चेन्नईत बुद्धिबळाचा महाकुंभ! | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Chess Tournament

१९२७ पासून बुद्धिबळ खेळाच्या फिडे या पालक संस्थेकडून चेस ऑलिम्पियाड स्पर्धा भरवली जाते. ज्या देशाने दशकानुदशकं बुद्धिबळाच्या खेळावर अधिराज्य गाजवलं.

चेन्नईत बुद्धिबळाचा महाकुंभ!

भारतीय क्रीडाविश्वात चैतन्याचं वातावरण स्पष्ट जाणवत आहे. भारतीय क्रिकेट संघ विविध देशांचे दौरे करत सामने खेळत आहे म्हणून मी हे म्हणत नाही, हे लक्षात घ्या. बर्मिंगहॅममध्ये कॉमनवेल्थ गेम्स चालू झाल्या आहेत. दुसरीकडे २७ जुलैला भारताच्या फुटबॉल संघानं पहिल्यांदा फिफाच्या नेशन्स कप स्पर्धेत भाग घेऊन खूप महत्त्वाचा पल्ला पार केलाय. या स्पर्धेत इटली, नेदरलँड, मेक्सिकोसारख्या जुन्याजाणत्या संघांशी मुकाबला करायची संधी भारतीय फुटबॉल संघाला मिळाली आहे. त्याच्यापेक्षा मोठी किंवा अतिभव्य स्पर्धा चेन्नईपासून ५० किलोमीटर अंतरावरच्या मामलापुरम गावात होत आहे, ज्याला मी बुद्धिबळाचा महाकुंभ म्हणतो आहे. होय होय, भारतात पहिल्यांदा ‘चेस ऑलिम्पियाड’ होत आहे. आपल्या सगळ्यांकरिता खूप अभिमानाचा क्षण आहे हा.

तसं बघायला गेलं तर १९२७ पासून बुद्धिबळ खेळाच्या फिडे या पालक संस्थेकडून चेस ऑलिम्पियाड स्पर्धा भरवली जाते. ज्या देशाने दशकानुदशकं बुद्धिबळाच्या खेळावर अधिराज्य गाजवलं, त्या रशियाला युक्रेनवरच्या हल्ल्यामुळं २०२२ च्या चेस ऑलिम्पियाडच्या यजमानपदावरून हटवण्यात आलं. इतकंच नाही, तर त्यांच्या संघालाही यंदाच्या चेस ऑलिम्पियाडमध्ये भाग घेता येणार नाहीये. भारतीय चेस संघटनेने हीच संधी बरोबर साधली. अत्यंत कमी वेळात इतकी मोठी जागतिक स्पर्धा भरवायची हिम्मत ऑल इंडिया चेस फेडरेशनने केली. भारतात बुद्धिबळ खेळाचा प्रसार प्रचंड आणि सर्वदूर झालेला असला तरी चेन्नई शहराला बुद्धिबळाची अनौपचारिक राजधानी मानलं जातं. त्याला कारण म्हणजे, भारतीय बुद्धिबळाला जागतिक स्तरावर मान मिळवून देणारा विश्वनाथन आनंद चेन्नईचा सुपुत्र आहे. म्हणूनच भारतात चेस ऑलिम्पियाड पहिल्यांदा होत असताना चेन्नई शहराला यजमानपद देणं औचित्याचं ठरलं. त्यातून तमिळनाडूचे मुख्यमंत्री स्टॅलिन ह्यांनी ९२ कोटी रुपये मंजूर करून संयोजकांना जबरदस्त पाठबळ दिलं.

केंद्र सरकारनंही चेस फेडरेशनला संपूर्ण सहकार्य करून लगेच हिरवा कंदील दाखवला. येत्या १० ऑगस्टपर्यंत चालणारी चौवेचाळीसावी चेस ऑलिम्पियाड स्पर्धा ही जगातील सर्वात मोठी स्पर्धा मामलापुरम गावात रंग भरेल.

चेस ऑलिम्पियाडचं स्वरूप लक्षात घेऊन केंद्र सरकार आणि चेस फेडरेशनने मिळून स्पर्धेचा प्रसार व्हावा आणि प्रसिद्धी व्हावी म्हणून चेस ऑलिम्पियाड ज्योत ७५ शहरांतून फिरवून मग स्पर्धेच्या जागी आणण्याचा घाट घातला. याचा चांगला परिणाम असा होणार आहे की, यापुढं चेस ऑलिम्पियाड होईल तेव्हा मुख्य ऑलिम्पिकप्रमाणे प्रत्येक स्पर्धेअगोदर भारतात ज्योत पेटवली जाईल आणि मग ती त्यावेळच्या स्पर्धेच्या जागी मानाने नेली जाईल.

