esakal | किती खेळायचं ते ठरवावं लागणारच !
sakal

बोलून बातमी शोधा

Cricket

किती खेळायचं ते ठरवावं लागणारच !

sakal_logo
By
सुनंदन लेले sdlele3@gmail.com

न्यूझीलंडच्या २०२१ मधल्या दौऱ्यातील सामने इतक्या चुकीच्या पद्धतीने आखले गेले होते की भारतीय संघाला स्थानिक वातावरणाशी जुळवून घेणे शक्य झाले नव्हते. मर्यादित षटकांचे सामने कठोर लढाई करत जिंकल्यावर कसोटी सामन्यात काहीच करता आले नाही. ख्राईस्टचर्च कसोटी सामन्यात सपाटून मार खाल्ल्यावर मी विराट कोहलीला प्रश्न विचारला होता की, ‘ तुम्ही स्वत:ला सलीम - जावेद समजत असलात तरी रोज ‘शोले’ लिहिता नाही येत ना? कोहली मनापासून हसला होता आणि त्याने भविष्यात मालिकांचे वेळापत्रक आखताना योग्य विचार केला जाईल असे सांगितले होते. खरे बोलायचे तर बाकी सगळ्या निर्णयात दादागिरी करणाऱ्या विराट कोहलीला ‘बीसीसीआय’ कडून सामन्यांची आखणी करताना होत असलेली घाई रोखता येत नाही.

काय म्हणावे या नियोजनाला

२०२१ हे वर्ष भारतीय क्रिकेटकरता लाभदायी ठरले आहे यात शंका नाही. ऑस्ट्रेलियात जाऊन ऑस्ट्रेलियाला पराभूत करण्याची किमया भारतीय संघाने करून दाखवली. तसे बघायला गेले तर २०१८ मध्ये ऑसी संघाला कसोटी मालिकेत पराभूत केले होते पण लोकांनी ऑस्ट्रेलियन संघात स्टीव स्मिथ आणि डेव्हिड वॉर्नर नव्हते अशी कोल्हेकुई केली होती. २०२०-२१ च्या दौऱ्यात संपूर्ण ताकदीचा ऑस्ट्रेलियन संघ होता आणि पहिल्या कसोटीत भारताचा डाव ३६ धावांमध्ये गुंडाळून कसोटी सामना जिंकताना ऑसी संघाने ताकद दाखवली होती. त्यानंतर भारतीय संघाने जबरदस्त पुनरागमन करत दुसरा कसोटी सामना अनिर्णित राखला आणि नंतरचे दोन कसोटी सामने जिंकून किमया करून दाखवली. १९ जानेवारीला शेवटचा कसोटी सामना संपला.

शरीराला आणि मनाला थकवणार्‍या ऑस्ट्रेलियन दौऱ्यानंतर १० दिवसात भारतीय संघ परत चेन्नईला रवाना झाला होता कारण विश्वास ठेवा इंग्लंडचा संघ कसोटी सामने खेळायला येऊन थांबला होता. ५ फेब्रुवारीला लगेच इंग्लंड विरुद्धची मालिका चालू झाली. ती मालिका संपली फेब्रुवारीच्या शेवटच्या दिवशी. नंतर लगेच आयपीएल स्पर्धेकरता खेळाडू तयारीला लागले. ती स्पर्धा कोरोनाच्या संसर्गाने रोखावी लागली म्हणून खेळाडूंना थोडी विश्रांती मिळाली.

जून महिन्यातील आयसीसी टेस्ट चँम्पीयनशिपच्या अंतिम सामन्याकरता भारतीय संघ इंग्लंडला जाण्याकरता मुंबईच्या हॉटेलात विलगीकरणात दाखल झाले. जून महिन्याच्या सुरुवातीला खास विमानाने भारतीय संघ इंग्लंडला आला. म्हणजे आता इंग्लंडला येऊन खेळाडूंना शंभर दिवस झाले. सततचे जैव सुरक्षा वातावरण, सततचे निर्बंध आणि त्यात अपेक्षांचे ओझे झेलत सर्वोत्तम कामगिरी करायला भारतीय खेळाडू धडपडत आहेत. मालिकेत चांगला खेळ करून २-१ आघाडी घेतली असताना शेवटच्या कसोटी अगोदर कोरोना संसर्गाचे धक्के संघाला सहन करावे लागले.

