टिक टिक वाजते गाण्यात...! (सुहास किर्लोस्कर)

टिक टिक वाजते गाण्यात...! (सुहास किर्लोस्कर)

कॅस्टनेट्‌स हे स्पॅनिश लोकसंगीतात वाजवलं जाणारं वाद्य. ते हाताच्या मुठीत मावेल एवढंच असतं.  दोन्ही हातांत दोन असं धरून, अंगठ्याला दोरीनं बांधून उर्वरित चार बोटांनी क्रमाक्रमानं एकमेकांवर आघात करून ते वाजवलं जातं. म्हणजे एका हातानं चार वेळा आणि दुसऱ्या हातानं पाचव्या वेळेस. नृत्याच्या वेळी हातात धरताना ते दिसणार नाही, अशा पद्धतीनं धरून वाजवण्यात येतं. या अनोख्या वाद्याचा हिंदी सिनेसंगीतात प्रथम उपयोग करण्याचं श्रेय कावस लॉर्ड यांना जातं.

‘हु  जूरेवाला...जो हो इजाजत...’ हे ‘ये रात फिर न आयेगी’ या सिनेमातलं गाणं संगीतकार ओ. पी. नय्यर यांच्या ठेक्‍यामुळं, आशा भोसले आणि मिनू पुरुषोत्तम यांच्या अप्रतिम सहगायनामुळं गाजलं. दोघी गात असताना एकच गायिका गात असल्याचा भास होतो, इतकं या गाण्याचं सुरेख सुसूत्रीकरण आहे. गाण्यामधला दोघींच्या हसण्याचा आवाज लक्षात राहतो. गीतकार अजीज कश्‍मिरी यांनी लिहिलेल्या या गाण्याच्या सुरुवातीला गिटारबरोबर ‘टिक टिक टिक’ काय वाजतं, याचा शोध घेतला आणि त्या वाद्याचं नाव ‘कॅस्टनेट्‌स’ (Castanets) आहे असं समजलं.  पियानो, सेक्‍सोफोन वाजल्यानंतर प्रेक्षकाला हेलनच्या हातातले कॅस्टनेट्‌स दिसतात. या गाण्यातली गिटार, ढोलक आणि टाळ्या यांचा ठेका प्रेक्षकालाही नाचायला लावतो. हेलननं आपल्या नृत्यकौशल्यानं आणि अभिनयानं अशी गाणी यादगार केली आहेत.    
***
संगीतकार राहुलदेव बर्मन यांनी संगीतदिग्दर्शक या नात्यानं पहिल्या सिनेमात म्हणजे ‘छोटे नवाब’मध्ये अरेबिक पद्धतीचं ‘-मतवाली आँखोवाले’ हे गाणं संगीतबद्ध केलं, तेव्हा ते २२ वर्षांचे होते. महंमद रफी यांनी गायलेला सुरुवातीचा आलाप हट के आहे आणि अर्थातच तो गाण्याची खुमारी वाढवतो. लता मंगेशकर गातात तेव्हा महमूदबरोबर नृत्य करणाऱ्या हेलनच्या हातात कॅस्टनेट्‌स आहेत. हे परदेशी वाद्य हेलन इतक्‍या सहजतेनं लपवत लपवत वाजवते की ही सफाई हेलननं कशी काय आणली असेल, याचं आश्‍चर्य वाटतं.   सध्याच्या सारख्या प्रशिक्षण देणाऱ्या संस्था तेव्हा नव्हत्या, इंटरनेट नव्हतं. कॅस्टनेट्‌ससारखं अनोखं वाद्य वाजवत कसं नाचावं याचं प्रशिक्षण हे गाणं बघत बघत हेलनकडून घ्यावंसं वाटतं!   
***
‘सागर’ या सिनेमातल्या ‘यूंही गाते रहो, मुस्कुराते रहो’ या गाण्यात दोन कडवी झाल्यावर डिम्पल कपाडिया नृत्य सुरू करते, तेव्हा जे  कॅस्टनेट्‌स ऐकू येतात, ते होमी मुल्लन यांनी वाजवले आहेत. मात्र, या गाण्यात डिम्पलच्या हातात कॅस्टनेट्‌स दिसत नाहीत. राहुलदेव बर्मन यांनी संगीतबद्ध केलेल्या आणि किशोरकुमार-एस. पी. बालसुब्रमण्यम यांनी गायलेल्या या गाण्यात गिटार, मेंडोलिन, तबला, ढोलकी, ड्रम, ब्राससेक्‍शनमधल्या वाद्यांचा मिळून जो एक रिदम तयार होतो, तो ऐकण्यासारखा आहे. दोघांनी आलाप गाताना स्केल बदलली आहे. अर्थातच ऋषी कपूर, कमल हसन आणि डिम्पल यांचं नृत्य बघण्यासारखं आहे.   
***
‘थोडी देर के लिये मेरे हो जाओ’ हे आशा भोसले यांनी साभिनय गायलेलं गाणं कॅस्टनेट्‌सनं सुरू होतं. मजरूह सुलतानपुरी यांनी लिहिलेलं आणि मदनमोहन यांनी संगीतबद्ध केलेलं हे गाणं ॲकॉर्डियनसाठीसुद्धा ऐकण्यासारखं आहे. ‘अकेली मत जैयो’ सिनेमातल्या या गाण्यातसुद्धा मिनू मुमताजच्या हातात कॅस्टनेट्‌स दिसतात. ‘जादू’ या सिनेमातलं नौशाद यांनी संगीतबद्ध केलेलं गाणं ‘लो प्यार की हो गयी जीत, बलम हम तेरे हो गये’ ॲकॉर्डियननं सुरू होतं आणि नंतर कॅस्टनेट्‌सचा आवाज येतो. नौशाद यांच्या या गाण्याचं संगीतसंयोजन कुणी केलं आहे, याचा शोध घेतला पाहिजे. कारण, या सिनेमातली गाणी हटके आहेत. याच सिनेमातलं ‘जब नैन मिले नैन से’ या शमशाद बेगम यांनी गायलेल्या गाण्यात नलिनी जयवंतच्या हातात कॅस्टनेट्‌स दिसतात.  
***
‘आरपार’ या सिनेमातल्या ‘उधर तुम हसीं हो, इधर दिल जवाँ है’ हे मजरूह सुलतानपुरी यांचं सदाबहार गाणे ओ. पी. नय्यर यांचं संगीत आणि कॅस्टनेट्‌सनं सजलं आहे. महंमद रफी आणि गीत दत्त यांनी गायलेल्या या गाण्यातल्या ‘खुद रात अंगडाईयाँ ले रही है, जिधर देखती हूँ, नजारा जवाँ है ’ या ओळी मजरूह यांनी मधुबालासाठीच लिहिल्या असाव्यात, असं मला नेहमीच वाटतं. ‘दिल से मिला के दिल प्यार कीजिए’ (सिनेमा ः टॅक्‍सी ड्रायव्हर, संगीतकार ः सचिनदेव बर्मन, गायिका ः लता मंगेशकर), ‘दमभर जो उधर मूँह फेरे’ (सिनेमा ः आवारा, संगीतकार ः  शंकर-जयकिशन, गायक-गायिका ः मुकेश-लता मंगेशकर), ‘बूझ मेरा क्‍या नाम रे’ (सिनेमा ः सीआयडी, संगीतकार ः ओ. पी. नय्यर, गायिका ः  शमशाद बेगम) ही कॅस्टनेट्‌सच्या ‘टिक टिक’नं सजलेली आणखी काही गाणी.
***
कॅस्टनेटस हे स्पॅनिश लोकसंगीतात वाजवलं जाणारं वाद्य. ते हाताच्या मुठीत मावेल एवढंच असतं.  दोन्ही हातात दोन असं धरून, अंगठ्याला दोरीनं बांधून उर्वरित चार बोटांनी क्रमाक्रमानं एकमेकांवर आघात करून ते वाजवलं जातं. म्हणजे एका हातानं चार वेळा आणि दुसऱ्या हातानं पाचव्या वेळेस. नृत्याच्या वेळी हातात धरताना ते दिसणार नाही, अशा पद्धतीनं धरून वाजवलं जातं.  या अनोख्या वाद्याचा हिंदी सिनेसंगीतात प्रथम उपयोग करण्याचं श्रेय कावस लॉर्ड यांना जातं. वडिलांचा वारसा त्यांचे पुत्र केरसी लॉर्ड यांनी समर्थपणे पुढं नेला आहे. नंतर होमी मुल्ल्लन यांनीसुद्धा बऱ्याच गाण्यांमध्ये कॅस्टनेट्‌स वाजवले आहेत.

