काटा रुते कुणाला? (सुनंदन लेले)

सुनंदन लेले sdlele3@gmail.com
रविवार, 14 एप्रिल 2019

यंदाचा आयपीएलचा पहिला टप्पा संपत आला आहे. महेंद्रसिंह धोनीसारख्या खेळाडूला यशाचा मार्ग बरोबर शोधता आला आहे. चेन्नई सुपर किंग्जचा बाद फेरीतल्या चार संघांमधील प्रवेश जवळपास नक्की झाला आहे. कोलकाता नाईट रायडर्स, किंग्ज इलेव्हन पंजाब, मुंबई इंडियन्स आणि सनरायझर्स हैदराबाद या चार संघांना बऱ्यापैकी सूर गवसला आहे. या उलट दिल्ली, राजस्थान आणि बेंगलोरच्या संघाचा प्रवास भलताच अडखळता चालू आहे. विराट कोहलीचा "रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर' संघ सलग सहा पराभवांनी गटांगळ्या खाताना दिसतो आहे.

यंदाचा आयपीएलचा पहिला टप्पा संपत आला आहे. महेंद्रसिंह धोनीसारख्या खेळाडूला यशाचा मार्ग बरोबर शोधता आला आहे. चेन्नई सुपर किंग्जचा बाद फेरीतल्या चार संघांमधील प्रवेश जवळपास नक्की झाला आहे. कोलकाता नाईट रायडर्स, किंग्ज इलेव्हन पंजाब, मुंबई इंडियन्स आणि सनरायझर्स हैदराबाद या चार संघांना बऱ्यापैकी सूर गवसला आहे. या उलट दिल्ली, राजस्थान आणि बेंगलोरच्या संघाचा प्रवास भलताच अडखळता चालू आहे. विराट कोहलीचा "रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर' संघ सलग सहा पराभवांनी गटांगळ्या खाताना दिसतो आहे. थोडक्‍यात पहिला टप्पा संपत असताना सततच्या पराभवांनी कोणाला काटा रुतू लागलाय, तर कोणा संघावर दमदार विजयांनी फुलांची बरसात होताना दिसते आहे.

यंदाचा आयपीएलचा पहिला टप्पा संपत आला आणि बऱ्याच गोष्टी उलगडू लागल्या आहेत. महेंद्रसिंह धोनीसारख्या खेळाडूला यशाचा मार्ग बरोबर शोधता आला आहे- ज्यामुळं चेन्नई सुपर किंग्जचा बाद फेरीतल्या चार संघांमधील प्रवेश जवळपास नक्की झाला आहे. कोलकाता नाईट रायडर्स, किंग्ज इलेव्हन पंजाब, मुंबई इंडियन्स आणि सनरायझर्स हैदराबाद या चार संघांना बऱ्यापैकी सूर गवसला आहे. या उलट दिल्ली, राजस्थान आणि बेंगलोरच्या संघाचा प्रवास भलताच अडखळता चालू आहे. विराट कोहलीचा "रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर' संघ सलग सहा पराभवांनी गटांगळ्या खाताना दिसतो आहे. थोडक्‍यात पहिला पडाव संपत असताना सततच्या पराभवांनी कोणाला काटा रुतू लागलाय, तर कोणा संघावर दमदार विजयांनी फुलांची बरसात होताना दिसते आहे.

मला सन 2011 ची आठवण झाली. भारतीय संघानं विश्‍वकरंडक जिंकला आणि दोन दिवससुद्धा त्यांना त्या अचाट यशाचा आनंद कुटुंबीयांसोबत घेता आला नाही. लहान मुलांची शाळा सुटत असताना पालक दरवाजात आपापल्या पाल्याला घेऊन जायला तयार असतात, तसे संघमालक वानखेडे मैदानाच्या सीमारेषेवर जणू आपापल्या खेळाडूंना आयपीएल खेळायला घेऊन जायला उभे होते. खेळाडूंनाही हूं की चू करायची सोय नव्हती- कारण आयपीएल स्पर्धेतून मिळणारे पैसे भरघोस असतात. "दुभत्या म्हशीच्या लाथा गोड' या म्हणीला धरून सगळे खेळाडू निमूटपणे उसनं हास्य चेहऱ्यावर आणून कामाला लागले. संघमालकांकरता विश्‍वकरंडकापेक्षा आयपीएल जरा जास्त मनाजवळची स्पर्धा आहे, हे खेळाडूंना कळून चुकलं होतं.

