रविवारचा सुट्टीचा दिवस होता. आम्ही चारपाच मित्र दुपारी चार-साडेचार वाजता एका उपाहारगृहामध्ये गप्पा मारण्यासाठी एकत्र जमलो होतो. त्याच उपाहारगृहामध्ये माझा एक जुना मित्र, तो मनोरंजन नगरीमध्ये काम करतो. तो भेटला. त्याने मला एक प्रश्न विचारला.
तो प्रश्न असा होता - सर, नुकतेच शाळांमध्ये एक परिपत्रक आलेले आहे आणि त्या परिपत्रकानुसार या वर्षी २६ एप्रिलपर्यंत परीक्षा सुरू राहणार आहेत, हे खरं आहे का? मी त्याला विचारले, परीक्षेचा आणि तुमचा काय संबंध? त्याने दिलेलं उत्तर फार महत्त्वाचं आहे.
तो असं म्हणाला, सर, दरवर्षी दहा ते बारा एप्रिलपर्यंत शाळांच्या परीक्षा पूर्ण होतात आणि आम्ही १६ एप्रिल पासून सात दिवस विद्यार्थ्यांसाठी चित्रपट महोत्सव आयोजित करतो. याही वर्षी १६ ते २३ एप्रिल या कालावधीमध्ये हा महोत्सव आयोजित केलेला आहे. याची पूर्ण तयारी झालेली आहे आणि आत्ता हे सर्क्युलर शाळांमधून फिरत आहे. त्यामुळे खूप अवघड झालेलं आहे.
माझ्या या मित्राची जी समस्या होती तीच समस्या अनेक पालकांची झाली आहे. दरवर्षीच्या परीक्षेच्या नियोजनाप्रमाणे पालकांनी एप्रिल महिन्याच्या शेवटच्या आठवड्यापासून ट्रीपला जाण्याचे नियोजन करून सर्व बुकिंग सुद्धा केलेले आहे. असे अनेक बालक आहेत त्यांचीही या परिपत्रकाने तारांबळ उडवलेली आहे.
राज्यातील शाळांमध्ये इयत्ता पहिली ते नववीच्या वर्गाच्या द्वितीय सत्र परीक्षा साधारणपणे मार्च अखेरीस अथवा एप्रिल महिन्याच्या पहिल्या आठवड्यात शाळा स्तरावरून घेण्यात येतात. ही योजना गेली २०-२५ वर्षांपासून शाळेमध्ये कार्यरत आहे. त्यामुळे एप्रिलच्या दुसऱ्या आठवड्यापासून सुट्टीचे नियोजन करणे यामध्ये काही चूक आहे, असे मला वाटत नाही.
शासनाला जर हे परिपत्रक काढायचे होते, तर ते जरूर काढले पाहिजे. पण ते सहा महिने किंवा योग्य मुदत सर्वांना घेऊन काढले पाहिजे, एवढाही विचार शासकीय पातळीवरून होत नाही. ही खेदाची बाब आहे. ऐन वेळेला परिपत्रक काढून सबंध शिक्षण क्षेत्रामध्ये गोंधळ माजवणे हे शासनाचे सातत्याने चालू असलेले असे शैक्षणिक कार्य आहे, असेच म्हणावे लागेल.
राज्यातील शाळांच्या द्वितीय सत्र परीक्षा २६ एप्रिलपर्यंत चालू ठेवाव्यात, हा विचार करताना शासनाने हवामानाचा काही विचार केलेला आहे का? महाराष्ट्रातील बहुसंख्य गावांमधील आजचे तापमान ३८ ते ३९ डिग्री सेंटीग्रेड आहे. एप्रिलमध्ये हे तापमान ४१ ते ४२ डिग्रीपर्यंत जाईल. असा अंदाज वेधशाळेने व्यक्त केलेला आहे.
या तापमानात विद्यार्थी घरून शाळेत येणे, शाळेमध्ये सहा तास थांबणे हे आरोग्याच्या दृष्टीने किती त्रासदायक आहे, याचा तरी विचार शासनाने करण्याची आवश्यकता आहे. आजही महाराष्ट्रामध्ये ५० टक्के शाळांमध्ये छतावर पत्रे आहेत हे स्पष्ट आहे.
