रंग रुपहला, जलवे सुनहरे (सुहास किर्लोस्कर)

रंग रुपहला, जलवे सुनहरे (सुहास किर्लोस्कर)

खरंतर सरोद हे काही खूप प्राचीन वाद्य नव्हे, तर गेल्या ४०० वर्षांत ते आलेलं आहे. सरोद या पर्शियन शब्दाचा अर्थ ‘सुंदर गाणं’ असा आहे. सरोदचा ‘पूर्वज’ म्हणजे रबाब. जेव्हा सन १७०० च्या मध्यात उस्ताद अमजद अली खाँ यांचे पूर्वज महंमद हश्‍मी खाँ बंगश हे अफगाण रबाब घेऊन घोड्यांचा व्यापार करत काश्‍मीरमध्ये आले आणि रेवाच्या महाराजांच्या दरबारात वादक म्हणून संगीतसाधना आणि सादरीकरण करू लागले, तेव्हापासून सरोदची कथा सुरू होते.

‘सुनो छोटी सी गुडिया की लंबी कहानी’ हे ‘सीमा’ या सिनेमातलं लता मंगेशकर यांनी गायलेलं गाणं सरोदनं सुरू होतं. शंकर-जयकिशन यांनी संगीतबद्ध केलेल्या या गीतात सरोद वाजवलं आहे उस्ताद अली अकबर खाँ यांनी. पडद्यावर नूतन एक छोट्या मुलीची दर्दभरी कथा सांगते, तेव्हा अंतऱ्यामध्ये प्रामुख्यानं सरोद वाजतं. साथीला आहे व्हायोलिन आणि पंजाबी ढोलक. दोन कडवी संपल्यावर सरोदनं ते दुःख गहिरं केलं आहे. या गाण्याचं दुसरं आनंदी व्हर्जनही आहे, त्यात प्रसंगानुसार जलतरंग वाजतं. गाण्याचं दृश्‍य न बघता ऐकलं तरी वाद्याच्या परिणामामुळं कोणत्या गाण्यात कोणते भाव आहेत, हे कुणीही सांगू शकेल. उस्ताद अली अकबर खाँ यांनी वादनातलं कौशल्य दाखवताना फार अवघड रचना न वाजवता गाणं खुलवलं आहे हे विशेष.
***

सरोद या वाद्याची माहिती जाणून घेण्यासाठी युवा सरोदवादक अनुपम जोशी यांना भेटलो. अनुपम जोशी यांना काही काळ उस्ताद अली अकबर खाँ यांचा सहवास लाभला. आता अनुपम हे पंडित राजीव तारानाथ यांच्याकडं सरोद शिकत आहेत. खरंतर सरोद हे काही खूप प्राचीन वाद्य नव्हे, तर गेल्या ४०० वर्षांत ते आलेलं आहे. सरोद या पर्शियन शब्दाचा अर्थ ‘सुंदर गाणं’ असा आहे. सरोदचा ‘पूर्वज’ म्हणजे रबाब. जेव्हा सन १७०० च्या मध्यात उस्ताद अमजद अली खाँ यांचे पूर्वज महंमद हश्‍मी खाँ बंगश हे अफगाण रबाब घेऊन घोड्यांचा व्यापार करत काश्‍मीरमध्ये आले आणि रेवाच्या महाराजांच्या दरबारात वादक म्हणून संगीतसाधना आणि सादरीकरण करू लागले, तेव्हापासून सरोदची कथा सुरू होते. त्यांचे नातू गुलाम अली खाँ बंगश हे ग्वाल्हेरचे दरबारी वादक झाले आणि त्यांनी रबाबमध्ये बदल करून सरोद हे वाद्य तयार केलं. सरोद हे ‘चित्रवीणा’, ‘रबाब’ आणि ‘सूरसिंगार’ यांचं मिश्रण आहे. उस्ताद अमजद अली खाँ यांनी सेनिया सरोदवर शास्त्रीय संगीत वाजवायला सुरवात केली. विसाव्या शतकात उस्ताद अल्लाउद्दीन खाँ यांनी सरोदला अंतिम स्वरूप दिलं.
