एक डोळा मिटून शिकार (सुनंदन लेले)

sunandan lele
sunandan lele

"जगातला सर्वोत्तम क्रिकेट छायाचित्रकार' अशी ख्याती असलेले पॅट्रिक इगर. क्रिकेटशी संबंधित अनेक क्षण त्यांनी कॅमेऱ्याच्या चौकटीत बंदिस्त करून टाकले. एकीकडं छायाचित्रं काढणं सोपं झालं असताना, या सोपेपणामुळं छायाचित्रं काढायची कला कमी होणार नाही ना, अशी भीती पॅट्रिक यांना वाटते. त्यांना प्रत्यक्ष भेटून साधलेला संवाद.

पत्रकार म्हणून काम करताना गेल्या वीस वर्षांत तंत्रज्ञानात किती बदल झाले याचा विचार करताना गंमत वाटते. सन 2000 उजाडेपर्यंत रोजचं वार्ताकन करताना कागदावर लेख लिहायचा आणि तो फॅक्‍स करायचा असा कारभार असायचा. मग फॅक्‍स गेला का, त्यातली काही अक्षरं स्पष्ट दिसतात का नाही वगैरे गोष्टींचा गुंता सोडवायला लागायचा. तोच काळ असा होता, की कोणाकडं जाडजूड लॅपटॉप दिसला की अगदी हेवा काय- खरं सांगायचं तर अगदी मत्सर- वाटायचा. सन 2001 मध्ये झिंम्बाब्वे दौऱ्यावर जात असताना माझा मित्र संतोष पाटीलनं मला फ्लॉपी डिस्क असलेला कॅमेरा वापरायला दिला. त्या कॅमेऱ्यानं फोटो काढून ते लगेच जसेच्या तसे ई-मेल करायचं तंत्र म्हणजे जादू वाटू लागली.

दौऱ्यावर वार्तांकन करायला पत्रकार बरेच यायला लागले. छायाचित्रकार मात्र मोजक्‍या वर्तमानपत्रांचेच असायचे. छायाचित्रकार 36 छायाचित्रांचे रोल वापरून छायाचित्रं काढायचे. मग ते रोल एका खास रसायनात टाकून तयार करायचे आणि मग त्या ट्रान्सपरन्सी मायदेशात पाठवायचे. सन 2003 मध्ये माझा जवळचा मित्र आशिष देसाईनं मला 'जग बदलतं आहे मित्रा... आता लिहून फॅक्‍सनं पाठवणं बास करा... नवीन तंत्रज्ञान वापरणं सुरू करा,'' असं म्हणत सुंदर छोटा लॅपटॉप वापरायला दिला. श्रीलिपी नावाचं सॉफ्टवेअर वापरणं सुरू केलं, तेव्हा अगदी "श्रीगणेशा' लिहायला पाच मिनिटं लागली- कारण लॅपटॉपच्या की-बोर्डवर टायपिंग कसं करायचं हे समजतच नव्हतं. मेंदू आणि लिहिणाऱ्या बोटांना जोडणारा दुवा देवानं निर्माण केला आहे. त्याचा वेग जमतो. मनाचा वेग चांगला आणि मराठी टायपिंगचा अत्यंत मंद! मग मन पळतंय आणि बोटं मागं राहात आहेत या खडतर प्रवासाला सुरवात झाली. मराठीत "ऑस्ट्रेलिया' शब्द लिहायला मला 14 बटणं दाबायला लागतात. त्यात एक चूक झाली, तर त्याचा आकडा 18-22 असा वाढत जातो.

