
पुण्यातल्या ‘चंद्रशेखर आगाशे कॉलेज ऑफ फिजिकल एज्युकेशन’ या संस्थेनं नुकतचं दोन दिवसांचं दर्जेदार चर्चा सत्र आयोजित केलं होतं, ज्यात केवळ पुणे किंवा भारतातील नव्हे तर जगभरातील काही निष्णात क्रीडा तज्ज्ञांनी सहभाग घेतला होता. महाराष्ट्रातील क्रीडा तज्ज्ञ आणि प्रशिक्षकांबरोबरीनं भारतीय क्रीडा प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांनी आणि राष्ट्रीय प्रशिक्षकांनी या चर्चा सत्रात भाग घेतला ज्याने चर्चेची पातळी खरंच उच्चं राहिली. यातील एका चर्चासत्राचा विषय होता ‘रोल ऑफ अलाईड एरीयाज इन एलिट परफॉरमन्स’. म्हणजेच महान खेळाडू तयार करायला विविध क्षेत्रातील तज्ज्ञांचे काय योगदान असते. आपण जेव्हा एखादा महान खेळाडू मैदानावर खेळताना आणि सर्वोत्तम कामगिरी करताना बघतो तेव्हा त्याच्या मागे किती लोकांचा थेट सहभाग असतो हे कळत नाही. आजच्या लेखातून त्याचीच जाणीव करून देण्याचा मी प्रयत्न करतो.
चंद्रशेखर आगाशे कॉलेज ऑफ फिजिकल एज्युकेशनने आयोजित केलेल्या चर्चा सत्रात डॉ. अजित मापारी ( खेळ आणि व्यायाम विज्ञान तज्ज्ञ), डॉ तन्मयी जोशी ( स्पोर्टस् फिजिओथेरपिस्ट) आणि डॉ.जानकी देवळे ( स्पोर्टस् सायकॉलॉजिस्ट) यांचा मुख्य सहभाग होता. सर्वोत्तम खेळाडू भारतातून तयार व्हावेत या करता आपापल्या परीने आवर्जून प्रयत्न करणाऱ्या या तीन निष्णात डॉक्टरांनी चर्चेदरम्यान एक मुद्दा आग्रहाने मांडला तो म्हणजे प्रशिक्षक खेळाडूच्या घडण्याचा आधारस्तंभ असला तरी फक्त प्रशिक्षक आंतरराष्ट्रीय दर्जाचा खेळाडू घडवू शकत नाही. मूलभूत प्रशिक्षणाच्या जोडीला योग्य व्यायाम, योग्य आहार, योग्य विचार आणि दुखापत निवारणाची योग्य विचारधारा यांसारख्या अनेक छोट्या छोट्या बाबींची जोड द्यावी लागते. क्रिकेट वार्तांकनाकरता भारतीय संघाचा पाठलाग करताना दिसून येते की भारतीय संघाला तयार करायला किती लोकांचा सपोर्ट स्टाफ अव्याहत परिश्रम करत असतो.
क्रिकेट संघाचा स्पोर्ट स्टाफ
बाकी काही सांगण्यापेक्षा यादी सादर करतो म्हणजे तुम्हांला अंदाज येईल. मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्री + गोलंदाजी प्रशिक्षक भारत अरुण + क्षेत्ररक्षण प्रशिक्षक श्रीधर + फलंदाजी प्रशिक्षक विक्रम राठोड हे सोडून दोन फिजिओथेरपिस्ट + दोन मसाज तज्ज्ञ + दोन जण फक्त फलंदाजांना कमी अंतरावरून चेंडू वेगाने फेकून सराव देणारे + दोन व्यायाम तज्ज्ञ इतका सपोर्ट स्टाफ भारतीय क्रिकेट संघाला प्रशिक्षण देत असतो आणि तंदुरुस्त ठेवत असतो. ऑस्ट्रेलिया दौर्यात भारतीय संघातील बर्याच खेळाडूंना या ना त्या कारणाने संघातून बाहेर जावे लागले तरीही संघाच्या कामगिरीला धक्का लागला नाही ज्याला कारण सपोर्ट स्टाफची सुनियोजित मेहनत होती. सांगण्याचा मतलब इतकाच आहे बीसीसीआयने जाणले आहे की ‘जेणो काम तेनो ठाय...दुजा करे सो गोता खाय’, रवी शास्त्रीच्या मार्गदर्शनाखाली सगळा सपोर्ट स्टाफ आपापले काम चोख पार पाडत आहे. कोणी कोणाच्या क्षेत्रात ढवळाढवळ करत नाही हे सुद्धा तितकेच महत्त्वाचे आहे.