अशा शाळांमध्ये ही मुले एप्रिल महिन्यामध्ये दिवसभर पेपर कसा लिहिणार? याचा विचार नको का करायला? उद्या अनेक विद्यार्थी आजारी पडले तर डॉक्टरांची चांदी होईल आणि हॉस्पिटल भरभरून भरतील, हे आपल्याला अपेक्षित आहे का?
गेली २० वर्षे द्वितीय सत्राच्या परीक्षा दहा ते बारा एप्रिलपर्यंत पूर्ण होणार, ही विद्यार्थ्यांना सवय लागलेली आहे. ती योग्य आहे का अयोग्य आहे या विचारापेक्षा विद्यार्थ्यांची मानसिकता आपल्याला १४ एप्रिलपासून सुट्टी आहे, ही तयार झालेली आहे. त्याप्रमाणे विद्यार्थ्यांनी व त्यांच्या पालकांनी सुट्टीचे नियोजन केलेले आहे. त्यावर या निर्णयाने पाणी पडणार आहे.
त्यामुळे विद्यार्थी नाराज होणार आहेत. नाराज अवस्थेमध्ये विद्यार्थ्यांना वार्षिक परीक्षेच्या उत्तरपत्रिका लिहाव्या लागतील हे कितपत योग्य आहे? शिक्षणाचा पायाच मुळी मानसशास्त्र आहे. त्यामुळे आपण पायावरच आघात करतोय की काय असे वाटते.
द्वितीय सत्राच्या परीक्षा झाल्यानंतर शिक्षकांना विद्यार्थ्यांचे निकाल लावावे लागतात. त्यासाठी द्वितीय सत्राच्या उत्तरपत्रिका तपासणी व त्यावरून निकाल तयार करणे, ही कामे शिक्षकांना करावी लागतात. मला सांगा २६ तारखेला ज्या विषयाचा पेपर संपेल, त्या विषयाच्या शिक्षकाकडे कमीत कमी चारपाच गठ्ठे उत्तरपत्रिका तपासण्यासाठी येतात.
आजही बहुसंख्य शाळांमध्ये एकेका वर्गात ६० ते ६५ विद्यार्थी आहेत . एका दिवसामध्ये शिक्षकाने कितीही प्रयत्न केले, तरी ३० ते ३५ उत्तरपत्रिका तपासून होतात. या नियोजनाप्रमाणे शिक्षकांना उत्तरपत्रिका तपासण्यासाठी कमीत कमी दहा व जास्तीत जास्त १४ ते १५ दिवस लागतात. त्यानंतर निकाल तयार करायचा असतो.
निकाल तयार करणे हे काही सोपं काम नाही किंवा एका तासात केलंय असं शक्य होत नाही. निकाल तयार करण्यासाठी कमीत कमी चार ते पाच दिवस लागतात. याचा अर्थ उत्तरपत्रिका तपासणी व निकाल तयार करणे दोन्ही मिळून शिक्षकांना वीस दिवसांची गरज आहेच, हे कुणीही नाकारू शकत नाही.
डिजिटल टेक्नॉलॉजी वापरून सुद्धा हे होऊ शकणार नाही. उत्तरपत्रिका तपासण्यासाठी अद्याप डिजिटल टेक्नॉलॉजी आलेली नाही. मग आता मला सांगा २६ तारखेपर्यंत परीक्षा घेतल्या, तर निकाल काय दहा-अकरा मे रोजी लावायचा आहे की काय, असा शासनाचा विचार आहे का? कुठलाही निर्णय घेण्यापूर्वी शासन विचार करतेय किंवा नाही हेच सध्या कळेनासं झालंय ?
