पर्यावरण, वन आणि हवामानबदल मंत्रालय (सुधीर फाकटकर)

सुधीर फाकटकर sudhirphakatkar@gmail.com
रविवार, 26 मार्च 2017

भारतीय विज्ञानक्षेत्रांची ओळख करून घेताना पर्यावरण, वन आणि हवामानबदल मंत्रालय जाणून घेणंही आवश्‍यक ठरावं. कारण, या मंत्रालयाच्या अखत्यारीत येणाऱ्या अकादमी, महामंडळं, संशोधनसंस्था आणि अन्य विभागांची संख्या ६० पेक्षाही जास्त आहे. आज अत्यंत महत्त्वपूर्ण असलेल्या या मंत्रालयाची स्थापना १९८५ मध्ये झाली.

भारतीय विज्ञानक्षेत्रांची ओळख करून घेताना पर्यावरण, वन आणि हवामानबदल मंत्रालय जाणून घेणंही आवश्‍यक ठरावं. कारण, या मंत्रालयाच्या अखत्यारीत येणाऱ्या अकादमी, महामंडळं, संशोधनसंस्था आणि अन्य विभागांची संख्या ६० पेक्षाही जास्त आहे. आज अत्यंत महत्त्वपूर्ण असलेल्या या मंत्रालयाची स्थापना १९८५ मध्ये झाली.

देशासाठी पर्यावरण, वन आणि हवामानबदलाबाबत ध्येय-धोरणं आखणं, नियोजन करणं, समन्वयसाधनं, कृती-आराखडा निर्माण करणं, तसंच या सगळ्याची अंमलबजावणी करण्याची जबाबदारी या मंत्रालयाकडे असते. या मंत्रालयाचे पर्यावरण सर्वेक्षण व संवर्धन, संशोधन, शिक्षण, वन्यजीव कल्याण, वनसुरक्षा, प्रदूषणनियंत्रण, वनशिक्षण, वनधोरण, संकटव्यवस्थापन, राष्ट्रीय नदीसंवर्धन, दक्षता, माहिती तंत्रज्ञान असे सुमारे ४० विभाग आहेत.

‘गोविंदवल्लभ पंत इन्स्टिट्यूट ऑफ हिमालयन एन्व्हायर्नमेंट अँड डेव्हलपमेंट, इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ फॉरेस्ट मॅनेजमेंट, इंडियन प्लायवूड इंडस्ट्रीज रिसर्च अँड ट्रेनिंग इन्स्टिट्यूट, वाइल्डलाइफ इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया व इंडियन कौन्सिल ऑफ फॉरेस्ट्री रिसर्च अँड एज्युकेशन या स्वायत्त संस्था या मंत्रालयाच्या आहेत. यातल्या भारतीय वनसंशोधन व शिक्षण परिषदेच्या अंतर्गत शुष्कवन, वनजनुकीय विज्ञान, वृक्ष पुनर्निर्माण, वन-उत्पन्न, काष्ठविज्ञान, बांबू, वनहवामान, वनमनुष्यबळ, पर्यावरण-पुनर्वसन, शहरी वन आदी विषयांसाठी १४ संशोधन-संस्था कार्यरत आहेत. जैवविविधता, राष्ट्रीय गंगानदी खोरं, वन्य-वन्यजीव संग्रहालय, वनस्पती, तसंच व्याघ्रसंवर्धन इ. क्षेत्रासांठी मंडळं निर्माण करण्यात आली आहेत.

अंदमान अँड निकोबार आईसलॅंड्‌स फॉरेस्ट अँड प्लॅंटेशन डेव्हलपमेंट कार्पोरेशनच्या या सार्वजनिक क्षेत्रातल्या संस्थेबरोबरच आठ राज्यांमध्ये राज्यपातळीवर वनसंशोधन संस्था कार्यरत आहेत. पर्यावरणासाठी न्यायाधीकरण, राष्ट्रीय नदीसंवर्धन संचलनालय, तसंच ‘इस्रो’च्या मदतीनं दूरस्थसंवेदन तंत्रज्ञानाच्या माध्यमातून असलेली मध्यवर्ती स्रोतयादी प्रणाली आदी खास उपक्रम हे मंत्रालय राबवतं. संकेतस्थळावर नागरिकांसाठी सर्व उपक्रमांच्या माहितीबरोबरच आधुनिक पद्धतीची ई-बुक सुविधा हे या मंत्रालयाचं वेगळेपण ठरावं.

या मंत्रालयाशी संलग्न शिक्षण संस्थांमध्ये उच्च शिक्षणासाठी शिष्यवृत्ती, संशोधन व पुरस्कारांसंदर्भात १७ योजना राबवल्या जातात. कार्यक्षेत्रासाठी असलेली भारतीय वनसेवा देशात तिसऱ्या क्रमांकाची आहे. विस्तृत व्याप्ती असलेल्या या मंत्रालयाच्या विविध विज्ञानक्षेत्रांची ओळख नंतर करून घेऊ या.

संस्थेचा पत्ता - पर्यावरण, वन आणि हवामान बदल मंत्रालय, पार्यवरणभवन, सीजीओ कॉम्प्लेक्‍स, लोधी मार्ग, दिल्ली - ११०००३
दूरध्वनी - (०११) २४३६१६६९, संकेतस्थळ -www.moef.nic.in

Web Title: sudhir phakatkar's article in saptarang