esakal | बामियान बुद्ध, नजीबउल्ला आणि... मी पाहिलेला अफगाणिस्तान
sakal

बोलून बातमी शोधा

Afghanistan

बामियान बुद्ध, नजीबउल्ला आणि... मी पाहिलेला अफगाणिस्तान

sakal_logo
By
सुधींद्र कुलकर्णी sudheenkulkarni@gmail.com

एखाद्या देशातल्या लोकांना आनंदी राहण्याची इच्छा असेल तर त्यासाठीची पहिली अट म्हणजे त्यांचा देश स्वतंत्र हवा. आक्रमण झालेले, ताब्यात घेतलेले किंवा परकी सत्तेखालील गुलाम राष्ट्र कधीही आनंदी राहू शकत नाही, त्याला प्रगतीचा आणि समृद्धीचाही स्पर्श होऊ शकत नाही. ''स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो मी मिळवणारच'', हा लोकमान्य टिळकांचा महामंत्र हे सर्व राष्ट्रांसाठी लागू होणारं सार्वकालीन सत्य आहे...पण सुखी, समृद्ध, प्रगतशील राष्ट्र घडवण्यासाठी आणखी एक अट आहे. त्या देशातले नागरिक - मग त्यांचा धर्म, वंश, जात, भाषा किंवा राजकीय विचारसरणी कोणतीही असो - एकजूट असायला हवेत. हेसुद्धा सर्व राष्ट्रांसाठी लागू होणारं सार्वकालीन सत्य आहे.

आपला सांस्कृतिक शेजारी असलेल्या अफगाणिस्तानचं हे दुर्दैव आहे की, गेल्या चार दशकांपासून अंतर्गत एकता आणि परकी हस्तक्षेपापासूनच्या स्वातंत्र्यानं या देशापासून काडीमोड घेतला होता. त्यांनी सोव्हिएत महासंघ (१९७९- १९८९) आणि अमेरिका (२००१-२०२१) या दोन महासत्तांना पराभूत केलं हे खरं आहे; पण त्यांना अद्यापही देशांतर्गत एकता पाहिजे त्या प्रमाणात साध्य करता आलेली नाही. सध्या या देशात सुरू असलेल्या घडामोडींतून त्याचं प्रत्यंतर येतं. तालिबान आणि इतर सामाजिक-राजकीय शक्ती अफगाणिस्तानात लवकरच एक सर्वसमावेशक स्थिर सरकार स्थापन करतील व स्थैर्याचा आणि राष्ट्राच्या पुनर्बांधणीचा मार्ग खुला करतील, अशी आपण फक्त आशा करू शकतो.

सोव्हिएतयुद्धाच्या काळात मी अफगाणिस्तानला दोन वेळा भेट दिली आहे. सोव्हिएत महासंघाचा अखेरचा सैनिक ता. १५ फेब्रुवारी १९८९ ला काबूलमधून बाहेर पडला, त्या घटनेचं वार्तांकन करण्यासाठी ''द संडे ऑब्झर्व्हर''चा (तेव्हाचं हे लोकप्रिय साप्ताहिक आता प्रकाशित होत नाही) पत्रकार म्हणून मी अफगाणिस्तानला गेलो होतो, तीच माझी या देशाला दिलेली अखेरची भेट होती. मी पाहिलेला अफगाणिस्तान ही आधुनिकीकरणाचा ओंगळवाणा स्पर्श न झालेली, अद्वितीय सौंदर्य असलेली भूमी होती. इथले लोक साधे आणि मोठ्या मनाचे होते, भारताविषयी त्यांच्या मनात सदिच्छा आणि प्रगाढ मैत्रीची भावना होती. प्रथम भेटीतच मी अफगाणिस्तानच्या प्रेमात पडलो होतो आणि हे प्रेम - त्या देशातल्या नागरिकांच्या चांगल्या भविष्याच्या आणि दीर्घकालीन शांततेच्या भावनेसह - वाढतच गेलं आहे.