***
उस्ताद अल्लाउद्दीन खाँ अनेक वाद्यं लीलया वाजवत असत. ऋत्विक घटक यांनी दिग्दर्शित केलेला या महान संगीततज्ज्ञावरचा माहितीपट आवर्जून बघण्यासारखा आहे. अनेक वाद्यांवर प्रभुत्व मिळवताना त्यांनी अनेक शिष्य तयार केले. या माहितीपटात ते अनेक शिष्यांना शिकवताना दिसतात. कन्या अन्नपूर्णादेवी यांना ‘सूरबहार’, उस्ताद अली अकबर खाँ यांना ‘सरोद’ आणि पंडित रविशंकर यांना ‘सतार’!  मैहर घराण्याची परंपरा सरोदसंदर्भात उस्ताद अली अकबर खाँ यांनी समर्थपणे चालवली. शिवाय वडिलांचा ज्ञानदानाचा वसा पुढं नेत त्यांनी कॅलिफोर्निया इथं ‘अकबर कॉलेज ऑफ म्युझिक’ ही संस्था उभी केली.
***
सिनेदिग्दर्शक चेतन आनंद यांनी आँधियाँ या सिनेमाच्या संगीतदिग्दर्शनाची जबाबदारी उस्ताद अली अकबर खाँ यांच्यावर सोपवली होती. या सिनेमाच्या पार्श्‍वसंगीतात सरोद, पंडित रविशंकर यांची सतार आणि पंडित पन्नालाल घोष यांची बासरी ऐकू येते. सन १९५४ मध्ये आलेल्या ‘फेरी’ या सिनेमाचंही संगीत उस्ताद अली अकबर खाँ यांनी दिलं होतं. या सिनेमातल्या एका दृश्‍यात गीता बाली आणि देव आनंद यांचं सतार-सरोद असं जे सहवादन आहे, ते पंडित निखिल बॅनर्जी आणि उस्ताद अली अकबर खाँ यांनी केलं आहे. त्याच वर्षी तत्कालीन पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या आग्रहावरून विश्‍वविख्यात व्हायोलिनवादक यहुदी मेन्युहिन भारतात आले होते. इथं सतार-सरोद ऐकल्यावर त्यांनी आग्रह केल्यामुळं उस्ताद अली अकबर खाँ यांनी पाश्‍चिमात्य देशांत सरोदवादनाचे कार्यक्रम केले. उस्ताद अली अकबर खाँ, पंडित रविशंकर यांनी सहवादनानं जगभरात मैफली गाजवल्या, त्यांना तबल्याची साथ करत असत उस्ताद अल्लारखा! अली अकबर खाँ यांनी आपली परंपरा ‘लीगसी’ या अल्बमद्वारे सगळ्यांसमोर आणली आणि तो अल्बम रसिरप्रिय झाला. या अल्बमध्ये आशा भोसले यांचं शास्त्रीय गायन आणि उस्ताद अली अकबर खाँ यांचं सरोदवादन श्रवणीय आहे. राग, तराणे यांनी सजलेला हा अल्बम म्हणजे संग्राह्य ठेवा होय. नेहमी ऐकत राहावा असा. उस्ताद वेगवेगळ्या रचना आपल्या वडिलांकडून शिकले. त्या मियाँ तानसेन यांच्यापासून चालत आलेल्या रचना आहेत. सोळाव्या ते अठराव्या शतकापासून चालत आलेले पारंपरिक खयाल, तराणे, होरी या रचना शिकवण्यासाठी आणि गाण्यासाठी त्यांनी आशा भोसले यांची निवड केली हे विशेष आणि आशा भोसले यांनी त्यांच्या अष्टपैलुत्वाची प्रचीती देत या रचना फार सुरेख गायल्या आहेत.
