मोडेन पण वाकणार नाही

ravichandran-ashwin
ravichandran-ashwin

ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या नुकत्याच संपलेल्या मालिकेत भारतीय संघानं जो ऐतिहासिक विजय मिळवला त्यात भारतीय संघाकडून एका शतकाची आणि एका डावात ५ विकेट मिळवण्याचा पराक्रम एकदाच नोंदवला गेला. याचा अर्थ स्पष्ट आहे की संघाला गरज निर्माण झाल्यावर दरवेळी कोणीतरी नवा हिरो निर्माण झाला ज्यानं हात वर करून जबाबदारी पार पाडली. जसे चैतेश्वर पुजाराचे सातत्य कामाला आले, तसेच रविचंद्रन अश्विनची भेदक गोलंदाजी मोठं काम करून गेली. मालिकेला सुरुवात होत असताना नेथन लायन शंभर कसोटी सामने पूर्ण करणार आहे आणि लवकरच तो चारशे बळींचा टप्पा पार करणार असल्याची चर्चा सुरू होती. ती चर्चा अपूर्ण राहिली, कारण लायन शंभरावा कसोटी सामना खेळला पण त्याला चारशे बळींचा टप्पा भारतीय फलंदाजांनी काही पार करू दिला नाही. त्यापेक्षा फक्त २६ कसोटी सामने आपला अश्विन कमी खेळला आहे आणि त्याच्या नावावर ३७७ कसोटी बळी नोंदवले गेले आहेत याकडं लक्ष दिलं गेलं नाही ही त्याची नाही तर आपली चूक आहे. ज्या अश्विननं स्टीव्ह स्मिथ च्या फलंदाजीला बांध घातला आणि सिडनी कसोटीत धैर्यानं फलंदाजी करून सामना अनिर्णित राखायला मुख्य भूमिका बजावली त्या अश्विनशी ‘सकाळ’ नं खास बातचीत केली. 

ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या मालिकेत वेगळा अश्विन दिसला असं का वाटलं ?
अश्विन :
अगदी खरं सांगू, गेल्या एक दोन वर्षात मी अनावश्यक विचार करणं टाळून खेळाचा आणि जीवनाचा आनंद घ्यायला शिकलो आहे. 

ऑस्ट्रेलियाच्या दौऱ्यावर जाताना मी पहिला कसोटी सामनाही खेळणार नव्हतो पण जडेजा १०० टक्के फिट नसल्याने मला संधी मिळाली. अजून एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे सराव सामना खेळात असताना मला अजिंक्यनं सल्ला दिला होता की मी फक्त गोलंदाजीवर लक्ष केंद्रित करावं आणि माझ्या धावा होतील का नाही याची चिंता करू नये. फलंदाजीचा प्रशिक्षक विक्रम राठोड मला म्हणाला की मी फलंदाजी करताना तंत्राचा विचार फार करतो. त्यापेक्षा सामन्याची अवस्था बघून खेळावे. या दोन सल्ल्यांचा माझ्यावर मोठा परिणाम झाला. त्यामुळं  मी तुम्हाला वेगळा दिसलो असेन. 

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

स्टीव्ह स्मिथचा धडाका तू काही प्रमाणात रोखलास ? 
अश्विन :
स्मिथ थोडा वेगळा फलंदाज आहे आणि धावा करण्याच्या बाबतीत तो खूपच उत्सुक असतो. वेगळा अशा अर्थानं कि बरेच फलंदाज उजव्या स्टम्प बाहेर खेळताना जरा बिचकतात आणि हा तिकडं उत्तम खेळतो. म्हणून मग सगळ्यांनी मिळून विचार करून त्याच्यासाठी मधल्या स्टम्प वर मारा करायचं ठरवले आणि त्याला क्षेत्ररचनेची साथ दिली. स्मिथला मी काहीवेळा सापळा रचून बाद केलं, ज्याचा मला खूप आनंद आहे.  

