‘व्याजदर, कच्चे तेल, युद्ध यावरच बाजाराची वाटचाल अवलंबून' | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Nilesh Shaha

सध्या शेअर बाजार खूप अस्थिर आहे. अल्पबचत योजनांच्या व्याजदरांमध्ये अपेक्षित वाढ झालेली नाही. पुढे बाजाराचे काय होणार, हा सर्वसामान्य गुंतवणूकदारांपुढे यक्षप्रश्न आहे.

‘व्याजदर, कच्चे तेल, युद्ध यावरच बाजाराची वाटचाल अवलंबून'

सध्या शेअर बाजार खूप अस्थिर आहे. अल्पबचत योजनांच्या व्याजदरांमध्ये अपेक्षित वाढ झालेली नाही. पुढे बाजाराचे काय होणार, हा सर्वसामान्य गुंतवणूकदारांपुढे यक्षप्रश्न आहे. यासंदर्भात कोटक म्युच्युअल फंडाचे व्यवस्थापकीय संचालक नीलेश शहा यांची ज्येष्ठ गुंतवणूक सल्लागार सुहास राजदेरकर यांनी खास ‘सकाळ’साठी घेतलेली मुलाखत.

प्रश्न : अलीकडे झालेली व्याजदरवाढ, रशिया-युक्रेन युद्ध या घटनांचा शेअर बाजारावर परिणाम झालेला असून, त्याचे पडसाद बाजाराच्या चढ-उतारांतून तत्काळ प्रतिबिंबित झालेले आहेत. परंतु, आता ते बाजाराने पचविले आहेत. येत्या काही दिवसांत युद्ध थांबणार, अशी बाजारात चर्चा आहे. जर युद्ध थांबले तर बाजार ‘व्ही-शेप’ पद्धतीने पुन्हा उसळी घेईल, असे आपणांस वाटते का? काय स्थिती राहील?

उत्तर : बाजार सर्व प्रकारच्या बातम्यांना नेहमीच प्रतिसाद देत असतो. सध्या बाजाराला आश्चर्याचा धक्का बसेल, अशा बातम्या नाहीत. तेलाचे दर चढे आहेत, युद्ध सुरु आहे, अमेरिकेत व्याजदर वाढत आहेत, महागाई वाढत आहे. आता युद्धाची स्थिती येथून आणखी खराब होईल, असे वाटत नाही. तेलाचे दर काही काळानंतर तिहेरी आकड्यावरुन दुहेरी आकड्यांत येतील. महागाईचा दर पुढील वर्षी हळूहळू खाली येईल. परंतु, यापेक्षा वेगळ्या घटना घडल्या तरच बाजारात त्याचे पडसाद उमटतील. कारण बाजाराला त्याच्याशी जुळवून घ्यायचे आहे. नवी माहिती बाजाराला पचवायची आहे. जर रशिया-युक्रेनमध्ये संघर्ष आणखी वाढला आणि रशियाने अणुयुद्धाची धमकी दिली तर बाजार येथून आणखी खराब होऊ शकतो. परंतु, जर रशियात सत्ताबदल झाले आणि नव्या अध्यक्षांनी युक्रेनच्या प्रश्नावर राजकीय तोडगा काढला, तर या घडामोडीला बाजाराकडून तेजीच्या रूपाने प्रतिसाद दिसू शकेल. अमेरिकेत गृहनिर्माण आणि रोजगाराचा दर पाहिला तर तेथे व्याजदर वर जाईल, अशी शक्यता आहे. पण ‘जीडीपी’चा दर पाहिला, तर तो उणे १.४ टक्के आहे. दुसऱ्या तिमाहीतही अशाच उणे दराची शक्यता राहिली तर व्याजदर तितके वाढणार नाहीत. प्रत्यक्ष घडामोडी किती विपरित किंवा चांगल्या असतील, त्या हिशेबाने बाजाराची वाटचाल राहणार आहे. जर अर्थव्यवस्था आणि बाजार या दोघांमध्ये ‘व्ही-शेप’ आकाराची सुधारणा पाहिजे असेल, तर तेलाचे दर कमी झाले पाहिजेत, युक्रेनच्या प्रश्नावर राजकीय तोडगा निघाला पाहिजे, अमेरिकेत व्याजदरवाढ दोन-अडीच टक्क्यांवरच थांबली पाहिजे.

