esakal | इस्रायली तरुणावरची भारतीय छाप!
sakal

बोलून बातमी शोधा

Yousef Haddad and Yaakov Finkelstein

इस्रायली तरुणावरची भारतीय छाप!

sakal_logo
By
सुधींद्र कुलकर्णी sudheenkulkarni@gmail.com

राजकीय संबंध, वैचारिक भावना आणि दोन देशांमधील संबंध यांच्यापेक्षा मानवी नाती फार श्रेष्ठ असतात. आपण ज्या वेळी माध्यमांमध्ये किंवा खासगी गटांमध्ये राजकीय किंवा आंतरराष्ट्रीय संबंधांबाबत चर्चा करतो, त्या वेळी मानवी घटकाकडे सहसा दुर्लक्ष केलं जातं. एकमेकांमधील वाद आणि मतभेदांच्याही पलीकडे जाऊन, आपण सर्वजण मानवच आहोत, या सत्याचा आपल्याला विसर पडतो. याचं कारण म्हणजे, बहुतेक सर्व राजकीय चर्चांमध्ये मानवी मनाचा विचार होतो, मानवी हृदयाचा नाही. ज्या वेळी फक्त मनांचा संवाद होतो, त्या वेळी वादांना धार चढते. मात्र, ज्या वेळी त्या संवादात हृदयाचाही सहभाग असतो, त्याच्याकडून मनाच्या चांगल्या संकल्पनांना पाठबळ मिळतं, त्या वेळी प्रेम, एकता, आपुलकी, सामंजस्य आणि सहकार्य यांचा प्रभाव वाढतो. आयुष्य जगताना केवळ तर्कशुद्ध विचारांचा आणि संकल्पनांचाच आधार घेतल्यास ते द्वेषभावनांचं आणि पूर्वग्रहदूषित मतांचं एक वाळवंट ठरेल आणि या वाळवंटात अविरत संघर्षाचं वातावरण असेल. सुदैवानं, मनुष्याला संवादाच्या मूल्याचा अगदीच विसर पडलेला नाही. आपला ज्यांच्याबरोबर वाद आहे, त्यांच्याशी हृद्य संवाद साधल्यास अनपेक्षित परिणाम साधला जाऊ शकतो. सगळेच वाद काही मिटणार नाहीत; पण दोघांना जोडणारा एक समान मानवी धागा आपल्याला गवसू शकतो. महान जर्मन कवी गटे याचं एक वाक्य आहे : ‘मित्रा, सर्व गृहीतकं ही काळ्या-करड्या रंगाची आहेत. आयुष्याचा वृक्ष मात्र सदाहरित आहे.’

हे सर्व मी तुम्हाला का सांगत आहे? ‘इस्राईलचे दोन चेहरे’ हा माझा लेख या सदरात गेल्या वेळी (२३ मे) प्रसिद्ध झाला होता. त्याच्यावर टीकेच्या आणि समर्थनाच्या बऱ्याच तीव्र प्रतिक्रिया व्यक्त झाल्या. पॅलेस्टाइन-इस्राईल संघर्षाचं वादग्रस्त स्वरूप पाहता, अशा प्रतिक्रिया अपेक्षितच होत्या. इस्राईलच्या वर्तणुकीबाबतच्या माझ्या टिपण्णीवर नाराजी व्यक्त करणाऱ्या व्यक्तींमध्ये त्या देशाचे मुंबईतील वाणिज्य दूत याकोव्ह फिंकलस्टाइन यांचाही समावेश होता. (जगातील सर्वांत सक्रिय राजनैतिक अधिकाऱ्यांमध्ये इस्राईलच्याही काही अधिकाऱ्यांचा समावेश आहे). कोरोनापूर्व काळात त्यांच्याबरोबर झालेल्या मैत्रीपूर्ण संवादाचा अनुभव असल्यानं, दूरध्वनीवरील आमच्या संभाषणात आम्ही एकमेकांना प्रत्यक्ष भेटण्याची आणि एकमेकांची मतं अधिक चांगल्या प्रकारे समजून घेण्याची इच्छा व्यक्त केली. लोअर परळ भागातील त्यांच्या कार्यालयातून जुन्या ‘गिरणगावा’चा आणि आता गगनचुंबी इमारतींच्या जंगलात परिवर्तित झालेल्या भागाचा चांगला नजारा दिसतो.

