विज्ञान व तंत्रज्ञान मंत्रालय (सुधीर फाकटकर)

सुधीर फाकटकर sudhirphakatkar@gmail.com
रविवार, 19 मार्च 2017

आपल्या देशात जरी आधुनिक विज्ञान-तंत्रज्ञानाची सुरवात स्वातंत्र्यपूर्व काळात झाली असली, तरी विज्ञान व तंत्रज्ञानासाठी स्वतंत्र मंत्रालय निर्माण होण्यासाठी १९७१ च्या मे महिन्याची २१ तारीख उजाडावी लागली.

आपल्या देशात जरी आधुनिक विज्ञान-तंत्रज्ञानाची सुरवात स्वातंत्र्यपूर्व काळात झाली असली, तरी विज्ञान व तंत्रज्ञानासाठी स्वतंत्र मंत्रालय निर्माण होण्यासाठी १९७१ च्या मे महिन्याची २१ तारीख उजाडावी लागली.

या मंत्रालयासाठी पुढील जबाबदाऱ्या निश्‍चित करण्यात आल्या आहेत - देशासाठी विज्ञान-तंत्रज्ञानाची धोरणं आखणं, केंद्रीय मंत्रिमंडळाला सल्ला देणं, विज्ञान-तंत्रज्ञानात उदयाला येत असलेल्या क्षेत्रांना प्रोत्साहन देणं, या मंत्रालयांतर्गत असलेले विभाग व परिषदा यांच्यात समन्वय साधत आवश्‍यकतेनुसार नवीन विभाग, प्रयोगशाळा व मंडळांची निर्मिती करणं, देशभरात विज्ञान-तंत्रज्ञानविषयक सर्वेक्षण करत भविष्यकालीन आखणी करणं, विज्ञान-तंत्रज्ञानाबाबत निधीचं नियोजन करणं, अन्य सरकारी यंत्रणा आणि खासगी उद्योग-व्यवसायासाठी विज्ञान-तंत्रज्ञानाचं व्यवस्थापन साधणं, विज्ञान-तंत्रज्ञानाच्या माहितीचं नियोजन करत खेडेगावातल्या सर्वसामान्यांपर्यंत प्रसार करण्यासाठी कटिबद्ध राहणं.

या मंत्रालयांतर्गत विज्ञान व औद्योगिक, जैवतंत्रज्ञान आणि विज्ञान व तंत्रज्ञान असे प्रमुख विभाग आहेत. भारतीय सर्वेक्षण आणि राष्ट्रीय नकाशा व नकाशासंग्रह या स्वतंत्र उपसंस्था, तसेच तंत्रज्ञानविकास आणि विज्ञान अभियांत्रिकी संशोधन ही दोन मंडळं या मंत्रालयाच्या अखत्यारीत येतात. याखेरीज किशोर वैज्ञानिक प्रोत्साहन योजना, स्वर्णजयंती शिष्यवृत्ती, महिला शास्त्रज्ञ कार्यक्रम, उपकरण विकास कार्यक्रम, स्वच्छ ऊर्जा संशोधन, राष्ट्रीय माहिती व तंत्रज्ञान व्यवस्थापन उपक्रम, आंतरराष्ट्रीय विज्ञान व तंत्रज्ञान सहकार्य, राज्य सरकार विज्ञान व तंत्रज्ञान कार्यक्रम इत्यादींसाठी २५ खास विभाग कार्य करतात. याशिवाय, स्वायत्त संस्थांच्या स्वतंत्र विभागांतही २६ स्वतंत्र संशोधन संस्था ही मंत्रालयाची विशेष ओळख आहे. वर उल्लेखिलेल्या प्रमुख विभागांच्याही अंतर्गत देशभर असलेल्या राष्ट्रीय प्रयोगशाळांची संख्या ६० पेक्षासुद्धा जास्त आहे. विज्ञान व तंत्रज्ञान मंत्रालयामार्फत संलग्न असलेल्या संस्थांकडून वैविध्यपूर्ण प्रशिक्षणाचे उपक्रम राबवले जातात. देशभरात केवळ विज्ञान व तंत्रज्ञानाचं प्रदर्शन भरवण्यासाठी दोन विशेष विभाग आहेत.

या मंत्रालयाकडून संबंधित संस्थांच्या विद्यार्थ्यांसाठी उच्च शिक्षण, संशोधन, तसेच प्रायोजकत्वासाठी शिष्यवृत्ती व निधी उपलब्ध केला जातो. माहिती तंत्रज्ञानाच्या देवाण-घेवाणीसाठी या मंत्रालयानं जगभरातल्या अनेक देशांशी सामंजस्य करार व कार्यक्रम आखले आहेत. देशाच्या सर्वांगीण प्रगतीसाठी विज्ञान व तंत्रज्ञान खऱ्या अर्थानं संपदा असलेलं विज्ञानक्षेत्र आहे.

संस्थेचा पत्ता -
विज्ञान व तंत्रज्ञान मंत्रालय,
तंत्रज्ञान भवन, नवीन मेहरोली मार्ग
दिल्ली - ११००१६.
दूरध्वनी - (०११) २६५६२१२२
संकेतस्थळ - www.dst.gov.in

Web Title: sudhir phakatkar's article in saptarang