सन 2019 मध्ये चित्र तेच आहे- फक्त आरशात बघताना डाव्याचा उजवा आणि उजव्याचा डावा होतो तसं झाले आहे. यंदा अगोदर आयपीएल आहे आणि मग लगेच विश्‍वकरंडक रंगणार आहे. वर्षभर प्रचंड क्रिकेट खेळून दमल्या अवस्थेत भारतीय संघाचे मुख्य खेळाडू आयपीएल स्पर्धेत सहभागी झाले आहेत. अगदी खरं सांगायचं, तर महेंद्रसिंह धोनी आणि त्याचे चेन्नई सुपर किंग्जचे सहकारी वगळता बाकी खेळाडू आयपीएलकरता खूप जीव ओतताना दिसत नाहीत. होय, काही भारतीय खेळाडू जिवाचा आटापिटा करताना दिसतीलही; पण त्याचा उद्देश आयपीएल स्पर्धेत चमकण्याचा नसून विश्‍वकरंडक स्पर्धेकरता भारतीय संघात जागा मिळवण्याची धडपड हा आहे. एकदा का 15 एप्रिलला संघाची घोषणा झाली, की मग खरे रंग दिसतील.

धोनीचं वर्चस्व
धोनीच्या संघाला बरेच लोक कुजकेपणानं "भाऊसाहेबांचा संघ' म्हणतात. त्याला कारण असं आहे, की धोनीच्या चेन्नई सुपर किंग्ज संघात वयाची तिशी पार करून गेलेले भरपूर खेळाडू आहेत. निम्म्याच्या वर खेळाडूंनी वयाची पस्तिशी पार केलीय. इतर संघांत वारंवार योजना आखायला संघाच्या बैठकी बोलावल्या जातात. काथ्याकूट केली जाते. चेन्नई संघाचे प्रशिक्षक सरावादरम्यान खेळाडूंना द्यायचा तो सल्ला देतात. नंतर संघाच्या बैठका होत नाहीत. मैदानावर उतरताना धोनी दोन मिनिटात खेळाडूंना योजना सांगून आपापली जबाबदारी समजावून देतो. ज्या खेळाडूंनी पस्तिशी पार केलीय, तेच खेळाडू धोनीकरता सर्वोत्तम कामगिरी करताना बघायला मिळाले आहेत.

गतविजेत्या चेन्नई सुपर किंग्ज्‌नं चालू आयपीएल मोसमात चांगल्या खेळाचा धमाका लावला आहे. घरच्या मैदानावर चेन्नईनं मुंबईसमोरचा एकमेव सामना गमावला आहे. संघाला गरज असताना स्वत: धोनीनं भन्नाट कामगिरी बॅटच्या माध्यमातून केली आहे. त्याच्या चपळ विकेटकीपिंगचं कौतुक सातत्यानं करावं लागतं आहे. चेन्नईच्या चेपॉक मैदानावरची खेळपट्टी मोठी फटकेबाजी करायला सोपी नाही. त्यातून धोनी हरभजनसिंग, इम्रान ताहीर आणि रवींद्र जडेजा असे तीन दर्जेदार फिरकी गोलंदाज हाती ठेवतो. नवीन चेंडू टाकणारा दीपक चहर सलग चार षटकं गोलंदाजी करायची हिंमत दाखवतो. एकंदरीतच धोनीला टी-20 क्रिकेटचं मर्म कळालं आहे, असंच म्हणावं लागेल.