मला कल्पना आहे की काही विचारी वाचक असेही म्हणतील की बीसीसीआयकडे वारेमाप पैसा आहे म्हणून हे चोचले पुरवले जातात. याची काहीही गरज नसते. म्हणून आपण दुसरे उदाहरण बघूयात ज्याने वैयक्तिक खेळात सर्वोच्च स्थानावरच्या खेळाडूमागे काय पलटण उभी असते मार्गदर्शन करायला हे आपल्या लक्षात येईल.
नोवाक जोकोविचचा संघ
जगातला क्रमांक एकचा टेनिसपटू नोवाक जोकोविचच्या संघात मोठी पलटण आहे. यात दोन खरे टेनिस प्रशिक्षक आहेत ज्यात त्याचा जुना मित्र वाजदा आहे आणि माजी खेळाडू गोरान इव्हानइसेविच गेले काही वर्ष त्याला येऊन मिळाला आहे. दोन फिजिओथेरपिस्ट आणि दोन व्यायाम तज्ज्ञांबरोबर एक आहार तज्ज्ञ सोबत कायम असतो. हे सोडून प्रत्येक महत्त्वाच्या टेनिस सामन्याकरता समोरच्या खेळाडूचे बलाबल बघून सामना कसा खेळायला हवा याची योजना आखणारा टेनिस स्ट्रेटेजिस्ट नोवाकच्या संघाचा भाग आहे. हे तर काहीच नाही नोवाकला शांत समाधानी माणूस बनायला ज्याने मदत केली तो पेपे इमाज नावाचा अध्यात्मिक विचारांचा माणूस जोकोविचला मार्गदर्शन करायला हजर असतो.
यातील उलीस बाडियोचे तर नोवाक जोकोविच खूप गुणगान करतो. २०२१ मधल्या पहिल्या ग्रँन्ड स्लॅम स्पर्धेत म्हणजे ऑस्ट्रेलियन खुल्या टेनिस स्पर्धेत सुरुवातीला नोवाकला दुखापत झाली होती. उलीस बाडियोने मेहनत करून नोवाकला दुखापतीतून सावरायला फिजिओ म्हणून मदत केली. ‘‘उलीस असा माणूस आहे ज्याच्या हातात जादू आहे आणि त्याची वागणूक खूप प्रेमळ आहे ज्याचा सकारात्मक परिणाम मला दुखापतीतून सावरायला होतो’’, ऑस्ट्रेलियन ओपन जिंकल्यावर उलीस बाडियोला योग्य श्रेय देताना नोवाक जोकोविच म्हणाला होता.
जुन्या विचारांचे किंवा स्पर्धेची काहीशी भिती असलेले प्रशिक्षक ज्यांना इतर तज्ज्ञांना सामावून घेतले तर आपले महत्त्व कमी होण्याचे भय असते ते आधुनिक विचारांना फाटा देतात. ‘काय गरज आहे प्रत्येक क्षेत्रातील तज्ज्ञाची...असे काय मोठे दिवे लावणार आहेत ते आपल्या ज्ञानाचे’, जुन्या आडमुठ्या विचारांचे प्रशिक्षक नवीन विचारांना नाकारताना नेहमी हे कारण देतात. पण आता सांगायची वेळ आली आहे की जमाना बदलला आहे. जर प्रत्येक क्षेत्रातील तज्ज्ञाने आपापले काम चोख पार पाडले तर दर्जेदार खेळाडू तयार व्हायला मोठी मदत होते.
शेवटी इतकेच सांगावेसे वाटते की खेळाचे तंत्रज्ञान आता खूप प्रगत झाले आहे. जितके खेळाचे मूलभूत प्रशिक्षण गरजेचे आहे तितकेच व्यायामापासून ते दुखापत होऊ नये म्हणून काय करायला हवे आणि दुखापत झाली तर त्यावर योग्य उपचार करून कसे बाहेर यायला हवे हे प्रगत ज्ञान मोलाचे आहे. सर्वोच्च स्तरावर खेळताना खेळाडूंना बरेच मानसिक संघर्ष करावे लागतात त्याकरता खेळ मानसोपचार तज्ज्ञांची मदत खूप निर्णायक ठरू शकते.
या सर्व गोष्टी अंगीकारल्याचा काय फायदा भारतीय क्रिकेट संघाला झाला हे स्पष्ट दिसत आहे. ऑलिंपिक खेळांकरता खेळाडूंना घडवताना भारतीय खेळ प्राधिकरण आधुनिक विचारसरणीचा सुयोग्य वापर करून त्या त्या क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला घेत आहे हे अत्यंत सकारात्मक लक्षण मानता येईल. स्थानिक पातळीवर प्रशिक्षक हे समजून घेतील आणि तज्ज्ञांचे मार्गदर्शन घेताना जुन्या विचारांना तिलांजली देतील अशी अपेक्षा आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.