ढूंढ लाया हूँ वोही गीत मै तेरे लिये... (सुहास किर्लोस्कर)

ढूंढ लाया हूँ वोही गीत मै तेरे लिये... (सुहास किर्लोस्कर)

सिनेमामधले प्रसंग, गाण्याचे शब्द आणि चित्रीकरण कसं केलं जाणार आहे, या सगळ्याचा विचार करून कोणती वाद्यं, केव्हा आणि कशी वाजवायची हे संगीतकार आणि संगीतसंयोजक ठरवतात. फार काही न वाजवता संगीतकार बरंच काही सांगून जातो आणि आपण ते गाणं गुणगुणत राहतो. कुणीतरी म्हटलं आहे, की जेव्हा आपण आनंदात असतो, तेव्हा गाण्यातल्या संगीताची मजा घेतो आणि जेव्हा आपण दुःखात असतो, तेव्हा गाण्याचे शब्द लक्षात राहतात!

सिनेमाचा नायक अशोककुमार आणि नायिका सुचित्रा सेन यांचं एकमेकांवर प्रेम आहे; पण काही कारणानं ते लग्न करू शकत नाहीत. तरीही त्यांचं एकमेकांवरचं प्रेम हे भक्तीप्रमाणे पवित्र आहे. या भावना गाण्यातून कशा व्यक्त करणार? ‘छुपा लो यूँ दिल में प्यार मेरा, के जैसे मंदिर मे लौ दिये की’ हे गाणं (सिनेमा ः ममता) तितक्‍याच पवित्र भावनेनं अतिशय सुरेल गायलं आहे हेमंतकुमार आणि लता
मंगेशकर यांनी. अशोककुमारनं गॉगल घातलेला असतो आणि ‘छुपा लो यूँ दिल में...’चा अर्थ चित्रीकरण पाहिल्यानंतर आपल्याला समजतो.

संगीतकार रोशन यांनी प्रसंगानुसार, वेगळा विचार करून संगीतबद्ध केलेल्या या गाण्यात फक्त टाळ वाजतो व तोसुद्धा हलकेच. अंतऱ्यापूर्वी बासरी वाजते. यमन रागाचा हा वेगळा रंग प्रेमाचा पवित्र भाव दाखवतो.
-ये सच है जीना था पाप तुमबिन
ये पाप मैने किया है अब तक
मगर है मन मे छबी तुम्हारी
के जैसे मंदिर में लौ दिये की

फिर आग बिरहा की मत लगाना
के जल के मै राख हो चुकी हूँ।
ये राख माथे पे मैने रख ली  
के जैसे मंदिर में लौ दिये की

(- मजरूह सुलतानपुरी यांचं हे गीतिकाव्य पाप-पुण्य, आग-राख असा विरोधाभास दाखवतं.
***
प्रसंगानुसार किंवा गाण्याच्या शब्दानुसार कमीत कमी वाद्यांचा वापर केलेली अशी बरीच गाणी आहेत.
‘चैन से हम को कभी
आप ने जीने ना दिया
जहर भी चाहा अगर
पीना तो पिने ना दिया’

या गाण्याला एक लय आहे; पण रिदमसाठी पियानो आणि हलकेच टाळ वाजत राहतो. बासरीचा योग्य तेवढाच वापर गाण्याला वेगळ्या उंचीवर नेऊन ठेवतो.
‘प्राण जाए पर वचन न जाए’ या सिनेमासाठी गीतकार एस. एच. बिहारी यांनी लिहिलेलं हे गीत संगीतकार ओ. पी. नय्यर यांनी नेहमीपेक्षा वेगळ्या पद्धतीनं स्वरबद्ध केलं आहे. गायिका आशा भोसले यांनी गायनात जो भाव व्यक्त केला आहे, जो अभिनय केला आहे, तो फार अप्रतिम आणि अवघड आहे. या गाण्याचा सिनेमामध्ये अंतर्भाव झालेला नसतानासुद्धा हे गाणं गाजलं, रसिकप्रिय झालं. असं फार कमी गाण्यांबाबत झालं आहे.
***