आश्‍विन- कार्तिकची छाप
चेन्नईमध्ये धोनी रजनीकांतपाठोपाठ लोकप्रिय माणूस बनला असताना चेन्नईला राहणारे अश्‍विन आणि दिनेश कार्तिक हे खेळाडू गाव सोडून दुसऱ्या संघाची धुरा सांभाळत आहेत. आश्‍विनला नेतृत्व करायची भारी हौस होती. किंग्ज इलेव्हन पंजाब संघाचं आश्‍विन आणि कोलकाता नाईट रायडर्स संघाचं नेतृत्व गेली दोन वर्षं दिनेश कार्तिक करत आहे. दोघांनीही आपापल्या संघांना योग्य दिशा दाखवली आहे. चालू स्पर्धेतही किंग्ज इलेव्हन पंजाब आणि कोलकाता नाईट रायडर्स चांगला खेळ करून दाखवत आहेत.
यंदाच्या आयपीएलच्या सुरवातीलाच आश्‍विन चुकीच्या कारणाकरता प्रकाशझोतात आला होता. जबरदस्त फलंदाजी करणाऱ्या राजस्थान रॉयल्स संघाच्या जोस बटलरला "मंकडेड' पद्धतीनं बाद करून आश्‍विननं नियमावर बोट ठेवलं खरं; पण तशा प्रकारे बाद करून आश्‍विननं क्रिकेटची सभ्यता मागं टाकली. आश्‍विननं जे केलं, ते नियमाला धरून केलं, हे मान्य आहे. फक्त "मंकडेड' पद्धतीत समोरच्या बाजूचा फलंदाज गोलंदाजानं चेंडू टाकण्याअगोदर अनावश्‍यक जास्त स्टार्ट घेतो का, हे तिसऱ्या पंचांनी तपासणं आता गरजेचं झालं आहे. वाईट बाब अशी, की येणाऱ्या विश्‍वकरंडक स्पर्धेत खासकरून विराट कोहलीला असंच कोणीतरी बाद करायची दाट शक्‍यता आत्तापासूनच वाटायला लागली आहे.

विराटच्या संघाची वाताहत
आयपीएल स्पर्धा सुरू होण्याअगोदरच बिनधास्त मतप्रदर्शन करणाऱ्या गौतम गंभीरनं, रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर संघमालकांनी अजूनही विराट कोहलीला कर्णधारपदी कायम ठेवल्यावरून आश्‍चर्य व्यक्त केलं होतं. त्याला कारण तसंच सबळ आहे. कोहलीनं रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर संघाची जबाबदारी कर्णधार म्हणून हाती घेतल्यापासून संघानं एकदाही आयपीएल करंडकावर नाव नोंदवलेलं नाही. इतकंच नाही, तर गेल्या काही मोसमात रॉयल चॅलेंजर्स बेंगलोरची कामगिरी अगदीच खराब झाली आहे.

