पोप फ्रान्सिस यांच्या भारतप्रवासाला मोदी परवानगी का देत नाहीत?

पोप पदावरील व्यक्तीसाठी व्हॅटिकनमध्ये राखीव असलेल्या महालात न राहता वास्तव्यासाठी एका सामान्य घराची निवड करून त्यांनी सर्वांसमोर एक आदर्श प्रस्थापित केला आहे.
Pope Francis
Pope FrancisSakal

मी रोममध्ये बसून हे सदर लिहीत आहे. जागतिक शांततेसाठी आयोजित केलेल्या जागतिक आंतरधर्मीय परिषदेत भाषण करण्यासाठी मी इथं आलो आहे. या परिषदेतल्या प्रमुख वक्त्यांमध्ये पोप फ्रान्सिस, इजिप्तमधील अल अझर या जगातल्या अत्यंत प्रतिष्ठेच्या मशिदीचे शाही इमाम शेख अहमद महंमद अल तैय्यब, जर्मनीच्या मावळत्या चॅन्सलर अँजेला मर्केल, इटलीचे पंतप्रधान मारिओ द्राघी आणि जगभरातील विविध धार्मिक नेते आणि विचारवंत यांचा समावेश होता. दरवर्षी युरोपमधल्या विविध शहरांमध्ये आयोजित केल्या जाणाऱ्या या परिषदेत माझा कायम सहभाग असतो. याच परिषदेत भाषण करण्यासाठी पश्‍चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनाही निमंत्रण देण्यात आलं होतं. त्यांनी मोठ्या उत्साहात हे निमंत्रण स्वीकारत रोमला येण्याची तयारीही केली होती. मात्र, नरेंद्र मोदी सरकारनं परराष्ट्र मंत्रालयाला हाताशी धरत त्यांना परवानगी नाकारली. ‘राज्याच्या मुख्यमंत्र्यांच्या सहभागासाठी ही परिषद अनुरूप नाही,’ असं कारण त्यांना सांगण्यात आलं.

खरं कारण अर्थातच वेगळं होतं : जागतिक व्यासपीठावर इतर कोणत्याही भारतीय नेत्याला स्थान मिळू नये, ती जागा फक्त आपल्यासाठीच राखीव आहे, असं मोदींना वाटतं. मोदी हे गुजरातचे मुख्यमंत्री असताना तत्कालीन ‘यूपीए’ सरकारनं त्यांना कधीही ‘व्हायब्रंट गुजरात’साठी विविध देशांचे अध्यक्ष, पंतप्रधान आणि प्रांतांच्या प्रमुखांना निमंत्रित करण्यापासून रोखलं नव्हतं, हे लक्षात घ्यायला हवं. तसंच, गुजरातचे मुख्यमंत्री म्हणून ते जपानचे तत्कालीन पंतप्रधान शिंझो ॲबे यांना भेटण्यासाठी टोकियोला गेले होते, त्यावेळी त्यांना कोणी अडवलं नव्हतं.

रोममधली ही परिषद ‘कम्युनिटी ऑफ सँटाजिडिओ’ या संघटनेनं आयोजित केली होती. विविध धर्मांमध्ये संवाद घडवून आणणं, शांततेचा प्रचार करणं आणि संघर्षावर तोडगा काढण्यासाठी जगभरात विविध कार्यक्रम राबवणं, अशी कामं गेल्या तीस वर्षांपासून करणारी ही एक प्रतिष्ठित संघटना आहे. या संघटनेला पोप फ्रान्सिस यांचं पाठबळ आहे.

‘युरोपातील महान योगी’ अशी ज्यांची खुद्द महात्मा गांधीजींनी स्तुती केली होती, ते सेंट फ्रान्सिस (जन्म ११८२ - मृत्यू १२२६) हे या संघटनेचे प्रेरणास्थान आहेत. हिंदू धर्माचा प्रतिनिधी म्हणून या परिषदेत दरवर्षी सहभागी होणारा वक्ता या नात्यानं मी, भारताच्या प्राचीन ‘सर्व धर्म समभावा’च्या परंपरेचा तसंच, सर्व संस्कृतींच्या आणि समुदायांच्या लोकांमध्ये भेदाभेद न करता त्यांचं भलं इच्छिण्याचा विचार जगभरातील श्रोत्यांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न केला. एक बाब

माझ्या लक्षात आली की, पोप फ्रान्सिस हे, २०१३ मध्ये या पदावर आल्यापासून, याच संदेशाचा प्रसार करत आहेत. मानवजातीसमोर सध्या असलेल्या सर्व महत्त्वाच्या प्रश्‍नांवर सातत्यानं आणि तळमळीनं बोलणारे आघाडीचे धार्मिक नेते म्हणून त्यांची जगभरात ओळख निर्माण होत आहे. गरीबी, श्रीमंत-गरीब यांच्यातली दरी, पर्यावरणाचा प्रश्‍न आणि धरणीमातेला वाचविण्याची निकड, युद्ध आणि संघर्षांना विरोध, युरोपमधला आणि जगात इतरत्र असलेला निर्वासितांचा प्रश्‍न, अशा अनेक मुद्द्यांना त्यांनी हात घातला आहे.

