esakal | ‘संगम’ नाही रे- आहे रे’चा
sakal

बोलून बातमी शोधा

केंद्रीय क्रीडा मंत्री किरण रिजिजू यांच्यासोबत ‘इंडिया खेलेगा’ अकादमीचे खेळाडू आणि प्रशिक्षक

क्रीडा
तो तसं बघायला गेलं तर भारताच्या २१ वर्षांखालच्या संघात होता आणि त्यानं ११ वेळा महाराष्ट्र राज्याचं विजेतेपद पटकावलं होतं. जर्मनीतल्या सर्वोत्तम टेबल टेनिस क्लबमध्ये सात वर्षे तो खेळत होता तसंच जपानला जाऊन खेळून तिथं प्रशिक्षणाचे धडेही गिरवून आला होता.

‘संगम’ नाही रे- आहे रे’चा

sakal_logo
By
सुनंदन लेले saptrang@esakal.com

तो तसं बघायला गेलं तर भारताच्या २१ वर्षांखालच्या संघात होता आणि त्यानं ११ वेळा महाराष्ट्र राज्याचं विजेतेपद पटकावलं होतं. जर्मनीतल्या सर्वोत्तम टेबल टेनिस क्लबमध्ये सात वर्षे तो खेळत होता तसंच जपानला जाऊन खेळून तिथं प्रशिक्षणाचे धडेही गिरवून आला होता. पण त्याच्या मनात फक्त टेबल टेनिसची अकादमी चालू करण्याचे विचार नव्हते तर त्या अकादमीत चांगल्या घरातील होतकरू मुलांसोबत अनाथ मुलांना टेबल टेनिस शिकवायचा जगावेगळा ध्यास होता. 

२०१३ मध्ये त्यानं ‘इंडिया खेलेगा’ नावानं प्रकल्प सुरू केला आणि सात वर्षांचा खडतर प्रवास केल्यावर ‘स्पोर्टस् अ‍ॅथॉरिटी ऑफ इंडिया’ने अकादमीला ‘खेलो इंडिया’चे अधिस्वीकृतीपत्रही दिले. इतकेच नाही तर काही दिवसांपूर्वी देशाचे केंद्रीय क्रीडा मंत्री किरण रिजीजू स्वत: येऊन ‘इंडिया खेलेगा’अकादमीला भेट देऊन गेले. होय ही कहाणी आहे सन्मय आणि त्याच्या परांजपे कुटुंबाची ज्यांनी गौरव लोहपात्रे आणि सिद्धेश पांडेसारख्या चांगल्या खेळाडूंना घडवण्यासोबत आणि मनिका बात्रा सारख्या उच्च कोटीच्या खेळाडूला प्रशिक्षण देण्याबरोबर खऱ्या अर्थानं अनाथ मुलांना सर्वोत्तम टेबल टेनिस प्रशिक्षण देण्याची किमया साधून दाखवली आहे.  

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

सन्मय परांजपेला टेबल टेनिसचे वेड होतं. त्याचा पाठपुरावा करताना सन्मयनं खेळाडू म्हणून चांगली मजल  गाठून दाखवली. त्याच्या पालकांना समाजकार्याची आवड असल्याने सन्मयवर समाजकार्याचे संस्कार न कळत झाले होतेच. हेच कारण असेल की सन्मयच्या मनात विचार आला की समाजातील सुसंस्कृत घरातील मुलांना क्रीडा प्रशिक्षण उपलब्ध असते, तर ते समाजातल्या अनाथ मुलांना ते का मिळू नयेत. म्हणून सन्मयनं ‘इंडिया खेलेगा’ अकादमीचं स्वप्न बघितलं, ज्याला त्याच्या आई- वडिलांनी सर्वतोपरी साथ दिली. पुरंदर- सासवड भागातील ‘सार्थक’ नावाच्या उत्तम समाजकार्य करणाऱ्या संस्थेतील अनाथ मुलांना टेबल टेनिसचे धडे द्यायला सुरुवात केली.

‘जर्मनीत खेळत असताना मला जाणवलं की चांगल्या प्रशिक्षणात शिस्तबद्ध कार्यपद्धती सर्वांत मोलाची भूमिका बजावत असते. तिकडे खेळाडूचा एका आठवड्याचा कार्यक्रम आखून तो तंतोतंत राबवला जातो. वेळा १०० टक्के पाळल्या जातात. त्यामुळं खेळाडूच्या मनातील अनावश्यक हुरहुर दूर होते आणि तो खेळावर पूर्ण लक्ष केंद्रित करू शकतो. मला अगदी तसेच प्रशिक्षण त्याच शिस्तीत देण्याची इच्छा होती. त्याबरोबर मला वाटले की समाजातील किमान काही अनाथ मुलांनासुद्धा या प्रशिक्षणात सामावून घेता यायला पाहिजे आणि त्यांनाही चांगल्या घरातील मुलांसोबत त्याच हिरिरीने टेबल टेनिस खेळण्याचा शिकण्याचा अनुभव देता यायला पाहिजे. म्हणून २०१३ मध्ये आम्ही ‘इंडिया खेलेगा’ अकादमीला सुरुवात केली. 

सप्तरंगमधील आणखी लेख वाचण्यासाठी क्लिक करा.

सर्वप्रथम मला सांगायला पाहिजे की शिक्षण प्रसारक मंडळीच्या अशोक वझे, एस के जैन, श्रीकृष्ण चितळे आणि नंदू फडके यांनी मला खूप मोलाचे सहकार्य केले आणि रणजीत नातूंनी अचूक वेळी नेमकं मार्गदर्शन केले. त्या सगळ्यांनी मला शारदा सभागृहाच्या इमारतीतील खालचा हॉल अकादमीकरता वापरायला दिला ज्याने मनातील योजना राबवणे शक्य झाले’, सन्मय परांजपेने सांगितले.

