'लक्ष्य' आणि आयपीएलची उत्तुंग भरारी (सुनंदन लेले)

sunandan lele
sunandan lele

उदयोन्मुख खेळाडूंना मोठ्या स्तरावर झेप घ्यायला सर्वतोपरी मदत करणारी "लक्ष्य' ही संस्था. "लक्ष्य' संस्थेचं वेगळेपण म्हणजे खेळाडू जेव्हा भारतीय संघाचे दरवाजे ठोठावत असतात तेव्हा त्या वयात ते खेळाडूला मदतीची साथ देतात. नुकत्याच झालेल्या वर्धापनदिनानिमित्त या संस्थेची ओळख आणि सध्या कळसाध्याय गाठलेल्या आयपीएल स्पर्धेबाबत विवेचन.

भारताचे खेळाडू आंतरराष्ट्रीय क्रीडा स्तरावर अधिराज्य का गाजवत नाहीत यावरून टीका करणारे बरेच लोक आहेत. टीव्हीवर विविध खेळांचे सामने बघून किंवा परदेशात प्रवास करून आल्यावर तिथल्या सुविधांचे दाखले देत मोठ्या मोठ्या बाता करणारे लोक बऱ्याच वेळा दिसतात. डोळ्यांना स्पष्ट दिसणाऱ्या कमतरता दूर कशा करण्यासाठी झटणारे आणि खेळाडूंना मोठं ध्येय गाठायला मनापासून मदत करणारे लोक किंवा संस्था कमी आहेत. पुण्यातली "लक्ष्य' संस्था अशीच वेगळी आहे. उदयोन्मुख खेळाडूंना मोठ्या स्तरावर झेप घ्यायला सर्वतोपरी मदत करणारी.
सन 2009 मध्ये काही खेळवेड्या मित्रांनी एकत्र येऊन "लक्ष्य'ची स्थापना केली. त्यात मुख्य पुढाकार त्या वेळचे पुण्याचे प्राप्तिकर आयुक्त संदीप प्रधान यांचा होता. सोबतीला मनीष जैन, विशाल चोरडिया, स्वस्तिक सिरसीकर आणि आशिष देसाई यांच्यासारखे यशस्वी उद्योजक होते. त्याचबरोबर अभिजित कुंटे, सुंदर अय्यरसारखे खेळात आणि खेळ आयोजनात मुरलेले उत्साही लोक होते. साहजिकच "लक्ष्य'नं पहिल्या वर्षीपासून गुणवान खेळाडूंना हेरून त्यांना प्रोत्साहन देण्याची कार्यपद्धती विकसित करायला पावलं उचलली.

भारतात "ओजीक्‍यू' म्हणजेच ऑलिंपिक गोल्ड क्वेस्ट, मित्तल ट्रस्ट आणि गो स्पोर्टस्‌ फाउंडेशन या क्षेत्रात काम करत आहेत. "लक्ष्य' संस्थेचं वेगळेपण म्हणजे खेळाडू जेव्हा भारतीय संघाचे दरवाजे ठोठावत असतात तेव्हा त्या वयात ते खेळाडूला मदतीची साथ देतात. या काळात खेळाडू पुढची पातळी गाठेल की नाही, याची शंभर टक्के खात्री नसते- त्यामुळे कोणी प्रायोजक पटकन्‌ पुढं येत नाही. कोणी त्यातून तयारी दाखवली, तर खेळाडूच्या जडणघडणीवर लक्ष कोण देणार, याची प्रायोजकाला चिंता असते. बहुतांश वेळेला खेळाडूला उच्च प्रशिक्षणाची गरज असते- जे बऱ्याच वेळेला खूप महाग असतं. खेळाडू कितीही गुणवान असला, तरी पालकांना आर्थिक पाठबळ देणं परवडतंच असं नाही. मग अशा चक्रव्यूहात सापडलेल्या खेळाडूला योग्य वेळी मदतीचा हात मिळाला नाही, तर प्रगतीची वाट खुंटते. "लक्ष्य' नेमकी याच अडचणींवर मात करून खेळाडूला खेळावर लक्ष केंद्रित करायला मदत करते. नेमबाजी किंवा बुद्धिबळासारख्या खेळात सर्वोत्तम परदेशी प्रशिक्षकाला पाचारण करून मोजक्‍या गुणवान खेळाडूंना प्रशिक्षण शिबिरात भाग घ्यायची संधी देते.
कोणतीही सामाजिक संस्था चालवायला आर्थिक पाठबळ उभं करणं सर्वांत मोठं आव्हान असतं. "लक्ष्य'चे कार्यकर्ते मोठ्या कष्टानं खेळाडूंकरता तेच आर्थिक पाठबळ उभे करतात. उद्योगपती बाबा कल्याणींनी आपल्या कंपनीतर्फे "लक्ष्य'वर विश्‍वास ठेवत गेली कित्येक वर्षं गुणवान खेळाडूंना प्रायोजकता देण्याचं मोठं मन दाखवलं आहे. गेल्या दोन-तीन वर्षांत "लक्ष्य' संस्थेनं पूजा राणी, विदित गुजराथीला साथ देत सर्वोच्च स्तरावर ठसा उमटवायला हातभार दिला आहे. नुकतीच टेबल टेनिस स्टार मनिका बत्रा "लक्ष्य'च्या वाढत्या यादीत सामील झाली आहे. इतकंच नाही, तर मनिकानं पुण्यात येऊन सन्मय परांजपेबरोबर सराव सुरू केला आहे. नुकताच "लक्ष्य'चा वर्धापनदिन साजरा झाला- ज्यात खेळाडू, प्रशिक्षक, प्रायोजक आणि खेळप्रेमी चांगल्या उद्देशाकरता एकत्र आलेले बघून मन भरून आलं.

