

Summer Vacation Memories
esakal
प्रणव सखदेव - sakhadeopranav@gmail.com
सकाळचं कोवळं ऊनही बोचत होतं. मे महिना सुरू होता. डोक्यातून खाली आलेला घामाचा ओघळ गालावरून, मानेवरून, पाठीवरून जाताना कळत होता. खाडीवरून येणाऱ्या दमट वाऱ्यामुळे उकाडा सुसह्य होण्याऐवजी वाढला होता. पण आम्हाला त्याची बिलकूल पर्वा नव्हती. आमचे पाय अथकपणे, घाम, उकाडा किंवा ऊन यांपैकी कशाचाही मुलाहिजा न ठेवता सायकलचं पायडल मारत होते.
उन्हाळ्याची सुट्टी लागली, की आम्हा मित्रांचा कार्यक्रम ठरलेला असे. सकाळी आठ-साठेआठ वाजता गांधारी पुलापर्यंत सायकलने जायचं. तिथल्या मोकळ्या मैदानात क्रिकेट किंवा फुटबॉल खेळायचं आणि मग परत यायचं.
लाल चौकीला सगळे जण भेटले आणि आम्ही सायकल मारायला सुरुवात केली. माझी बीएसएएसएलआर होती, काही मित्रांची हर्क्युलसचा दणकट घोडा. काहींची जाड टायरची आणि आम्हा सगळ्यांनाच आवडणारी एमटीबी. आमच्यात एकाच मित्राची, मिहीरची सायकल सर्वांत भारी म्हणजे गिअरवाली होती.
तेव्हा म्हणजे मी आठवीत वगैरे असताना गिअरवाल्या सायकली नुकत्या नुकत्या दिसू लागल्या होत्या, पण अर्थातच त्यांच्या किमती बऱ्याच होत्या. त्यामुळे बरेचदा कितीही हट्ट केला तरी आम्हा मित्रांपैकी कुणाच्याच घरून त्या आम्हाला मिळाल्या नव्हत्या. खूपच हट्ट केला तर ‘या असल्या सायकली रेसर लोकांसाठी ठीक आहेत, तुम्हा मुलांना कशाला हव्यात त्या?’ असं सांगून बोळवण केली जायची आणि त्यापेक्षा हट्ट केला तर मात्र फटका किंवा रट्टा घालण्याची भीती घातली जायची आणि ती भीती प्रत्यक्षातही येते याचा अनुभव असल्याने आम्ही गुपचूप मिळेल ते पदरात पाडून घ्यायचो!