मॉन्सून आणि शेअर मार्केट

भारताच्या अर्थव्यवस्थेमध्ये शेतीचा वाटा कमी होत असला तरी आजही तो मोठा आहे. साधारणपणे ६० टक्के लोकसंख्या ही आजही शेतीवर अवलंबून आहे.
Monsoon and Share Market
Monsoon and Share Marketsakal
Summary

भारताच्या अर्थव्यवस्थेमध्ये शेतीचा वाटा कमी होत असला तरी आजही तो मोठा आहे. साधारणपणे ६० टक्के लोकसंख्या ही आजही शेतीवर अवलंबून आहे.

भारताच्या अर्थव्यवस्थेमध्ये शेतीचा वाटा कमी होत असला तरी आजही तो मोठा आहे. साधारणपणे ६० टक्के लोकसंख्या ही आजही शेतीवर अवलंबून आहे. तसेच, भारताच्या एकूण देशांतर्गत उत्पादनात (जीडीपी) शेतीचा वाटा साधारणपणे २० टक्के आहे. त्यामुळे पाऊस कमी झाला, तर आपला देश दुष्टचक्रात सापडू शकतो. पाऊस कमी झाला, तर शेतकऱ्यांची कर्जे थकतील, बँका; तसेच इतर कर्जे देणाऱ्या संस्था अडचणीत येतील, अन्नधान्याचा तुटवडा निर्माण होईल, त्यांचे दर वाढतील, चलनवाढ होईल, रिझर्व्ह बँकेला व्याजदर वाढवावे लागतील; ज्यामुळे परत वाढ खुंटेल, त्याचा आपल्या ‘जीडीपी’वर नकारात्मक परिणाम होईल. सरकारसाठीसुद्धा पावसाचा अचूक अंदाज महत्त्वाचा असतो. कारण त्यानुसार काही महत्त्वाचे निर्णय घेता येतात; जसे, की एखादे पीक कमी निघण्याची शक्यता असेल, तर त्याची निर्यात कमी अथवा बंद करणे, कोणत्या राज्यांमध्ये पाऊस कमी होणार आहे, तिथे अगोदरच काही उपाययोजना करणे, किमान आधारभूत किंमत (एमएसपी) वाढविणे आदी.

यंदा पाऊस ‘नॉर्मल’?

इंडियन मेटेओरोलॉजिकल डिपार्टमेंट (आयएमडी) यांनी केलेल्या अभ्यास आणि अंदाजानुसार, यावर्षी भारतामध्ये पाऊस ‘नॉर्मल’ (९६ टक्के) होणार आहे. त्यांचा या वर्षी ८३.५० सेंटिमीटर पावसाचा अंदाज आहे. परंतु, ‘स्कायमेट’ या खासगी संस्थेने मात्र यंदाचा पाऊस हा ‘नॉर्मल’पेक्षा कमी राहील (९४ टक्के) असे जाहीर केले आहे. ‘नॉर्मल’ची व्याख्या साधारण अशी असते, की ५० वर्षांच्या सरासरी पावसाच्या ९६ टक्के ते १०४ टक्के पाऊस होणार असेल, तर तो ‘नॉर्मल’ समजला जातो. ‘आयएमडी ’ आणि ‘स्कायमेट ’ या दोन्ही संस्थांच्या अंदाजाची सरासरी काढली, तर या वर्षी पाऊस ९५ टक्के म्हणजेच ‘नॉर्मल’पेक्षा कमी राहण्याची शक्यता आहे, असे म्हणावे लागेल. जून आणि जुलैमध्ये पाऊस ठीक राहून ऑगस्ट आणि सप्टेंबरमध्ये तो कमी होण्याची शक्यता आहे. असे असले तरीही पुढील गोष्टी लक्षात घेणे आवश्यक आहे.

महत्त्वाचे घटक

1) हवामानतज्ज्ञांनी केलेला पावसाचा हा एक अंदाज असतो आणि त्यामध्ये ५ ते १० टक्के बदल संभवतो. ‘आयएमडी’चा हा अंदाज ९६ टक्के म्हणजेच ‘नॉर्मल’ व्याख्येच्या सर्वांत खालच्या नंबरवर असल्याने (९६ ते १०४ टक्के), तो ‘नॉर्मल’पेक्षा कमी राहण्याची शक्यता वाढते.

2) समुद्र लाटा, हवेचा दाब, वातावरण आणि तापमान यामध्ये सातत्याने बदल होत असतात. त्यामुळे ‘आयएमडी’ परत एकदा मे महिन्यात त्यांचा अंदाज जाहीर करेल, त्यावेळी कदाचित परिस्थिती अधिक चांगली असू शकते.

3) दोन्ही संस्था या खूपच ‘कन्झर्व्हेटिव्ह’ अर्थात हात राखून अंदाज जाहीर करतात. त्यामुळे प्रत्यक्षात पाऊस चांगला होण्याची सुद्धा शक्यता असते.

