
हा लेख तुमच्या हाती पडेपर्यंत फुटबॉल विश्वकरंडक स्पर्धेतील साखळी फेरीचे सामने पूर्ण झालेले असतील आणि बाद फेरीचे पहिले दोन सामनेही पार पडलेले असतील.
प्रस्थापितांना धक्के देणारी स्पर्धा
हा लेख तुमच्या हाती पडेपर्यंत फुटबॉल विश्वकरंडक स्पर्धेतील साखळी फेरीचे सामने पूर्ण झालेले असतील आणि बाद फेरीचे पहिले दोन सामनेही पार पडलेले असतील. बाद फेरी सुरू झाल्यावर स्पर्धेला खरा रंग चढतो असं म्हणणाऱ्या जाणकारांना आपले शब्द गिळावे लागले आहेत, इतकी साखळी फेरी धमाल झाली आहे. जगातील सर्वोत्तम ३२ संघ जरी मुख्य स्पर्धेला पात्र ठरले होते, तरीही फुटबॉलप्रेमींचं लक्ष मोजक्या काही संघांवर होतं. नजर एकीकडे लागलेली असताना दुसरीकडे प्रस्थापित संघांना पराभवाचे दणके सहन करावे लागले आहेत.
सुरुवातच धक्कादायक
स्पर्धेला सुरुवात झाली आणि लायनेल मेस्सीच्या नेतृत्वाखाली मैदानात उतरलेल्या अर्जेंटिना संघाला सौदी अरब संघानं पराभवाचा दणका दिला. मेस्सीने पेनल्टी किकवर गोल करत आघाडी मिळवून दिली होती. अर्जेंटिना संघाच्या चाहत्यांना उत्साहाचं उधाण चढलेलं असताना उत्तरार्धात सौदी अरब संघाने दोन झकास गोल करून मेस्सीच्या संघाला पराभूत केलं. जगभरचे फुटबॉलप्रेमी तो सामना, त्या सामन्याचा निकाल बघून वेडे झाले. प्रत्येक गट चार संघांचा असल्याने एकाच पराभवानंतर अर्जेंटिना संघाचं धाबं दणाणलं. अजून एक पराभव आणि अर्जेंटिना संघ स्पर्धेबाहेर फेकला गेला असता. दुसऱ्या सामन्यात मॅक्सिको आणि तिसऱ्या सामन्यात पोलंडचा पराभव करून अर्जेंटिना संघ बाद फेरीत म्हणजे उपउपांत्यपूर्व फेरीत पोहोचला आणि सगळ्यांनी सुटकेचा श्वास घेतला.
अर्जेंटिनाच्या त्या पराभवाने एक गोष्ट घडली ती म्हणजे, सगळे प्रथितयश संघ खडबडून जागे झाले. स्पर्धेत एकाग्रता नव्याने जागी झाली, तरीही जर्मन संघाला जपानकडून धक्का लागलाच. दोन जबरदस्त गोल करून जपान संघाने माजी विश्वविजेत्या जर्मन संघाला पराभवाचा दणका दिलाच. जपानी प्रेक्षकांनी दुसऱ्याच एका सामन्यात खेळ पूर्ण झाल्यावर स्टेडियममधील कचरा गोळा करून संयोजकांना मदत केलेली बघून जगभर जपानी लोकांच्या स्वच्छताप्रेमाचं कौतुक झालं.
चालू विश्वकरंडक स्पर्धेत सगळ्यांची नजर लायनेल मेस्सी आणि ख्रिस्तियानो रोनाल्डोकडे आहे. दोघेही महान खेळाडू विश्वकरंडकाची पाचवी स्पर्धा खेळत आहेत आणि दोघांचीही ही शेवटची स्पर्धा आहे. गेली दोन दशकं मेस्सी - रोनाल्डोने फुटबॉलजगतावर राज्य गाजवलं आहे. रोनाल्डोकडे अविश्वसनीय तंदुरुस्ती आहे, तर मेस्सीकडे कौशल्याची वेगळीच किनार आहे. दोघाही खेळाडूंना आपापल्या देशाकडून खेळण्याचा सार्थ अभिमान आहे. विश्वकरंडक स्पर्धा जिंकून कारकीर्दीचा परमोच्च बिंदू गाठायची इच्छा मनोमन साठवत दोघे खेळाडू जिद्दीने मैदानात उतरत आहेत.