आयपीएलची घाई

कोरोनाच्या संसर्गामुळे भारतातील आयपीएल स्पर्धा मध्येच रोखावी लागली होती. पण आयपीएल पूर्ण करणे गरजेचे आहे म्हणून बीसीसीआयने कसेबसे वेळापत्रक आखून उरलेली स्पर्धा आयोजित केली आहे. १४ सप्टेंबरला मँचेस्टर कसोटी सामना संपेल आणि खेळाडू १५ तारखेला दुबईकडे उड्डाण करतील. तीन दिवसांच्या विश्रांतीनंतर खेळाडू आयपीएलचा सामना खेळताना दिसतील. गेले १०० दिवस इंग्लंडच्या २० डिग्रीच्या आसपासच्या हवेत भारतीय खेळाडू खेळत आहेत आणि आता ४० पेक्षा जास्त डिग्रीच्या गरम हवेत आयपीएल खेळून पूर्ण करावी लागणार आहे. आयपीएलचा शेवटचा सामना १९ ऑक्टोबरला होईल आणि लगेच ‘ट्वेन्टी -२०’चा विश्‍वकरंडक स्पर्धा सुरू होईल. काय म्हणावे या वेळापत्रकाला मला तरी समजत नाही.

दुभत्या म्हशीच्या लाथा गोड

अगदी सत्य बोलायचे झाले तर खेळाडूंना हे वेळापत्रक कुठल्याच अर्थाने झेपत नाहीये. पण मराठीत म्हण आहे ना की दुभत्या म्हशीच्या लाथा गोड तशी अवस्था आहे. खेळाची ओढ, कारकिर्दीची काळजी आणि भरघोस आर्थिक मोबदला या तीन गोष्टींमुळे कितीही त्रास होत असला तरी खेळाडू निमूटपणे सगळे सहन करत खेळत आहेत. थोडक्यात सांगायचे तर साडेपाच महिने सतत घराबाहेर राहून काही खेळाडू इंग्लंडला ६ कसोटी सामने , उरलेली आयपीएल स्पर्धा आणि नंतर ‘ट्वेन्टी -२०’चा विश्‍वकरंडक स्पर्धा खेळणार आहेत. ते सुद्धा अत्यंत भिन्न हवामानात. कोणी कितीही तंदुरुस्त असला तरी या सगळ्याचे दुष्परिणाम खेळाडूंच्या शारीरिक आणि मानसिक मन:स्वास्थ्यावर होणार आहेत.

इंग्लंडमधील कसोटी सामन्यांचे वार्ताकन करायला आल्यावर खेळाडूंशी या संदर्भात बोलल्यावर मैत्रीतील गप्पांमध्ये खेळाडू सततचे बायो सिक्युरिटी बबलमध्ये राहत क्रिकेट खेळणे झेपत नसल्याचे बोलून दाखवत आहेत. कसोटी, एक दिवसीय, टी२० आणि आयपीएल चार क्रिकेट प्रकारात सतत खेळणारे विराट कोहली, जसप्रीत बुमरा, रोहित शर्मा सारखे खेळाडू भविष्यात काही सामने सोडून देऊन विश्रांती घेण्याचा पक्का विचार करत असल्याचे समजले. बुमरासारख्या काही खेळाडूंचे नव्याने लग्न झाले आहे तर बऱ्याच खेळाडूंची मुले अगदी लहान आहेत. सगळ्यांना बायो सिक्युरिटी बबल मध्ये राहून लहान मुलांना आनंदी ठेवणेही कठीण होत आहे तसेच कुटुंबापासून लांब राहणेही शक्य होत नाहीये.

खेळाडूंना कितीही खेळायचा मोह असला आणि संयोजकांनी त्यांची बडदास्त ठेवली तरीही इतके सतत खेळणे कोणालाही शक्य होणार नाहीये. बर्‍याच परदेशी खेळाडूंनी ही गरज लक्षात घेऊन काही सामन्यातून विश्रांती घेतली. भारतीय खेळाडूंना असे निर्णय घेताना थोडा वेळ लागेल पण हे नक्की की तो काळ आता लांब नाहीये. मोह टाळणे कधी ना कधी जमवायला लागणार आहे. भारतीय खेळाडूंना हे समजलेच पाहिजे की सर सलामत तो पगडी पचास.

loading image
go to top