आश्‍चर्याची बाब म्हणजे, त्यांनी त्यांच्या कार्यालयातील एका सहकाऱ्याला, जो अरब आणि मुस्लिम होता, चर्चेत सहभागी करून घेतलं. ‘मी ज्यू आहे आणि हा अरब आहे; पण आम्ही दोघंही इस्रायली आहोत. आमच्या देशाचे नागरिक म्हणून दोघांनाही समान अधिकार आणि जबाबदाऱ्या आहेत...’ त्यांच्या या निवेदनाला त्यांच्या सहकाऱ्यानंही अनुमोदन दिलं. एका इस्रायली अरब व्यक्तीला आयुष्यात प्रथमच भेटत असल्यानं मी आनंदीही होतो आणि उत्सुकही होतो. इस्राईलच्या एकूण लोकसंख्येत अरबांची संख्या २० टक्के, म्हणजे सुमारे एक कोटी आहे हे फार कमी भारतीयांना माहीत असेल. यातील जवळपास सगळेच मूलनिवासी, म्हणजेच पॅलेस्टिनी अरब आहेत. कारण, १९४८ पूर्वी केवळ पॅलेस्टाईनच होता, इस्राईलचं अस्तित्वच नव्हतं. त्यांना इस्लाम आणि ख्रिस्ती अशा दोघांचा वारसा आहे.

फिंकलस्टाईन आणि त्यांच्या सहकाऱ्यानं मला सांगितलं : ‘आमचा लढा पॅलेस्टिनी नागरिकांशी नाही. आम्ही ‘हमास’च्या विरोधात आहोत, ती एक दहशतवादी संघटना आहे. पॅलेस्टिनी आणि इतर अरबांसह शांततेनं राहण्याची आमची इच्छा आहे. द्विराष्ट्र संकल्पनेला इस्राईल सरकारचा पाठिंबा आहे; पण ‘हमास’ला हे नको आहे. त्यांना इस्राईलचा विनाश घडवून आणायचा आहे.’’ त्यांच्याबरोबरील संवादातून आमच्यातील सर्वच मतभेद दूर झाले नाहीत, आणि मतभेदांवरून वाद घालण्यासाठी मीदेखील तिथं गेलो नव्हतो; पण तिथून मी समाधानानं बाहेर पडलो. बऱ्याच काळानंतर मी माझ्या जुन्या मित्राला भेटलो होतो, त्याहूनही अधिक म्हणजे, एका गुंतागुंतीच्या समस्येमधील परस्परांना पटणारे काही समान मुद्दे आम्हाला सापडले. मात्र, यानंतर जे घडलं त्यामुळे मला आश्‍चर्याचा सुखद धक्का बसला.

काही दिवसांनंतर फिंकलस्टाईन यांनी माझ्याशी संपर्क साधला आणि म्हणाले : ‘‘मी इस्राईलमधील माझ्या एका जवळच्या मित्राशी तुमची ओळख करून देऊ इच्छितो. तुम्ही इस्रायली अरब अधिकाऱ्याला, जो मुस्लिम होता, भेटला होतात. माझा मित्र योसेफ हद्दाद हा इस्रायली अरब असून तो ख्रिश्‍चन आहे. माझ्याप्रमाणेच त्यानंही इस्राईलच्या सैन्यात काम केलं आहे. तो सध्या इस्राईलमधील अरब आणि ज्यू समुदायांमध्ये बंधुत्वभाव घट्ट करण्याचं अप्रतिम काम करतो आहे. त्याच्यासारख्या लोकांची भूमिका भारतीय माध्यमांमधून व्यक्त होणं आवश्‍यक आहे.’’