4) अल-निनो’ आणि ‘ला-नीना’ हे शब्द सुद्धा या संदर्भात आपण नेहमी ऐकतो. विषय मोठा आहे; परंतु आपण आता इतकेच लक्षात घेऊ, की ‘अल-निनो’ म्हणजे कमी पाऊस आणि ‘ला-नीना’ म्हणजे जास्त पाऊस. असे जरी असले तरीही ‘अल-निनो’मध्ये सुद्धा चार प्रकार असतात. दुर्बल, माफक, जोरदार आणि अतिजोरदार. या वेळचा ‘अल-निनो’ हा ‘दुर्बल’ असल्याने फारसे घाबरण्याचे कारण वाटत नाही. परंतु, हाच ‘अल-निनो’ जर अतिजोरदार असेल, तर मात्र पाऊस कमी पडण्याची शक्यता जास्त राहते.

5) नुसत्या ‘अल-निनो’चा विचार न करता त्याचा ‘इंडियन ओशन डायपोल’ (आयओडी) याच्या बरोबरीने विचार करणे जास्त संयुक्तिक असते. ‘आयओडी’ म्हणजे थोडक्यात, पूर्वेकडील (बंगालचा उपसागर) येथील आणि पश्चिमेकडील (अरबी समुद्र) तापमानामधील फरकामुळे हवेचा दाब निर्माण होऊन वाहणारे वारे. ‘आयओडी’ सक्रिय असेल, तर ‘अल-निनो’ असूनसुद्धा पाऊस ‘नॉर्मल’ होऊ शकतो. ‘स्कायमेट’चा अंदाज असा आहे, की सध्या ‘आयओडी’ निष्क्रिय आहे; परंतु तो सक्रिय होऊ शकतो. तसे झाले तर पाऊस ‘नॉर्मल’ होईल.

6) खरीप पिके, जी साधारणपणे जून ते सप्टेंबर दरम्यान होतात, ती थेट पावसावर अवलंबून असतात. त्यामुळे खरीप पिकांवर पावसाच्या कमी-जास्त होण्याचा थेट आणि मोठा परिणाम संभवतो.

7) चलनवाढ मोजताना ज्या प्रमुख गोष्टी विचारात घेतल्या जातात, त्यामध्ये ४० टक्के अन्नधान्याचा वाटा असतो. त्यामुळे पाऊस कमी-जास्त होण्याचा चलनवाढीवर त्या प्रमाणात परिणाम होतो. आकडे असे दर्शवितात, की २०१४, २०१५ आणि २०१८ मध्ये पाऊस ‘नॉर्मल’पेक्षा कमी असूनसुद्धा चलनवाढ सरासरी सहा टक्क्यांच्याच आसपास राहिली.

8) पावसाचा हा अंदाज संपूर्ण देशासाठी सरासरी असतो. काही राज्यांत कमी, तर काही राज्यांत जास्त पडतो. त्यामुळे कोणत्या राज्यात पाऊस कमी राहण्याची शक्यता आहे, ते पाहणे महत्त्वाचे ठरते. उदाहरणार्थ, समजा गुजरात राज्यात तो ‘नॉर्मल’ राहणार असेल, तर भुईमूग आणि कापसावर फारसा परिणाम होणार नाही. परंतु, पंजाब राज्यात पाऊस कमी पडण्याचा अंदाज असल्यास गहू, मका आणि डाळींवर नकारात्मक परिणाम दिसू शकतो. या वर्षीच्या पावसाच्या अंदाजानुसार, जम्मू-काश्मीर, लडाख, गुजरात, राजस्थान, कर्नाटक येथे चांगला पाऊस होण्याची शक्यता आहे, तर उत्तर प्रदेश, पंजाब, मध्य प्रदेश येथे पाऊस कमी होण्याची शक्यता आहे. महाराष्ट्रात ‘नॉर्मल’पेक्षा कमी असण्याची शक्यता आहे.

बाजारावर काय परिणाम?

पाऊस कमी झाला, तर शेअर बाजार हमखास पडणारच, असे मानण्याचे कारण नाही. शेअर बाजार इतर असंख्य गोष्टींवर अवलंबून असतो. आकडे असे दर्शवितात, की पाऊस कमी राहूनसुद्धा शेअर बाजाराने चांगला परतावा दिला आहे किंवा पाऊस चांगला राहूनसुद्धा परतावा कमी झाला आहे.

तात्पर्य काय?

पावसाच्या भाकितांनुसार घाईघाईने ट्रॅक्टर, सिमेंट, बी-बियाणे, खत बनविणाऱ्या कंपन्यांच्या शेअरची खरेदी-विक्री न करता त्याचा समग्र अभ्यास करणे आवश्यक ठरते. यासाठी बाजारातील अनुभवी विश्लेषकांची मदत घेणे हिताचे ठरते.

(लेखक ‘ए३एस’ फायनान्शिअल सोल्युशन्सचे प्रवर्तक आहेत.)

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com