बूम बुमरा बूम (सुनंदन लेले)

सुनंदन लेले sdlele3@gmail.com
रविवार, 9 जून 2019

भारतीय क्रिकेट संघातला जसप्रीत बुमरा सध्या कमाल करतो आहे. सन 2011पर्यंत जो मुलगा अहमदाबादच्या गल्लीत टेनिस चेंडूवर क्रिकेट खेळत होता, तोच आता भारतीय गोलंदाजीतला तो मुख्य स्तंभ बनला आहे. कोणतंही औपचारिक प्रशिक्षण न घेतलेल्या, केवळ टीव्ही बघून शिकलेल्या जसप्रीतची कहाणी प्रेरणादायी आहे. त्याची ही कहाणी आणि त्याची एकमेवाद्वितीय स्टाइल यांच्यावर नजर.

भारतीय क्रिकेट संघातला जसप्रीत बुमरा सध्या कमाल करतो आहे. सन 2011पर्यंत जो मुलगा अहमदाबादच्या गल्लीत टेनिस चेंडूवर क्रिकेट खेळत होता, तोच आता भारतीय गोलंदाजीतला तो मुख्य स्तंभ बनला आहे. कोणतंही औपचारिक प्रशिक्षण न घेतलेल्या, केवळ टीव्ही बघून शिकलेल्या जसप्रीतची कहाणी प्रेरणादायी आहे. त्याची ही कहाणी आणि त्याची एकमेवाद्वितीय स्टाइल यांच्यावर नजर.

वर्ष होतं 2011 आणि महिना होता डिसेंबरचा. अहमदाबादमधला वयाची जेमतेम 17 वर्षं पूर्ण केलेला एक मुलगा गुजरातच्या 19 वर्षांखालच्या संघात निवडला गेला. निवड समितीला इतकंच दिसत होतं, की त्या मानानं किरकोळ दिसणाऱ्या या मुलाशी खेळताना फलंदाजांची त्रेधा उडत आहे. दोन वर्षं वयोगटातले सामने खेळल्यावर त्या मुलाला गुजरातच्या मुख्य संघाकरता टी-20 सामना खेळायची संधी मिळाली. त्याच काळात माजी खेळाडू आणि प्रशिक्षक जॉन राईट किरण मोरेसोबत अहमदाबादला गुणवान खेळाडूंचा शोध घ्यायला आले होते. मुंबई रणजी संघातल्या काही अनुभवी फलंदाजांना त्या मुलानं गोलंदाजी करणं सुरू केलं. त्याची अनोखी किंवा खरं सांगायचं, तर विचित्र शैली फलंदाजांना झेपत नव्हती. जॉन राइट यांना सर्वांत आवडलं काय, की त्या मुलानं सलग दोन षटकं फक्त यॉर्कर टाकायचा जोमानं प्रयत्न केला. यॉर्कर काय किंवा बाउन्सर काय दोन्ही चेंडू प्रभावीपणे टाकायला एका वेळी दोन चेंडू टाकायची शक्ती लावावी लागते हे जॉन राईट जाणून होते. त्यांनी गुणवत्ता आणि गोलंदाजीतलं वेगळेपण बरोबर हेरलं. ""या मुलाच्यात गती आहे,'' माजी विकेटकीपर किरण मोरेला जॉन राईट म्हणाले. पुढच्या दोन दिवसांत मुंबई इंडियन्स संघानं त्या मुलाला आयपीएल संघात दाखल करून घेतलं होतं....ही अनोखी, स्वप्नवत कहाणी आहे जसप्रीत बुमराची!

तसं बघायला गेलं, तर बुमरा कुटुंब छान चौकोनी होते. मोठी बहीण जुहीका आणि धाकटा जसप्रीत. वडील जसबीर यांचा छोटा व्यवसाय होता. सगळं सुरळीत चालू असताना जसबीर आजारी पडले, ते आजारातून बाहेरच आले नाहीत. मुलं पाच आणि आठ वर्षांची असतानाच जसबीर अचानक देवाघरी गेले. जसबीरच्या घरच्यांनी त्यांच्या सुनेला म्हणजे दलजीतला आधार दिला नाही. उलट त्यांनी जसबीर आणि तिच्या दोन मुलांची जबाबदारी झटकून टाकली. एकट्या पडलेल्या जसबीर यांना दोन मुलांना लहानाचं मोठं करायचं होतं, म्हणून त्यांनी दु:ख गिळून टाकलं. जसबीर शिक्षिका होत्या. जुहीका आणि जसप्रीतला द्यायला त्यांच्याकडं फक्त शिक्षण होते. शाळेत नोकरी करत त्यांनी दोन लहान मुलांच्या कुटुंबाचा भार सोसायला वेळप्रसंगी ज्यादा शिकवण्या घेतल्या. आईच शिक्षक असलेल्या शाळेत जायला लागल्यामुळं जसप्रीतला शाळेला दांडी मरायची मजा घेता आली नाही. दलजीत यांनी मुलांना वाढवताना कोणतंच दडपण टाकलं नाही. लहान जसप्रीत बऱ्याच वेळा टेनिस चेंडूवर मुलांच्यात क्रिकेट खेळत असायचा.

