तू जो मेरे सूर में, सूर मिला ले... (सुहास किर्लोस्कर)

तू जो मेरे सूर में, सूर मिला ले... (सुहास किर्लोस्कर)

सरोद या वाद्यानं चित्रपटगीतांना एक नवं परिमाण दिलं. ‘मन रे तू काहे ना धीर धरे’, ‘इस मोड से जाते हैं’, ‘तेरे नैना तलाश कर’, ‘मेरे नैना सावन भादो’ अशी अनेक उदाहरणं सांगता येतील. या वाद्याचे आणि गीतांचे वेगवेगळे रंग.

‘म  न रे तू काहे ना धीर धरे,’ हे महंमद रफी यांनी गायलेलं गीत सरोदवादनानं सुरू होतं आणि सरोदच्या स्वरांनीच संपतं. साहिर लुधियानवी यांनी मनाची अवस्था फार सुरेखरीत्या शब्दबद्ध केली आहे. रंग-रूप हे सर्व बाहेरून दिसणारं आहे, ते राखून ठेवणं आपल्या हातात नाही. आपल्या बाह्यरूपावर आपण जितकं लक्ष देतो, तितकं लक्ष मनाच्या सुंदरतेकडं दिलं तर? या क्षणभंगूर गोष्टीमुळे अस्वस्थ होऊ नको, रे मना! या गाण्यावर प्रदीपकुमार यांनी ‘मनाचा निग्रह’ करून चेहरा हलणार नाही, याची दक्षता घेतल्याचं जाणवतं. विनोदाचा भाग सोडा; पण मनाचे वेगवेगळे रंग असतात, तसेच रंग यमन रागाचेही आहेत. कदाचित त्यामुळंच संगीतकार रोशन यांनी हे गीत यमन रागावर बेतलेलं असावं. ‘चित्रलेखा’ या चित्रपटातलं हे गीत सरोदनं सजवलं आहे पहिल्या महिला सरोदवादक झरीन दारूवाला-शर्मा यांनी. अंतऱ्यापूर्वी वाजणारे खटके सरोदमध्ये अनोख्या पद्धतीनं ऐकू येतात. गाण्याच्या ध्वनिमुद्रणाच्या वेळी बऱ्याच सहकारी वादकांनी त्यांच्याकडं अविश्‍वासानं आणि काहीशा शंकेनं बघितलं; पण सरोदवादनाला सुरवात झाल्यावर सगळेच आश्‍चर्यचकित झाले. सरोदच्या स्वरासाठी हे गाणं पुनश्‍च ऐकल्यावर एक वाद्य गाण्यातले भाव कसं प्रकट करू शकतं, हे उमजतं. ‘चित्रलेखा’ या चित्रपटाद्वारे झरीन शर्मा यांनी चित्रपट संगीतातली करिअरची सुरवात केली आणि नंतर जयदेव, एस. डी. बर्मन, आर. डी. बर्मन, खय्याम, रवींद्र जैन अशा संगीतकारांची गाणी सरोदवादनानं खुलवली.
****
एस. डी. बर्मन यांनी संगीतबद्ध केलेल्या ‘तलाश’ चित्रपटातल्या ‘तेरे नैना तलाश कर’ या मन्ना डे यांनी गायलेल्या गाण्यात सरोद, सतार, तबला, पखवाज यांची जुगलबंदी आहे, हे गाण्याच्या ‘यहाँ दो रूप हैं’ या शब्दाला अनुरूप आहे. झरीन शर्मा यांची सरोद ‘गुड्डी’ चित्रपटातल्या ‘बोले रे पपीहरा’ या गाण्यातही ऐकू येते. संगीतकार वसंत देसाई यांच्याकडं इतकं उत्कृष्ट गाणं गायल्यानंतर गायिका वाणी जयराम यांची बरीच गाणी ऐकायला मिळतील, असं वाटलं होतं; पण तसं झालं नाही. ‘तू जो मेरे सूरमें’ या ‘चितचोर’ चित्रपटातल्या (संगीतकार रवींद्र जैन) गाण्यात येसूदास आणि हेमलता यांच्या स्वरांना वाद्यसाथ अशोक शर्मा (सतार) आणि झरीन शर्मा (सरोद) या दांपत्यानं केली आहे. त्यामुळं गाण्याचा अर्थ तिथंही किती समर्पक लागू झाला आहे बघा!!
