जेएनएआरडीडीसी (सुधीर फाकटकर)

सुधीर फाकटकर sudhirphakatkar@gmail.com
रविवार, 26 फेब्रुवारी 2017

ॲल्युमिनियम हा धातू हलकेपणा, वजनाच्या तुलनेत बळकटपणा, गंजप्रतिबंधक आणि विद्युत आणि उष्णतेसाठी उच्च संवाहकता आदी गुणवैशिष्ट्यांमुळं दैनंदिन व्यवहार ते उद्योगव्यवसायाच्या अनुषंगानं असंख्य साधनं-उपकरणांसाठी उपयोगात येणारा आहे. अनेक मिश्र धातूंच्या निर्मितीसाठी उपयोगात येणाऱ्या ॲल्युमिनियमच्या सर्वंकष संशोधनासाठी १९८९ मध्ये खाण मंत्रालयानं ही संस्था उभारली आहे.

ॲल्युमिनियम हा धातू हलकेपणा, वजनाच्या तुलनेत बळकटपणा, गंजप्रतिबंधक आणि विद्युत आणि उष्णतेसाठी उच्च संवाहकता आदी गुणवैशिष्ट्यांमुळं दैनंदिन व्यवहार ते उद्योगव्यवसायाच्या अनुषंगानं असंख्य साधनं-उपकरणांसाठी उपयोगात येणारा आहे. अनेक मिश्र धातूंच्या निर्मितीसाठी उपयोगात येणाऱ्या ॲल्युमिनियमच्या सर्वंकष संशोधनासाठी १९८९ मध्ये खाण मंत्रालयानं ही संस्था उभारली आहे.

ॲल्युमिनियमचे अत्युच्च दर्जाचं संशोधन साधत त्याचा उपयोग उद्योग-व्यवसायांसाठी करत पर्यावरण राखणं हे नागपूरच्या ‘जवाहरलाल नेहरू ॲल्युमिनियम रिसर्च डेव्हलपमेंट अँड डिझाईन सेंटर (जेएनएआरडीडीसी) या संस्थेचे ध्येय आहे. ध्येय साध्य करण्यासाठी या संस्थेत बॉक्‍साईड-ॲल्युमिनियम, विद्युतअपघटन (इलेक्‍ट्रोलिसिस), टाकाऊ पदार्थ व्यवस्थापन आणि विश्‍लेषण असे संशोधन विभाग आहेत. बॉक्‍साईट-ॲल्युमिनियम विभागात बॉक्‍साईटच्या (ॲल्युमिनियम घटक असलेले संयुग वा कच्चा धातू) खनिजसाठ्यांच्या शोध घेण्यापासून शुद्ध स्वरूपातलं ॲल्युमिनियम मिळवण्यासंदर्भातल्या सगळ्या विज्ञान-तंत्रज्ञानाचा वेध घेतला जातो. इलेक्‍ट्रोलासिस विभागात शुद्ध स्वरूपातलं ॲल्युमिनियम मिळवण्यासाठीच्या विद्युत-रसायन यंत्रप्रणालींचा विकास साधला जातो, तर टाकाऊ पदार्थ व्यवस्थापन विभाग हा ॲल्युमिनियम मिळवताना निर्माण होणाऱ्या टाकाऊ पदार्थांचा फेरवापर आणि योग्य विल्हेवाट यावर संशोधन करतो आणि विश्‍लेषण विभाग सद्य आणि भविष्यकालीन विज्ञान-तंत्रज्ञानाचा वेध घेतो.
ॲल्युमिनियम विषयाच्या संदर्भात इथं धातू-संस्करण, प्राथमिक धातू-उत्पादन, प्रक्रियानियंत्रण व प्रारूप विकास या विषय-क्षेत्रांसाठी बॉक्‍साईट व कार्बनपदार्थ गुणवैशिष्ट्यं तपासणी, धातुशास्त्र व सूक्ष्मविश्‍लेषण, यांत्रिकी व भौतिकी तपासणी आदी अद्ययावत प्रकारच्या प्रयोगशाळा आहेत. संस्थेनं देशभरात ॲल्युमिनियमसंदर्भात आजवर सरकारी आणि खासगी मिळून ३० प्रकल्प पूर्ण केले आहेत. जेएनएआरडीडीसीकडून संशोधित-विकसित झालेलं विविध प्रकारचं माहिती-तंत्रज्ञान प्रकाशित असून, ते उद्योग-व्यवसायांसाठीही उपलब्ध केलं जातं. याखेरीज पेटंट स्वरूपातलंही विज्ञान-तंत्रज्ञान या संस्थेनं निर्माण केलं आहे. संस्थेचं विशेष वार्तापत्रही प्रकाशित केलं जातं.

जेएनएआरडीडीसी या संस्थेत पदार्थ-गुणवैशिष्ट्यतपासणी, ॲल्युमिनियम वितळवणं, प्रक्रिया करणं, तसेच उत्पादनासंदर्भात साचे निर्माण करणे इत्यादी तंत्रज्ञान शिकवणाऱ्या अल्प मुदतीच्या प्रशिक्षणाची सुविधा आहे. देशात सुमारे ६०० पेक्षाही जास्त उद्योग-व्यवसायांमध्ये कुशल मनुष्यबळनिर्मितीसाठी या प्रशिक्षणाचा फायदा होत आहे. या संस्थेत धातू-शास्त्र, रसायनशास्त्र या विज्ञान-अभियांत्रिकी व संबंधित शाखांच्या पदवीप्राप्त विद्यार्थ्यांसाठी संशोधनाचं कार्यक्षेत्र उपलब्ध असतं.

संस्थेचा पत्ता -
  जवाहरलाल नेहरू ॲल्युमिनियम रिसर्च डेव्हलपमेंट अँड डिझाईन सेंटर
  अमरावती मार्ग, वाडी, नागपूर - ४४००२३
  दूरध्वनी - (०७१०४) २२०४७६
  संकेतस्थळ - www.jnarddc.gov.in

Web Title: sudhir phakatkar's article in saptarang