दिल्लीची रस्तेसंशोधन संस्था (सुधीर फाकटकर)

सुधीर फाकटकर sudhirphakatkar@gmail.com
रविवार, 21 मे 2017

रस्ते आणि त्यांच्यावरची वाहतूक हा सामाजिक, आर्थिक आणि तंत्रज्ञानाच्या प्रगतीसाठी अतिशय महत्त्वाचा विषय आहे, म्हणूनच १९५२ मध्ये दिल्ली इथं केंद्रीय रस्तेसंशोधन संस्थेची (सीआरआरआय) स्थापना करण्यात आली. गुणवत्तापूर्ण, दीर्घकाळ टिकणारे, सुरक्षित आणि परिपूर्ण क्षमतेनं वाहतूक करणारे रस्ते निर्माण करण्यासाठी संशोधन करत तंत्रज्ञान विकसित करणं हे या संस्थेचं ध्येय आहे. या ध्येयाच्या अनुषंगानं इथं भूतांत्रिकता-अभियांत्रिकी, पूल-अभियांत्रिकी व रचना, वाहतूक-अभियांत्रिकी व सुरक्षा, वाहतूकनियोजन, पर्यावरण आणि फरसबंदी म्हणजे रस्त्यावरचे कठीण थर या विषयांसाठी स्वतंत्र संशोधन विभाग आहेत.

भूतांत्रिकता-अभियांत्रिकी विभागात रस्तेमहामार्गाच्या संदर्भात भूरचनांचा शोध, भूस्खलनाचा अभ्यास, भूरचना सुधारणा आणि बंधारे यांचा अभ्यास केला जातो. पूल-अभियांत्रिकी व रचनाविभागात बांधकामविषयक घटकांपासून आराखडा, विकास, बांधकाम, गुणवत्तातपासणी अशा एकूण २५ विषयांचा अभ्यास होतो. वाहतूक-अभियांत्रिकी व सुरक्षाविभागात वाहनचालकांच्या तपासणीपासून ते रस्त्यांची नियमित तपासणी, इंधनाचा वापर ते अपघातविश्‍लेषण अशा १५ विषयांचा अभ्यास केला जातो. वाहतूकनियोजनात व्यवहार्यता-व्यवस्थापन इत्यादी १० प्रणालींचा अभ्यास होतो. पर्यावरणात विविध प्रकारचं प्रदूषण, कार्बन-उत्सर्जन असे पाच विषय आहेत, तर फरसबंदी विभागात घटकपदार्थांपासून आराखडा, रचना, जतन असे सुमारे २४ विषय येतात. सगळ्या विभागांच्या स्वतंत्र प्रयोगशाळा आहेत. उल्लेखनीय बाब म्हणजे, प्रयोगशाळांबरोबरच विविध प्रकारच्या तपासण्यांसंदर्भातली स्थिर-चल प्रकारची मूलभूत आणि अद्ययावत स्वरूपाची उपकरणं आणि यंत्रणा इथं आहेत.
वरील विषयक्षेत्रांमध्ये सीआरआरआयनं आजवर रस्तेविषयांमध्ये ऊर्जानिर्मितीतून निर्माण होणाऱ्या राखेच्या उपयोगापासून ते श्राव्यातीत लहरींच्या माध्यमातून रस्त्यांची तपासणी करणाऱ्या अद्ययावत प्रणालीपर्यंत सुमारे ५० प्रकारचं तंत्रज्ञान विकसित केलं आहे. यातल्या काही तंत्रज्ञानांचे जागतिक पातळीवर स्वामित्व हक्कही संस्थेनं मिळवले आहेत. या सगळ्याची माहिती संस्थेच्या वार्षिक अहवालातून, वार्तापत्रातून, संशोधनविषयक अहवालांच्या माध्यमातून, तसंच ‘सडकदर्पण’ या हिंदी मासिकातून मिळते.

सीआरआरआय या रूरकी इथल्या अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या संयुक्त विद्यमाने रस्तेविषयक मूलभूत सोई-सुविधा आणि आपत्ती-व्यवस्थापन या विषयात पदव्युत्तर पदवी अभ्यास राबवला जातो. याखेरीज वर उल्लेखिलेल्या विषयांचे अल्प मुदतीचे विविध अभ्यासक्रम व कार्यशाळाही आयोजिल्या जातात. मुख्यत्वे स्थापत्य आणि संबंधित विज्ञान-अभियांत्रिकी शाखांच्या विद्यार्थ्यांना कार्यक्षेत्राची संधी उपलब्ध असलेलं हे एक महत्त्वाचं विज्ञानक्षेत्र आहे.

संस्थेचा पत्ता - केंद्रीय रस्तेसंशोधन संस्था,
मथुरा मार्ग, दिल्ली ११० ०२५.
दूरध्वनी - (०११)२६८३२१७३,
संकेतस्थळ - www.crridom.gov.in

Web Title: sudhir phakatkar's article in saptarang