मी योसेफला फोन केला. कलाटणी देणारा भारताचा प्रभाव त्याच्या आयुष्यावर असल्याचं मला आमच्या दीर्घ संभाषणानंतर जाणवलं. तो ३५ वर्षांचा आहे. इस्राईलमधील सर्वांत मोठं बंदर असलेल्या हैफा या शहरात तो राहतो. इस्राईलमधील अरबांना सैन्यात सेवा करण्याची सक्ती नाही. मात्र, योसेफ वयाच्या १८ व्या वर्षी स्वत:हून सैन्यात दाखल झाला. सन २००६ मध्ये इस्राईल आणि ‘हिज्बुल्ला’ यांच्यात झालेल्या दुसऱ्या लेबनॉनयुद्धात एका क्षेपणास्त्रहल्ल्यात हद्दाद याला एक पाय गमवावा लागला.

योसेफ म्हणाला : ‘माझा पाय तुटलेला मी पाहिला. शस्त्रक्रियेनंतर चार दिवसांनी मला शुद्ध आली. पाय जागेवर आहे की नाही हे मी पाहिलं. पाय जागेवरच होता, फक्त बऱ्याचशा लोखंडी पट्ट्यांनी तो जोडलेला होता.’’

योसेफ पुन्हा धडपणे चालू शकेल की नाही याबाबत डॉक्टरांना शंका होती.

‘मी फुटबॉल खेळणार आहे, असं मी त्यांना सांगितलं. एका वर्षानंतर फुटबॉल पायानं लाथाडतच मी त्यांच्या रुग्णालयात प्रवेश केला,’’ योसेफ म्हणाला.

आपल्या हातून काहीतरी चांगलं घडणं अपेक्षित आहे असं त्याला या घटनेनंतर वाटलं.

‘तुम्ही मृत्यूपासून २० ते ३० मिनिटांच्या अंतरावर असाल तर, आयुष्यात आता काय करायचं आहे याचा तुम्ही विचार करता. मला जग जिंकायचे होतं,’’ त्या अनुभवानंतर मनात आलेले विचार योसेफनं सांगितले.

योसेफनं एका अर्थी जग जिंकलंच आहे. तो इस्राईलमधील एका तंत्रज्ञान कंपनीत काम करतो आणि आपल्या क्षेत्रात भरपूर यश आणि पैसा त्यानं मिळवला आहे; पण कशाची तरी कमतरता त्याला भासत होती. आयुष्यात तो सुखी नव्हता. सन २०१७ मध्ये तो भारतात आला आणि त्याचं आयुष्य बदलून गेलं.

अनेक इस्रायली युवक-युवती, विशेषत: त्यांचं सक्तीचं लष्करी प्रशिक्षण पूर्ण झाल्यानंतर भारतात येतात. आयुष्यात न गवसलेलं ‘काही तरी’ इथं शोधण्याचा ते प्रयत्न करतात. अनेक जण इथल्या स्वयंसेवी संस्थांमध्ये काम करण्यासाठीही येतात. आलेल्यांपैकी बहुतेक सर्व जण काही वेळ तरी हिमालयात व्यतीत करतात. ‘उत्तर भारतात मी व्यतीत केलेले चार महिने अविस्मरणीय होते,’ असं योसेफनं मला सांगितलं.

तो म्हणाला : ‘‘मला आलेला एक अनुभव आहे. तो तुम्हाला सांगितलाच पाहिजे. मी हिमाचल प्रदेशातील मनाली इथं होतो, तेव्हा मला गिर्यारोहणाला एकट्याला जायचं होतंं; पण स्थानिक भाषा अवगत नसल्यानं एका गाईडची मात्र गरज होती. यासाठी मी ज्या कंपनीशी संपर्क साधला होता तिनं मला एक तंबू, एक गाईड आणि जेवण तयार करण्यासाठी एक स्वयंपाकी पुरवला. हा स्वयंपाकी वृद्ध होता. हसतमुख. तो रुचकर स्वयंपाक करायचा. रोज सकाळी तो मला अत्यंत नम्रतेनं, ‘मिस्टर, मिस्टर, चाय...’ अशा हाका मारून उठवत असे. त्यानंतर तो दुसऱ्या दिवशीच्या ट्रेकसाठी आम्हाला तयार करत असे आणि त्या नव्या ठिकाणी तंबूसह हजर होत असे.