बघून क्रिकेट शिकला
बरेचसे क्रिकेटपटू मैदानात जाऊन क्रिकेट शिकतात. तुम्हाला सांगितलं, तर आश्‍चर्य वाटेल, की जसप्रीत टीव्हीवर सामने बघून क्रिकेट जास्त शिकला आहे. त्याबद्दल तो म्हणतो ः ""बऱ्याच वेळा आई शाळेत असायची आणि मोठी बहीणपण. मग मी एकटा घरी यायचो. आईनं करून ठेवलेले पदार्थ गरम करून घ्यायचो आणि जेवायचो. घरात उद्योग एकच- तो म्हणजे टीव्हीवर जो सुरू असेल तो क्रिकेट सामना बघणं. मला वेगवान गोलंदाजांना मारा करताना बघायला खूप आवडायचं. वसिम अक्रम यांना बघून मला एकच समजलं, की काहीही झालं, तरी वेगवान गोलंदाजाला उत्तम यॉर्कर टाकणं जमलंच पाहिजे. घरात मी एकटाच यॉर्करची प्रॅक्‍टिस करायचो. आमचा हॉल जरा मोठा होता. मी नेम धरून चेंडू भिंत आणि जमिनीच्या बेचक्‍यात टाकायचो. त्याचाच फायदा असा व्हायचा, की बरोबर तसा चेंडू पडला, की अजिबात आवाज यायचा नाही. त्यामुळं मी बाहेर खेळतो आहे हे आईला समजायचं नाही.''
""ज्या लहान मुलानं राज्याच्या संघाकडूनसुद्धा क्रिकेट खेळण्याचं स्वप्न बघितलं नाही, त्या जसप्रीतचं न पाहिलेलं स्वप्न साकारलं गेलं- जेव्हा जॉन राइट यांच्या आग्रहावरून जसप्रीतला थेट मुंबई इंडियन्स आयपीएल संघात दाखल करून घेतलं गेलं तेव्हा. ""मला मुंबई इंडियन्स संघ व्यवस्थापनाचा फोन आला, तेव्हा खरंच वाटत नव्हतं. अगोदर माझ्या आईला मी सतत क्रिकेट खेळणं पसंत नव्हतं. मात्र, माझ्या क्रिकेटवेडानं आकार घेतल्याचं बघून तिच्या डोळ्यात आनंदानं पाणी तरळलं,'' जसप्रीत बुमरा भावनिक होत सांगत होता.

मुंबई इंडियन्स संघात सामील झाल्यावर यॉर्करचा बादशाह लसिथ मलिंगानं जसप्रीत बुमराला मार्गदर्शन केलं. न्यूझिलंडचा महान माजी गोलंदाज शेन बॉंन्डनं जसप्रीतला फलंदाजाला बाद करायला सापळा कसा रचायचा हे शिकवलं. सचिन तेंडुलकरसोबत खेळतानाचा अनुभव विचारता जसप्रीत म्हणतो ः ""ज्या खेळाडूला टीव्हीवर खेळताना बघून अंगावर रोमांच यायचे, त्यांच्यासोबत प्रत्यक्ष एका संघात खेळायचं ही संधी आणि मान फार मोठा होता. मला सचिन यांनी मैदानावर एकच गोष्ट समजावली होती. "गोलंदाजी करताना फलंदाजाला बघून मारा कर. त्याच्यामागं नाव काय आहे याचा विचार करू नकोस,' असं ते म्हणाले होते. थोडक्‍यात आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये नाव कितीही कोणाचं मोठं असलं, तरी अखेर हे बॅट-बॉलमधलं द्वंद्व आहे, असं त्यांना समजवायचं होतं.''

दोन वर्षं आयपीएल खेळून जसप्रीत थोडा परिपक्व झाला; पण त्याचवेळी त्याच्या गुडघ्याला दुखापतही झाली. दुखापतीतून सावरायला जसप्रीतला संयम राखावा लागला, तसंच खूप कष्टही करावे लागले. पदार्पणाच्या वर्षातच सचिन तेंडुलकरनं मला सांगितलं होतं ः ""बघ, हा जसप्रीत बुमरा कष्ट करत राहिला, तर एक दिवस तो भारतीय संघाकरता खेळताना तुला दिसेल.''
आयपीएलमध्ये सातत्यानं कामगिरी केल्यावर मर्यादित षटकांच्या सामन्यात खेळणाऱ्या भारतीय संघाचे दरवाजे जसप्रीत बुमराकरता उघडले. ऑस्ट्रेलियात पदार्पण करताना तो नुसता खेळला नाही, तर कर्णधार स्टीव्ह स्मिथसह दोन बळी मिळवत त्यानं सर्वांत किफायतशीर गोलंदाजी केली. महत्त्वाची गोष्ट म्हणजे भारतानं तो सामना मोठ्या धावसंख्येचा पाठलाग करून जिंकला.