जयदेव यांनी संगीतबद्ध केलेल्या गाण्यात प्रेमाची वेगळी छटा आशा भोसले यांनी गायनातून दाखवली आहे. सिनेमाचा नायक उदास आहे, नायिका त्याला धीर देत आहे अशा वेळी खूप वाद्यं वाजणार नाहीत. ‘हम दोनो’ सिनेमातलं ‘जहाँ में ऐसा कौन है कि जिस को गम मिला नही’ हे गाणं महंमद रफी यांनी गायलेल्या ‘अभी न जाओ छोडकर’ या गाण्याचं वेगळं रूप आहे. आशा भोसले यांनी ‘तुम से मै जुदा नही, मुझ से तुम जुदा नही’ हे समजावून सांगताना ‘ दिलाऊँ किस तरहा यकीं’ असं काही गायलं आहे, की केवळ हेच शब्द ऐकण्यासाठी हे गाणं परत ऐकावं. गाण्यात दादरा तालात तबला आणि पंडित शिवकुमार शर्मा यांनी वाजवलेलं संतूर यांचा आवश्‍यक तेवढाच वापर करण्यात आलेला आहे. सहाय्यक संगीतदिग्दर्शक आहेत प्रभाकर जोग. विशेष म्हणजे, या सिनेमाचं ‘टायटल म्युझिक’ सिनेमाच्या कथेला अनुसरून देस रागावर आधारित धूनवर आहे. साधनावरच चित्रित झालेले ‘परख’ या सिनेमातलं ‘-मेरे मन के दिये’ हे गाणं शांतपणे ऐकावं आणि बघत राहावं. दिग्दर्शक बिमल रॉय यांनी त्या काळी म्हणजे, सन १९६० मध्ये, छाया-प्रकाशाचा खेळ अप्रतीमरीत्या दाखवला आहे. तो दिवा, पणतीची ज्योत, तेवढ्या प्रकाशात दिसणारी साधना, धुराची पार्श्वभूमी...सगळंच जुळून आलं आहे. संगीतकार सलील चौधरी यांचं संगीत, कोरसची हार्मनी, कमीत कमी वाद्यं यांमधून गीतकार शैलेंद्र यांच्या या गीतातल्या भावना प्रेक्षक-श्रोत्यांपर्यंत प्रभावीपणे पोचवल्या गेल्या आहेत.  
‘यूँही घुट घुट के जल तू मेरे लाडले’ अशी मनाची अस्वस्थता लता मंगेशकर यांनी खालच्या पट्टीमध्ये व्यक्त केल्यामुळं हे गाणं फार प्रभावी झालं आहे, असं मला वाटतं.
***

बऱ्याच संगीतकारांनी शब्द प्रभावीपणे मांडताना किंवा गाण्याचा प्रसंग अधोरेखित करताना गाण्याला चाल दिली आहे; पण सूर शांतपणे ऐकवले आहेत. श्रेया घोषाल आणि संगीतकार विशाल भारद्वाज यांनी ‘ओंकारा’ या सिनेमासाठी गायलेल्या  ‘ओ साथी रे, दिन डूबे ना’ या गाण्यातली शांतता अंगावर येते, सिनेमात पुढं होणाऱ्या प्रसंगाची पूर्वसूचना देते. शेक्‍सपीअरच्या ‘ऑथेल्लो’सारखा संशयकल्लोळ कोणत्या थराला जाईल, या कल्पनेनं वातावरण अधिकच गंभीर होतं. गुलजार यांच्या या आशयघन गीताला संगीत विशाल भारद्वाज यांनी दिलं आहे. गाण्याचं चित्रीकरण करताना सिनेमाचे दिग्दर्शक विशाल भारद्वाज यांनी प्रेमातला खट्याळपणा दाखवतानाच ‘काहीतरी बिनसलं आहे’ याची पूर्वकल्पनाही दिलेली आहे.
‘हकीकत’ या सिनेमातल्या ‘मै ये सोचकर उस के दर से उठा था’ ही कैफी आझमी यांनी लिहिलेली काव्यरचना महंमद रफी यांनी गायली आहे. मदनमोहन यांनी संगीतबद्ध केलेल्या या रचनेत फक्त व्हायोलिन वाजतं ते लष्करी जवानाचं दुःख गहिरं करण्यासाठीच. ‘रंग दे बसंती’ या सिनेमातलं ‘लुकाछुपी बहुत हुई, सामने आ जा ना, कहाँ कहाँ ढूँढा तुझे, थक गई तेरी माँ’ हे गाणं जवानाच्या आईचं मनोगत व्यक्त करतं. लता मंगेशकर आणि संगीतकार ए. आर. रहमान यांनी गायलेल्या या गाण्याचं संगीत म्हणजे एका लयीमध्ये फक्त गिटार वाजते. पुढच्या कडव्याला फक्त तबला वाजत राहतो. कारण, आता आपल्याला गाण्यातून मुलाची बाजू समजते. रहमान यांचंच संगीतदिग्दर्शन असलेली ‘स्वदेस’ सिनेमातली ‘आहिस्ता आहिस्ता निंदिया तू आ, इन दो नैनो में’ ही लोरी उदित नारायण आणि साधना सरगम यांनी गायली आहे. जावेद अख्तर यांनी लिहिलेल्या या लोरीला सिंथेसायझरचे स्वर हलकेच वाजतात ते लय दाखवण्यासाठी.
***