प्रत्येक सामन्यात अंदाजे दहा किलोमीटर धावणारा रोनाल्डो १०० मीटरची शर्यत साडेदहा सेकंदांपेक्षा कमी वेळेत पूर्ण करतो. त्याचं बॉडी फॅट सहाच्या आसपास असल्याचं बोललं जातं. तो हवेत आठ फुटांपेक्षा जास्त उडी घेत चेंडू डोक्याने गोलात धडकवू शकतो. जवळपास ४३ इंच छातीचा घेर असलेल्या रोनाल्डोची कंबर फक्त ३३ इंच आहे. त्याच्या मांडीचा घेर जवळपास २५ इंचांचा आहे. हे आकडे अभ्यासले तर तुम्हाला रोनाल्डोच्या अशक्य तंदुरुस्तीची पुसटशी कल्पना येईल. दुसऱ्या बाजूला लायनेल मेस्सीच्या पायाला फुटबॉल चिकटल्यासारखा भासतो. तो चेंडूबरोबर काहीपण हरकत करू शकतो. समोरच्या खेळाडूला गुंगारा देऊन आपल्या खेळाडूला सुंदर पास करायचं मेस्सीचं तंत्र विलक्षण आहे. मैदानावर रोनाल्डोचा वावर स्पष्ट दिसतो, तर मेस्सी गुपचूप असतो आणि गरजेच्या वेळी जादूसारखा योग्य जागी पोहोचतो. मैदानावर खेळताना नजर न उचलताही मेस्सीला आपला खेळाडू कुठं उभा आहे आणि प्रतिस्पर्धी खेळाडू कुठं आहेत हे बरोबर समजतं. आपल्या सहकाऱ्याचा वेग आणि समोरच्या खेळाडूचा वेग याचा अचूक अंदाज घेत मेस्सी पास करतो, तेव्हा त्याची अचूकता लक्षणीय असते. साहजिकच बाद फेरीत पोहोचलेल्या पोर्तुगाल आणि अर्जेंटिना संघाकडे चाहत्यांची नजर असेल ती मेस्सी - रोनाल्डोचा खेळ बघायलाच.
सेनेगल, अमेरिका आणि ऑस्ट्रेलियन संघांनी शेवटच्या १६ संघांच्या यादीत नाव पक्कं केल्याचा सुखद आश्चर्याचा धक्का सगळ्यांना बसला आहे. आफ्रिकन देशांमध्ये सेनेगल संघाचा चालू स्पर्धेतील खेळ प्रेक्षकांना खूष करून गेला आहे. ऑस्ट्रेलियन संघाकडे युरोपियन देशांकडे असलेला अनुभव नसूनही त्यांनी मोठ्या संघांची शिकार करून बाद फेरीत धडक मारली आहे. आता ऑस्ट्रेलियाला मेस्सीच्या अर्जेंटिना संघाशी दोन पाय करायचे आहेत. दुसरीकडे अमेरिकेला हॉलंड संघाला टक्कर द्यायची आहे. इंग्लंड, ब्राझील, फ्रान्स संघांचा खेळ अपेक्षेप्रमाणे झाला आहे. बाद फेरीत इंग्लंड संघाचा सेनेगलविरुद्धचा सामना चांगलाच रंगेल असं वाटत आहे.

नव्या खेळाडूंचा बोलबाला
मान्य आहे की किलीयन एम्बापे, नेमार, मेस्सी, रोनाल्डो हे स्पर्धेचे तारे आहेत, तरीही त्यांच्या छायेतून बाहेर पडून स्वतःचा ठसा उमटवायला तरुण खेळाडू अगदी सज्ज झाल्याचं दिसत आहे. वीस वर्षीय पेप मटार सेनेगल संघासाठी धमाल खेळ करतोय. एम्बापेइतकीच ऑरीलीनच्या खेळाची छाप पडते आहे. त्याचबरोबर स्पेन संघाच्या गावी नावाच्या फक्त अठरा वर्षीय असलेल्या खेळाडूचं स्पर्धेवर गारूड आहे. नामांकित खेळाडूंना समोरच्या संघाचे खेळाडू नेम धरून रोखत असताना वर नमूद केलेल्या खेळाडूंना गोल करायची संधी लाभत आहे.
भारतीय प्रमाणवेळेनुसार शनिवारी रात्रीपासून उपउपांत्यपूर्व फेरीचे सामने चालू होणार आहेत. दर्जेदार फुटबॉल म्हणजे काय असतं, याचा साक्षात्कार पुढील १५ दिवसांत आपल्याला होणार आहे. ब्राझील संघाच्या हिरोला, म्हणजे नेमारला पहिल्याच सामन्यात झालेल्या दुखापतीनंतर महत्त्वाच्या सामन्यांअगोदर प्रमुख खेळाडूंना दुखापत होणार नाही यासाठी प्रशिक्षक देवाकडे साकडं घालत आहेत. पंधरा लाख पर्यटकांनी स्पर्धेचा आनंद घ्यायला कतार देशात प्रवेश केला आहे. येणाऱ्या पंधरवड्यात यात आणखी थोडी भर पडेल, कारण स्पर्धेला कोट्यवधी रुपयांचं प्रायोजकत्व देणाऱ्या नामी कंपन्या आपापल्या खास लोकांना घेऊन दोहा विमानतळावर उतरायच्या तयारीत आहेत.
साखळी स्पर्धा सुरू असताना इतके दिवस काही सामने बरोबरीत सुटत होते. बाद फेरी सुरू झाल्यावर सामना निकाली लागण्यासाठी अतिरिक्त वेळ आणि गरज पडल्यास पेनल्टी शूट आउट केलं जाणार असल्याने स्पर्धेचा थरार पराकोटीला पोहोचणार आहे. मैदानावर सुख-दुःखांच्या लहरी एकाचवेळी उसळताना बघायला मिळणार आहेत.