****
ज्येष्ठ संतूरवादक पंडित उल्हास बापट यांनी एका मुलाखतीमध्ये सांगितलं आहे, त्याप्रमाणं आर. डी. बर्मन यांनी त्यांच्या गाण्यांमध्ये सरोदचा अनोखा उपयोग केला आहे. गुलजार यांच्या गाण्यांत ते अनेकदा जाणवतं. ‘आँधी’ चित्रपटातल्या ‘इस मोडसे जाते हैं’ या गाण्यातली झरीन शर्मा यांची सरोद आणि तेच सूर पुढं नेणारी अशोक शर्मा यांची सतार यांचा परिणाम अप्रतिम. ‘किनारा’ चित्रपटातल्या ‘नाम गुम जाएगा’ या अप्रतिम गाण्यात दुसऱ्या कडव्यापूर्वी सरोद विलक्षण कमाल करते. बासरी, सतार, जलतरंग, तबला, गिटार यांचा समर्पक वापर हे या गाण्याचं वैशिष्ट्य. अर्थात गुलजार यांचे शब्द हा खरंतर अभ्यासाचा वेगळाच विषय. ‘मेहबूबा’ चित्रपटात आर. डी. बर्मन यांनी ‘शिवरंजनी’ रागाचं वेगळं रूप ‘मेरे नैना सावन भादो’ या गाण्यात सादर केलं. किशोरकुमार यांच्या दर्दभऱ्या स्वराला साथ आहे गिटार; हरिप्रसाद चौरासिया यांची बासरी, झरीन शर्मा यांची सरोद यांची! लता मंगेशकर यांनी गायलेल्या याच गाण्याच्या साथीची वाद्यं प्रसंगानुसार बदलली आहेत ः पंडित शिवकुमार शर्मा यांचं संतूर, सरोद आणि सस्पेन्सचा ‘माहोल’ तयार करणारा तंबोरा!!
****
‘तुम बिन जाऊँ कहाँ’ या गाण्यांतले मेंडोलिनवादक किशोर देसाई यांनी सांगितलं की, ते आणि आर. डी. बर्मन एकाच वेळेस उस्ताद अली अकबर खाँ यांच्याकडं सरोद शिकत होते. किशोर देसाई यांनी सरोद वाजवलेली गाणी म्हणजे ‘तू छुपी है कहाँ’, ‘जो बात तुझमें है’, ‘फिर वोही शाम’ इत्यादी. सरोद बऱ्याच गाण्यांत ऐकू येते. ‘सरफरोशी की तमन्ना’, ‘छोड दे सारी दुनिया किसी के लिए’, ‘मोहे भूल गए सावरिया’, ‘आपने याद दिलाया तो मुझे याद आया’, ‘मेरी बिना तुम बिन रोये’ अशी बरीच उदाहरणं सांगता येतील. ‘मैं तुलसी तेरे आँगन की’ या चित्रपटाच्या शीर्षकगीतामध्ये सरोदवादन केले आहे ब्रिजनारायण यांनी. सरोदवर शास्त्रीय वादन सादर करणाऱ्या महिला कलाकार म्हणून शरण राणी माथूर यांचं नाव आवर्जून घेता येईल. चित्रपटसंगीतामध्ये सरोदवादन करणारे राधिका मोइत्रा, अरुणकुमार, कमल गांगुली, ईश्‍वर देसाई असे बरेच कलाकार आहेत. अगदी अलीकडच्या ‘पिकू’ या चित्रपटात शीर्षकगीत म्हणून सरोदचा उल्लेखनीय वापर केला आहे. ‘साज’ चित्रपटातल्या उस्ताद झाकीर हुसेन यांनी संगीतबद्ध केलेल्या ‘रात ढलने लगी’ या गाण्यात पहिल्या अंतऱ्यापूर्वी सरोद गाण्याचा माहोल बदलते आणि दुसऱ्या अंतऱ्यापूर्वी सॅक्‍सोफोन वेगळा परिणाम साधणारं हे सरोदवादन केलं आहे उस्ताद अली अकबर खाँ यांचे चिरंजीव, पंडिता अन्नपूर्णादेवी यांचे शिष्य उस्ताद आशिष खाँ यांनी.