द्वितीय सत्राच्या प्रश्नपत्रिकांसाठी दोनतीन योजना आहेत. एक म्हणजे ज्या त्या शाळेने आपल्याच शिक्षकांकडून प्रश्नपत्रिका काढून घेणे. दुसरा म्हणजे त्या त्या जिल्ह्याच्या मुख्याध्यापक संघाकडून प्रश्नपत्रिका घेणे आणि तिसरा विचार म्हणजे काही खासगी संस्था प्रश्नपत्रिका कमी दरामध्ये काढून त्या संस्थांना देतात. याप्रमाणे संस्थांनी प्रश्नपत्रिकांचे नियोजन केलेले आहे.
या प्रश्नपत्रिका छापूनही झालेल्या आहेत. या प्रश्नपत्रिका गेली वीस-पंचवीस वर्षे एक एप्रिलला परीक्षा सुरू होणार या पद्धतीने कार्यरत आहेत. याही वर्षी त्याप्रमाणे छपाई झालेली आहे. आता याचं काय करायचं? या गोष्टीचा आमचा काहीही संबंध नाही, असं शासन म्हणत असेल तर मग समाजाच्या विकासासाठी शासन आहे का समाजाला धुडकावून काम करण्यासाठी शासन आहे याचाही निर्णय आपल्याला घ्यावा लागेल.
परीक्षा हे शिक्षणाचं एकमेव उद्दिष्ट नाही, हे ओरडून ओरडून शिक्षणतज्ज्ञ सांगत आहेत. पण तरीसुद्धा शासनाचे याकडे दुर्लक्ष आहे, हे गेल्या वर्षभरातल्या शासनाच्या कार्यपद्धतीवरून दिसून येत आहे. सध्या शाळांमध्ये विद्यार्थी फक्त परीक्षा देत आहे.
सारख्या परीक्षा त्यामध्ये शाळांच्या परीक्षा त्यानंतर शासनाच्या संकलित मूल्यमापनाच्या परीक्षा तसेच शासनाच्या पीएटी चाचण्यांचे नियोजन, शाळांच्या युनिट टेस्ट परीक्षा तसेच शासनाचे नियतकालिक मूल्य मूल्यांकन अशा अनेक परीक्षा शाळांमधून सातत्याने सुरू आहेत.
शिक्षकांनी शिकवायचे का नाही हा प्रश्न निर्माण झालेला आहे आणि शिकवायच्या ऐवजी सारख्या परीक्षा घेत राहिलं तर परीक्षेमध्ये अपेक्षित निकाल कसा मिळेल, हाही विचार आपल्याला करावा लागेल. त्या द्वितीय सत्राचे घ्या.
द्वितीय सत्रामध्ये शाळांच्या परीक्षा आहेतच त्याचबरोबर संकलित मूल्यमापन आणि पीएटी चाचण्याही शाळेमधील शिक्षकांना घ्यायच्या आहेत आणि त्याचीही तपासणी करायची आहे म्हणजे शिक्षकांनी सगळे उद्योग बंद करून दिवस-रात्र फक्त उत्तरपत्रिका तपासण्याचे काम करावे, असे शासनाला अपेक्षित आहे का? असं झाल्यास शिक्षकांमध्ये असमाधान, असंतोष, असहकार ही बीजे रोवली गेल्यास त्यामध्ये चूक काय आहे?
पुनर्विचार आवश्यक
शासनाने अचानकपणे परिपत्रक काढून सबंध शिक्षण क्षेत्रामध्ये आणि समाजामध्ये गोंधळाचे वातावरण निर्माण केलेले आहे. चुका होतात ही पण चूक झाली असे समजावे आणि या निर्णयाचा फेरविचार करावा. समाज हिताच्या दृष्टीने शिक्षण प्रक्रियेची गुणवत्ता वाढवण्याच्या दृष्टीने यामध्ये काही बदल करून एक नवीन परिपत्रक त्वरित काढणे आवश्यक आहे.
अन्यथा पंधरा मे पर्यंत शाळा चालू राहाव्यात असे तरी पत्रक काढावे म्हणजे या सर्व गोष्टी शक्य होतील. योग्य तो निर्णय शासन घेईल. समाज आणि शिक्षण क्षेत्रातील लोक अत्यंत अपेक्षेने शासनाकडून अपेक्षा करीत आहेत किंवा शासनाला ही नम्र विनंती आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.