२०१६ साली सार्थक संस्थेला भेट द्यायला गेला असताना सन्मयने जाताना टेबल टेनिसच्या रॅकेट व बॉल घेऊन गेला. मुलांना त्यात खूप आनंद मिळालेला बघून प्रथम त्याने पुण्यातील अकादमीत दीड दिवसांचा कँप त्या मुलांकरता केला आणि मग १० मुलांना निवडून दोन महिने त्यांना पुण्यात आणून त्यांची राहण्याची खाण्यापिण्याची सोय करून दोन महिने त्यांना सलग प्रशिक्षण दिले. त्यातील काही मुले चांगली प्रगती करू लागली असताना त्यातील ६-७ अनाथ मुलांच्या तथाकथित नातेवाईंकांनी संस्थेत हजेरी लावून मुलांना घेऊन जाऊन त्यांना खाद्यपदार्थ बनवण्याच्या गाडीवर कांदा चिरायला लावणे किंवा भांडी धुवायला लावण्याचा प्रकार केला. बिचार्‍या मुलांना खेळापासून तोडले गेले. इंडिया खेलेगा अकादमीने हार न मानता उपक्रम अव्याहतपणे चालू ठेवला आणि आजही अकादमीत सार्थक संस्थेतील ८-९ अगदी लहान अनाथ मुले टेबल टेनिसचे धडे मनापासून गिरवत आहेत.

अनाथ मुलांना टेबल टेनिसचे शास्त्रशुद्ध प्रशिक्षण मिळत असल्याचा व्हिडिओ केंद्रीय क्रीडा मंत्री किरण रिजीजू यांनी बघितला आणि त्यांना तो इतका भावला की त्यांनी तो आपल्या इंन्स्टाग्राम अकाऊंटवर पोस्ट केला. मंत्री महोदयांनी शब्द दिला की पुण्यात येईन तेव्हा अकादमीला नक्की भेट देईन. शिक्षण प्रसारक मंडळीच्या कार्यकारिणीने अत्यंत मोलाचा पाठिंबा दिला तसेच सन्मयच्या पालकांनी अकादमीचा खर्च स्वत: उचलून कार्य चालू ठेवले. पुणे जिल्ह्याचा विजेता गौरव लोहपात्रे ‘इंडिया खेलेगा’ अकादमीतून घडला आहे. तसेच महाराष्ट्र राज्याचा विजेता आणि प्रतिथयश खेळाडू सनील शेट्टीला पराभूत करणारा सिद्धेश पांडेही याच अकादमीतून शिकून टेबल टेनिसचे जग गाजवतो आहे. 

अकादमीची कार्यपद्धती समजून भारताची अग्रणी खेळाडू मनिका बात्रा २०१८ मध्ये अकादमी बघून गेली आणि २०१९ पासून मनिकाने पुण्यात मुक्काम हलवून आपले संपूर्ण प्रशिक्षण इंडिया खेलेगा अकादमीत चालू केले. ‘मनिकासारखी महान खेळाडू रोज नित्यनियमाने टेबल टेनिसचा सराव ज्या प्रकारे करते ते बघून इतर खेळाडूंना मोठी प्रेरणा मिळत आहे आणि अकादमीही सतत नवीन चांगले प्रशिक्षण कसे देता येईल याचा ध्यास मनात ठेवत सुधारणा करत असल्याचे परांजपे कुटुंबानं ‘सकाळ’शी बोलताना सांगितले.

‘इंडिया खेलेगा’ अकादमीत शिकणारी लहान अनाथ मुले झपाट्याने प्रगती करत आहेत. गौरव लोहपात्रे आणि सिद्धेश पांडे वरच्या स्तरावर झेप घ्यायला कष्ट करत आहेत. गेल्या दोन वर्षात मनिका बात्राने सातत्याने जागतिक स्पर्धात भाग घेतल्यावर किमान शेवटच्या ३२ खेळाडूंच्या राऊंडला धडक मारायची कामगिरी करून दाखवली आहे. जपान ऑलिंपिकला पात्र ठरणे हे पहिले ध्येय मनिका बात्रासमोर असले तरी खरे सांगायचे तर २०२४ मध्ये होणाऱ्या ऑलिम्पिक स्पर्धेत पदक पटकावण्याचं ध्येय तिनं ठेवलं आहे ज्याचा पाठपुरावा अकादमी करत आहे.

मनिका बात्रा सारखी उच्च खेळाडू सराव करत असल्याने स्पोर्टस् अ‍ॅथॉरिटी ऑफ इंडियाचे मुख्य संदीप प्रधान''इंडिया खेलेगा’ अकादमीवर बारकाईने लक्ष देऊन आहेत. गेल्या महिन्यात किरण रिजीजू यांनी अकादमीला भेट देऊन सगळ्यांचे मनोधैर्य उंचावले आहे. एकीकडे मनिका बात्रा सारखी खेळाडू आणि दुसरीकडे अनाथ मुले एकाच अकादमीत प्रशिक्षण घेत असल्याने समाजातील दोन भिन्न स्तरावरचे खेळाडू शास्त्रोक्त प्रशिक्षणातून काय भरारी घेतात हे बघणे मोठे आनंदाचे आणि वेगळ्या स्वरुपाचे ठरणार आहे.

Edited By - Prashant Patil