गाजलेली आयपीएल
विश्‍वकरंडक क्रिकेट स्पर्धा यंदा होणार असल्यानं भारतीय क्रिकेट नियामक मंडळाला आयपीएल स्पर्धा थोडीशी लवकर भरवावी लागली. स्पर्धा सुरू होताना सन 2018मध्ये दोन वर्षांच्या वनवासानंतर जोरदार पुनरागमन करून विजेतेपदावर परत हक्क सांगणाऱ्या चेन्नई सुपर किंग्ज संघावर लक्ष होतं. चेन्नई संघाच्या मोसमाच्या पहिल्या सराव सत्राकरता महेंद्रसिंह धोनी चेपॉक मैदानावर उतरला, तेव्हा वीस हजार प्रेक्षक संघाचा पिवळा टीशर्ट परिधान करून आपणहून हजर झाले होते ते दृश्‍य अचाट होतं. एकीकडं चेन्नईचा संघ वयानं काहीशा जास्त खेळाडूंना संघात घेत प्रगतीचा मार्ग बरोबर शोधताना दिसला, तर दुसरीकडं एकदम तरुण खेळाडूंचा भरणा असलेला दिल्ली कॅपिटल्सचा संघही रिकी पॉंटिंग आणि सौरव गांगुलीच्या मार्गदर्शनाखाली जोरदार खेळ करताना दिसला. मुंबई इंडियन्सच्या संघाला स्पर्धेत जम बसवायला वेळ लागला नाही.

यंदाची आयपील स्पर्धा चालू झाल्यावर सर्वांत धमाल केली हैदराबाद संघानं. एक वर्ष बंदीची शिक्षा भोगून डेव्हिड वॉर्नर जिद्दीनं मैदानात उतरला. वॉर्नरला जॉनी बेअरस्टोची साथ लाभली. दोघांनी मिळून समोर आलेल्या प्रत्येक संघातल्या गोलंदाजांवर कडाडून हल्ला चढवला. पहिली फलंदाजी आली, तर मोठी धावसंख्या उभारताना वॉर्नर- बेअरस्टो जोडीनं केलेली आक्रमक फलंदाजी अवाक्‌ करणारी होती. समोरच्या संघानं मोठी धावसंख्या उभारली, तर ते आव्हान याच दोन दादा फलंदाजांनी कोवळ्या काकडीसारखं कचाकच खाऊन संपवलं. वॉर्नर- बेअरस्टो जोडी स्पर्धा नाजूक टप्प्यावर आली असताना देशाकडून सामने खेळण्याकरता आपापल्या देशात परतली, तोच धक्‍का हैदराबाद संघाला पचवता आला नाही. नशिबानं साथ दिल्यानं हैदराबाद संघ बाद फेरीत पोचला. बेंगलोर संघाच्या कामगिरीनं भरारी न मारण्याचा सपाटा अव्याहत पुढं सुरू राहिला. प्रशिक्षक गॅरी कर्स्टन, कर्णधार विराट कोहली आणि स्टार खेळाडू ए. बी. डिव्हिलीयर्स अशी कागदावरची मजबूत बांधणी असूनही बेंगलोर संघ मैदानावर ठसा उमटवू शकला नाही.

भल्या मोठ्या साखळी स्पर्धेनंतर बाद फेरीतला पहिला सामना अपेक्षाभंग करणारा ठरला. मुंबई संघानं चेन्नई संघाला पाण्याबाहेर नाक काढून दिलं नाही. संपूर्ण सामन्यात वर्चस्व गाजवत मुंबई संघानं मोठा विजय संपादन केला आणि अंतिम सामन्याकरता बुकिंग करून टाकलं. दुसऱ्या सामन्यात रिषभ पंतच्या बॅटच्या तडाख्यानं हैदराबाद संघ घायाळ झाला. हा लेख लिहीत असताना बाद फेरीचा दिल्ली विरुद्ध चेन्नई सामना चालू होणार होता.

यंदाच्या आयपीएल स्पर्धेत सर्वोत्तम कामगिरीची छाप हार्दिक पंड्या आणि रिषभ पंतनं पाडली आहे. हार्दिक पंड्याचा खेळ बघून विश्‍वकरंडक स्पर्धेचा तो स्टार होणार, असं बोललं जात आहे. दुर्दैवानं रिषभ पंतला विश्‍वकरंडक संघात जागा दिली गेली नसल्यावर जोरदार टीका होत आहे. एक नक्की आहे, की पुढच्या वर्षीच्या आयपीएल स्पर्धेकरता संघबांधणी करताना काही नावाजलेल्या; पण रया गेलेल्या खेळाडूंना संघचालक "धन्यवाद' म्हणून शाल श्रीफळ देतील. संघात केवळ मोठमोठी नावं असली म्हणजेच संघ चांगली कामगिरी करू शकतो हा अंदाज फोल ठरला. पुढल्या वर्षी झाल्या चुकांची दुरुस्ती संघ चालक नक्की करतील.

रविवारी संध्याकाळी मुंबई इंडियन्स संघाला कोण आव्हान देतं हे बघायला मजा येणार आहे. दरवर्षी आयपीएलची लोकप्रियता वेगळी उंची गाठत आहे आणि जगातल्या नाजावलेल्या लीगमध्ये आयपीएलला मानाचं स्थान लाभलं आहे याचा अभिमान वाटतोय.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com