इदं न मम... (सुजाता फडके)

sujata phadke
sujata phadke

काय करावं? कुठून सुरवात करावी हा मोहाचा पसारा आवरायला? प्रश्‍न...प्रश्‍न...डोक्‍यात अचानक प्रकाश पडला..."बिंदू ते सिंधू' असा प्रवास असतो सरितेचा. मग या बिंदूपासूनच सुरवात करावी या विचारासरशी ताडकन उठले आणि शिल्पाला हाक मारली...

'आजी, तुमचा फोन...कुणीतरी बाई मुंबईहून बोलत आहेत,''
शिल्पा फोन धरून उभी होती.
'हॅलो, नमस्कार. मी जयंती जोशी बोलतेय.''
'काल तुमचा एक लेख वाचला. खूप आवडला. जयंती जोशी हे नाव ओळखीचं वाटलं. माझ्या एका शाळकरी मैत्रिणीची आठवण आली. तीही याच नावाची - "तीन जे.' जयंती जयंत जोशी. पूर्वीची सरिता पांडे.''
'अगं ए, मी तीच सरिता! पण तू कोण?''
'अगं मी लीलू. तुझी शाळेतली घट्ट मैत्रीण. "साखळीसखी' म्हणायच्या आपल्याला वर्गातल्या सगळ्या मुली. आठवतंय? ए, पण तू लेखिका वगैरे कधी झालीस? अन्‌ पुण्यात केव्हा आलीस?''
'लीलू, तू अशी अचानक भेटशील याची कल्पनाच नव्हती. आश्‍चर्य, महान आश्‍चर्य - अगदी "हरवले ते गवसले' बाई. तूही लग्नानंतर गडप झालीस ती झालीसच; पण आता सांग, मुंबईला कशी पोचलीस?''
'अगं, मुलगा मुंबईला आहे म्हणून इथंच स्थिरावलो. आई गेल्यावर भाऊ नाशिकला गेला. मग आपल्या गावचं माझं माहेरच संपलं. मग आपली भेट कधी आणि कशी होणार? पण आज अचानक तू सापडलीस तुझ्या लेखनामुळे. तुझा लेख वाचला. खाली नाव-पत्ता पाहिला. संपर्कक्रमांकही होताच. मनात एकदम आलं, ही आपलीच मैत्रीण जयंती असावी. मग म्हटलं, फोन करून खात्री करून घ्यावी. कारण, लग्नानंतर तुझं बदललेलं नाव एकदम युनिक होतं ः जेजेजे...थ्री जे.''
'मग तुझ्या लग्नातला सगळा प्रसंगच आठवला. तुझ्या या "जेजेजे'वरून खूप थट्टा-मस्करी झाली होती. त्यानंतर तुला सगळ्या मैत्रिणी "थ्री जे' असंच म्हणायच्या.''
'लीलू, तू एकदम अंतरंगालाच हात घातलास. ते मौज-मजेचे, आनंदाचे दिवस कसे भुर्रकन उडून गेले. माहेरच्या अंगणातल्या चिमण्यांसारखे!
बघता बघता आज्या झालो आपण...आज्या''.
चाळीस वर्षांचा विरह, त्या काळातले सुख-दुःखांचे प्रसंग, मुलं, त्यांची शिक्षणं, लग्नकार्ये, नातवंडं, कोण किती शिकलंय, काय करतंय,
यश, व्यवसाय...असं सगळं सगळं गप्पांमध्ये उलगडत गेलं. या भरभरून बोलण्यात दोन्हीकडून उत्साह ओसंडत होता. तेवढ्यात दारावरची बेल वाजली. नाइलाजानं संवादाला ब्रेक बसला.
***