जागतिक पातळीवरील गरीबीविरोधातील मोहीम आणि आर्थिक असमानतेविरोधात आवाज उठवण्यास पोप फ्रान्सिस यांनी आपल्या कार्यकाळात सर्वोच्च प्राधान्य दिलं आहे. ‘जगातील गरीबी हा एक मोठा गैरव्यवहार आहे,’ असं त्यांचं म्हणणं आहे. ते म्हणतात,‘‘प्रचंड संपत्ती असलेल्या आणि प्रत्येकाचं पोट भरण्याइतपत स्रोत उपलब्ध असलेल्या या जगात, कितीतरी उपाशी मुलं आहेत आणि किती तरी मुलं शिक्षणापासून वंचित आहेत. हे खरोखरच अनाकलनीय आहे.’’ एखाद्या धर्माचं जगातील सर्वांत श्रीमंत सत्ताकेंद्र असलेल्या व्हॅटिकनमध्ये होणाऱ्या कार्यक्रमांमधील भपकेबाजपणा आणि ऐश्‍वर्याची उधळण कमी करण्यात पोप यांना अद्याप यश आलेलं नाही, हे वास्तव आहे.

मात्र, पोप पदावरील व्यक्तीसाठी व्हॅटिकनमध्ये राखीव असलेल्या महालात न राहता वास्तव्यासाठी एका सामान्य घराची निवड करून त्यांनी सर्वांसमोर एक आदर्श प्रस्थापित केला आहे. म्हणूनच त्यांना गरिबांचे पोप’ असंही म्हटलं जातं. संपत्तीचा आणि भौतिक गोष्टींचा हव्यास हा ‘समाजाला झालेला कर्करोग आहे,’ असा इशारा त्यांनी दिला आहे. ‘यातूनच निष्फळता, अहंकार आणि गर्वाचा जन्म होतो. मानव आणि निसर्ग हे संपत्तीचे दास नसावेत. त्यामुळेच, जिथे सेवेऐवजी संपत्तीची सत्ता असते, अशा निवडकांसाठीच्या आणि असमानता निर्माण करणाऱ्या अर्थव्यवस्थेला आपण नकार देऊया. अशी अर्थव्यवस्था नाशाकडे नेणारी आहे. ही अर्थव्यवस्था भेदभाव करते. ही अर्थव्यवस्था पृथ्वीला नष्ट करते. अर्थव्यवस्थेला जनतेच्या सेवेत रुजू करणे, हे पहिले लक्ष्य आहे,’ असं पोप यांचं म्हणणं आहे. ‘गरज आणि हाव’ याबाबत गांधीजींनी दिलेल्या इशाऱ्याची आठवण करून देणारं विधान पोप करतात : ‘आपल्या उत्पादनांची विक्री करण्यासाठी आत्यंतिक उपभोगवादाचा वापर करण्यास बाजारपेठांनी सुरुवात केल्यापासून, अनावश्‍यक गोष्टी खरेदी करण्याच्या आणि खर्च करण्याच्या चक्रात लोक सहजासहजी अडकत आहेत.’

पर्यावरणाच्या ऱ्हासापासून पृथ्वीचे संरक्षण करण्यासही पोप फ्रान्सिस यांनी प्राधान्य दिलं आहे. २०१५ मध्ये पॅरिस पर्यावरण परिषदेच्या पूर्वसंध्येला त्यांनी, ‘आपल्या सामुदायिक घराच्या निगराणीबाबत...’ या नावानं एक महत्त्वपूर्ण निवेदन प्रसिद्ध केलं. जागतिक तापमानवाढीचा जगभरातील अत्यंत गरीब व्यक्तींवर आणि दुर्लक्षित घटकांवर कसा दुष्परिणाम होतो आहे, यावर त्यांनी यात भर दिला आहे. जगभरातील राजकीय नेते आणि अर्थसत्तांच्या सद्‌सद्‌विवेकबुद्धीला आवाहन करत त्यांनी, ‘जगातील गरीब आणि पृथ्वी या दोघांचीही वेदना ऐकता यावी यासाठी पर्यावरणासंदर्भातील चर्चांमध्ये समान न्यायाबाबतच्या प्रश्‍नांचाही अंतर्भाव करावा,’ अशी मागणी केली होती.

