esakal | क्रिकेटमधलं सत्ताकेंद्र बदलतंय...
sakal

बोलून बातमी शोधा

Cricket

क्रीडा
महाराष्ट्राकडून १९ आणि २२ वर्षाखालच्या संघातून क्रिकेट खेळत असताना आमचे पहिले सामने पश्चिम विभागाचे असायचे ज्यात महाराष्ट्र, मुंबई, बडोदा, सौराष्ट्र आणि गुजरात असे पाच संघ सहभागी व्हायचे. स्पर्धा संपली की चांगली कामगिरी केलेल्या खेळाडूंचा पश्चिम विभागाचा संघ निवडला जायचा.

क्रिकेटमधलं सत्ताकेंद्र बदलतंय...

sakal_logo
By
सुनंदन लेले saptrang@esakal.com

महाराष्ट्राकडून १९ आणि २२ वर्षाखालच्या संघातून क्रिकेट खेळत असताना आमचे पहिले सामने पश्चिम विभागाचे असायचे ज्यात महाराष्ट्र, मुंबई, बडोदा, सौराष्ट्र आणि गुजरात असे पाच संघ सहभागी व्हायचे. स्पर्धा संपली की चांगली कामगिरी केलेल्या खेळाडूंचा पश्चिम विभागाचा संघ निवडला जायचा. १९८० - ९० च्या दशकात सर्वांत तयारीचा संघ मुंबईचा असायचा आणि त्यामानानं कमजोर संघ गुजरातचा असायचा. बडोद्याला वेगळ्या संघाचा मान मुंबईप्रमाणे मिळायचा, कारण बडोद्याच्या महाराजांनी प्रदीर्घ काळ क्रिकेटला राजाश्रय दिल्याची ती मानवंदना होती जणू. वर्षानुवर्ष बडोद्याचा कुठला ना कुठला खेळाडू भारतीय संघात दिसायचा. आम्ही चांगली कामगिरी करून पश्चिम विभागाच्या संघात जाण्याची धडपड करायचो तेव्हा किरण मोरे किंवा त्याच्यापेक्षा थोडा लहान संजय मांजरेकर सर्वोत्तम कामगिरी करून भारतीय संघात जायचे स्वप्न बघायचे. तो काळ असा होता की भारतीय संघात मुंबईचे ६ खेळाडू होते. ज्यातील ५ खेळाडू ११ जणांच्या संघात खेळत होते. इतकंच नाही तर भारतीय क्रिकेट नियामक मंडळातही मुंबई क्रिकेट संघटनेचा दबदबा असायचा. हे सगळं सांगायचा सोपा अर्थ हाच की त्यावेळी भारतीय क्रिकेटचे सत्ताकेंद्र मुंबई होतं.

मुंबई पाठोपाठ कर्नाटक संघातून मोठ्या वेगात चांगले खेळाडू भारतीय संघात दाखल झाले. अनिल कुंबळे, जवागल श्रीनाथ, राहुल द्रविड आणि व्यंकटेश प्रसाद हे भारतीय संघातून एकत्र खेळू लागले. २००४ मध्ये महेंद्रसिंह धोनी भारतीय संघात आला आणि त्यानंतर झपाट्यानं बदल होत गेले. तसं बघायला गेलं, तर रांची भारतीय क्रिकेटच्या नकाशावर नव्हते ते अचानक ठसठशीत दिसू लागले. अगदी छोट्या गावातून चांगले खेळाडू भारतीय संघाचा दरवाजा ठोठावायला लागले. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

जालंधरमधून भारतीय संघात आलेला हरभजन सिंग आपली जागा चांगल्या कामगिरीनं पक्की करून बसला होता. २००७ च्या ‘ट्वेन्टी-२०’ विश्वकरंडक जिंकणार्‍या संघाकडे नजर टाकली तर तुम्हांला दिसेल की रोहतकसारख्या गावातून आलेला जोगिंदर शर्मा भारतीय संघाकरता सर्वांत महत्त्वाचे असलेले षटक टाकत होता. रायबरेलीमधून कष्ट करून वर आलेला डावखुरा वेगवान गोलंदाज रुद्रप्रताप सिंग आणि केरळ राज्यातील कोठामंगलम नावाच्या गावी जन्माला आलेला श्रीसंत धोनीचे आवडते असे नवीन गोलंदाज होते.  किती नावे घेता येईल भारतीय क्रिकेटमध्ये झालेल्या बदलाची उदाहरणे देताना. सात ते दहा वर्षांच्या कालावधीत हे सगळे बदल घडले.

सप्तरंगमधील आणखी लेख वाचण्यासाठी क्लिक करा. 

