यॉडली यॉडली यो हो...(सुहास किर्लोस्कर)

सुहास किर्लोस्कर
रविवार, 23 एप्रिल 2017

यॉडलिंग म्हणजे काय? प्रत्येकाच्या आवाजाची एक पट्टी (रेंज) असते. ठराविक पट्टीच्या स्वरापर्यंत वरचा स्वर लावता येतो. व्होकल कॉर्डचा उपयोग करून त्याच्याही वरचा खोटा स्वर म्हणजे फॉल्सेटो. पुरुषानं स्त्रीच्या आवाजात गाणं म्हणताना जो आवाज लावला जातो, त्यालाही फॉल्सेटो म्हणता येईल. यॉडलिंग म्हणजे आवाजाच्या खालच्या पट्टीमधून फॉल्सेटो आवाजात वारंवार अदलाबदल करून म्हटलेलं गाणं. 
 

यॉडलिंग म्हणजे काय? प्रत्येकाच्या आवाजाची एक पट्टी (रेंज) असते. ठराविक पट्टीच्या स्वरापर्यंत वरचा स्वर लावता येतो. व्होकल कॉर्डचा उपयोग करून त्याच्याही वरचा खोटा स्वर म्हणजे फॉल्सेटो. पुरुषानं स्त्रीच्या आवाजात गाणं म्हणताना जो आवाज लावला जातो, त्यालाही फॉल्सेटो म्हणता येईल. यॉडलिंग म्हणजे आवाजाच्या खालच्या पट्टीमधून फॉल्सेटो आवाजात वारंवार अदलाबदल करून म्हटलेलं गाणं. 