माझ्या दोन्ही दौऱ्यांच्या वेळी मला अफगाणिस्तानचे तत्कालीन अध्यक्ष डॉ. महंमद नजीबउल्ला यांना भेटण्याची संधी मिळाली. उंच, दणकट आणि त्या वेळी वयाच्या चाळिशीत असलेले नजीबउल्ला हे अत्यंत धाडसी, आत्मविश्वास असलेलं, प्रभावी व्यक्तिमत्त्व होतं. भारताचेही ते चांगले मित्र होते. अनेक अंतर्गत वाद आणि त्यांच्याच डावी विचारसरणी असलेल्या पक्षात जीवघेणा संघर्ष झाल्यानंतर ते १९८७ ला सत्तेवर आले होते. त्यांच्या पक्षाला सोव्हिएत महासंघाचं पाठबळ होतं. नजीबउल्ला हे पुरोगामी विचारांचे होते. इस्लामचा त्यांचा चांगला अभ्यास होता. त्यामुळेच राष्ट्रीय ऐक्य निर्माण करण्याच्या उद्देशानं त्यांनी इस्लामिक धर्मगुरू आणि टोळ्यांच्या म्होरक्यांशी संवाद साधण्याचा प्रयत्न केला होता. यात त्यांना काही प्रमाणात यशही मिळालं होतं. सोव्हिएत महासंघाच्या सैनिकांच्या माघारीलाही त्यांचं समर्थन होतं.

नजीबउल्ला यांच्या पक्षाला सत्तेत आणणाऱ्या ''क्रांती''ला दहा वर्षं पूर्ण झाल्यानिमित्त एप्रिल १९८८ मध्ये आयोजिलेल्या एका कार्यक्रमाला त्यांनी भारतीय चित्रपटसृष्टीतल्या अनेक प्रसिद्ध कलाकारांना निमंत्रण दिलं होतं. त्या शिष्टमंडळात फक्त दोन पत्रकारांचा समावेश होता - दिवंगत अरुण साधू आणि मी. सुनील दत्त यांच्या नेतृत्वाखाली नसिरुद्दीन शाह आणि त्यांची पत्नी रत्ना पाठक, शबाना आझमी आणि त्यांचे पती कवी-गीतकार व पटकथा-संवादलेखक जावेद अख्तर, ओम पुरी, सईद जाफरी आणि दिग्दर्शक सुभाष घई हे सर्व जण होते. आपले हे कलाकार जिथं जातील तिथं त्यांच्याभोवती अफगाणचाहत्यांचा सही मिळवण्यासाठी गराडा पडताना पाहून मी आश्चर्यचकित झालो होतो. भारतीय चित्रपट तिथं तेव्हा, आणि नंतरही, प्रचंड लोकप्रिय होते याचंच हे निदर्शक होतं.

नजीबउल्ला यांनी पाहुण्यांसाठी त्यांच्या निवासस्थानी स्वागतसमारंभ आयोजिला होता. त्यात गायिका फरीदा माहवाश यांच्यासह (त्यांची ओळख ''अफगाणिस्तानच्या लता मंगेशकर'' अशी करून देण्यात आली होती) अनेक गायकांनी हिंदी, फ़ारसी, दारी भाषेत गाणी म्हटली.

अफगाणिस्तानचा माझा दुसरा दौरा सन १९८९ मध्ये झाला होता. अफगाणिस्तानला अराजकतेत टाकत ता. ३१ ऑगस्ट २०२१ ला अमेरिकेचा अखेरचा सैनिक अफगाणिस्तानमधून बाहेर पडला. याउलट सोव्हिएत महासंघाची सैन्यमाघार शिस्तबद्ध होती. त्या वेळी खरोखरच एक नियोजित कार्यक्रम होऊन त्यात नजीबउल्ला आणि सोव्हिएतचे अधिकारी सहभागी झाले होते आणि सोव्हिएत सैनिकांनी अफगाण नागरिकांना पुष्पगुच्छही दिले होते. आणखी एक ठळकपणे जाणवणारा फरक आहे. अमेरिकेची सैन्यमाघार पूर्ण होण्याआधीच अफगाणिस्तानचे माजी अध्यक्ष अश्रफ घनी यांनी देश सोडून पलायन केलं. मात्र, सोव्हिएत सैन्य निघून गेल्यावरही नजीबउल्ला तीन वर्षं सत्तेत होते.