सन 2004 मध्ये पाकिस्तान दौऱ्यावर जात असताना मला पहिल्यांदा नवाकोरा डिजिटल कॅमेरा वापरायला मिळाला. छायाचित्रं काढून इंटरनेटवर लगेच पाठवता यायला लागली. वार्तांकनात एक वेगळी किनार आली. पत्रकारांकरता नंतर तंत्रज्ञान नुसतं सोपं झालं नाही, तर खूप परवडणारंही झालं. बघताबघता पत्रकार पक्षात 90 टक्के लोकांकडे लॅपटॉप आणि 50 टक्के लोकांकडे डिजिटल कॅमेरेही दिसू लागले.
लंडनला रिचमंड भागात ट्रेननं जाताना मला हा सगळा बदल आठवत होता- त्याला खास कारण होतं. मी अशा एका व्यक्तीला भेटायला निघालो होतो- ज्याची ख्याती जगातला सर्वोत्तम क्रिकेट छायाचित्रकार म्हणून आहे. त्यांचं नाव पॅट्रिक इगर. रोल वापरायच्या जमान्यात या महान छायाचित्रकाराच्या कॅमेऱ्यात मैदानात गेलेल्या दहाच्या दहा विकेट्‌स बंद असायच्या. विचार करा, की कौशल्यासोबत काय एकाग्रता आणि खेळाचं ज्ञान असेल पॅट्रिक इगर यांचं. याच कारणामुळं पॅट्रिक इगर यांना भेटायला मी उत्सुक झालो होतो.

कमाल कारकिर्द
पॅट्रिक इगर यांनी जवळपास 325 कसोटी सामन्यांची छायाचित्रं काढली, हे वाचून त्यांना भेटायला जाताना मला चांगलंच दडपण आलं होतं. रिचमंड स्टेशनला उतरलो आणि त्यांनी दिलेल्या पत्ता शोधत चालत जायला लागलो, तेव्हा क्रिकेटर्स नावाचा पब दिसला. त्यांच्या घराची बेल दाबली, तेव्हा स्वत: पॅट्रिक यांनीच दरवाजा उघडला. अगदी सरळ साधेपणानी स्वागत करून घरात घेताना 'थंडगार हवेत चहा प्यायला मजा येते. मी पितोय चहा, तुला पण देऊ का,'' अशी विचारणा त्यांनी केली.
त्यांचा जन्म 1944 चा. म्हणजेच वयाची जवळपास पंचाहत्तरी त्यांनी गाठली होती; पण त्यांच्या हालचालीत वृद्धत्व जाणवत नव्हतं. पॅट्रिक यांचं घर म्हणजे पुस्तकांचा खजिना होता. समोरच्या भिंतीत एका फ्रेममध्ये बरीच पदकं लावलेली होती. 'माझ्या पणजोबा, आजोबा आणि वडिलांनी युद्धात देशाची सेवा केली त्याची ही शौर्यगाथा आहे. त्यातली काही पदकं पहिल्या आणि दुसऱ्या जागतिक युद्धात दाखवलेल्या शौर्याची आहेत. माझ्या बापजाद्यांनी खऱ्या बंदुकीचं शूटिंग केलं आणि छाताडावर घाव झेललेही. मी नुसतंच फोटोचं "शूटिंग' केलं...'' स्वत:चीच थट्टा करताना पॅट्रिक म्हणाले.

सन 1965 मध्ये पॅट्रिक इगर यांनी पहिल्यांदा कसोटी सामन्याची छायाचित्रं काढली. 'होय. तो जमाना वेगळा होता. कॅमेऱ्याला मोटर नव्हती- त्यामुळं सेकंदाला जास्त फोटो काढता यायचे नाहीत. त्यामुळं मैदानावरचे अचूक क्षण टिपायला कौशल्याबरोबर नशिबाची साथ लागायची. मी स्वत: क्रिकेट थोडं खेळलो असल्यानं खेळ सुरू असताना काय होण्याची शक्‍यता आहे याचा थोडा अंदाज यायचा मला. तंत्रज्ञानाची खूप मोठी साथ नसल्यानं एकाग्रतेवर भर द्यावा लागायचा. प्रत्येक चेंडू टाकायला गोलंदाजानं धाव घ्यायला सुरवात केली, की मी चित्त एकाग्र करून एक डोळा मिटून कॅमेऱ्यात मान घालायचो. खूप जास्त वेळ एकाग्रता राखण्याकरता दोन चेंडूंदरम्यान विश्रांती घेण्याचं तंत्र मला आत्मसात करावं लागलं,'' जुन्या काळातल्या आव्हानांबद्दल ते सांगत होते.