****
सरोदवादन वेगळ्या पद्धतीनं करून या वाद्याला दुःखी मूडमधून आनंदी वातावरणात आणण्याचं श्रेय जातं उस्ताद अमजद अली खाँ यांना. सरोदवर वेगवेगळ्या रागाचे वेगवेगळे ढंग उस्तादजी सादर करतात. रागमालेमध्ये ‘तिलक कामोद’, ‘हंसध्वनी’, ‘कलावती’, ‘सरस्वती’, ‘दुर्गा’ अशा प्रकारे एका रागातून दुसऱ्या रागात ते सहजतेनं प्रवास करत जातात. उस्ताद झाकीर हुसेन यांची साथ लाभली तर म्हणजे ‘सोने पे सुहागा!’
****
सरोद कसं शिकायचं, शिकायला किती वेळ लागेल असे काही नेहमी विचारले जाणारे प्रश्‍न. कोणतेही वाद्य शिकायचे असल्यास आधी ते विकत घ्यावे, फक्त क्‍लासमध्ये वाजवून शिकता येत नाही, त्यासाठी घरी रियाज आवश्‍यक असतो. सरोद विकत घ्यायचे असल्यास सरोदवादकाच्या सल्ल्याने घ्यावे. साधारण किंमत ३५ हजार रुपयांपासून सव्वा लाख रुपयांपर्यंत असते. सरोद शिकण्यासाठी इतर तंतुवाद्यांपेक्षा चौपट वेळ लागतो. झटपट केलेला चायनीज राईस आणि वेळ काढून तयार केलेल्या बिर्याणीमध्ये जसा फरक आहे तसाच. फावल्या वेळेतला छंद म्हणून वाजवायचं हे वाद्य नव्हे. काही गाणी हौस म्हणून वाजवता यावीत, असा उद्देश असेल तर चांगल्या गुरूकडून मार्गदर्शन मिळालं आणि रोज रियाज केला, तर चार ते पाच वर्षांत जमेल. सरोदवर प्रभुत्व मिळवणं असा उद्देश असेल तर आयुष्य अपुरं पडेल... हेच तत्त्व बऱ्याच वाद्यांसाठी लागू आहे. आपल्याकडं काही पालक ‘मला तबला/संगीत शिकायचं होतं, माझं स्वप्न आता तू पूर्ण कर,’ असं सांगून मुलांचं नाव क्‍लासमध्ये नाव नोंदवतात. मात्र, संगीत किंवा कोणतीही कला आवड निर्माण झाल्याशिवाय शिकवता/शिकता येत नाही. सर्व वाद्ये ऐकण्याची सवय स्वतः करायला हवी आणि नंतर मुलांनाही लहानपणापासून बरीच वाद्यं ऐकायची सवय लावायला हवी. यानंतर वेगवेगळ्या कार्यक्रमांना मुलांना घेऊन जाता येईल. त्यांच्याबरोबर बसून संगीताचा श्रवणानंद घेता येईल. खूप ऐकण्याचा रियाज केल्यानंतर, आवड निर्माण झाल्यावर नवनवीन प्रश्‍न पडतात, गुरूला विचारले जातात आणि अशा चर्चेला रियाजाची जोड मिळाली की शिक्षण सुरू होतं. वाद्य शिकण्याबरोबर, गायन आणि तबला शिकणं आवश्‍यक असतं. कोणतंही वाद्य तालात वाजवलं जातं. त्यामुळं ताल, तालाचं आवर्तन, कोणत्याही मात्रेपासून वाजवायला सुरवात करून समेवर येणं हा शिक्षणाचा आणि रियाजाचा भाग आहे. उस्ताद अमजद अली खाँ यांचं how to play sarod हे पुस्तक उपलब्ध आहे, वाचण्याव्यतिरिक्त गुरूकडून मार्गदर्शन तितकंच महत्त्वाचं आणि अपरिहार्य. रोज एक ते दोन तास आणि सुटीच्या दिवशी तीन ते चार तास रियाज तबल्याबरोबर करावा. गिटारवादन शिकण्याचाही सरोद शिकताना उपयोग होतो. कोणतीही धून/राग संकल्पना आधी गाऊन मग वाद्यावर वाजवण्याचा प्रयत्न केला, तर जास्त परिणामकारक वादन होतं. गायनामुळं रागाचा मूड समजतो आणि रागसंकल्पना उमजते. त्यासाठी वाद्याला म्हणावं लागतं...
तू जो मेरे सूर में,
सूर मिला ले, संग गा ले
तो जिंदगी हो जाये सफल

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com