...त्यांना खेळू देत ! | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Cricket
...त्यांना खेळू देत !

...त्यांना खेळू देत !

मे महिना चालू झाला हे तीन गोष्टींनी अगदी लगेच समजतं. एक तर जिथं तिथं आंब्यांची विक्री सुरू झालेली दिसते. दुसरी गोष्ट म्हणजे, प्रत्येक पर्यटन स्थळाच्या जागी भरपूर गर्दी आढळते... आणि तिसरी गोष्ट म्हणजे मैदान. मैदानांबरोबर पोहण्याचे तलाव आणि विविध खेळांची कोर्ट बालगोपाळांनी भरून जातात. ‘आमच्या मुलाला क्रिकेटची खूप आवड आहे... तो ना धोनीचा फॅन आहे... त्याला क्रिकेटमध्येच कारकीर्द करायची आहे,’ असं सांगत पालक १० वर्षांच्या मुलांना प्रशिक्षण वर्गाला घालताना दिसतात. गमतीने सांगतो, मोठ्या कढईत भजी तळायला टाकल्यावर दिसतं तसंच दृश्य पोहण्याच्या तलावांत दिसतं, इतकी मुलं शिकायला येतात आणि त्यांच्या डोक्यांनी तलाव भरून जातो. सुधारणा अशी झाली आहे की, नुसतंच क्रिकेट नाही, तर सगळ्याच खेळांचे उन्हाळी प्रशिक्षण वर्ग निदान शहरांत तरी भरलेले दिसतात. प्रश्न इतकाच उरतो की, किती पालक आपल्या मुला-मुलींना उन्हाळी शिबिरानंतर खेळ खेळायला प्रोत्साहित करतात!

इकडं आणि तिकडं

पत्रकार म्हणून गावोगावी फिरताना असं दिसून येतं की, भारतातील खूप कमी शाळांमध्ये खेळाचा तास गांभीर्याने घेतला जातो. पीटीचा तास म्हणजे खेळाचा तास नसतो. पीटी शिक्षकांना उत्साह असला तर तो उत्साह विद्यार्थ्यांमध्ये दिसतो. जर केवळ औपचारिकता म्हणून तो तास घेतला जात असला, तर खेळ तर लांब राहिले, साधा मूलभूत व्यायामही होत नाही. गावाकडं मुलं - मुली शाळेअगोदर तसंच शाळेच्या सुट्टीच्या वेळात आणि कधी तरी शाळेची वेळ संपल्यावरही मोकळ्या पटांगणात बागडताना, खेळताना दिसतात, तेव्हा खूप मस्त वाटतं. शहरांतील मुलांची अडचण झाली आहे.

अगोदर मुलं घराजवळच्या शाळेत पायी जायची. मग अगोदर जाऊन खेळायला वेळ मिळायचा. आता झालंय काय, की बहुतांश मुला-मुलींना एकतर पालक सोडतात किंवा रिक्षावाले काका. मग जेमतेम शाळा चालू होताना पोहोचलेली मुलं शाळा संपल्यावर लगेच घरच्या वाटेला लागतात. एकंदरीत सवंगड्यांबरोबर बागडायला वेळच मिळत नाही. ह्याचे दुष्परिणाम होत असले तरी ते वरकरणी दिसत नाहीत हा खरा धोका आहे.

प्रगत देशांतील बऱ्‍याच शाळांमध्ये चित्र वेगळं असतं. थंडीच्या दिवसांत सर्वच्या सर्व मुला- मुलींना पोहणं शिकवलं जातं. उन्हाळ्याच्या दिवसांत सर्वांना पळण्याचं तंत्र शिकवलं जातं. तसंच, मैदानी खेळ खेळण्याच्या योजना राबवल्या जातात. क्रिकेट, हॉकी आणि फुटबॉल खेळांचं शास्त्रशुद्ध प्रशिक्षण शालेय जीवनात दिलं जातं. शाळेत जाणारं प्रत्येक मूल किमान दोन खेळ खेळतं आणि किमान एक वाद्य वाजवायला शाळेतच शिकतं. मोठ्या शाळेच्या शेवटच्या दोन वर्षांत मुलांच्या गुणांचा अभ्यास करून, नक्की मुलांना काय आवडतं आहे याचा अंदाज लावून, मग त्या मुलाला किंवा मुलीला कोणत्या खेळाचं पुढचं प्रशिक्षण द्यायचं याचा रीतसर निर्णय घेतला जातो.

इकडं आणि तिकडं खेळाच्या बाबतीतील विचारांत काय फरक आहे हे समजावं म्हणून वरील मुद्दा मांडला.

पालकांची भूमिका मोलाची

मुलांच्या जडणघडणीत पालक काय विचार करतात, काय भूमिका घेतात हा कळीचा मुद्दा ठरतो. कित्येक मुलांना खेळायचंच नसतं किंवा भलताच खेळ आवडत असतो. पालक आपल्या मनातील सुप्त इच्छा पूर्ण करायला आपल्या आवडीच्या खेळाच्या प्रशिक्षण शिबिराला पाल्यांना बळजबरी टाकतात. याचा परिणाम असा होतो की, जबरदस्तीने प्रशिक्षणाला टाकलेला मुलगा किंवा मुलगी मैदानात आळसाने रेंगाळताना दिसतात. भारतातील बहुतांशी पालक आपला पाल्य सांघिक खेळ खेळू लागला, तरी फक्त वैयक्तिक कामगिरी काय करतोय, याकडेच बारीक लक्ष देतात. लोणचं घातल्यापासून मुरायला वेळ लागतो, तसं खेळाचं प्रशिक्षण सुरू झाल्यावर खेळाडू घडू लागण्याची प्रक्रिया सुरू व्हायला वेळ लागतो, याची कल्पना असूनही पालक घाई करताना दिसतात तेव्हा वाईट वाटतं. उन्हाळी शिबिर हे त्या त्या खेळाची ओळख करून घेणं, त्या खेळाच्या तंत्राची प्राथमिक माहिती घेण्याच्या दृष्टीने महत्त्वाचं असतं. शिबिरात भाग घेऊन खेळाची गोडी लागली की, मग खरी जडणघडणीची प्रक्रिया सुरू होते. पालकांनी हा कळीचा मुद्दा समजून घेणं नितांत गरजेचं आहे.

खेळ चालू केला आणि सर्वोच्च पातळी गाठण्यात यश आलं तर सोन्याहून पिवळं. दुर्दैवाने सर्वोच्च पातळी गाठता आली नाही, तरी कोणताही खेळ मनापासून खेळणारा नागरिक हा समाजात चांगला माणूस म्हणूनच जगतो, वावरतो. खेळाचा अभ्यास करताना शिकायला मिळालेल्या गोष्टी चांगलं जीवन जगायला आयुष्यभर कामी येतात, हे मात्र मी अनुभवाने खात्रीने सांगू शकतो.

Web Title: Sunandan Lele Writes Cricket Pjp78

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
टॅग्स :CricketSunandan Lele
go to top