संवाद दोन दिग्गजांशी! | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

pankaj adwani and rashid khan

एशियन चॅम्पियनशिप स्नूकर आणि बिलियर्डसच्या खेळात मानाची समजली जाते ती दर्जेदार खेळाडूंमुळे.

संवाद दोन दिग्गजांशी!

एशियन चॅम्पियनशिप स्नूकर आणि बिलियर्डसच्या खेळात मानाची समजली जाते ती दर्जेदार खेळाडूंमुळे. आठव्यांदा ही स्पर्धा जिंकून कमाल करणाऱ्या पंकज अडवानीने आणि २०२२ ची आयपीएल स्पर्धा खेळायला भारतात आलेल्या अफगाणिस्तानच्या राशिद खानने ‘सकाळ’शी खास बातचीत केली.

दडपणांची मजा वेगळीच...

प्रश्‍न : एशियन चॅम्पियनशिप स्पर्धेबद्दल काय सांगशील?

पंकज : भारताकरिता यंदाची स्पर्धा खास राहिली, कारण विजेतेपद आणि उपविजेतेपद भारतीय खेळाडूंनी पटकावलं. मला विजेतेपद मिळालं याचा आनंद आहे; पण खरं सांगतो तुला, माझा खास मित्र आणि प्रतिस्पर्धी ध्रुव सितवालाने माझी चांगलीच परीक्षा घेतली. इतका मस्त मुकाबला झाला की, सामन्यानंतर असं वाटलं, दोघांनी जिंकायला पाहिजे होतं.

प्रश्‍न : लागोपाठ मोठ्या स्पर्धा खेळण्याने काय दडपण येतं?

- मोठं आव्हान होतं, पाठोपाठ तीन मोठ्या स्पर्धा कमी अवधीत खेळण्याचं. त्यातून मला एशियन चॅम्पियनशिपच्या अगोदरच्या स्पर्धांत योग्य लय सापडली नव्हती. थोडं दडपण आलं होतं; पण दडपणाखाली खेळायची मजा वेगळी आहे. मला आवडतं असं कठीण स्पर्धात्मक वातावरण. सर्वोच्च पातळीवर सगळ्याच खेळाडूंची तयारी, मेहनत, कौशल्य जवळपास सारखंच असतं. फरक दडपण कोण कसं झेलतो, त्यावर अवलंबून असतो. बघ ना, एशियन स्नूकर स्पर्धेत मी चांगला खेळलो; पण समोरचा स्पर्धक माझ्यापेक्षा छान खेळला. एशियन बिलियर्डस् स्पर्धेत उपांत्य सामन्यात मला चांगलंच झगडावं लागलं. म्यानमारचा खेळाडू पॉक सा जबरदस्त फॉर्मात होता. मला माझ्या खेळाची पातळी उंचावण्यावाचून पर्याय उरला नाही. कधी कधी असं वाटतं की, माझ्यासमोर खेळतानाच हे खेळाडू सर्वोत्तम खेळ कसा करतात! अंतिम सामन्यात ध्रुव सितवालाने मला सर्वोत्तम खेळ करायला भाग पाडलं.

प्रश्‍न : पराजयानंतर भावना काय मनात येतात?

- खोटं कशाला बोलू? त्रास होतो पराभव पचवताना. आपला खेळ योग्यवेळी चांगला झाला नाही की चिडचिड होते. नंतर लगेच मनाला आवर घालून विश्लेषण करून सुधारणा करायला मेहनत करावी लागते. आपला खेळ चांगला झाला आणि समोरच्याने अजून वरचढ खेळ केला तर त्रास कमी होतो. आत्मविश्वासाला धक्का लागता कामा नये, या गोष्टीला मी प्राधान्य देतो.

प्रश्‍न : खेळाचं प्रेम, उत्सुकता कायम राहण्याबाबत काय करतोस?

- मान्य आहे की, मी बऱ्‍याचवेळा मोठे विजय मिळवले आहेत, तरीही मला प्रत्येकवेळी जाणवतं की, खेळात सुधारणा करायला... नवीन नवीन शॉट्‍स शिकायला खूप वाव आहे. हीच गोष्ट मला मेहनत करायला तयार ठेवते. शिकण्याकरिता नवीन प्रयोग करायला मन मोकळं ठेवणं मला महत्त्वाचं वाटतं.

प्रश्‍न : खेळाडूंना मिळणाऱ्या पाठिंब्याबाबत काय सांगशील?

- आमच्या खेळाला पेट्रोलियम बोर्ड चांगला पाठिंबा देत आहे, त्याकरिता मी खूप आभारी आहे त्यांचा. खेळाडूला वरची पातळी गाठायला योग्य वेळी योग्य मार्गदर्शन, पाठिंबा मिळणं गरजेचं असतं. त्याचा विचार करता पेट्रोलियम बोर्डाची होणारी स्पर्धा आमच्याकरिता मोलाची ठरते. आता त्या स्पर्धेत भाग घ्यायला मी उत्सुक आहे.

संयम आणि विश्‍वास महत्त्वाचा...

