प. शाळांनी एकाच गावातल्या, एकाच इयत्तेतल्या इंग्रजी आणि मराठी शाळांमधल्या मुलांना समोरा समोर बसवून गावकऱ्यांच्या समोर तुलना केली आणि दाखवून दिलं की मराठी शाळांमध्ये शिकलेली मुलं कशाप्रकारे इंग्रजी शाळेतील मुलांच्यापेक्षा प्रत्येकच बाबतीत सरस आहेत. जे जुन्नर मधल्या हजारो पालकांना समजलं ते इतर पूर्ण राज्यातील पालकांना समजावं आणि त्यांनी आपल्या मुलांसाठी मराठी माध्यमाची शाळा निवडावी हीच अपेक्षा.

मराठीची अवस्था आज जितकी रंगवली जाते सुदैवाने तितकी वाईट नक्कीच नाही, अगोदर म्हटल्याप्रमाणे १२ वी पर्यंतचे विज्ञानाचे शिक्षण आणि परीक्षा आपण मराठीतून देऊ शकतो, एवढी बाब मराठीतून प्राथमिक शिक्षण घेण्याकरता पुरेशी आहे, पण भाषेला अजून मोठे करायचे असल्यास, कालानुरूप अधिकाधिक सक्षम बनवायचे असल्यास, सरकार, मराठीप्रेमी, प्रकाशन संस्था, विज्ञानपर लेखक यांनी एकत्रितपणे विचार करून पावले उचलली नाहीत तर मात्र येणारा काळ मराठीसाठी कठीण असेल. सर्व काही नीट होईल म्हणून भाषेचं भविष्य वेळेवर सोपवू नका.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Suchikanr Vanarase writes about Marathi Language