भजनाला साथ करताना टाळ वाजवले जातात, या टाळांना ‘कॅस्टनेट्‌सचा भारतीय अवतार’ असं म्हणता येईल. राजस्थानी संगीतात वाजवली जाणारी खरताल, चिमटा अशी वाद्यं हीसुद्धा या वाद्याचीच भावंडं. ‘संगीत’ या सिनेमात तालावर नाचायला लावणाऱ्या  ‘सुन ओ हसीना, मैं आवारा इक बंजारा’ या गाण्यात जॅकी श्रॉफच्या साथीदाराच्या हातात असंच वाद्य आहे. राजस्थानी धूनवर आधारित या गाण्याचं संगीतदिग्दर्शन केलं आहे आनंद-मिलिंद यांनी. जुन्या काळातले संगीतकार चित्रगुप्त यांचे हे दोघं सुपुत्र.

सुरवातीला ‘चायनीज ब्लॉक’ आणि ‘कॅस्टनेट्‌स’ यांमध्ये माझी गल्लत व्हायची.  लक्षपूर्वक ऐकल्यावर दोन्ही वाद्यांच्या आवाजातला फरक समजला. ‘आईए मेहेरबाँ’ (सिनेमा ः हावडा ब्रिज, संगीतकार ः ओ. पी. नय्यर, गायिका ः आशा भोसले, गीतकार ः हसरत जयपुरी), जाने क्‍या तू ने कही (सिनेमा ः प्यासा, संगीतकार ः सचिनदेव बर्मन, गायिका ः गीता दत्त, गीतकार ः साहिर लुधियानवी) या गाण्यांमध्ये जे वाजवले गेले आहेत, ते चायनीज ब्लॉक आहेत. तालवाद्यांमध्ये बरेच प्रकार असतात. तबला, ढोल, ढोलकी, डफ, ड्रम, बाँगो, कोंगो, जेंबे, मादल, डुग्गी, मटका आणि बरीच वाद्यं या प्रकारात येतात. फक्त वादकांच्या हाताची ‘धडकन’ आपल्याला श्रोता म्हणून वाद्याच्या आवाजावरून समजली, की गाणी अजून श्रवणीय होतात!   

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com