सुदानी क्रांतीचा चेहरा : अला सालेह

धनंजय बिजले
सोमवार, 22 एप्रिल 2019

सुदानच्या निमित्ताने अरब स्प्रिंगचा दुसरा टप्पा सुरू होण्याची धास्ती अन्य देशांतील सत्ताधीशांना वाटत आहे. सुदानमध्ये महिलांनी क्रांती घडविली असून, आपल्या न्याय्य-हक्कांसाठी त्यांनी कंबर कसली आहे, हे नक्की.

परंपरागत पांढऱ्या रंगाचा खास सुदानी पेहराव आणि कानात चंद्राच्या आकारातील सोन्याची भली मोठी रिंग घातलेली २२ वर्षांची अला सालेह सध्या सुदानी जनतेच्या असंतोषाचे प्रतीकच बनली आहे. सुदानची राजधानी खार्टुममध्ये मोटारीच्या टपावर उभारून घोषणा देत लष्करी सत्ताधीश बशीर यांच्या पोलादी राजवटीला आव्हान देणाऱ्या सालेहचा फोटो एका सुदानी महिलेने टिपला आणि पाहता पाहता तो साऱ्या जगभर सोशल मीडियातून व्हायरल झाला. सुदानमधील क्रांतीचा ती आता चेहरा बनली आहे.

सुदानमधील ओमर अल बशीर यांच्या तीस वर्षांच्या राजवटीविरोधात निदर्शने करणारी सालेह जेव्हा लष्करी मुख्यालयासमोर मोटारीच्या टपावर उभारून अगदी ‘ग्रेसफूल डान्स’ करते, तेव्हा तिच्या घोषणांना शेकडो निदर्शक उत्स्फूर्तपणे तिला दाद देतात. अनेकांनी तिला चक्क राणीची उपमा बहाल केली आहे. अरबजगतात महिलांना आजही दुय्यम वागणूक दिली जाते. त्यांच्यावर अनेक बंधने आहेत. सुदानही त्याला अपवाद नाही. अशा वेळी सालेहच्या धाडसाचे जगभर कौतुक होत आहे.

तिच्या या धैर्यामुळे लाखो सुदानी महिलांना स्फूर्ती मिळाली आणि त्या बशीर यांच्या राजवटीविरुद्ध थेट रस्त्यावर उतरल्या. इंजिनिअरिंगचे शिक्षण घेतलेली सालेह नव्या पिढीचे प्रतिनिधित्व करते. लष्करी राजवटीविरुद्ध सुदानमध्ये सुरू झालेली निदर्शने सध्या निर्णायक टप्प्यावर पोहोचली आहेत.

गेल्या डिसेंबरमध्ये ब्रेडच्या किमती तिप्पट वाढल्याचे निमित्त घडले आणि सुदानी जनता रस्त्यावर उतरली. सुरुवातीला याकडे तीस वर्षांपासून निरंकुश सत्ताधीश असलेले बशीर यांनी डोळेझाक केली. मात्र, हळूहळू निदर्शनांचे लोण राजधानीपर्यंत येऊन धडकले. त्या वेळी त्यांना जाग आली. त्यांनी देशात आणीबाणी लागू केली. मात्र, लोकांनी केवळ महागाई कमी करून भागणार नाही, तर बशीर यांनी सत्तेतून पायउतार होण्याची मागणी केली.

२०११ मध्ये इजिप्तमधील ताहरीर चौकात झालेल्या क्रांतीप्रमाणेच आंदोलन आकाराला येऊ लागले. ‘सुदानी प्रोफेशनल्स असोसिएशन’च्या नेतृत्वाखाली लाखो लोक बशीर यांच्या राजीनाम्यासाठी रस्त्यावर उतरले. विशेष म्हणजे निदर्शकांमध्ये ७० टक्के महिला होत्या. याची दखल अखेर लष्कराला घ्यावी लागली. लष्करानेच हस्तक्षेप करीत बशीर यांना पदच्युत केले अन्‌ बशीर यांची हुकूमशाही राजवट गेल्या आठवड्यात संपुष्टात आली. लष्कराने ‘लष्करी परिषदे’कडे सूत्रे दिली आहे.

मात्र, आता निदर्शकांना हेदेखील मान्य नाही. लष्कराद्वारे बशीर मागच्या दाराने सत्ता हातात ठेवत असल्याचा त्यांचा आरोप आहे. सुदानची जनता आजही लोकशाही, महिलांचे हक्क, तरुणांना रोजगार यासाठी रस्त्यावर ठाण मांडून बसली आहे. लष्करासाठी हे सर्व अनाकलनीय असून, साऱ्या जगाचे लक्ष लागून राहिल्याने जनतेचे रोष, चिरडणेही त्यांना मुश्‍कील बनले आहे. अखेर लष्कराने गुरुवारी बशीर यांना अटक केली असून, कडक बंदोबस्तात घरात स्थानबद्ध केले आहे. त्यांच्यावर सुदानमध्येच खटला चालविण्यात येणार आहे.

२०११ मध्ये इजिप्तमधील निदर्शनांचे लोण साऱ्या अरब जगतात पसरले होते. इजिप्तमध्ये होस्नी मुबारक यांना जावे लागले. शेजारील सीरिया, लीबिया, येमेन, बहारिन, सौदी अरेबिया येथेही या अरब स्प्रिंगचे तीव्र पडसाद उमटले. अनेक सत्ताधीशांना पायउतार व्हावे लागले होते,  तर अनेकांना सवलती द्याव्या लागल्या. सुदानमधील क्रांतीच्या ठिणगीचे वणव्यात रूपांतर होणार नाही ना, २०११ मधील अरब स्प्रिंगचा दुसरा टप्पा सुरू होणार नाही ना, अशा अनेक सवालांनी अन्य देशांतील सत्ताधीशांनाही घेरले आहे. अन्य अरब देशांत काय होईल, हे आत्ताच सांगता येत नसले, तरी सुदानमध्ये खऱ्या अर्थाने महिलांनी क्रांती घडविली असून, आपल्या न्याय्य-हक्कांसाठी त्यांनी कंबर कसली आहे, हे नक्की.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Sudan Women Ala Saleh, Agitation