
‘इनिशिअल पब्लिक ऑफर’ म्हणजे ‘आयपीओ’ चा बाजार मागील १२ ते १६ महिन्यांमध्ये अर्थात खूपच तेजीत होता. २०२१ या एकाच वर्षामध्ये तब्बल ५५ ‘आयपीओ’द्वारे जवळपास एक लाख कोटी रुपये इतकी विक्रमी गुंतवणूक झाली.
‘इनिशिअल पब्लिक ऑफर’ म्हणजे ‘आयपीओ’ चा बाजार मागील १२ ते १६ महिन्यांमध्ये अर्थात खूपच तेजीत होता. २०२१ या एकाच वर्षामध्ये तब्बल ५५ ‘आयपीओ’द्वारे जवळपास एक लाख कोटी रुपये इतकी विक्रमी गुंतवणूक झाली. मोठ्या पाच आणि दहा आयपीओंनी एकूण जमा रकमेच्या अनुक्रमे ४१ आणि ६० टक्के रक्कम जमा केली. पाच ते सात दिवसांत कायदेशीररित्या पैसे दाम-दुप्पट होण्याचे सर्वसामान्य गुंतवणूकदारांचे स्वप्न बहुतेक ‘आयपीओं’नी पूर्ण केले. ५५ पैकी तब्बल १६ आयपीओंनी गुंतवणूकदारांचे पैसे दुप्पट केले आहेत. यामध्ये पारस डिफेन्स या शेअरने सर्वांत जास्त म्हणजे लिस्टिंगच्या दिवशी १८५ टक्के आणि त्यानंतर थोड्याच दिवसात ३०० टक्के परतावा दिला आहे. एमटीएआर टेकनॉलॉजी हा शेअर, ज्याची आयपीओ किंमत ५७५ होती, तो ११०० रुपयांना ‘लिस्ट’ झाला.
हे सर्व आठवण्याचे कारण म्हणजे, मागील काही महिन्यांपासून अचानक तेजीत आलेला ‘प्री-आयपीओ बाजार’ आणि वाढत असलेल्या फसवणुकीच्या घटना. प्री-आयपीओ म्हणजेच ‘प्रायव्हेट प्लेसमेंट’. कंपनी त्यांचा आयपीओ आणण्यापूर्वीच खासगीत खरेदी केलेले शेअर. याआधी बहुतेक सर्वसामान्य लोकांना प्री-आयपीओ शेअर काय असतात, ते कोठून आणि कसे घेता येतात, ते माहिती नव्हते. परंतु, मागील काळातील आयपीओच्या तेजीमुळे आता बहुतेक गुंतवणूकदार ‘प्री-आयपीओ’कडे वळायला लागले आहेत. त्याचे कारण म्हणजे, बहुतेक गुंतवणूकदारांची एक तक्रार सातत्याने राहिली आहे, की आयपीओमध्ये अर्ज केला तरीही ॲलॉटमेंट मिळत नाही. त्यामुळे, बहुतेक गुंतवणूकदार प्री-आयपीओमध्ये शेअर खरेदी करताना दिसू लागले. हे म्हणजे, स्टेशनवर गाडी आल्यावर बसायला जागा मिळण्यासाठी जी गर्दी आणि हाणामारी होते आणि उशिरा चढलेल्यांना बसायला जागा मिळत नाही, (थोडक्यात ॲलॉटमेंट मिळत नाही) तसेच झाले. ही निराशा टाळण्यासाठी काही लोक, यार्डामध्ये जाऊन गाडीत बसून यायचे. म्हणजेच प्री-आयपीओ खरेदी करून आपली जागा निश्चित करून ठेवायची. आणि याचाच फायदा, काही चुकीची मंडळी घेताना दिसू लागली. या क्षेत्रामध्ये गुंतवणूकदारांना फसविण्याच्या आणि त्यांच्या अज्ञानाचा गैरफायदा घेण्याचे प्रमाण वाढत असल्याचे दिसते आहे. हा खरे तर एक सायबर गुन्हाच म्हणता येईल. कारण, गुंतवणूकदार स्वतः शेअरची किंमत द्यायला तयार होतो आणि स्वतःच्या हाताने धनादेश देतो. नुकतेच पुण्यामध्ये घडलेले एक उदाहरण घेऊ, म्हणजे हा विषय समजणे सोपे होईल.
