अंगणातील शिकारीचा थरार...

जेवण करून बिछान्यावर अंग टाकले, तोच शिवमचा फोन आला, ‘दादा, पटकन व्हॉट्सॲप बघ..
अंगणातील शिकारीचा थरार...
Summary

जेवण करून बिछान्यावर अंग टाकले, तोच शिवमचा फोन आला, ‘दादा, पटकन व्हॉट्सॲप बघ..

जेवण करून बिछान्यावर अंग टाकले, तोच शिवमचा फोन आला, ‘दादा, पटकन व्हॉट्सॲप बघ...’ त्याने पाठवलेला फोटो पाहिला. मी तातडीने कॅमेऱ्यावर लेन्स लावून चटकन खाली निघालो. पडीक इमारतीच्या पहिल्या मजल्यावरील बाल्कनीकडे शिवमने बोट दाखवले. तिथे शिक्रा बसला होता. त्याने केलेल्या शिकारीवर ताव मारत होता. ते थरारक दृश्य कॅमेऱ्यात टिपण्याचे भाग्य मला लाभले.

वन्यजीव छायाचित्रण म्हणजे लांबलचक तोफांसारख्या लेन्स, दुर्गम जंगलात फिरणं, असाच सर्वसामान्यांचा समज असतो. काहीअंशी तो खराही आहे; परंतु डोळस नजरेने शोधल्यास आपल्या आजूबाजूलादेखील वन्यजीवांचे दर्शन घडू शकते. त्याची प्रचिती नुकतीच आम्हाला आली. तसे आमच्या सोसायटीच्या बाजूला एक पडीक इमारत आहे. धोकादायक म्हणून जाहीर झाल्याने तिथे कुणी राहत नाही; मात्र संध्याकाळी सूर्यास्तानंतर तिथे एक गव्हाणी घुबड (बार्न आऊल) नेहमी दिसतो, असे आमचा सुरक्षारक्षक किरण सांगत असतो. कित्येकदा तर त्याने रात्री दोन-अडीच वाजता फोन करून मला बोलावले होते; पण प्रत्येक वेळी कॅमेरा, लेन्स आणि टॉर्च घेऊन जाईपर्यंत ते उडालेले असायचे. तेव्हा किरणने त्याच्या मोबाईलमध्ये टिपलेली छायाचित्रे पाहत हात चोळत आम्हाला परतावे लागत असे. एकदा तर सोसायटीच्या सार्वजनिक नळाखाली साचलेल्या पाण्यात पाणी पिताना ते त्याला दिसले होते, परंतु मला अद्याप त्याच्या छायाचित्रणाची संधी मिळाली नाही.

अगदी अलीकडेच कच्छच्या दौऱ्याहून परतलो आणि लगेच दुसऱ्या दिवशी सकाळीच दवाखान्यात रुजू झालो. पाच दिवस रजेवर असल्याने रुग्णांची गर्दी होती. दुपारी ३ वाजता घरी आल्यावर जेवण करून बिछान्यावर अंग टाकले, तोच शिवमचा फोन आला, ‘दादा, पटकन व्हॉट्सॲप बघ...’ शिवम गुजराथी हा आमच्या सोसायटीत सर्वांचा लाडका आणि मदत करणारा. थोडंफार वन्यजीव आणि पक्ष्यांची आवड असलेला.. त्याने पाठवलेला फोटो पाहिला. मला ती मोहोळ घार वाटली (त्याने मोबाईलवर फोटो काढला होता). ‘दादा, पटकन ये, समोरच्या पडीक इमारतीच्या पहिल्या मजल्यावरील बाल्कनीत बसलाय’ असे शिवम म्हणाला. मी तातडीने कॅमेऱ्यावर लेन्स लावून चटकन खाली निघालो. यापूर्वी अनेक वेळा असेच खाली गेलो आणि प्रत्येक वेळी निराशाच पदरी आली होती. तसाच आताही धावतच निघालो.

पडीक इमारतीच्या पहिल्या मजल्यावरच्या बाल्कनीकडे शिवमने बोट दाखवले. तिथे शिक्रा बसला होता; पण त्याच्या दिशेने लेन्स धरताच लगेच उडाला. एकही छायाचित्र टिपता आले नाही. शिक्रा इमारतीच्या मागील बाजूच्या दिशेने उडाला, म्हणून तिथे जाऊन दिसतोय का हे पाहायचे ठरवले. भारतातील दुर्गम भागातील दुर्मिळ पशू-पक्षी कॅमेऱ्यात टिपतो; परंतु सोसायटीमध्ये मात्र नेहमीच निराशा पदरी पडते, असे म्हणालो तोच शिक्रा पुन्हा दिसला. बाजूच्या इमारतीच्या मागील गच्चीवर. पटकन थोडीफार छायाचित्रे टिपली; पण अँगल विचित्र असल्यामुळे त्याचे खालून फोटो मिळाले. आजूबाजूला सरकून पहिले; परंतु योग्य अँगल मिळत नव्हता. इतक्यात तो उडाला आणि बाजूच्या एका झाडाच्या फांदीमागे बसला. त्याने बहुधा बुलबुल पक्ष्याची शिकार केली होती. झाडामागे बसल्यामुळे तो नीटसा दिसत नव्हता. आम्ही वाट पाहायचे ठरवले. त्या शिक्र्यालादेखील ती फांदी योग्य वाटली नसावी; त्याला बहुधा तिथे शिकार मटकावता येत नव्हती. त्यामुळे थोड्याच वेळात तो तिथून बाजूच्या फांदीवर सरकला. तिथून तो व्यवस्थित दिसत होता. आधीच्या फांदीवर त्याच्या भोवताली कावळे त्याला त्रास देत होते; पण आता जिथे बसला होता, तिथून तो आम्हाला व्यवस्थित दिसत होता. तिथून तो कावळ्यांना दिसत नसल्याने सर्व कावळे उडून गेले. त्यानंतर त्याने केलेल्या शिकारीवर ताव मारला आणि आम्हालादेखील ते थरारक दृश्य कॅमेऱ्यात टिपता आले. शहरातील सिमेंट काँक्रिटच्या जंगलातही वन्यजीव आपले अस्तित्व टिकवून ठेवण्याची धडपड करीत आहेत. अगदी आमच्या सोसायटीच्या आवारातच अशी छायाचित्रणाची संधी मिळाली यापेक्षा अधिक ते काय हवे?

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com