वाराणसीची भाजीपाला संशोधन संस्था (सुधीर फाकटकर)

सुधीर फाकटकर sudhirphakatkar@gmail.com
रविवार, 18 जून 2017

तीर्थक्षेत्र काशी (वाराणसी) इथं भाजीपाल्यावर संशोधन करणारं एक विज्ञानक्षेत्र (भारतीय भाजीपाला संशोधन संस्था-आयआयव्हीआर) आहे. भारतीयांच्या आहारातल्या पोषक तत्त्वांच्या पूर्ततेचं आव्हान पूर्ण करण्याचं मुख्य ध्येय ठेवून १९७१ मध्ये इंडियन कौन्सिल ऑफ ॲग्रिकल्चर रीसर्चनं (आयसीएआर) ही संस्था स्थापन केली आहे.

तीर्थक्षेत्र काशी (वाराणसी) इथं भाजीपाल्यावर संशोधन करणारं एक विज्ञानक्षेत्र (भारतीय भाजीपाला संशोधन संस्था-आयआयव्हीआर) आहे. भारतीयांच्या आहारातल्या पोषक तत्त्वांच्या पूर्ततेचं आव्हान पूर्ण करण्याचं मुख्य ध्येय ठेवून १९७१ मध्ये इंडियन कौन्सिल ऑफ ॲग्रिकल्चर रीसर्चनं (आयसीएआर) ही संस्था स्थापन केली आहे. ध्येयाच्या अनुषंगानं भाजीपाल्यासाठी पोषक तत्त्वांची गुणवत्ता वाढवण्यासाठी मूलभूत, नावीन्यपूर्ण आणि धोरणात्मक संशोधन करणं, देशातल्या संबंधित संस्थांसाठी मार्गदर्शनं करणं, भाजीपाल्यांचा टिकाऊपणा आणि संरक्षणासाठी तंत्रज्ञान विकसित करणं, संशोधित वाणांचं भांडार जतन करणं आणि माहितीविज्ञानाच्या प्रसारासाठी प्रशिक्षणाचे उपक्रम राबवणं आदी उद्देश या संस्थेचे आहेत. उत्तर प्रदेशात कुशीनगर, भदोही व देवरिया या ठिकाणी संस्थेची विस्तारित केंद्रं आहेत.

भाजीपाल्यासंदर्भात पीकसुधारणा, उत्पादन आणि संरक्षण असे तीन मुख्य विभाग आणि सुधारणा विभागात जनुकांचं संग्रहण, मूल्यांकन, जतन ते रेण्वीय पातळीवरची तपासणी असे आठ प्रकारचे अभ्यास-संशोधनाचे विषय इथं आहेत. उत्पादन विभागात शेतीविज्ञान, मृत्तिकाशास्र, जलनियोजन, लागवड, जैवतंत्रज्ञान व सामाजिक विज्ञान असं विषयक्षेत्र आहे. संरक्षण विभागात बुरशी, जीवाणू, कीटकविज्ञान व सूक्ष्मकृमीशास्र या विषयात संशोधन चालतं. या विविध संशोधन-विषयांसाठी रेण्वीय जीवशास्र, जनुकं, पेशी, बियाणे, तंत्रज्ञान, लागवडविद्या, कीटकनाशक, तसंच परजीवी आदी विषयांच्या सुमारे १५ प्रयोगशाळा असून, तेवढ्याच प्रथिने-शुद्धीकरण, वर्णपटविश्‍लेषक, सूक्ष्मदर्शक व तत्सम साधनं-उपकरणांच्याही सुविधा आहेत.
आजवर या संस्थेनं भाजीपाला पिकांच्या शेकडो जाती-प्रजाती विकसित केलेल्या असून, देशातल्या आणि परदेशातल्या शेतीशी संबंधित संस्थांबरोबर संयुक्त प्रकल्पही राबवले आहेत. ‘आयआयव्हीआर’नं सर्वसामान्यासाठी उभारलेल्या कृषीविषयक तंत्रज्ञान माहितीकेंद्रात संशोधित बि-बियाण्यांची माहिती मिळते व विक्रीही केली जाते. याखेरीज विकसित विज्ञान-तंत्रज्ञान, वार्षिक अहवाल, वार्तापत्र आणि प्रादेशिक भाषेतलं ‘सब्जी किरण’नामक नियतकालिक संस्थेतर्फे प्रकाशित होतं. महत्त्वाचं म्हणजे, प्रत्यक्ष शेतीच्या ठिकाणी जाऊनही मार्गदर्शन केलं जातं.
या संस्थेत मुख्यत्वे कृषीविषयक व संबंधित विज्ञान-तंत्रज्ञान विद्यार्थ्यांसाठी संशोधनाच्या, तसंच कार्यक्षेत्राच्या संधी उपलब्ध असतात. उत्तरेकडच्या तीर्थक्षेत्रांना भेटी देताना या विज्ञानाक्षेत्राकडंही जिज्ञासूंनी पावलं जरूर वळवावीत!

संस्थेचं नाव - भारतीय भाजीपाला संशोधन संस्था,
पोस्ट बॅग क्रमांक - १, जखनी, शहनशाहपूर
वाराणसी - २२१३०५
दूरध्वनी - (०५४२) २६३५२४७
संकेतस्थळ : www.iivr.org.in

Web Title: sudhir phakatkar write artilce in saptarang