***
सरोद कसं तयार करतात?  तर एकसंध लाकूड कोरून तयार केलेल्या भागावर त्याच्या बाहेरच्या भागावर रेघा पाडलेल्या असतात. हा भाग कातड्यानं मढवलेला असतो. तारा बांधण्यासाठी २१ ते २५ खुंट्या असतात. ज्या ठिकाणी तारांवर बोटं खेळवायची असतात, तो सगळा भाग पातळ पोलादी पत्र्यानं मढवलेला असतो. त्यामुळं बोटं सरकवण्यास सुलभ जातं. हे वाद्य काहीसं तिरकं धरून हस्तिदंती काडीनं किंवा नारळाची करवंटी वापरून तयार केलेल्या प्लकरनं आघात करून व नखांनी तारा दाबून व ताराखांली दिलेल्या धातूच्या पत्र्यावरून बोटं फिरवून वाजवलं जातं. उस्ताद अमजद अली खाँ यांची मैफल पुण्यात ऐकली, तेव्हा ते अधूनमधून नखाला आकार देत, हे बघितलं आहे. सरोदला १७ ते २५ तारा असतात. सूर/मेलडी वाजवण्यासाठी चार ते पाच तारा असतात. धृपद-अंगानं वाजवण्यासाठी चार तारा असतात. त्या रागाप्रमाणे ट्यून केल्या जातात. रिदम-स्ट्रिंग/लय पकडण्यासाठी, झाला वाजवण्यासाठी चिकारीच्या दोन तारा असतात. ११ ते १५ तरफेच्या तारा असतात. सरोद वाजवण्याच्या प्रमुख तीन पद्धती आहेत. ‘अमजद अली खाँ पद्धत’, ‘मैहर घराना पद्धत’ (अली अकबर खाँ), ‘सेनिया शाहजहाँपूर पद्धत’ (पंडित राधिकामोहन मोइत्रा). सरोदचा रियाज करताना दाडा, दिड दिड, दाड दाड दा असे बोल म्हटले जातात. उस्ताद अमजद अली खाँ यांच्या काही रेकॉर्डमध्ये ते बोल गातात आणि नंतर वादन करतात. या वाद्यात गंभीर आणि वैराग्यरसानं वातावरणनिर्मिती होते. मात्र, सरोदवादनानं आनंदी वातावरणही निर्माण करता येतं, हे उस्ताद अमजद अली खाँ यांनी दाखवून दिलं आहे.
***
‘भूली हुई यादों मुझे इतना ना सताओ’ हे (सिनेमा ः संजोग, गीतकार ः राजेंद्रकृष्ण, संगीतकार ः मदनमोहन, गायक ः मुकेश) या यमन रागावर आधारित असलेल्या गाण्यात सरोद सुरवातीला आणि अंतऱ्यामध्ये ऐकता येतं. ‘मुझे तुम से कुछ भी ना चाहिये’ हे गाणं (सिनेमा ः कन्हैया, संगीतकार ः शंकर-जयकिशन, गीतकार ः शैलेंद्र, गायक ः मुकेश) सरोद-सतार सहवादनानं सुरू होतं आणि पूर्ण गाण्यात सरोदमुळं मुकेशच्या आवाजात गहिरे रंग भरले जातात.
कधी, कोणत्या वाद्याचा उपयोग करायचा हे सिनेसंगीतकारांचं कौशल्य वादातीत असल्याचा प्रत्यय हे
रूपक तालातलं गाणं ऐकलं की येतो. ‘मधुबन मी राधिका नाचे रे’ या गाण्याच्या (सिनेमा ः कोहिनूर, संगीतकार ः नौशाद, गीतकार ः शकील बदायुनी, गायक ः महंमद रफी) या गाण्याच्या शेवटी सतार-जलतरंग-सरोद अशी जुगलबंदी आहे, ती वाद्यं पडद्यावर दिसतातसुद्धा.
***
‘फिर ठेंस लगी दिल को’ (सिनेमा ः कश्‍मीर की कली, संगीतकार ः ओ. पी. नय्यर, गीतकार ः एस. एच. बिहारी, गायिका ः आशा भोसले) हे भावपूर्ण गाणं म्हणजे सतार आणि सरोद यांची जुगलबंदीच आहे. या गाण्यात सरोद ही सतारीला साथीचा हात पुढं करते आणि सतार ही सरोदला बरोबर घेऊन जाते. या सहप्रवासाला पंडित रामनारायण यांच्या सारंगीची जोड आणि आशा भोसले यांचे ते हुंदके....सगळंच अप्रतिम. ओ. पी. नय्यर यांनीच संगीतबद्ध केलेलं ‘देखो बिजली डोले बिन बादल की’ (सिनेमा ः फिर वही दिल लाया हूँ, गीतकार ः मजरूह सुलतानपुरी, गायिका ः आशा भोसले-उषा मंगेशकर) हे रामकली रागावर आधारित असलेलं भैरव थाटातलं गाणं अंतऱ्यामधल्या सरोद-सारंगी-सतार सहवादनासाठी पुनःपुन्हा ऐकावं असं. या तिन्ही वाद्यांमधून ‘रंग रुपहला, जलवे सुनहरे’ असलेल्या सरोदचा वेगळा आनंद घेता आला की समजावं आपल्याला या वाद्याची ओळख झाली आहे. पुढच्या लेखात अशाच आणखी काही सरोदमय गाण्याबद्दल.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com