ऑस्ट्रेलियन संघाविरुद्ध २००१ मध्ये गाजलेल्या मालिकेपर्यंत नयन मोंगिया भारतीय संघाचा आवडता यष्टिरक्षक होता. अचानक मोंगियावरची मर्जी उडाली आणि १७ वर्षांच्या पार्थिव पटेलला भारतीय संघाचा दरवाजा उघडला गेला. पार्थिवनं काहीवेळेला संघाची गरज ओळखून खूप कठीण जबाबदाऱ्या पार पाडल्या. २००४ मध्ये भारतीय संघ पाकिस्तान दौऱ्यावर गेला असताना कसोटी मालिकेत १-१ बरोबरी झाल्यावर निर्णायक कसोटीत पार्थिव पटेलला चक्क सलामीला फलंदाजी करायला पाठवलं गेलं. 

वीरेंद्र सेहवाग पहिल्या षटकात बाद झाल्यावर पार्थिव पटेलनं राहुल द्रविड सोबत मोठी भागीदारी रचून भारतीय विजयाचा पाया रचला होता ज्याचा मी साक्षीदार होतो.

पार्थिव पटेलची जागा महेंद्रसिंह धोनीनं घेतली आणि इतिहास घडवला. पार्थिव पटेलनं क्रिकेटचा ध्यास सोडला नाही. त्यानं गुजरातच्या रणजी संघाला मजबूत बनवले. जास्त नाव न कमावलेल्या पण होतकरू खेळाडूंना हाताशी घेत आणि सुनियोजित कष्ट करत पार्थिवनं २०१६ मध्ये गुजरात संघाला पहिलं रणजी विजेतेपद पटकावून देताना कमाल केली. अंतिम सामन्यात बलाढ्य मुंबई संघाला पराभूत करताना पार्थिवनं पहिल्या डावात ९० तर दुसऱ्या डावात मोठ्या धावसंख्येचा पाठलाग करताना अफलातून १४३ धावांची खेळी केली होती हे विसरून चालणार नाही.

जसप्रीत बुमराचा उदय
मुंबई इंडियन्स संघाकरता गुणवान खेळाडूंचा शोध घेताना जॉन राइट आणि किरण मोरे हे दोघेजण अहमदाबादला आले असताना एक गोलंदाज त्यांच्या नजरेला भिडला. गोलंदाजीची काहीशी विचित्रं शैली असलेल्या या गोलंदाजानं समोरच्या फलंदाजाला एका मागोमाग एक यॉर्कर टाकून जागचं हलू दिले नाही. ते कसब बघून जॉन राइट - किरण मोरे खूश झाले आणि त्यांनी १९ वर्षीय जसप्रीत बुमराला मुंबई इंडियन्सच्या संघात घेतले. २०१३ मध्ये बुमरा पहिला आयपीएल सामना खेळला आणि त्यानंतरची त्याची प्रगती लक्षणीय आहे. २०१६ मध्ये ऑस्ट्रेलियाच्या दौर्‍यावर गेलेल्या भारतीय संघात बुमराला घेतलं गेलं. त्यानं एक दिवसीय आणि ट्वेन्टी-२० संघात पदार्पण पाठोपाठ केले. २०१८ मध्ये विराट कोहलीनं दक्षिण आफ्रिकेत बुमराला कसोटी खेळायची संधी दिली ज्याचे बुमराने सोने केले आहे.

अक्षर पटेलची कामगिरी
एकीकडे जय शहा बीसीसीआय सचिव म्हणून जोरात काम करत आहेत. दुसरीकडं तिसरा कसोटी सामना अतिभव्य नवीन स्टेडियमवर होतोय. जगातील सर्वात मोठ्या क्रिकेट मैदानाचा मान या नवीन स्टेडियमनं पटकावला आहे. पुढील वर्षी दोन नवीन संघ आयपीएल स्पर्धेत दाखल होतील त्यातला एक अहमदाबादला येण्याची शक्यता दाट आहे. त्याच वेळेला एका कसोटी सामन्यात गुजरात संघाचे दोन खेळाडू भारतीय संघातून खेळण्याचा प्रकार पहिल्यांदा होतो आहे. नवीन मैदानाच्या पत्रकार कक्षात बसून हा लेख लिहीत असताना अक्षर पटेलनं पहिल्या डावात इंग्लंडच्या सहा फलंदाजांना बाद करण्याचा पराक्रम मला बघायला मिळतोय. सांगण्याची महत्त्वाची बाब अशी आहे की भारतीय क्रिकेटमध्ये मैदानावरचं आणि मैदानाबाहेरचं सत्ता केंद्र बदलत असल्याची ही निशाणी आहे असे मला तरी वाटतं. तुमचं मत काय आहे जरूर कळवा.

Edited By - Prashant Patil