लीलू आणि मी...एक दुसरीला अगदी पूरक. आमची शाळा - प्राथमिक, माध्यमिक मग मॅट्रिकपर्यंत बरोबर. पुढं तिचं लग्न. भुसावळला जाणं. तिथून तिनं माझ्या लग्नाला येणं. चार दिवस खूप मजा करणं. सगळं सगळं मनाच्या तळातून वर आलं. मन कसं खोल असतं नाही! तळ काही लागत नाही; पण कधी जर का चुकून तळ लागलाच तर त्या उपशात काय काय निघेल काही सांगता येत नाही. किती किती आणि कुठल्या कुठल्या आठवणी आपण
जपून ठेवत असतो!
एवढी वर्षं पुणे-मुंबई या शेजारशेजारच्या शहरांत राहूनही एकमेकींना एकमेकींचा पत्ता नव्हता अन्‌ आज अचानक पत्ता लागला तो माझ्या युनिक नावामुळे. सगळ्या मैत्रिणींनी ज्या माझ्या नावाची टिंगल उडवली होती त्याच विशिष्ट नावामुळे आम्हा दोघींची भेट झाली. मधली चाळीस वर्षं पुसून गेली अन्‌ आम्ही दोघी लहान पोरींगत हसत राहिलो, बोलत राहिलो.
***

वामकुक्षीसाठी पडले; पण विचारांनी झोपच उडवली. खरंच त्या वेळी वाटायचं, लीलूशिवाय जगण्यात मजाच नाही. लग्नानंतर माहेर सोडताना अश्रू अनावर. कसं आयुष्य जाणार? आता तर सगळंच बदललं. अगदी नावासकट. नवीन नाव मिळालं - जयंती. नवऱ्याच्या नावाशी जुळणारं. पुढं जन्मभर तेच नाव मिरवलं. त्याआधी ओळख होती सरिता पांडे. हेही नाव आई-वडिलांनी दिलेलं. ते लग्नापर्यंत टिकलं. पुढं तीच "कु. सरिता पांडे' झाली "सौ. जयंती जोशी.' व्यक्ती तीच; पण ओळख बदलली. जयंती कोण? तर अमक्‍या-तमक्‍याची बायको...अमक्‍या घराण्याची सून. पुढं मुलं मोठी झाली. शिक्षण, व्यवसाय, पदाप्रमाणे अमक्‍या-तमक्‍या प्रसिद्ध व्यक्तीची आई...अशी आणखी एक नवी ओळख. अन्‌ आता सोनू-मोनूची आजी. म्हणजे यात पूर्वीची सरिता पार गडप झाली. मला आजवर मिळत गेलेल्या या सगळ्या ओळखी दुसऱ्यांनी दिलेल्या. मग इथं माझं काय? आजपर्यंत विचारच केला नव्हता. अगदी निधनाच्या बातमीपर्यंत हे असंच चालत असतं. "अमक्‍या-तमक्‍याच्या बायकोचं निधन'...जणू मी माझी नाहीच! मग मी का सगळ्याचा मोह धरते? सर्व आठवणी का जपून ठेवते मी? मुलांच्या, नातवंडांच्या छोट्या छोट्या वस्तू "आठवण' म्हणून का गोळा करत बसते, का जपत बसते?
-मोह...हो, हा मोहच! ज्यापायी मी इतक्‍या निरुपयोगी वस्तू गोळा करून ठेवल्या, वर्षानुवर्षं जिवापाड जपल्या; पण जिथं माझं नावही दुसऱ्या कुणीतरी दिलेलं, तर मग या पसाऱ्यात जीव का अडकावा? इदं न मम... सर्व सोडायचं.
संत, पंत, ग्रंथ वारंवार सांगतात ः "मोह सोड...जगात तू आलीस आई-वडिलांनी आणलं म्हणून...त्यांनी त्यांच्या आवडीचं नाव दिलं म्हणून तू जगात त्या नावानं ओळखली जाऊ लागलीस...अमक्‍यांची मुलगी. पुढं लग्न झाल्यावर नवऱ्यानं नाव दिलं...त्या नावानं मिरवत संसार केला त्याच्या मर्जीनं अन्‌ शेवटी मरण येणार तेही त्यानंच दिलेल्या नावानं; पण ईश्‍वराच्या मर्जीनं! या सगळ्यात तुझं असं काय? कशाला एवढा मोह? आता तरी स्वतःला ओळख....!
***