गोलंदाजी करताना जुना अश्विन जागा झाल्यासारखा वाटलं ! 
अश्विन :
(मनापासून हसत ) खरंच वाटलं तुम्हाला... वा वा. एक नक्की आहे की अजिंक्यनं मला खूप स्वातंत्र्य दिलं. मी स्वतः जबाबदारी स्वीकारून गोलंदाजी करावी अशी त्याची कर्णधार म्हणून मागणी होती ज्याने मला खर्या अर्थानं प्रेरणा मिळाली. गोलंदाजी करताना आत्मविश्वास जाणवू लागल्यावर त्याचा परिणाम फलंदाजीवरही झाला. 

सिडनीच्या सामन्याबद्दल आणि तुझ्या खेळीबद्दल थोडं सविस्तर सांग, अनेक क्रिकेटप्रेमींना त्याबद्दल खूप उत्सुकता आहे. 
अश्विन :
त्या खेळीबद्दल... आमची दुसऱ्या डावातील गोलंदाजी सुरू असतानाच मला पाठीत चमका येऊ लागल्या  होत्या. त्या काही केल्या कमी होईनात म्हणून मला तातडीनं औषध घ्यावं लागलं कारण अजून गोलंदाजी करायची होती. त्याचा दुष्परिणाम असा झाला की माझ्या पाठीची वाट लागली. चौथ्या दिवशी संध्याकाळी रूमवर परत आल्यावर मला झोपता येत नव्हतं आणि पडलो तर उठता येत नव्हते. खूप चिंता वाटली मला की पाचव्या दिवशी सकाळी माझी काय अवस्था होणार. सकाळी उठलो तर पाठ खूप अवघडलेली होती. म्हणून मग योग्य व्यायाम करून पॅव्हेलियनमध्ये आलो. 

मला नंतर फलंदाजीला जायचं होतं, तरी मी वाकता येत आहे तोपर्यंत पॅड बांधूनच टाकलं आणि नंतर पूर्णवेळ खाली बसलोच नाही. मी सतत ड्रेसिंगरूमच्या कठड्याला धरून पाठीला थोडा थोडा ताण देत राहिलो. माझी फलंदाजी आली तेव्हा वेगवान गोलंदाजांनी मला आखूड टप्प्याचा मारा करून आघात केले. पण त्यातून मी ठरवलं की आज मोडेन पण वाकणार नाही.  त्यात त्यांनी चेंडू पुढं टाकून स्विंग करायचा जास्त प्रयत्न केला नाही. लायनला खेळणे मला कठीण गेले नाही. हनुमा विहारी समोरून एकदम भक्कम फलंदाजी करत होता. मग आम्ही ठरवले की एकमेकांना साथ देत लढत राहायचे. सिडनी क्रिकेट मैदानावर मी अगोदर दोनवेळा अर्धशतक केलंय ती कामगिरी मला माझा विश्वास बळकट करण्यास उपयोगी ठरली. चहापानानंतर, तर तुला सांगतो की आम्ही काय करत होतो तेच मला समजत नव्हतं, एक प्रकारे आम्ही खेळण्याच्या आणि संघासाठी उत्तम कामगिरी करण्याच्या एकमेव ध्येयानं आम्ही बेभान झालो होतो. 

शेवट गोड झाला त्याबद्दल...?
अश्विन : खूप खूप गोड शेवट झाला. त्यांचे खेळाडू आम्हाला सतत डिवचत होते की या, या, ब्रिस्बेनला या, मग दाखवतो. प्रत्यक्षात आम्ही त्यांना दाखवले कि क्रिकेट मध्ये काय घडू शकते. खूप आनंद आणि अभिमान वाटतो आपल्या संघाचा. किती अडचणींना तोंड देत आपण सर्वोत्तम खेळ करून दाखवला आणि मालिका २-१ जिंकली. या इथं एक सांगावेसं वाटतं की विराट आणि अजिंक्यची शैली वेगळी असली तरी दोघांचं ध्येय एकच आहे. आपल्या प्रशिक्षकांनी आणि सपोर्ट स्टाफनं अथक परिश्रम घेतले आणि आम्हाला सतत सकारात्मक विचार करायला लावला म्हणून हे शक्य झालं.

Edited By - Prashant Patil

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com