spielberg
spielberg

स्पीलबर्ग साकारणार भारतीय नेत्याचे बायोपिक! (संडे स्पेशल)

हॉलिवूडचे विख्यात चित्रपट निर्माते आणि दिग्दर्शक स्टिव्हन स्पीलबर्ग ह्यांना खूप शोधांती आपल्या चरित्रपटासाठी कथानायक मिळाला आहे. स्पीलबर्ग ह्यांच्या ह्या महत्त्वाकांक्षी प्रकल्पाचे कथानायक आहेत आपले केंद्रीय समाजकल्याण मंत्री रामदास आठवले!

लॉस एंजलिस - सध्याचा काळ हा राजकीय नेत्यांच्या चरित्रपटांचा काळ असून, गेल्या काही महिन्यात लागोपाठ आलेल्या बायोपिक्‍सनी उत्तम धंदा केल्यामुळे बॉलिवूडमधील निर्मात्यांनी चरित्रपटांमध्ये लक्ष घातल्याचे दिसत आहे. पुढाऱ्यांची चरित्रे बघण्यासाठी बॉक्‍स ऑफिसवर प्रेक्षकांची तुडुंब गर्दी होत आहे. कोट्यवधींचा फायदा होत असल्याने चित्रपटगृहांचे मालकही अशा चित्रपटांचे स्वागत करत आहेत. मध्यंतरी येऊन गेलेल्या ‘ठाकरे’, ‘ॲन ॲक्‍सिडेंटल प्राइम मिनिस्टर’, ‘एनटीआर’ अशा काही राजकीय चरित्रपटांना चांगला प्रतिसाद मिळाल्यामुळे देशातील मोठमोठ्या बॅनर्ससह हॉलिवूडच्या काही चित्रनिर्मितीगृहांनीही भारतीय राजकीय चरित्रपटांमध्ये रस दाखवला आहे. हॉलिवूडचे विख्यात चित्रपट निर्माते आणि दिग्दर्शक स्टिव्हन स्पीलबर्ग ह्यांनी ह्या संदर्भात योग्य चरित्रशोध सुरू केला होता, त्यांना अखेर आपला कथानायक मिळाला आहे. स्पीलबर्ग ह्यांच्या ह्या महत्त्वाकांक्षी प्रकल्पाचे कथानायक आहेत आपले केंद्रीय समाजकल्याण मंत्री रामदास आठवले!

‘द पोएट’ ह्या नावाने हा चित्रपट जगभर साडेसहा हजार चित्रपटगृहांत दाखवला जाणार असून, त्याच्या निर्मितीसाठी साधारणत: सातशेवीस कोटी डॉलर्स (सुमारे पाच हजार कोटी रुपये) इतका खर्च अपेक्षित आहे, अशी माहिती ‘ड्रीमवर्क्‍स’ ह्या स्पीलबर्ग ह्यांच्या चित्रसंस्थेच्या जनसंपर्काधिकारी मेरलिन लेब्लाँ ह्यांनी पत्रकार परिषदेत दिली. ‘दि पोएट’ हा चित्रपट इंग्लिश भाषेसह स्वाहिली, हुतु, क्रिओळ, झ्वांझी, झुलु अशा किमान दोनशे भाषांमध्ये प्रदर्शित होईल. 

मेरलिन लेब्लाँ ह्यांनी संपूर्ण प्रकल्पाची माहिती देताना सांगितले, की भारतीय नेत्यांचे चरित्रपट जनसामान्यांना भुरळ घालणारे आहेत. ते फक्‍त भारतापुरते मर्यादित राहू नयेत, तर त्याचा जगात प्रसार व्हावा, असे स्पीलबर्ग ह्यांना वाटत होते. भारत ही गुणवत्तेची खाण आहे. त्यातील गुणवंत नेता हेरून त्याचा जीवनपट साकारण्याची स्पीलबर्ग ह्यांची मूळ कल्पना होती. त्यांच्या कठोर मोजपट्ट्यांवर रामदास आठवले ह्यांचे व्यक्‍तिमत्त्व उतरले. खुद्द स्पीलबर्ग स्वत:च हा चित्रपट दिग्दर्शित करणार असून, चित्रपटाची हिंदी आणि मराठी आवृत्ती मात्र स्वत: आठवले हेच दिग्दर्शित करतील, असेही लेब्लॉ ह्यांनी स्पष्ट केले. चित्रपटाची गाणी आणि पटकथालेखनाची जबाबदारीही आठवले ह्यांच्याकडेच सोपवण्यात आली असून, ‘सबकुछ आठवले’ अशी त्याची टॅगलाइन असेल.