बुमराचं टी-20 पदार्पण अजून जोमानं झालं, जेव्हा त्यानं तीन फलंदाजांना बाद करून ऑस्ट्रेलियाचा डावच संपवला. योगायोगाची गोष्ट म्हणजे एकदिवसीय आणि टी-20 आंतरराष्ट्रीय पदार्पणाप्रमाणं जसप्रीतचं कसोटी पदार्पणही जानेवारी महिन्यात झाले. कोणाला वाटलं नव्हतं, की बुमरा कसोटी संघात निवडला जाईल. पहिल्याच सामन्यातल्या दुसऱ्या डावात बुमरानं ए. बी. डिव्हिलीयर्स, फाफ डू प्लेसीस आणि क्विंटन डिकॉकला झटपट बाद करून खळबळ माजवली. त्याच्यातला खरा कसोटीपटू ऑस्ट्रेलिया दौऱ्यात बघायला मिळाला. त्यानं चारही कसोटी सामन्यांत अफलातून भेदक मारा करून ऑसी फलंदाजांना सळो की पळो करून सोडलं.
सध्याच्या घडीला जसप्रीत बुमरा विराट कोहलीचं गोलंदाजीतलं मुख्य अस्त्र बनला आहे. कर्णधाराचा या वेगवान गोलंदाजावर खूप विश्वास आहे. बुमराला कसोटी संघात जागा देण्याकरता कोहलीनंच निवड समितीकडे शब्द टाकला होता, असंही समजलं. जसप्रीतबद्दल विचारता विराट म्हणाला ः ""समोरच्या फलंदाजांना सोडाच; पण जाळ्यात सराव करताना जसप्रीत आम्हालाही चांगलाच त्रास देतो. त्याच्या कलेवर त्याची निष्ठा आणि हुकमत आहे. तो जास्त कोणाशी चर्चा करत नाही, की बडबड करत नाही. योग्य मेहनत करून, विचार करून तो प्रत्येक सामन्यात ध्येय डोळ्यासमोर ठेवून उतरतो. फलंदाजांच्या तंत्रातल्या चुका तो बरोबर शोधतो आणि आघात करतो. कोणता फलंदाज आपटबाराला घाबरतो आणि कोण यॉर्करला बिचकतो, याचा त्याचा अंदाज जबरदस्त आहे. जाळ्यात गोलंदाजी करताना जसप्रीत आम्हालाही भंडावून सोडतो. कधी कोणाच्या हातावर, तर कोणाला हेल्मेटवर चेंडू बसला, तरी त्याला काही फरक पडलेला नसतो.''

जसप्रीत मोठ्या क्रिकेटमधे गोलंदाजी करताना दिसू लागला, तेव्हा बऱ्याच क्रिकेट जाणकारांनी अंदाज वर्तवला होता, की याची शैली अशी विचित्र आहे की याला लवकरच मोठी इजा होणार- इतकं ओझं बुमरा गोलंदाजी करताना आपल्याच शरीरावर टाकतो. भारतीय संघात दाखल झाल्यावर प्रशिक्षकांसमोर दोन पर्याय होते. एक तर बुमराची शैली बदलायची, किंवा त्याला इजा होण्याची शक्‍यता असलेल्या स्नायूंना, हाडांना योग्य सुनियोजित व्यायाम करून बळकटी आणायची. शैली बदलली, तर त्याच्या गोलंदाजीतला डंख नाहीसा होईल मोठी भीती होती. मग दुसरा पर्याय निवडला गेला. जसप्रीतनं प्रचंड मेहनत करून तंदुरुस्तीत लक्षणीय बदल घडवले. या सगळ्याचा परिणाम आपल्याला बघायला मिळतो आहे.

विश्वकरंडक स्पधेचा पहिला सामना झाला आहे आणि आज दुसरा सामना ऑस्ट्रेलियाबरोबर होणार आहे. पहिला विश्वकरंडक खेळत असूनही बुमरावर त्याचं दडपण दिसत नाहीये. तो त्याच सहजतेनं समोरच्या फलंदाजांवर तुटून पडताना दिसतो आहे. बरेच क्रिकेट पंडित जसप्रीत बुमरा 2019 विश्वकरंडकाचा एक मोठा तारा ठरणार, असं भाकीत वर्तवू लागले आहेत. सन 2011 मध्ये जो मुलगा अहमदाबादच्या गल्लीत टेनिस चेंडूवर क्रिकेट खेळत होता, तोच मुलगा आता भारतीय गोलंदाजीचा मुख्य खांब बनला आहे. ही कहाणी आहे जसप्रीत बुमराची. आहे की नाही कमाल?


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: sunandan lele write jasprit bumrah cricket article in saptarang