झाले असे, की पुण्यातील एका नामवंत डॉक्टरांनी त्यांची गावाकडील जमीन विकली होती आणि त्याचे त्यांना एक कोटी रुपये आले होते. ते त्यांना शेअरमध्ये गुंतवायचे होते. त्यांना कोणीतरी एका प्रसिद्ध ब्रोकिंग कंपनीचे नाव सांगितले आणि ते त्यांच्या ऑफिसमध्ये गेले. तेथील एक मॅनेजर आणि सहकाऱ्यांनी या डॉक्टरांना एका आलिशान मिटिंग रूममध्ये बसविले. थंडगार रस आणि बिस्किटे मागविली. समोरील स्क्रीनवर एक सुंदर प्रेझेंटेशन दाखविले. त्यात प्रसिद्ध गुंतवणूकगुरू वॉरेन बफे यांच्यापासून ते राकेश झुनझुनवालांपर्यंत सर्वांनी शेअर बाजारामधून कसे पैसे कमावले, याचे उदाहरणासह सुरस वर्णन होते. नुकत्याच बाजारात आलेल्या ‘आयपीओ’ शेअरची किंमत आणि लिस्टिंगला त्यांची तुफान वाढलेली किंमत याची ताजी उदाहरणे दिली. परंतु, ‘आपल्यासारख्या सर्वसामान्य माणसांना या शेअरची ॲलॉटमेंट कशी मिळत नाही,’ ते सांगितले. यावर उपाय म्हणून असे शेअर ‘लिस्ट’ होण्यापूर्वीच कसे घेणे आवश्यक आहे, ते समजावले. वर असेही सांगितले, की तुमचे नशीब चांगले आहे म्हणून तुम्ही इथे आलात, कारण बहुतेक सर्वसामान्य लोकांना असे शेअर कसे घेता येतात, हे माहिती नसते.
इतका ‘ब्रेन-वॉश’ झाल्यावर डॉक्टर त्यांना नकार देणे शक्यच नव्हते. मग त्यांनी डॉक्टरांना २५ शेअरची यादी दिली (काही शेअरची नावे सोबतच्या तक्त्यामध्ये उदाहरणादाखल दिली आहेत.) आणि हे सर्व शेअर ते डॉक्टरांसाठी अतिशय वाजवी व स्वस्त किमतीमध्ये खरेदी करतील, असे सांगितले. परंतु, ते जिथे काम करतात, त्या ब्रोकर कंपनीतर्फे हे शेअर खरेदी केले तर डॉक्टरांना ते महाग मिळतील, त्यापेक्षा त्यातील एका सहकाऱ्याच्या ओळखीच्या दुसऱ्या एका कंपनीकडून ते घ्यावेत, असे ठरले. डॉक्टरांकडून त्या कंपनीच्या नावावर एक कोटी रुपयांचा चेक घेतला गेला. डॉक्टरांच्या डी-मॅट खात्याचा तपशील घेतला गेला. पुढे १५ ते २० दिवसांत हे सर्व शेअर डॉक्टरांच्या डी-मॅट खात्यावर जमा होतील, असे आश्वासन दिले.
प्रत्यक्षात ते शेअर केवळ १० दिवसांच्या आतच डॉक्टरांच्या डी-मॅट खात्यात जमा झाले. त्यामुळे डॉक्टरांना कोणतीही शंका आली नाही, उलट, त्या सहकाऱ्यावरचा त्यांचा विश्वास वाढला आणि त्यांनी त्याचे आभारसुद्धा मानले. परंतु, सहा महिन्यांनी डॉक्टरांच्या लक्षात आले, की त्यांनी ज्या किमतीला ते शेअर खरेदी केले होते, त्या शेअरची ती किंमत कधीही नव्हतीच. खरेदीच्या दिवशी जी किंमत होती, त्यापेक्षा त्यांच्याकडून दुप्पट ते दहा पट जास्त रक्कम घेण्यात आली होती. खरेदीच्या दिवशी त्या सर्व शेअरची किंमत होती साधारणपणे फक्त ४० लाख रुपये. म्हणजे त्याच दिवशी डॉक्टरांना ६० लाख रुपयांचा तोटा झाला. हा ‘फायनान्शिअल फ्रॉड’ आहे आणि याला उपाय आणि शिक्षा आहेत. या शेअरच्या किमतींना आधारभूत निर्देशांक जरी नसला आणि डॉक्टरांनी जरी त्यांच्या हाताने ते पैसे दिले असले तरीसुद्धा कोणीही एखाद्याच्या अज्ञानाचा इतका मोठा गैरफायदा घेऊ शकत नाहीत. उदाहरणार्थ, तुम्ही एखाद्या नव्या शहरात गेला आणि रिक्षावाल्याने तुमच्या रस्त्याच्या अंतराबाबतच्या अज्ञानाचा फायदा घेऊन तुम्हाला ५० रुपयांच्या जागी ५०० रुपये सांगितले तर त्याला शिक्षा आहे का नाही? तसेच आहे हे!
या सर्वांमधून मिळणारी शिकवण आणि बोध लक्षात घेऊन त्यावर भर देणे गरजेचे आणि महत्त्वाचे आहे, असे मला वाटते. प्री-आयपीओ शेअर, जमीन, क्रिप्टो करन्सी या गोष्टींचे वास्तव मूल्य हे सापेक्ष असते. खरी किंमत ठरविणे हे क्लिष्ट आणि अवघड काम असते. त्यामुळेच, आपण सर्वांनीच या गोष्टींचे व्यवहार करताना अतिशय सावधगिरी बाळगणे गरजेचे आहे. अवाजवी परताव्याच्या कोणत्याही आमिषाला बळी पडता कामा नये. तसेच तज्ज्ञ आणि अनुभवी सल्लागाराच्या मदतीनेच निर्णय घेतले, तर भविष्यात असे प्रसंग घडणार नाहीत.
(लेखक प्रसिद्ध गुंतवणूक सल्लागार आहेत.)
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.