पोप फ्रान्सिस यांनी फेब्रुवारी २०१९ मध्ये आणखी एक धाडसी पाऊल उचललं. ख्रिश्‍चन आणि मुस्लिम यांच्यातले संबंध सुधारण्यासाठी त्यांनी संयुक्त अरब अमिरातीचे सुधारणावादी युवराज शेख महंमद बिन झायेद यांच्या निमंत्रणावरून अबुधाबीला भेट दिली. अरब देशाला भेट देणारे ते पहिलेच पोप ठरले. ‘अल अझर’चे शाही इमाम अहमद अल तैय्यब यांच्यासह एका आंतरधर्मीय परिषदेत सहभागी होत त्यांनी मार्गदर्शनही केलं. हिंदू धर्माचा प्रतिनिधी म्हणून मला या परिषदेत सहभागी होण्याची संधी मिळाली होती. या परिषदेत मी महात्मा गांधी यांच्या विचारांवर भाषण केलं होतं. ख्रिश्‍चन आणि इस्लामिक समुदायाच्या दोन महत्त्वाच्या नेत्यांनी सर्व जाती-धर्म, समुदाय, वंश, देश, संस्कृतीमधल्या मानवजातींना जागतिक शांतता आणि बंधुता यासाठी संयुक्तपणे आवाहन केलं. धर्माच्या नावाखाली पोसला जाणारा द्वेष, कट्टरतावाद आणि दहशतवाद यांचाही त्यांनी तीव्र शब्दांत निषेध केला होता.

पोप फ्रान्सिस यांना असिसी इथं मी २०१६ मध्ये भेटलो होतो, त्यावेळी मी त्यांना म्हणालो,‘‘तुम्ही तुमच्या प्रेम आणि शांततेचा संदेशप्रचारासाठी जगभरातल्या अनेक देशांमध्ये जाता. तुम्ही अमेरिकेला भेट दिली आहे, तशीच कम्युनिस्टांची राजवट असलेल्या क्युबालाही भेट दिली आहे. तुम्ही आतापर्यंत भारतात का नाही आलात? बुद्धांच्या आणि महात्मा गांधींच्या या भूमीला तुम्ही नक्कीच भेट द्यायला हवी.’’ त्यांच्या चेहऱ्यावर हसू उमटलं, त्यांनी प्रेमानं माझा हात हातात घेतला आणि म्हणाले,‘‘ होय, मला देखील भारतात यावंसं वाटतं. तुमच्या देशात येण्याची माझी तीव्र इच्छा आहे.’’ मी नंतर याच मुद्द्यावर भारतातील कॅथोलिक चर्चच्या प्रमुख व्यक्तींबरोबर चर्चा केली. त्यांनी सांगितलं,‘‘ पोप हे व्हॅटिकन देशाचे प्रमुख असल्यानं, आपल्या देशात येण्यासाठी त्यांना भारत सरकारकडून निमंत्रण जाणं आवश्‍यक आहे. आम्ही सरकारला अनेक वेळा याबाबत विनंती केली, पण दुर्दैवानं प्रत्येकवेळी आमच्या पदरी निराशा पडली.’’

हतबलतेनं मी अनेकदा स्वत:लाच प्रश्‍न विचारतो - ‘‘पोप फ्रान्सिस यांना बौद्ध बहुसंख्य असलेला श्रीलंका २०१५ मध्ये निमंत्रण देऊ शकतो, २०१७ मध्ये मुस्लिमबहुल बांगलादेश निमंत्रण देऊ शकतो, तर धर्मनिरपेक्ष आणि हिंदुबहुल असलेल्या भारताला त्यांना का निमंत्रण देण्यात काय अडचण आहे?’’ अटलबिहारी वाजपेयी हे २००० साली इटलीला गेले असताना, त्यांनीही व्हॅटिकनला जाऊन तत्कालीन पोप जॉन पॉल द्वितीय यांची भेट घेतली होती. (यावेळी मीही त्यांच्याबरोबर होतो.)’’ या प्रश्‍नाचं उत्तर कदाचित फक्त नरेंद्र मोदीच देऊ शकतील.

(सदराचे लेखक ज्येष्ठ पत्रकार -विचारवंत असून ‘फोरम फॉर न्यू साऊथ एशिया या संस्थेचे संस्थापक आहेत.’)

(अनुवाद : सारंग खानापूरकर)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com