राष्ट्रीय भौतिकी प्रयोगशाळा (सुधीर फाकटकर)

सुधीर फाकटकर
रविवार, 22 जानेवारी 2017

देश स्वातंत्र्य झाल्यानंतर अल्पावधीतच वैज्ञानिक आणि औद्योगिक संशोधन परिषदेनं स्थापन केलेल्या सुरवातीच्या काही संस्थांपैकी ही एक प्रयोगशाळा आहे. भौतिकशास्त्रीय संशोधन आणि विकासाला सामर्थ्य देऊन त्यात अद्ययावतता व त्यायोगे राष्ट्रातली विज्ञान-तंत्रज्ञानाची सर्वांगीण प्रगती साध्य करणं, हे राष्ट्रीय भौतिकी प्रयोगशाळेचं (एनपीएल) ध्येय आहे.

देश स्वातंत्र्य झाल्यानंतर अल्पावधीतच वैज्ञानिक आणि औद्योगिक संशोधन परिषदेनं स्थापन केलेल्या सुरवातीच्या काही संस्थांपैकी ही एक प्रयोगशाळा आहे. भौतिकशास्त्रीय संशोधन आणि विकासाला सामर्थ्य देऊन त्यात अद्ययावतता व त्यायोगे राष्ट्रातली विज्ञान-तंत्रज्ञानाची सर्वांगीण प्रगती साध्य करणं, हे राष्ट्रीय भौतिकी प्रयोगशाळेचं (एनपीएल) ध्येय आहे. राष्ट्रीय स्तरावरच्या संस्थांना आणि उद्योग संस्थांना अधिकाधिक अचूक मोजमापनासाठी मार्गदर्शन, सहकार्य करणं, मोजमापनासंदर्भातली उपकरणं व प्रक्रिया विकसित करणं, संबंधित समस्यांचं निराकरण करणं आणि सातत्य राखत आंतरराष्ट्रीय मापकांनुसार राष्ट्रीय मापकांची निर्मिती करून त्यांची अद्ययावतता जतन करणं, असे या प्रयोगशाळेचे उद्देश आहेत.

एनपीएलचं कार्य पुढील विभागांद्वारे चालतं - १) पदार्थ भौतिकी आणि अभियांत्रिकी - औद्योगिकविषयक पदार्थ प्रक्रियांचं अभियांत्रिकी ज्ञान इथं विकसित केलं जातं. २) रेडिओ आणि वातावरणीय विज्ञान - मुख्यत्वे संदेशवहनासाठी वापरल्या जाणाऱ्या रेडिओ वर्णपटाच्या माध्यमातून वातावरणीय विज्ञानविषयक बदल, परिणाम अभ्यासले जातात. ३) वेळ, वारंवारिता आणि विद्युतविषयक मापकं - आंतरराष्ट्रीय मानदंडांनुसार या विषय क्षेत्रांमधल्या मापकांची निर्मिती करत त्यात विश्‍वासार्हता राखणं. ४) औद्योगिक मापनविद्या आणि उच्च दर्जाची मापकं - उद्योग-व्यवसायांशी निगडित एकूण एक मापकांची निर्मिती करून त्यांची गुणवत्ता राखणं. ५) प्रगत पदार्थ आणि उपकरणं - विकसित होत असलेल्या नवनवीन पदार्थांसंदर्भात विकास करत संबंधित साधनं निर्माण करणं. बदलत्या कालखंडानुसार एनपीएलचा भौतिकीविषयक मूलभूत संशोधनप्रवास आता नॅनो तंत्रज्ञान, पुंजकीय विज्ञान, तसंच अर्धवाहक-अतिसंवाहक पदार्थांच्या विषय क्षेत्रांमध्येही जोमानं सुरू आहे. अन्य संशोधन संस्था आणि उद्योग-व्यवसायांसाठी गरजेचं असलेलं ज्ञानकोश भांडार (रिपॉझिटरी) हा एक अत्यंत महत्त्वाचा विभाग एनपीएलमध्ये आहे. उद्योग-व्यवसायांसाठी विविध पदार्थविषयक गुणवत्ता तपासणी, तसंच दैनंदिन व्यवहारातल्या एककांपासून विज्ञान-तंत्रज्ञान क्षेत्रातल्या विविध मापनतपासणी - पडताळणी सुविधा इथं उपलब्ध आहेत. याचबरोबर एनपीएलनं विकसित केलेल्या विज्ञान-तंत्रज्ञानविषयक मार्गदर्शन-सल्ला देणाराही विभाग इथं आहे.
राष्ट्रीय भौतिक प्रयोगशाळेत उच्च शिक्षण-प्रशिक्षणाच्या अनेक संधी उपलब्ध असतात. भौतिकी व तत्सम विज्ञान शाखा, तसेच संबंधित अभियांत्रिकी विषयांमधल्या विद्यार्थ्यांसाठी पदव्युत्तर व पीएच.डीच्या शिक्षणाची सुविधा इथं उपलब्ध आहे. त्याचप्रमाणे अद्ययावत विषयांसंदर्भात अल्पकालीन प्रशिक्षणही इथं मिळतं. देशातला प्रत्येक उद्योग-व्यवसाय आणि संशोधन संस्थेचा प्रत्यक्ष वा अप्रत्यक्ष संबंध एनपीएलशी आलेला असतो, यावरून राष्ट्रीय भौतिकी प्रयोगशाळेचं महत्त्व लक्षात यावं.

राष्ट्रीय भौतिकी प्रयोगशाळा
डॉ. के. एस. कृष्णन मार्ग, साउथ पटेलनगर, पुसा,
नवी दिल्ली - ११० ०१२ दूरध्वनी - (०११) ४५६०९२१२
संकेतस्थळ - www.nplindia.org

Web Title: sudhir phakatkar's article in saptarang