‘तारे जमीन पर’ या सिनेमात आई-वडील मुलाला - ईशानला- होस्टेलमध्ये सोडून जातात...ते कारमध्ये बसलेले आहेत...मुलगा होस्टेलच्या दारात उभा आहे...गाडी सुरू होते...स्टार्टरचा आवाज येतो आणि त्या आवाजानं ईशान थरथरतो. होस्टेलमध्ये पदोपदी त्याला आईची आठवण येते. ‘मै कभी बतलाता नही, पर अंधेरे से डरता हूँ मै माँ, यूँ तो मै दिखलाता नही, तेरी परवा करता हूँ मै माँ’ या गाण्याला शंकर-एहसान-लॉय यांनी आवश्‍यक तेवढीच वाद्यं वापरली आहेत. मुलांच्या गर्दीत एकटा असणाऱ्या ईशानचं दुःख प्रसून जोशी यांनी लिहिलेल्या गीतामधून आणि शंकर महादेवनच्या आवाजातून प्रभावीपणे ऐकू येतं. दिग्दर्शक आमिर खान यांनी मुलाच्या दृष्टिकोनातून होस्टेलमध्ये जाणवणारं एकटेपण फार सुरेख चित्रित केलं आहे.

कमीत कमी वाद्यांचा वापर केलेली तलत महमूद यांनी गायलेली बरीच गाणी आहेत. संगीतकार सचिनदेव बर्मन यांनी संगीतबद्ध केलेलं ‘जलते है जिस के लिये, तेरी आँखो के दिये, ढूँढ लाया हूँ वोही गीत मै तेरे लिये’ (सिनेमा ः सुजाता) हे त्यांपैकीच एक. पियानोवर हलकेच वाजणारा रिदम, माऊथ ऑर्गन, अंतऱ्याला वाजणारं व्हायोलिन आणि ‘गीत नाजुक है मेरा’ अशा ओळींना वाजणारी बासरी... नूतनचा सुरेख अभिनय...सगळंच भुरळ पाडणारं. सचिनदेव बर्मन यांनीच संगीतबद्ध केलेल्या ‘चुपके से मिले प्यासे प्यासे’ या गीता दत्त यांनी शब्दात सांगितलेल्या आणि महंमद रफी यांनी गायलेल्या गाण्याला साथ आहे ती फक्त राहुलदेव बर्मन यांनी वाजवलेल्या माऊथ ऑर्गनची.

‘तुम पुकार लो, तुम्हारा इंतजार है’ (सिनेमा ः खामोशी, गायक ः हेमंतकुमार, गीतकार ः गुलजार),‘प्रीतम आन मिलो...’ (सिनेमा ःमिस्टर अँड मिसेस ५५, गायिका ः गीता दत्त, संगीतकार ः ओ. पी. नय्यर), ‘कोई होता जिस को अपना...’(सिनेमा ः मेरे अपने, गायक ः किशोरकुमार, संगीतकार ः सलिल चौधरी, गीतकार ः गुलजार) अशी बरीच गाणी सांगता येतील.

सिनेमामधले प्रसंग, गाण्याचे शब्द आणि चित्रीकरण कसं केलं जाणार आहे अशा सगळ्याचा विचार करून कोणती वाद्यं, केव्हा आणि कशी वाजवायची हे संगीतकार आणि संगीतसंयोजक ठरवतात. फार काही न वाजवता संगीतकार बरंच काही सांगून जातो आणि आपण ते गाणं गुणगुणत राहतो. कुणीतरी म्हटलं आहे, की जेव्हा आपण आनंदात असतो, तेव्हा गाण्यातल्या संगीताची मजा घेतो आणि जेव्हा आपण दुःखात असतो, तेव्हा गाण्याचे शब्द लक्षात राहतात!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com