अगदी खरं सांगायचं, तर कोहलीनं आयपीएल स्पर्धेत मन गुंतवलं आहे का नाही, अशी शंका यायला लागली आहे. संघनिवड करताना योग्य खेळाडूंना संघात घेतलं गेलं नाही, की एकदम नव्या खेळाडूंचा शोध घेऊन त्यांना संघात दाखल केलं गेलं नाही. उदाहरण देतो. माजी गोलंदाज टी. ए. शेखरला दोन संघमालकांनी नवे खेळाडू शोधून काढायला आळीपाळीनं नेमलं होतं. शेखरनं ऑस्ट्रेलिया आणि वेस्ट इंडिजच्या स्थानिक स्पर्धा बघून त्यातले काही खेळाडू बरोबर हेरले होते. ऑस्ट्रेलियन संघाच्या जवळपासही नसताना डेव्हिड वॉर्नरला शेखरनंच टिपलं होतं.
मुंबई इंडियन्स संघमालकांनी जॉन राईट आणि किरण मोरे यांना नेमून ताज्या दमाच्या खेळाडूंचा शोध घेतला होता. जसप्रीत बुमरा, हार्दिक आणि क्रुणाल पंड्या बंधूना किरण मोरे- जॉन राइटनं बरोबर हेरलं. मग मुंबई इंडियन्स संघाच्या सराव सत्रात आणून त्यांना घासूनपुसून तयार केलं. आज हे तीन खेळाडू मुंबई इंडियन्स संघाकरता काय कमाल करत आहेत, हे आपण सगळेच बघतो आहोत.
असा कोणताच प्रयत्न रॉयल चॅलेंजर्स बेंगलोरनं केलेला दिसत नाही. काही वर्षांपूर्वी ख्रिस गेल संघात होता. आता बेंगलोरचा संघ फक्त कोहली आणि एबी डिव्हिलीयर्सवर अवलंबून वाटतो. यंदाच्या मोसमात कोहलीनं महान प्रशिक्षक गॅरी कर्स्टनला दाखल करून घेतलं, तरीही संघाचे हाल "पहिले पाढे पंच्चावन्न' असेच आहेत. सलग सहा सामने गमावलेला रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर संघ गुणतक्‍त्यात शेवटच्या क्रमांकावर गटांगळ्या खाताना दिसतो आहे. झाल्या प्रकारानं कोहलीच्या नेतृत्वगुणांवर शंका घेतली जाऊ लागली आहे, जी धोक्‍याची खूण आहे.

वैयक्तिक कामगिरीच्या बाबतीत एकदम गरम- गार असा खेळ बघायला मिळतो आहे. बेन स्टोकस्‌, जोफ्रा आर्चर नावानं मोठे; पण राजस्थान रॉयल्सकरता त्यांनी कमाल कामगिरी केलेली नाही. तीच काहीशी गत स्टीव्ह स्मिथची आहे. डेव्हिड मिलर आणि एबी डिव्हिलीयर्सनं अजून कामगिरीतलं सातत्य राखलेलं नाही. त्याउलट डेव्हिड वॉर्नर आणि जॉनी बेअरस्टो धमाल आक्रमक फलंदाजी सातत्यानं करत आहेत. आंद्रे रसेल आणि किरॉन पोलार्ड या दोन वेस्ट इंडियन खेळाडूंनी बॅटचा वापर तलवारीसारखा करत गोलंदाजांची कत्तल केली आहे.

यंदाची आयपीएल स्पर्धा बघताना एक गोष्ट प्रकर्षानं जाणवते आहे ती म्हणजे बरेचसे खेळाडू जरा जपून जपून खेळताना दिसत आहेत. बरोबरच आहे म्हणा त्यांचं. आयपीएल स्पर्धा संपल्यावर दोनच आठवड्यांत विश्‍वकरंडक स्पर्धा इंग्लंडला रंगणार आहे. सर्व संघांतले मुख्य खेळाडू दुखापतीपासून लांब राहण्याकरता प्रयत्न करणार हे उघड आहे.

आयपीएलचा पूर्वार्ध हवामान बदलू लागलं असताना म्हणजे मार्च महिन्यात झाला. एप्रिलचा मध्य उलटून जाताना उत्तरार्ध सुरू होणार आहे. भारतातलं हवामान प्रचंड गरम झालं आहे. मुंबई, कोलकाता, चेन्नईला प्रचंड उकाडा असतो, घामानं खेळाडू निथळतात. दुसऱ्या बाजूला जयपूर, दिल्ली, हैदराबादला चटके बसणारी गरम हवा नांदत असते. घराच्या आरामात टीव्हीवर सामने बघताना आपल्याला त्रास होतो, तर मैदानात चाळीस अंश सेल्सिअसपेक्षा जास्त गरम हवेत जीवघेण्या चढाओढीचे क्रिकेट खेळताना खेळाडूंचे काय हाल होत असतील याचा विचार केलेला बरा; पण परत एकदा ती म्हण सांगतो ः "दुभत्या म्हशीच्या लाथा गोड.'


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: sunandan lele write ipl 2019 cricket article in saptarang