‘तुम बिन जाऊ कहां’ या गाण्याची सुरवात मेंडोलिननं आणि किशोरकुमार यांच्या योडलिंगनं होते. या गाण्यातूनच मला गाण्याच्या या नवीन प्रकाराची ओळख झाली. गाणं आवडलं म्हणून सिनेमा बघितला, तर आश्‍चर्य म्हणजे भारतभूषणना किशोरकुमार यांचा आवाज दिला आहे, तर शशी कपूर यांना मोहंमद रफी यांचा आवाज. नंतर समजलं, की ही राहुल देव बर्मन यांची कल्पना होती. वडिलांनी म्हटलेलं गाणं सिनेमात कायम वाजत राहतं, त्यामुळं किशोरकुमार यांचा आवाज वडिलांना द्यायचं ठरवलं गेलं आणि मुलगा - शशी कपूरना - महंमद रफी यांचा आवाज दिला गेला. या गाण्याची किशोरकुमार यांची तीन व्हर्जन आहेत, तीन प्रसंगांप्रमाणे. एक नायकानं लहानपणी ऐकलेलं. अंतऱ्यापूर्वीचं यॉडलिंग गाण्याच्या मूडप्रमाणे आहे. अशा प्रकारची गंभीर स्वरूपाची गाणी गाताना किशोरकुमार यांनी जे भाव गायनामध्ये दाखवले आहेत ते लाजवाबच. 
*** 
हेच यॉडलिंग एका खोडकर गाण्यामध्ये वेगळ्या पद्धतीनं गायलेलं आहे. एकदा किशोरकुमार आणि राहुल देव बर्मन ‘गन्स ऑफ नाव्हेरॉन’ हा सिनेमा बघायला गेले. या सिनेमातली प्रसिद्ध शीळ त्यांना आवडली आणि त्यांनी या धूनवर आधारित गाणं करायचं त्यांनी ठरवलं. ‘ज्युवेल थीफ’चे संगीत दिग्दर्शक सचिन देव बर्मन यांना सहायक संगीत दिग्दर्शक राहुल देव यांनी तयार केलेली धून ऐकवली आणि एक अफलातून गाणं तयार झालं ः ‘ये दिल ना होता बेचारा’. गाणं एखाद्या रागावर आधारित असू शकतं किंवा धूनवर. एक धून कशी विकसित करता येते, याचं हे उत्तम उदाहरण आहे. गाण्यात ‘पंचमप्रभाव’ जाणवतो. गाणं चायनीज ब्लॉक, मिक्‍स रिदम आणि यॉडलिंगनं सुरू होतं. 
सन १९५० मध्ये किशोरकुमार यांनी पहिल्यांदा योडलिंग केलं ‘आती है याद हमको’ या गाण्यात (मुकद्दर). सन १९६१ मधलं ‘ठंडी हवा ये चाँदनी सुहानी’ हे गाणे पियानो, आशा भोसले यांचा आलाप आणि किशोरकुमार यांचं यॉडलिंग अशा क्रमानं सुरू होतं. किशोरकुमार यांनी ‘चला जाता हूँ’ (सिनेमा ः मेरे जीवनसाथी, संगीतकार ः राहुलदेव बर्मन), ‘अंदाज’ सिनेमामध्ये ‘जिंदगी एक सफर है सुहाना’ (शंकर-जयकिशन) अशा बऱ्याच गाण्यात यॉडलिंग केलं आहे; पण गाण्याच्या या प्रकाराची बरीच विविधता असलेलं ‘कहर’ गाणं म्हणजे ‘मैं हूँ झुम झुम झुमरू.’ किशोरकुमार यांनीच संगीत दिग्दर्शन आणि गायन केलेल्या या बहारदार गाण्यात गिटार, अकॉर्डियन अशी फार कमी वाद्यं आहेत. यॉडलिंगचे बरेच प्रकार किशोरकुमार यांनी लीलया गायले आहेत. हे सगळं गाताना ते बेसूर होण्याचा संभव असतो, हे स्वतः गाताना समजतं. यॉडलेई, मिली मिली मिली, पक्‍पर्रर, टिरीटिरीडिरी आणि ते किशोरकुमार यांचं वरच्या स्वरात हसणं...सगळंच अचाट, अफाट, सुरेल आणि अवघडही! 
*** 
तर यॉडलिंग म्हणजे काय? प्रत्येकाच्या आवाजाची एक पट्टी (रेंज) असते. ठराविक पट्टीच्या स्वरापर्यंत वरचा स्वर लावता येतो. व्होकल कॉर्डचा उपयोग करून त्याच्याही वरचा खोटा स्वर म्हणजे फॉल्सेटो. पुरुषानं स्त्रीच्या आवाजात गाणं म्हणताना जो आवाज लावला जातो, त्यालाही फॉल्सेटो म्हणता येईल. यॉडलिंग म्हणजे आवाजाच्या खालच्या पट्टीमधून फॉल्सेटो आवाजात वारंवार अदलाबदल करून गाणं. गाण्याच्या या प्रकाराचा इतिहास विराज पाध्ये या अभ्यासू मित्राकडून समजला. तेराव्या शतकात युरोपमधल्या खेडेगावातले मेंढपाळ अशा प्रकारचे आवाज काढायचे. सतराव्या शतकात अमेरिकेमध्ये थिएटर आणि संगीतविषयक कार्यक्रमात या गायनप्रकाराचा आंतर्भाव सुरू झाला. जिमी रॉजर्स यांनी १९२७ मध्ये ‘ब्लू यॉडेल नंबर १’ या रेकॉर्डद्वारे यॉडलिंग लोकप्रिय केलं. अमेरिकेत या प्रकारानं लोकांना वेड लावलं आणि सगळ्यांनी असं गायला सुरवात केली. १९३१ मध्ये जॉनी वेस्मुलर या अभिनेत्यानं टारझन जंगलामधून पुकारा करतो, त्या प्रसंगासाठी याचा वापर केला. डे झुरिक सिस्टर्स या यॉडलिंगमध्ये लक्षणीय कामगिरी करणाऱ्या पहिल्या गायिका. मेरी जेन आणि करोलिन डे झुरिक या बहिणींनी १९३८ मध्ये गायलेली गाणी, त्यांचं यॉडलिंग आणि सहगायन ऐकल्यावर ऐकणारा केवळ अचंबितच होऊ शकतो! सन १९५० नंतर कंट्री म्युझिक किंवा पाश्‍चात्त्य संगीतातून हा गायनप्रकार दुर्मिळ झाला. 
*** 
‘चुनरी संभाल गोरी’ हे गाणं अनेक तालवाद्यांच्या आविष्कारानं सुरू होतं. त्यात महाराष्ट्राचा ‘लेझीम-रिदम’सुद्धा ऐकू येतो. लेझमीत ज्याप्रमाणे शिट्टी वाजवून ताल-ठेका बदलला जातो, तो प्रकार या गाण्यात ऐकायला मिळतो. गाणं सुरू होतं हार्मोनिअमपासून आणि नंतर ते लेझीम, ढोल, झांज, ढोलकी, घुंगरू, तबला, ढोलक, डुग्गी, शीळ, ड्रम असा बऱ्याच वाद्यांचा (‘रिदमकिंग’ मारुतीराव कीर) प्रवास करतं...नंतर श्‍वासांचा आवाज, लता मंगेशकर यांनी म्हटलेलं हा-आ आणि नंतर मन्ना डे यांनी लावलेला वेगळा स्वर!! गाण्याच्या मुखड्यानंतर, पहिल्या अंतऱ्यापूर्वी मन्ना डे यांनी गायलेला आलाप आणि बोल. ‘‘आ... उ... रु रु रु रु.... हुई... रु रु रु रु’’. फक्त नेहमीचा आवाज आणि फॉल्सेटो यांमध्ये वारंवार अदलाबदल केलेली नाही. त्यामुळं याला फॉल्सेटोचा एक प्रकार, असं म्हणता येईल. लय, ताल, तालवाद्यं, गायनाचे प्रकार यासाठी राहुलदेव बर्मन यांनी संगीतबद्ध केलेलं हे गाणं लाजवाब आहे. 
*** 
यॉडलिंग अजून कुणी कुणी गायलं आहे? महंमद रफी यांनी काही गाण्यांमध्ये हा प्रकार गायला आहे. उदाहरणार्थ : ‘ओ चले हो कहाँ कहो’, ‘उन से रिप्पी टिप्पी हो गयी’, ‘हल्लो स्वीटी सेव्हन्टीन्‌’. सुरेंद्र यांचं ‘मैं तेरे दिल की दुनिया में आ के रहूंगी’ आणि महेंद्र कपूर यांचं ‘ओ ओ ओ मनचली, अकड के चली’ ही आणखी काही गाणी. ‘एक गीत, दो आवाज या दो पहलू’ या प्रकारातलं गाणं ‘जिंदगी एक सफर है सुहाना’ हे गाणं किशोरकुमार आणि आशा भोसले यांच्या आवाजात आहे. आशा भोसले या बहुदा पहिल्या भारतीय गायिका असतील, ज्यांनी यॉडलिंग केलं आहे... 
*** 
आवाज लावण्याच्या या अनोख्या प्रकारानंतर आवाजाची पट्टी बदलून गाण्याबद्दल पुढच्या लेखामध्ये... 

Web Title: suhas kirloskar write about yodeling