जुन्या काळात क्रिकेट सामन्यांचं वार्तांकन करणं किती वेगळं होतं, याचे अनुभव सांगताना पॅट्रिक म्हणाले ः 'काय सांगू तुला! तुझ्याच देशात नागपूरला सामना कव्हर करायला गेलो असताना, संघाला हॉटेलमध्ये नाही तर सर्किट हाऊसला ठेवलं होतं. मी संघातल्या दोन खेळाडूंसोबत खोलीत एकत्र राहिलो होतो. सन 1970चा तो जमानाच वेगळा होता. खेळाडू, पत्रकार असं वेगळं नव्हतं काही. अनौपचारिक असायचं सगळं. सामना संपल्यावर आम्ही थेट ड्रेसिंग रूममध्ये जाऊन सहजी छायाचित्रं काढायचो. मी सामना संपल्यावर ग्रेग चॅपेलचा एका हातात बिअर आणि एका हातात सिगार असं छायाचित्रही काढला आहे.'' प्रत्यक्ष तो छायाचित्र दाखवताना डोळे मिचकावत पॅट्रिक सांगत होते.

स्मरणात राहिलेली छायाचित्रं
'खूप आहेत रे... काय सांगू... 1975 मध्ये पहिला मर्यादित षटकांचा विश्‍वकरंडक झाला. त्याच्या अंतिम सामन्यात डेनिस लिलीच्या बाऊन्सरला रॉय फ्रेड्रिक्‍सनं अफलातून फटका मारला; पण त्यात त्याचा तोल जाऊन तो स्वत:च स्टंपवर पडला- ते छायाचित्र मजेदार होतं. त्याच सामन्यात अगदी तरुण व्हिवियन रिचर्डसनं फलंदाजाला धावबाद केलं होतं, त्या छायाचित्रात वेग होता. ऑस्ट्रेलियासमोरच्या एका सामन्यात आल्वीन कालीचरण शर्टची तीन बटणं उघडी टाकून केसांवरून हात फिरवत मैदानात आला आणि त्यानं डेनिस लिलीला चोपून काढलं, ते छायाचित्र हिरोगिरी करणाऱ्या क्रिकेट कलाकाराचं होतं,'' आठवणीत रमताना पुस्तकातून छायाचित्र काढून दाखवताना पॅट्रिक सांगत होते.

कमाल व्यक्तिमत्त्वांबद्दल बोलताना पॅट्रिक म्हणाले ः 'छायाचित्र काढायला मजा यायची असे माझ्या आवडीचे काही खास खेळाडू आहेत ना. गारफिल्ड सोबर्स सर्वांत लाडके. कारण त्यांच्या खेळातली सहजता कॅमेऱ्यात टिपताना मजा यायची. क्रिकेटच्या तीनही क्षेत्रांत सहजी वावरणारा हा खेळाडू होता. छायाचित्रांत लय असायची सोबर्सच्या. इयान बोथमचा रगेलपणा मला आवडायचा. त्याच्या खेळात एक प्रकारची बेफिकिरी दिसायची. अजून एक कमाल माणूस म्हणजे व्हीव रिचर्डस्‌. भयंकर अवली माणूस. माज असायचा त्याच्या क्रिकेट मैदानावर वावरण्यात. जणू त्याच खेळाचा व्हीव रिचर्डस्‌ राजा होता. "छायाचित्र काढूयात का,' असं कधी विचारल्यावर व्हीव धारधार नजरेनं नुसताच बघायचा- उत्तर द्यायचा नाही. चांगल्या मूडमध्ये असला तर लगेच हो म्हणायचा. त्याचं व्यक्तिमत्त्व वेगळं होतं. भीती नाही; पण दरारा वाटायचा व्हीव रिचर्डसचा. सर्वांत चांगला सहकार्य करणारा खेळाडू म्हणजे सचिन तेंडुलकर.''

