संशोधन वनस्पतींविषयीचं...

सुधीर फाकटकर sudhirphakatkar@gmail.com
रविवार, 7 मे 2017

राष्ट्रीय वनस्पतीविषयक संशोधन संस्थेचा इतिहास १८ व्या शतकापासून सुरू होतो. तत्कालीन अयोध्येच्या नबाबानं लखनौमध्ये उभारलेल्या सिकंदरबागेचा उपयोग त्या वेळी संगीत, नृत्यकाम आणि काव्यमैफलींचा आनंद घेण्यासाठी करण्यात आला. याच बागेत १८५७ मधील बंडाच्या रणधुमाळीत दोन हजार भारतीय सैनिकांचं शिरकाण झालं. ब्रिटिशांनी राज्य प्रस्थापित केल्यानंतर या बागेचं रूपांतर शासकीय बागकामविषयक संस्थेत करण्यात आलं.

राष्ट्रीय वनस्पतीविषयक संशोधन संस्थेचा इतिहास १८ व्या शतकापासून सुरू होतो. तत्कालीन अयोध्येच्या नबाबानं लखनौमध्ये उभारलेल्या सिकंदरबागेचा उपयोग त्या वेळी संगीत, नृत्यकाम आणि काव्यमैफलींचा आनंद घेण्यासाठी करण्यात आला. याच बागेत १८५७ मधील बंडाच्या रणधुमाळीत दोन हजार भारतीय सैनिकांचं शिरकाण झालं. ब्रिटिशांनी राज्य प्रस्थापित केल्यानंतर या बागेचं रूपांतर शासकीय बागकामविषयक संस्थेत करण्यात आलं. गोमती नदीच्या किनारी सुमारे २५ हेक्‍टर क्षेत्र असलेली ही बाग स्वातंत्र्य मिळाल्यानंतर राष्ट्रीय वनस्पतीविषयक संशोधन बाग होऊन १९५३ ला सीएसआयआयच्या अखत्यारीत आली आणि पुढं १९७८ ला राष्ट्रीय वनस्पतीविषयक संशोधन संस्था असं तिचं नामकरण झालं.

वनस्पतीविषयक मूलभूत आणि उपयोजित संशोधन करत विकसित केलेल्या माहिती तंत्रज्ञानाचा व्यावसायिक वापर करणं हा या संस्थेचा उद्देश आहे. त्या अनुषंगानं इथं जैवविविधता, परिस्थितीशास्त्र, पर्यावरणविज्ञान, उत्पत्तिशास्त्र व रेण्वीय जीवशास्त्र, सूक्ष्मजीव अन्योन्यक्रिया, वनस्पतीविषयक बाग आणि विज्ञान- तंत्रज्ञानसेवा या प्रमुख क्षेत्रांच्या अंतर्गत त्यांचे उपविभाग आहेत. यामधल्या प्रयोगशाळांमध्ये अद्ययावत सूक्ष्मदर्शकापासून वनस्पतीच्या संवेदनांचं मोजमाप करणाऱ्या प्रणाली, उत्क्रांतीचं अवलोकन करणारी यंत्रणा, गुणवैशिष्ट्यांचा अभ्यास करणारे विश्‍लेषक, तसंच वनस्पतींच्या वाढीसाठी वेगवेगळ्या तापमानांच्या जागा इत्यादी सुविधा आहेत. तब्बल तीन लाख ७५ हजार प्रकारच्या वनस्पतींनी समृद्ध असलेलं व त्या वनस्पतींची विविध आंतरशाखांच्या माध्यमातून माहिती देणारं भव्य संग्रहालय हे या संस्थेचं वैशिष्ट्य आहे. याखेरीज लखनौपासून २२ किलोमीटरवर बंथरानामक गावात दूरस्थ प्रकारचं संशोधन करणारं केंद्र आहे. फुलांच्या संदर्भात या संस्थेनं फुलांबाबत प्रक्रिया उद्योगांचाही विकास करत देशाचा पुष्प उद्योगातला वाटा वाढवण्यासाठी खास प्रयत्न केले आहेत. ही संस्था दरवर्षी जानेवारी आणि डिसेंबरमध्ये आंतरराष्ट्रीय स्तरावरचं पुष्पप्रदर्शन आयोजित करते, ज्याचा फायदा सर्वसामान्यांपासून संशोधकांपर्यंत घेतला जातो.

वनस्पतीविषयक मूलभूत आणि उपयोजित संशोधनासंदर्भात या संस्थेनं सामंजस्य करार केले आहेत. या संस्थेकडून पदवी आणि पदव्युत्तर विद्यार्थ्यांसाठी वनस्पती वर्गीकरणशास्त्र, जनुकीय उत्क्रांतिविज्ञान ते बागव्यवस्थापन इत्यादी विषयांचे अल्प कालावधीचे प्रशिक्षण कार्यक्रम राबवले जातात. वनस्पतिशास्त्रांशी संबंधित विज्ञानशाखांना इथं कार्यक्षेत्राच्या संधी उपलब्ध असतात.

संस्थेचा पत्ता -
राष्ट्रीय वनस्पतीविषयक संशोधन संस्था,
पोस्ट बॉक्‍स क्रमांक - ४३६
राणाप्रताप मार्ग, लखनौ - २२६००१

Web Title: sudhir phakatkar's article in saptarang