त्या वृद्धाच्या व्यक्तिमत्त्वाची माझ्यावर खूपच छाप पडली होती आणि मला स्वत:ची थोडी लाजही वाटत होती. या वृद्ध व्यक्तीकडून, जी माझ्या आजोबांच्या वयाची आहे, मी स्वत:ची सेवा करवून घेत होतो. माझ्या ट्रेकच्या अखेरच्या संध्याकाळी तो वृद्ध मला म्हणाला : ‘‘उद्या आम्ही परत जाणार असल्यानं मी तुमच्यासाठी विशेष भोजन तयार केलं आहे. जेवण झाल्यानंतर एक वाद्य हातात घेत त्यांनी माझ्या सन्मानार्थ एक गाणं म्हणायला सुरुवात केली. मला त्या गाण्याचा अर्थ समजला नाही; पण त्यानं माझं मन हेलावून टाकलं.’’

‘याच क्षणी एक अस्वस्थ करणारा विचार माझ्या मनात विजेसारखा प्रकटला. मी स्वत:ला म्हटलं,‘हा एक वृद्ध माणूस आहे, अत्यंत साधा आणि फार कमी गरजा असलेला. तो फारसा शिकलेलाही नाही. तरीही तो किती आनंदी आहे आणि माझ्यासारख्या अनोळख्या व्यक्तीलाही आनंदी करत आहे. मी त्याच्यासारखा आनंदी का नाही? माझ्याकडे प्रचंड पैसा आहे, इस्राईलमध्ये माझ्या घरी एक मर्सिडीज आहे, महागडी घड्याळे मी वापरतो; पण या सर्व गोष्टी असूनही मला आनंद मिळत नाही. माझ्या आयुष्यात कशाची तरी कमतरता आहे. त्या वृद्ध व्यक्तीनं माझं आयुष्य बदलवून टाकलं. मी ज्या वेळी इस्राईलमध्ये परतलो तेव्हा मी नोकरी सोडून दिली. ज्यामुळे आयुष्य अर्थपूर्ण होईल असं काही तरी करण्याचा मी निर्णय घेतला. माझ्या नव्हे तर, दुसऱ्यांच्या आनंदासाठी काम करण्याची माझी इच्छा होती, तसंच अनेक अंतर्गत समस्यांनी वेढलेल्या इस्रायली समाजात सुधारणा करण्यासाठीही मला काही तरी करायचे होतं. मग मी ‘टुगेदर - व्हाऊच फॉर इच अदर’ या संस्थेची स्थापना केली.’’

त्याच्या या संस्थेत ज्यू-ख्रिश्‍चन-मुस्लिम यांच्यासह द्रूझ समुदायाच्या (सीरिया आणि लेबनॉनमध्ये हे लोक मोठ्या संख्येनं राहतात) लोकांचा समावेश आहे. योसेफच्या म्हणण्यानुसार, ‘ज्यू आणि इतर धर्मीयांमधील अविश्‍वासाची दरी कमी करणं आणि अरब, इस्रायली नागरिकांना इस्राईलच्या समाजात अधिक चांगल्या पद्धतीनं मिसळण्यासाठी मदत करणं हे या संस्थेचं ध्येय आहे.’ अशा प्रकारच्या समरसतेची आवश्‍यकता असण्याची काही कारणं आहेत. आर्थिक स्थिती, रोजगाराच्या संधी आणि शिक्षण यांमध्ये इस्राईलमधील अरब जनता ज्यू नागरिकांच्या तुलनेत बरीच मागं आहे. अरब-इस्राईल या दीर्घकालीन संघर्षामुळे काही इस्रायली अरबांचा सरकारबाबतचा दृष्टिकोन नकारात्मक आहे. नुकत्याच झालेल्या इस्राईल-पॅलेस्टाइन संघर्षात इस्राईलमध्येच ज्यू आणि अरब नागरिकांमध्ये हिंसक वाद झाला होता. इस्रायली ज्यूंमध्येही, ॲश्‍केनाझी ज्यू (पश्‍चिम युरोपातून आलेले) आणि मिझराही ज्यू (पश्‍चिम आशियातून आणि उत्तर आफ्रिकेतून आलेले) यांच्यातही श्रेष्ठ-कनिष्ठ भाव आहे. ॲश्‍केनाझी ज्यू हे अधिक श्रीमंत असून त्यांना त्यांच्या पाश्‍चिमात्य मूल्यांचा अभिमान असतो, तर मिझराही ज्यू हे स्वत:ला देशाशी अधिक जोडलेले असल्याचं समजतात, त्यांना कधी कधी अरबही समजलं जातं.