छायाचित्र काढण्यासाठी रोल वापरायच्या जमान्यात पॅट्रिक यांनी छायाचित्र काढली. ती जुनी खास क्रिकेट छायाचित्रं बघताना मन हरखून जात होतं. या माणसाला कामाची नाही, तर कलेची आसक्ती होती हे वारंवार दिसून येत होतं. बेसिल डी ओलिव्हराच्या गोलंदाजीवर माईक ब्रेअर्लीनं पकडलेल्या झेलाचं छायाचित्र बघताना अंगावर रोमांच उभे राहिले. इतकंच नाही, तर त्यांनी पुण्याच्या नेहरू स्टेडियमवर झालेल्या सामन्याचा काढलेलं जुनं छायाचित्रही दाखवलं.
त्यांना चिंता फक्त इतकीच आहे, की आता कॅमेरे तंत्रज्ञानानं फार पुढं गेले आहेत. ते म्हणतात ः 'एका सेकंदाला कित्येक छायाचित्रं काढता येतात. म्हणजेच मोक्‍याचा क्षण हातातून निसटून जायची भीती कमी झाली आहे. मूळ छायाचित्र चुकलं, तरी त्यात दुरुस्ती करता येते. या सगळ्याचा विचार करता छायाचित्र काढायची कला कमी होणार नाही ना, हीच एक भीती आहे मला. एकाग्रता आणि अचूकता याचं मोल कमी होत चाललं आहे- ते बोचतं माझ्या मनाला.''

तब्बल 325 कसोटी सामन्यांचं छायाचित्ररूपानं वार्तांकन पॅट्रिक इगर यांनी केलं- ज्यात 98 ऍशेस कसोटी सामने होते. सन 2011 मध्ये कसोटी सामन्यांची छायाचित्रं काढायला जाणं त्यांनी बंद केलं. 'तो सामना क्रिकेट इतिहासातला दोन हजारावा सामना होता आणि योगायोग म्हणजे लॉंर्डस्‌वर झालेल्या त्या सामन्यात भारतीय संघ खेळत होता. त्या सामन्यानंतर मी सामन्यांना कामाला जाणं थांबवलं,'' आठवणी जागवताना पॅट्रिक म्हणाले. 'पण तुला सांगतो- माझं आणि माझ्या पत्नीचं भारतप्रेम कमी झालं नाहीये हं. गेल्याच वर्षी आम्ही राजस्थानला सुट्टीकरता जाऊन आलो आणि राजस्थान संस्कृतीत असलेल्या रंगांनी मला मोहात पाडलं. भरपूर फोटो काढले मी. माझं आणि कॅमेऱ्याचं नातं गेल्या 65-68 वर्षांचं आहे. मला माझ्या आजीनं 1958 च्या आसपास पहिला कॅमेरा दिला,'' असं म्हणत पॅट्रिक उठले आणि त्यांनी 1958 मध्ये काढलेल्या पहिल्या छायाचित्रांचा अल्बम क्षणार्धात काढून मला ते छायाचित्र दाखवलं, तेव्हा मी गपगार पडलो. तो माणूस, त्याचा नीटनेटकेपणा- सगळंच अजब होतं. एक डोळा मिटून क्रिकेट मैदानावर शिकार करणाऱ्या अशा अस्सल क्रिकेटप्रेमी माणसाला भेटून त्याच्याशी गप्पा मारून खूप श्रीमंत झाल्यासारखं वाटलं मला.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com