प्रश्न : ज्यावेळी गुंतवणूकदार आशा सोडून देतात, त्यावेळी बाजार उसळी घेतो. आपण घटनांचा योग्य अंदाज बांधला तरी योग्य वेळेला आपण नफा कमावू शकत नाही. आपण गुंतवणूक विभागणीबाबत(अॅसेट अॅलोकेशन) खूप चर्चा करतो. परंतु, बोलणे सोपे असले तरी प्रत्यक्ष कृती करणे खूप अवघड आहे. अशा स्थितीत गुंतवणूकदारांनी काय केले पाहिजे?

- जर आपण आजारी पडलो तर केमिस्टच्या दुकानात जाऊन औषधे खरेदी करतो का? करत नाही. तुम्ही डॉक्टरकडे जाता. तो आपल्याला तपासतो आणि मग गोळ्या लिहून देतो. काही वेळेला ताप दोन-तीन गोळ्यांनी बरा होतो. कोलेस्ट्रॉल, बीपी यासारख्या आजारांसाठी तो तुम्हाला दीर्घ कालावधीसाठीच्या गोळ्या देतो. आपण त्यांचा सल्ला किती तंतोतंत पाळतो, यावर तुम्ही केव्हा बरे व्हाल, हे निश्चित होते. लोक आपल्या आरोग्यासाठी जे पथ्यपाणी पाळतात, तेच त्यांनी आपल्या आर्थिक आरोग्यासाठी पण करायला हवे. सर्वांत प्रथम एका चांगल्या गुंतवणूक सल्लागाराचे मार्गदर्शन घ्यायला हवे आणि आपली जोखीम क्षमता तपासायला हवी. त्याला गुंतवणूक उद्दिष्ट सांगा आणि त्याच्याकडून व्यवस्थित आर्थिक नियोजन तयार करुन घ्या. ज्याप्रमाणे आपण डॉक्टरांकडून चमत्काराची अपेक्षा करत नाही, तसेच आपल्या आर्थिक सल्लागाराकडून सुद्धा चमत्काराची अपेक्षा करु नये. शेअर बाजारातही तेजी-मंदी येत-जात असते. कोणीही बाजाराचा हा ‘टॉप’ आणि हाच ‘बॉटम’ सांगू शकत नाही. ‘ॲसेट ॲलोकेशन’बाबत बोलणे खूप सोपे, परंतु कृती अवघड आहे, हे खरे आहे. पण म्युच्युअल फंडात ‘अॅसेट ॲलोकेशन’बाबत अनेक सुविधा आहेत. योग्य ‘अॅसेट ॲलोकेशन’मुळे आपली जोखीम कमी होते आणि परतावा चांगला मिळू शकतो.

प्रश्न : तुमचा, अर्थात कोटक म्युच्युअल फंडाचा असा एक निर्णय सांगा, की जो तुम्ही घेतला तेव्हा थोडा धाडसी आणि प्रवाहाविरुद्ध होता; पण त्या निर्णयाने गुंतवणूकदारांना चांगला परतावा मिळवून दिला...

- एखादा निर्णय कधी बरोबर असू शकतो, तर कधी चुकीचा असू शकतो. मार्च २०२० मध्ये ज्यावेळी बाजार कोसळला, त्यावेळी कमोडिटीचे दर खूप कोसळले होते. आम्ही कमोडिटीच्या शेअरमध्ये कधीही जास्त गुंतवणूक केलेली नव्हती. थोडीच करायचो, मोठी गुंतवणूक कधीही केलेली नव्हती. २०२० मध्ये आम्ही मेटलच्या शेअरमध्ये गुंतवणूक केलेली नव्हती, त्यामुळे आमच्या फंडाने खूप जास्त चांगली कामगिरी दाखविलेली नव्हती. आम्ही त्यात गुंतवणूक केली असती, तर आमचा परतावा खूप चांगला दिसला असता. पण आम्ही अन्य क्षेत्रात चांगली गुंतवणूक करत चांगला परतावा मिळवत होतो. पण मेटल क्षेत्रामध्ये आम्ही ‘अंडरवेट’ होतो. त्यात आम्ही ‘ओव्हरवेट’ राहिलो असतो तर ‘सोने पे सुहागा’ अशी स्थिती झाली असती. आम्ही प्रत्येक महिन्याला पाहायचो, की आम्ही दूर राहिल्याने आमचे नुकसान होत आहे. पण आम्ही कळपात घुसलो नाही. मेटलचे दर वर जातात, तसे खालीही येतात. जानेवारी २०२२ मध्ये आम्ही एक माहिती दिली होती, की २०१९ मध्ये मेटल, क्रूड हे जागतिक ‘जीडीपी’च्या आठ टक्के होते. २०२२ मध्ये त्यांनी जागतिक ‘जीडीपी’मध्ये ५५ टक्के योगदान दिले आणि त्यांचा भार १२ टक्के झाला. पण आम्हाला हे काहीसे वेगळे वाटत होते. आम्ही ठरवले, की आम्हाला मेटलच्या शेअरमध्ये गुंतवणूक करायचीच नाही. गुंतवणूक केली नसल्याने आम्ही पस्तावलेला असलो तरी आता गुंतवणूक करुन पुन्हा पस्तवायचे नाही. आज आमचा हा निर्णय त्यानंतर सहा महिन्यांनी बरोबर ठरला. त्यामुळे आमच्या एका निर्णयात नुकसानही झाले आणि फायदाही झाला.