प्रश्‍न : क्रिकेट तुझ्याकरिता काय आहे?

राशिद खान : मी खूप वेगळ्या देशात लहानाचा मोठा झालो. काही वर्षांपूर्वी कोणी सांगितलं असतं की, क्रिकेट जगतात अशी उंची गाठू शकेन, तर विश्वास बसला नसता. क्रिकेटने मला काय नाही दिलं; जगभर खेळायची संधी दिली, लोकांकडून प्रेम - आदर मिळाला. कुठंही गेलो तरी लोक माझ्यावर खेळाडू म्हणून प्रेम करतात. मनापासून ‘दुवा’ देतात. या सगळ्याच गोष्टी मनात साठतात तेव्हा वाटतं की, क्रिकेट माझ्याकरिता सर्वस्व आहे.

प्रश्‍न : शेन वॉर्न आणि मुरलीधरनबरोबर तुझं नातं कसं होतं? काय शिकवलं त्यांनी तुला?

- बाप रे, आमच्या लेग स्पीन समूहाचा शेन वॉर्न ‘दादा’ होता. मला आठवतं, २००९ मध्ये जेव्हा मी लहान होतो आणि पहिल्यांदा मेलबर्न क्रिकेट मैदानावर शेन वॉर्नला भेटलो, तेव्हा पूर्णपणे भारावून गेलो. १५-२० मिनिटं शेन वॉर्न मला भेटला होता. माझा माझ्या नशिबावर विश्वास बसत नव्हता. त्यानंतर मुरलीधरनबरोबर मला काम करायला मिळालं. मी एकच गोष्ट दोघांना विचारायचो की, कसोटी सामन्यात यश मिळवायला मी काय करू? दोघंही मला समजावून सांगायचे की, कसोटीत यश मिळवायला संयम राखणं सर्वांत महत्त्वाचं. कधी कधी कसोटी सामन्यात १५-२० षटकं विकेट मिळत नाही. कधी अचानक ३-४ विकेट्स मिळतात. कधी चांगल्या चेंडूवर यश मिळत नाही, तर कधी सामान्य चेंडूवर फलंदाज बाद होतो. हे सगळं पचवायला संयम हवा, स्वतःच्या कलेवर विश्वास हवा, असं शेन वॉर्न आणि मुरलीधरन मला समजावून सांगायचे.

प्रश्‍न : टी-२० क्रिकेट प्रकारात खेळताना तू नेहमी आक्रमक गोलंदाजी करतोस. धावा वाचवण्याचा नाही तर फलंदाजाला बाद करायचा प्रयत्न करतोस. हे कसं शिकलास?

- टी-२० क्रिकेट प्रकार वेगवान आहे. फलंदाज सतत मोठे फटके मारायचा प्रयत्न करतो. मला त्याला संदेश द्यावासा वाटतो की, तू आक्रमक विचार करतो आहेस, ते मीपण करतो आहे. मी सतत स्टंपचा नेम धरून मारा करतो. याने होतं काय की, फलंदाजाला आडवी बॅट करून फटके मारताना विचार करावा लागतो की, मी चुकलो तर माझी विकेट जाणार. जर मी स्टंपच्या बाहेर मारा केला, तर त्याच्यावरचं दडपण निघून जाईल. हा खेळ असा आहे की, फलंदाज आणि गोलंदाज एकमेकांच्या मनात शंका निर्माण करायचा प्रयत्न करतात. म्हणून घाबरून चालत नाही, आत्मविश्वास दाखवावा लागतो. मी सामन्याअगोदर स्वप्न बघतो की, कोणत्या फलंदाजाला कसं बाद करेन, ज्याला व्हिज्युअलायझेशन म्हटलं जातं. मला अशा कार्यपद्धतीचा फायदा झाला आहे.

प्रश्‍न : यंदाच्या आयपीएल मोसमात नवीन संघाकडून खेळणार आहेस...

- खूप खूप उत्सुकता वाटते आहे... गुजरात टायटन्स या नव्याने दाखल झालेल्या संघाकडून आम्ही खेळणार आहोत. हार्दिक पंड्या आमचा कप्तान असणार आहे. नवीन जर्सीत मैदानात उतरताना रोमांच अंगावर येत आहेत. प्रयत्न इतकाच असेल की, बॅटिंग, बोलिंग किंवा फिल्डिंगच्या क्षेत्रात संघाकरिता सर्वस्व झोकून देऊन खेळायचं.

प्रश्‍न : प्रेक्षक परत येत आहेत, याचा काय फायदा होईल?

- माझ्याकरिता प्रेक्षकांविना खेळ मजाच येत नाही. प्रेक्षक परत मैदानात येत आहेत यासारखी आनंदाची गोष्ट नाही. खास करून भारतात स्पर्धा होत आहे, तेसुद्धा प्रेक्षकांच्या उपस्थितीत, अजून काय पाहिजे! आमच्या संघाच्या पाठीराख्यांना खूष करून टाकणारी कामगिरी आम्हाला करून द्यायची आहे.

Web Title: Sunandan Lele Writes Pankaj Advani And Rashid Khan Discussion

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..