खुद्द स्पीलबर्ग ह्यांनी ‘ हॉलिवूड न्यूज’ ह्या पोर्टलला सविस्तर मुलाखत देताना, ‘‘मला माझा कथानायक सापडला, (ॲट लास्ट आय फाऊंड माय हिरो...)’’ असे उद्‌गार काढले. हिरवा कोट आणि लालचुटूक शर्ट व टाय, तसेच रंगीबेरंगी बूट अशा पोशाखातील आठवले ह्यांचे छायाचित्र अमेरिकेत एका मासिकात प्रसिद्ध झाले होते, ते स्पीलबर्ग ह्यांच्या पाहण्यात आले आणि त्यानंतर त्यांनी हे उद्‌गार काढले. 

‘ते छायाचित्रच इतके भुरळ घालणारे होते, की तीन तासांचा चित्रपट काय जादू करील, ह्याची तुम्हाला कल्पनाही करता येणार नाही.

आठवलेसाहेबांच्या प्रतिभेने मी विलक्षण प्रभावित झालो असून हळूहळू काव्यलेखनाकडेही वळीन असे दिसते,’’ असे स्पीलबर्ग मनापासून म्हणाले.

‘मी आहे नव्या चित्रपटात गर्क
कारण माझे नाव आहे स्पीलबर्ग’
...अशा कवितेच्या ओळीही स्पीलबर्ग ह्यांनी लागलीच म्हणून दाखवल्या. 
चित्रपटातील प्रमुख भूमिकाही अर्थातच रामदास आठवले हे स्वत:च साकारतील, असे जाहीर करण्यात आले असून, येत्या वर्षभरात त्याचे शूटिंग पार पडेल आणि पुढील एक एप्रिल रोजी चित्रपट जगभर प्रदर्शित होईल.

दरम्यान, आठवले ह्यांच्या महत्त्वाकांक्षी चरित्रपटाविषयी कुणकुण लागल्याने पंतप्रधान कार्यालयात अस्वस्थता निर्माण झाली असून, खरे तर हा मान मोदीजींनाच मिळायला हवा होता, अशी कडवट प्रतिक्रिया परराष्ट्र खात्याच्या एका अधिकाऱ्याने व्यक्‍त केली. स्पीलबर्ग ह्यांचा सदर प्रकल्प हाणून पाडण्यासाठी बरेच राजकारण शिजू लागले असून, स्पीलबर्ग ह्यांच्या ‘ड्रीमवर्क्‍स’ संस्थेच्या भारतातील कार्यालयावर सक्‍तवसुली संचालनालयाच्या धाडी टाकण्याचा बेत आखला जात होता. परंतु, असे कार्यालयच अस्तित्वात नसल्याने सक्‍तवसुली अधिकारी हात हलवीत परत गेल्याचे खात्रीलायक गोटातून समजते.

खुद्द रामदास आठवले ह्यांनी ‘ड्रीमवर्क्‍स’शी झालेल्या करारातील गोपनीयतेच्या कलमामुळे आणि निवडणूक आचारसंहितेमुळे ह्याविषयी काहीही बोलण्यास नकार दिला. तथापि, त्यांनी सदर वृत्तास सूचक अनुमोदन दिले. ते म्हणाले-
फूल एप्रिलचे फूल
काँग्रेसचा झाला डब्बा गुल!

एप्रिल महिन्याचा पहिला दिवस हा गंमत करण्याचा, फिरकी घेण्याचा दिवस म्हणून ओळखला जातो. फिरकी घेण्याचे प्रकार या दिवशी सर्रास केले जातात. यातून स्वतःची आणि इतरांचीही करमणूक होते. अशाच काही घटना खास तुमच्यासाठी, वेगळ्या ढंगात, वेगळ्या शब्दांत, पोट धरून हसण्यासाठी... एवढेच! सर्वांचा आदर आणि मान राखूनच!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com