प्रश्न : तुम्ही म्हटल्याप्रमाणे यावेळी फंड व्यवस्थापकांपेक्षा, देशातील सर्वसामान्य गुंतवणूकदारांनी बाजारावर जास्त विश्वास दाखविला. त्यामुळेच परकी गुंतवणूकदारांनी तुफान विक्री करूनसुद्धा बाजार खूप मोठ्या प्रमाणात खाली गेला नाही. म्युच्युअल फंडांकडून त्यांनी कोणत्या लाभाची अपेक्षा ठेवावी?

- ज्यांनी गेल्या दहा वर्षांत ‘एसआयपी’च्या माध्यमातून गुंतवणूक सुरुच ठेवलेली आहे, ते या ‘करेक्शन’मध्येही दोन आकडी परतावा कमवत आहेत. ३, ५, ७ आणि १० वर्षांत दोन आकडी परतावा मिळालेले अनेक जण आहेत. काही ठिकाणी जास्त, तर काही ठिकाणी किंचित कमी; पण दोन आकडी परतावा मिळाला आहे. शिस्तप्रिय गुंतवणूकदारांना भारतात पैसा मिळत आहे. आज देशाची अर्थव्यवस्था तीन लाख कोटी (ट्रिलियन) डॉलर झालेली आहे. आगामी पाच-सात वर्षांत अर्थव्यवस्था सात लाख कोटी (ट्रिलियन) डॉलरपर्यंत वाढून, त्यानंतर १०-१५ लाख कोटी (ट्रिलियन) डॉलर होईल. ही वाढ बाजारात प्रतिबिंबित झालेली दिसेल आणि ती प्रत्येकाच्या पोर्टफोलिओत पण दिसेल. २०२० मध्ये आमच्या तीन वर्षांच्या ‘एसआयपी’चा परतावा उणे होता. दहा वर्षांसाठीचा परतावा बँकेच्या एका वर्षाच्या मुदत ठेवींपेक्षा कमी होता. त्यावेळी बरेच गुंतवणूकदार घाबरुन गेले असतील. पण ज्यांनी ‘एसआयपी’ सुरुच ठेवली, त्यांना दोन आकडी परतावा मिळत आहे. ज्यांनी गुंतवणूक काढून घेतली, त्यांचा फक्त कागदावरच असलेला तोटा प्रत्यक्षात आला. पण ज्यांनी आपल्या ‘एसआयपी’मध्ये वाढ (टॉप-अप) केली, ते आज सर्वांत जास्त परतावा मिळवत आहेत. जर गुंतवणूकदारांनी शिस्त पाळली, तर भारताची वाढणारी अर्थव्यवस्था सर्वांचाच फायदा करून देणार आहे. परंतु, त्यासाठी आपल्याला संयमाने अग्निपरीक्षा द्यावीच लागेल. मंदीत आपल्याला उणे परतावा सहन करावाच लागतो आणि तरीही गुंतवणूक सुरु ठेवावी लागते.

प्रश्न : क्रिप्टो ॲसेटच्या व्यवहारांवर ‘टीडीएस’ लागू करण्याचा निर्णय झालेला आहे. तुमचे ‘क्रिप्टो ॲसेट’ या नव्या मालमत्ता विभागाविषयी काय मत आहे?