काय करावं? कुठून सुरवात करावी हा मोहाचा पसारा आवरायला? प्रश्‍न...प्रश्‍न...डोक्‍यात अचानक प्रकाश पडला..."बिंदू ते सिंधू' असा प्रवास असतो सरितेचा. मग या बिंदूपासूनच सुरवात करावी या विचारासरशी ताडकन उठले आणि शिल्पाला हाक मारली. एवढी वर्षं आत्मीयतेनं जमवलेला सगळा पसारा आवरायला काढला. निवडानिवड करू लागले.
नातवाची बालपणातली खेळणी...सुरेख मोटारगाड्या, स्वयंचलित विमान... त्यानं शाळेत केलेली मातीची खेळणी...त्यानं काढलेली हत्ती-घोड्यांची चित्रं...काचेच्या गोट्या...अंट्या...नाना आठवणींच्या जळमटात गुंतलेल्या या वस्तू एका मोठ्या कॅरीबॅगमध्ये भरल्या. मग माझ्या पुस्तकांच्या कपाटावर ठेवलेली सुटकेस शिल्पाला काढायला सांगितली. धुळीनं माखलेल्या त्या पेटीत माझा निरुपयोगी खजिना होता. शिवणकामासाठी लागणारं सामान...कशिदाकारीच्या रेशीमलडी...काच...मोती...लेसेसचे तुकडे...लोकरीचे उरलेले गोळे आणि असंच सटरफटर सामान...आता काय करणार होते मी त्याचं? पण त्यात गुंतलेलं मन ही सगळी सामग्री फेकू देऊ देत नव्हतं. मात्र, निश्‍चय पक्का केला आज. सगळं काही एका पिशवीत कोंबलं. आता कागद-कात्रणाची वेळ आली. कुठकुठल्या नियतकालिकांत प्रसिद्ध झालेली देवी-देवतांची चित्रं, फुलांचे-पक्ष्यांचे फोटो, वाचनीय लेख, कविता, सुंदर वाक्‍यं, संतवचनं...किती किती नि काय काय गोळा करून ठेवलं होतं मी. "आज वापरून झालं, उद्या फेकून दिलं' असं झालंच नाही कधी. कारण, सर्वांठायी मोह! या मोहानं किती गुंतवून ठेवलं मला!
शिवणकामाच्या वस्तूची पिशवी शिल्पाला दिली. तिच्या चाळीतल्या त्या शिवण करणाऱ्या बाईला देऊन टाकायला सांगितली. तसं ती म्हणाली ः 'अहो आजी, आज काय झालंय तुम्हाला? असं वारं अंगात आल्यागत साऱ्या सामानाची विल्हेवाट लावायला निघाल्या ते? आणि एवढी सुंदर खेळणी कचरेवालीच्या पोराला देऊन टाकत आहात ती...''
शिल्पाच्या प्रश्‍नांकडं मी काहीसं दुर्लक्ष केलं आणि जमवलेली ती सगळी कात्रणं एका खोक्‍यांत निष्ठूरपणे भरली आणि तिला नंतर म्हणाले ः 'हो, आता मला मोहातून सुटायचंय. कुण्या माझ्यासारख्या
वेड्या आणि साहित्यात रमणाऱ्या तरुण मुलीला देऊन टाकेन मी हे सगळं आणि या गुंत्यातून मोकळी होईन.''
शिल्पा आ वासून पाहतच राहिली.
इतकी वर्षं जपलेला हा आवडीचा खजिना किती जिव्हाळ्यानं आजींनी सांभाळला होता नि आज असं काय घडलं की या सगळ्या वस्तूंची त्या विल्हेवाट लावत आहेत...!
भीत भीत शिल्पानं मला कारण विचारलं ः
मी हसले आणि म्हणाले ः 'इदं न मम. अगं, आता हा माझा वृद्धापकाळ. म्हणजे मोह-माया सोडून आत्मचिंतन करण्याचा, स्वतःची ओळख शोधण्याचा हा काळ. माझ्या आयुष्यात माझं असं काय आहे ते शोधण्याचा हा काळ. आयुष्य सगळं
उधार-उसनवारीचं. जन्म, नाव, गाव, बुद्धी, शिक्षण, संसार, नातीगोती हे सगळंच कुणी ना कुणी दिलेलं. माझी स्वतःची अशी फक्त एकच गोष्ट आहे. स्वतःची ओळख सांगणारी अशी ती गोष्ट म्हणजे माझं लेखन, माझी लेखणी. या लेखणीनंच मला स्वतःची ओळख दिली. हिच्यामुळेच मी स्वतंत्र अस्तित्वानं वावरतेय. बाकी सगळं "इदं न मम.'
शिल्पा अबोध लेकरासारखी माझ्याकडं पाहत राहिली.
तिला माझं हे "इदं न मम' कळलं का नाही कुणास ठाऊक!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com