योसेफ म्हणाला : ‘‘आम्ही, ‘टुगेदर- व्हाऊच फॉर इच अदर’ मधील सर्वजण बदल घडवून आणण्याचं माध्यम बनण्याची प्रतिज्ञा घेतो. आमच्या विविध वंशामध्ये, विविध धर्मांमध्ये आणि आमच्या इस्रायली अस्मितेबाबत कोणताही मतभेद आहे, यावर आमचा विश्‍वास नाही. इस्राईल हा लोकशाहीदेश असून सर्व नागरिक समान आहेत.’’

नावाप्रमाणेच, ही संस्था एकमेकांना मदत करून विविधतेतही सौहार्द निर्माण करण्यासाठी कटिबद्ध आहे. ‘एकमेकां साहाय्य करू, अवघे धरू सुपंथ!’

मी माझ्या मनाशी विचार केला : ‘योसेफनं कदाचित संत तुकाराममहाराजांबाबत काही ऐकलं नसेल; पण तो त्यांच्या शिकवणुकीचं पालन करण्याचा निश्‍चितच प्रयत्न करत आहे....’

‘तू तुझी जीवनकथा लिहून काढायला हवीस. खूपच वाचनीय पुस्तक तयार होईल. जागतिक दर्जाचा चित्रपटही तयार होऊ शकतो,’ मी योसेफला म्हटलं. तो मनापासून हसला आणि म्हणाला : ‘‘ भारताचा माझ्या आयुष्यावर फार खोल ठसा उमटला आहे. माझा नुकताच साखरपुडा झाला आहे. मी आणि माझ्या वाग्दत्त वधूनं मधुचंद्रासाठी भारतातच येण्याचा निर्णय घेतला आहे.’’

योसेफबरोबर झालेल्या चर्चेनंतर माझी पुन्हा एकदा खात्री पटली की, इस्राईल-पॅलेस्टाइन वाद ही मानवनिर्मित आपत्ती आहे. या समस्येमागील राजकारण आपण समजून घेणं आवश्‍यक असून, कोण चूक आणि कोण बरोबर हे सांगायचं धाडस बाळगायला हवं; पण फक्त यामुळे समस्या सुटण्यास मदत होणार नाही. जगाच्या हे लक्षात यायला हवं की, अरब आणि ज्यू या दोघांनाही या अंतहीन शोकान्तिकेचा फटका बसतो आहे आणि दोघांनाही मदतीची, संकटातून बाहेर येण्याची गरज आहे. शांततेत आणि स्वातंत्र्यात राहण्याचा, न्यायानं आणि आदरपूर्वक जगण्याचा दोघांनाही वैध हक्क आहे; पण हे फक्त पॅलेस्टाईन-इस्राईल संघर्षाबाबतच खरं आहे का? तोडगा काढावा यासाठी हृदयापासून आक्रोश करणाऱ्या काश्‍मीरसह जगभरात इतरही अनेक संघर्ष नाहीत का?

(अनुवाद : सारंग खानापूरकर)