२०२२ चेस ऑलिम्पियाड स्पर्धेत तब्बल १८७ देश भाग घेणार आहेत आणि हा विश्वविक्रम असेल. २८ जुलैला मुख्यमंत्री स्टॅलिन आणि प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी चेस ऑलिम्पियाडचं उद्‍घाटन केलं आणि त्याची व्याप्ती लक्षात घेऊन राज्य सरकारनं स्पर्धेच्या जागी गावात सार्वजनिक सुट्टी जाहीर केली होती. खेळाचा मॅस्कॉट थंबी तमाम लहान मुलांचा लाडका होतोय. इतकंच काय, चेन्नईमधील सर्वांत जुना नेपियर पूल बुद्धिबळाच्या पटासारखा चौकटीचा रंगवला गेलाय. एकंदरीत चेस ऑलिम्पियाडचं वातावरण चांगलंच तापलंय.

बुद्धिबळाच्या स्पर्धा वैयक्तिक स्वरूपाच्या असतात. चेस ऑलिम्पियाड मात्र देशाच्या संघांदरम्यान खेळवली जाते, ज्याला स्विस पद्धत मानलं जातं. एक स्पर्धा खुली असते, ज्यात पुरुष आणि महिला गरज असेल तर एकत्र येऊन लढू शकतात. दुसरी स्पर्धा फक्त महिलांची असते. थोडक्यात सांगायचं तर, भाग घेणारे देश ५ खेळाडूंचा संघ बनवतात आणि त्यातील ४ खेळाडू एका वेळी दुसऱ्या संघातील खेळाडूंबरोबर लढतात. ह्यात कोणीही खेळाडू दुसऱ्या खेळाडूशी दोनदा खेळत नाही. एकूण ११ फेऱ्या खेळल्या जातात या चेस ऑलिम्पियाड स्पर्धेत.

मुख्य खुल्या स्पर्धेच्या विजेत्या संघाला हॅमिल्टन - रसेल करंडक दिला जातो. महिलांच्या विजेत्या संघाला वेरा - मॅनचीक करंडक मिळतो. यजमान देश म्हणून भारताला दोन्ही विभागांत दोन संघ उतरवायची परवानगी मिळाली आहे. म्हणजेच भारताच्या सर्व चांगल्या आणि सक्षम खेळाडूंना चेस ऑलिम्पियाड स्पर्धेत प्रत्यक्ष भाग घ्यायची संधी मिळणार आहे.

जोर लगा के हय्या

नजीकच्या भूतकाळातला इतिहास तपासला तर असं दिसतं की, भारतीय संघाने २०२० मध्ये झालेल्या चेस ऑलिम्पियाड स्पर्धेत चक्क सुवर्णपदक पटकावलं होतं. २०२१च्या चेस ऑलिम्पियाड स्पर्धेत ब्राँझपदक मिळालं होतं. २०२२ चेस ऑलिम्पियाड स्पर्धेत रशिया आणि चीन देशांचे संघ भाग घेणार नाहीयेत. तसंच, फ्रान्स देशाचा संघ संपूर्ण ताकदीनिशी उतरणार नाहीये. म्हणजेच अमेरिकेचा संघ सर्वांत मोठा दावेदार असणार आहे आणि भारतीय संघाला ठसा उमटवायची खूप मोठी संधी आहे.

भारताने पुरुष आणि महिलांचे प्रत्येकी दोन संघ उतरवताना सखोल विचार केला आहे. भारतीय पुरुष ‘अ’ संघात विदित गुजराथी आणि पी. हरिकृष्णा मुख्य खेळाडू असतील, ‘ब’ संघात निहाल सरीनबरोबर बुद्धिबळविश्व लहान वयात दणाणून सोडणारा प्रग्यानंद असेल. ‘ब’ संघाचं सरासरी वय १९ आहे ही गोष्ट लक्षात घेण्यासारखी आहे. महिलांच्या संघात कोनेरू हंपी आणि हरिकाच्या सोबत मराठमोळी भक्ती कुलकर्णी खेळताना दिसेल.

कागदावर तगड्या दिसणाऱ्या अमेरिकन संघाला टक्कर देऊन बाजी उलटण्याची किमया भारतीय संघ करून दाखवेल अशी दुर्दम्य आशा भारतीय बुद्धिबळ चाहत्यांना आहे. खास करून भारतीय महिला संघाची बाजू जास्त तयारीची वाटत आहे. ह्या संघाला अभिजित कुंटेंचं मार्गदर्शन लाभणार आहे. विश्वनाथन आनंद खेळाडू म्हणून चेस ऑलिम्पियाड स्पर्धेत भाग घेणार नसला, तरी संपूर्ण भारतीय चमूला मुख्य मार्गदर्शक तोच असणार आहे, असं मांडत असताना अझरबैजान देशाच्या संघाकडे काणाडोळा करून चालणार नाही, असं बुद्धिबळातील जाणकार सांगत आहेत.

क्रीडा स्पर्धांवर प्रेम करणाऱ्या लोकांसाठी येणारे १५ दिवस सर्व खेळांचे सर्वोत्तम स्वरूप बघायचे असतील. उत्साह वाढवायला अजून काय पाहिजे, मला सांगा तुम्ही.

Web Title: Sunandan Lele Writes Chennai Chess Competition

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..