- अनेक लोक ‘क्रिप्टो करन्सी’ असा शब्द वापरतात. परंतु, तुम्ही ‘क्रिप्टो अॅसेट’ हा योग्य शब्द वापरला आहे. क्रिप्टो ही करन्सी नाही, तर ती अॅसेट आहे. क्रिप्टोतील गुंतवणूक जास्त जोखीम आणि जास्त जुगार यात मोडते. तिला ‘जास्त जोखीम आणि जास्त परतावा’ सुद्धा म्हणता येणार नाही. हा नवा प्रकार खूपच अस्थिर राहणार आहे. काही क्रिप्टो तर आता ९९ टक्के खाली घसरलेले आहेत. अशा प्रकारात गुंतवणूक करताना तुम्ही तुमचे सारे भांडवल गमावू शकता, यासाठी तुम्ही मानसिकदृष्ट्या तयार पाहिजे. क्रिप्टोत व्यवहारासाठीचा खर्च दोन्ही बाजूने १५ ते २० टक्के इतका जास्त आहे. म्हणजे क्रिप्टो ही गळणारी बादली आहे. म्हणजे तुम्ही दोन वेळा ‘ट्रेड’ करता, त्यावेळी २० टक्के शुल्क दिलेले असते. व्यवहारासाठी इतकी उच्च किंमत मोजून फारच थोडे लोक पैसे कमवू शकतील. तिसरे म्हणजे यामध्ये सुरक्षितपणे ठेवता येण्याची पद्धत (सेफ किपिंग) पाहिजे. आजच्या घडीला ३० टक्के बिटकॉईन अशा खात्यात आहे, ज्यांच्या ऑनलाईन चाव्या अर्थात पासवर्डस हरवलेल्या आहेत. त्यामुळे ‘सेफ किपिंग’ हे खूप महत्त्वाचे आहे. चौथी बाब म्हणजे तुम्ही क्रिप्टोत व्यवहार करताना मध्यस्थ्यांच्या व्यवस्थेबाबत खात्री पाहिजे. एक्स्चेंज पळून गेले, डेटा उडून गेला अशा अनेक बातम्या दररोज कानावर पडत आहेत. पण मध्यस्थ व्यवस्थाच गायब झाली, तर पैशासह सगळे गायब झालेले असेल. त्यामुळे क्रिप्टोकडे तुम्ही कसेही पाहिले, तरी ते अतिशय ‘हाय रिस्क-हाय गॅम्बल’ आहे. भारतात क्रिप्टो नियंत्रित नाही, पण व्यवहार करण्यासाठी ते कायदेशीर आहे. कारण सरकार त्यावर ‘टीडीएस’ आकारत आहे. पण म्युच्युअल फंड, विमा योजना याप्रमाणे ते नियंत्रित मुळीच नाही.

प्रश्न : नीलेश शहा त्यांचे स्वतःचे पैसे कसे आणि कोठे गुंतवतात?

- मी स्वतःला सावध गुंतवणूकदार मानतो. मी सुद्धा म्युच्युअल फंड इक्विटी योजनांमध्ये ‘एसआयपी’ पद्धतीने गुंतवणूक करतो, मी ‘एनपीएस’मध्येही गुंतवणूक करतो. मी लोकांना जे सांगतो तशीच मी नियमित गुंतवणूक करतो. माझी गुंतवणूक दीर्घकालावधीसाठीच असते. मी बचतीवर खूप भर देतो, जास्त खर्च करत नाही. मी थोडा पैसा डेट फंडामध्ये, थोडा इक्विटीत, थोडा रिअल इस्टेटमध्ये, थोडा सोन्यात गुंतवतो; तसेच थोडी बाहेरील देशांतील (ऑफशोअर) इक्विटीमध्येही माझी गुंतवणूक आहे. माझ्यावर ‘सेबी’चे खूप निर्बंध आहेत. डेटमधील गुंतवणूक नियमानुसार तीन वर्षांसाठी ‘लॉक’ आहे. मी लोकांना जितका सल्ला देऊ शकतो, तितकी गुंतवणूक मी निर्बंधांमुळे करु शकत नाही. ती माझी वैयक्तिक मर्यादा आहे.

Web Title: Suhas Rajderkar Writes Market Movements Depend On Interest Rates Crude Oil War Share Market

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..