मी काबूलमधल्या गुरुद्वाराला भेट देत अफगाण शीख आणि हिंदूंबरोबर संवाद साधला. ता. १८ फेब्रुवारी १९८९ ला मी नजीबउल्ला यांची त्यांच्या अध्यक्षीय प्रासादात मुलाखत घेतली. अफगाणिस्तानच्या साहित्यपरंपरेचा सखोल अभ्यास असलेले नजीबउल्ला मुलाखतीदरम्यान प्रश्नांना उत्तरं देताना महान अफगाण कवींच्या ओळी उद्धृत करत होते. इथं जागेची कमतरता असल्यानं ते बोललेलं मला सगळंच सांगता येणार नाही. मात्र, त्यांनी दारी भाषेत सांगितलेल्या काही ओळी सांगतो : ''दार जादे हुमवर दा विदन होनाराश चिस्त? मारदोना दा विदन होनाराश दारखामोपेख अस्त." म्हणजेच, ''चांगल्या सरळ रस्त्यावरून चालण्यात काय कौशल्य आहे? खरं कौशल्य हे वळणावळणाच्या, अडथळे असलेल्या रस्त्यावरून चालण्यात आहे.'' सन १९९२ मध्ये मुजाहिदीनांनी त्यांचं सरकार उलथवून टाकलं. संयुक्त राष्ट्रांच्या काबूलमधल्याच कार्यालयात त्यांना आश्रय घ्यावा लागला. तिथंच ते चार वर्षं राहिले. त्यांना भारतात सुरक्षित आणण्यासाठी आपल्या सरकारचे प्रयत्न सुरू होते; पण ता. २७ सप्टेंबर १९९६ ला तालिबान्यांनी त्यांची क्रूर हत्या केली.

माझ्या या भेटीत मला एक अविस्मरणीय अनुभव आला. काबूलहून उत्तरेकडे असलेल्या ''मज़ार-ए-शरीफ'' या शहराकडे मी निघालो होतो. जगातल्या सर्वांत सुंदर मशिदींपैकी एक असलेली निळी मशीद याच ठिकाणी आहे. याच ठिकाणी प्रेषित महंमद पैगंबरांचे जावई आणि सहकारी हजरत अली यांची कबर आहे, असं अनेक मुस्लिमांचं मानणं आहे. काबूलहून आमचं विमान उडाल्यानंतर काही वेळातच, शेजारीच बसलेला माझा अफगाण गाईड आणि दुभाष्या मला म्हणाला : "ती पाहा, खाली प्रचंड मोठी मूर्ती." मला खिडकीतून फिकट विटकरी रंगाचे उजाड पर्वत आणि त्यांत खोदलेल्या गुहा दिसत होत्या. मात्र, त्या उंचीवरून मूर्ती जेमतेमच दिसत होती.

मी गाईडला विचारलं: "कुणाची मूर्ती आहे?" अत्यंत अभिमानानं त्यानं उत्तर दिलं : "हा बामियान बुद्ध आहे, जगातील सर्वांत उंच बुद्धमूर्ती."

मी मग त्याला विचारलं : "तू तर मुसलमान आहेस. तुमचा देशही मुस्लिमबहुल आहे. तुमची धर्मभावना मूर्तिपूजेला मान्यता देत नाही. मग, मी ती मूर्ती पाहावी, असं तुला का वाटलं?"

तो म्हणाला : "खरंय, आम्ही निष्ठावंत मुस्लिम आहोत; पण आम्हाला अफगाणिस्तानच्या इस्लामपूर्व इतिहासाचा अभिमान आहे. आमच्या देशात इस्लाम येण्याआधीपासून इथं बौद्ध धर्म होता. बामियान बुद्ध हा आमच्या राष्ट्रीय ठेव्याचा बहुमोल असा भाग आहे."

शहाणपणाचे हे शब्द अनेक मुस्लिम देशांमधल्या, भारतातल्याही समस्येच्या मुळावर घाव घालणारे आहेत. मुस्लिमांनी फक्त इस्लामिक वारशाचा अभिमान बाळगावा की इस्लामपूर्व, इस्लामनंतरच्या बिगरइस्लामिक वारशाबद्दलही अभिमान बाळगावा?

सन १९९६ मध्ये सत्ता हाती आलेल्या तालिबाननं त्यांचा तत्कालीन म्होरक्या मुल्ला महंमद उमर याच्या आदेशावरून मार्च २००१ मध्ये ती बामियान बुद्धमूर्ती स्फोटकांच्या साह्यानं उडवून दिली. असं करून त्यांनी मानवतेच्या विरोधात मोठा गुन्हा केला. तालिबान आता पुन्हा सत्तेत आले आहेत. या वेळी त्यांच्यात बदल झाला आहे का? आपल्याला वाट पाहावी लागेल. मात्र, त्यांनी त्यांचं धर्मांध वर्तन थांबवलं नाही तर अफगाण जनताच त्यांच्या विरोधात उभी ठाकत त्यांना सत्तेवरून खाली खेचेल, याबाबत माझ्या मनात कोणतीही शंका नाही.

(सदराचे लेखक ज्येष्ठ पत्रकार-विचारवंत असून, ''फोरम फॉर न्यू साऊथ एशिया’ या संस्थेचे संस्थापक आहेत.)

(अनुवाद : सारंग खानापूरकर)

loading image
go to top