मी कोण आहे? (संदीप वासलेकर)

sundeep waslekar
sundeep waslekar

मी एक माणूस आहे हे सर्वजण विसरलेले दिसतात. मी एक मित्र, नातेवाईक, सहकारी आहे यात कुणालाच रस नाही. मी एक नागरिक आहे असं मानणंही त्यांच्यासाठी अडचणीचंच. पैसा आणि प्रतिष्ठेच्या शोधात असणाऱ्या, धर्म-जातीचं बंधन माणुसकीच्या गळ्याभोवती आवळणाऱ्या या समूहात मी कोण आहे?

एकदा विमानात सहप्रवाशाबरोबर संवाद साधण्याचा प्रयत्न मी केला. त्यानं लगेच खिशातून स्वतःचं कार्ड काढून मला दिलं व म्हणाला ः ""मी या संगणक कंपनीचा अध्यक्ष आहे. तुम्ही कोण आहात?''
मी म्हणालो ः ""मी एक गणित आहे! माझं शरीर, मन व आत्मा यांची बेरीज केली तर व तिला माझ्या नैतिक मूल्यांनी गुणलं तर त्या गुणाकाराचं उत्तर म्हणजे मी आहे.''
तो म्हणाला ः ""अरे वा! तुम्हाला अध्यात्म वगैरे समजतं असं दिसतंय; पण... तरीही, तुम्ही कोण आहात?''
मी म्हणालो ः ""मला अध्यात्माविषयी काही माहीत नाही. मी काही नैतिक मूल्यांचं परिमाण वापरून अंदाज बांधतो. माझ्या स्वतःच्याच परीक्षणानुसार मी एक चांगली व्यक्ती आहे, असं सध्या म्हणायला हरकत नाही. खरं म्हटलं तर मी काही कायमच चांगली व्यक्ती नव्हतो व पुढं नैतिक कसोटी कितपत पार करीन ते नंतर कळेल. मात्र, सध्या तरी मी एक चांगली व्यक्ती आहे, असं मला स्वतःला वाटतं.''
तो म्हणाला ः ""अहो, तुम्ही चांगले आहात म्हणून तर विमानात बसलेला आहात; पण तरीही, तुम्ही कोण?''
मी विचारलं ः ""चांगलेपणाचा आणि विमानाचा काय संबंध? विजय मल्ल्या, नीरव मोदी वगैरे मंडळी विमानानंच पळाली ना?''
तो म्हणाला ः ""अहो, मी चांगलं-वाईट याबद्दल बोलतच नाहीये. त्याची मला पर्वा नाही. माझा प्रश्‍न आहे की "तुम्ही कोण आहात?' म्हणजे तुम्ही काय करता?''
दलाई लामांनी एक गोष्ट सांगितली होती. ती मला या वेळी आठवली.
त्या गोष्टीचा आशय असा ः "कुंभकाराकडचं मडकं हा काय प्रकार असतो? आपल्याला वाटेल की माती-पाणी-रंग यांचं ते एक मिश्रण असतं; परंतु आपल्यातल्या कुणी केवळ माती-पाणी-रंग एकत्र मिसळले तर मडकं तयार करू शकतो का? तर नाही. कारण, या तीन घटकांव्यतिरिक्त मडक्‍यात कुंभकाराची प्रतिभाही असते. आपण सर्वजण कुंभकाराच्या त्या मडक्‍यासारखे असतो. अनेक मूर्त व अमूर्त पदार्थ, भावना, विचार, प्रक्रिया यांचं आपण एकत्रित असं एक मिश्रण असतो. या सगळ्याचा संयुक्त असा एक अंतिम परिणाम आपण असतो. आपलं व्यक्तिमत्त्व, चारित्र्य व कर्तृत्व हे अनेक बाबींवर अवलंबून असतं व त्यापैकी अनेक गोष्टी आपण ठरवलेल्या नसतात. त्यामुळे आपण स्वतःच्या कर्तृत्वावर झालेली कुणी थोर व्यक्ती आहोत अथवा कमनशिबामुळं अभागी व्यक्ती आहोत असा विचार करणं चुकीचं ठरेल.'
दलाई लामांच्या या गोष्टीबद्दल मी त्या सहप्रवाशाशी काही बोललो नाही; पण काहीतरी संवाद करायचा म्हणून त्या काळात झालेल्या घटनांचा विषय काढला. ""काल पॅरिसच्या "नोत्रदाम'मध्ये आग लागून संपूर्ण जगाचं सांस्कृतिक नुकसान झालं. खूप वाईट वाटलं.''
त्यानं फक्त "हं' म्हटलं व वर्तमानपत्र वाचायला सुरवात केली. तेवढ्यात हवाई-पारिचारिका आली. तिनं मनापासून हसून माझं स्वागत केलं व विचारलं ः ""सर, आज एकटेच कसे काय? तुमचे कुणी सहकारी नाहीत बरोबर?''
मी म्हणालो ः ""सहकारी 3-4 दिवस आधीच गेले. मला जरा मुंबईत काही खासगी कामं होती म्हणून मी उशिरा निघालो.''

दोन मिनिटांनी विमानाचा फर्स्ट ऑफिसर म्हणजे सहचालक आला व त्यानंही स्वागत केलं. "सर्व काही व्यवस्थित ना' अशी चौकशी केली व तो कॉकपिटमध्ये निघून गेला.
सहप्रवाशानं वर्तमानपत्र बाजूला ठेवलं. पायावर पाय ठेवले. माझ्याकडं वळला व म्हणाला ः ""हे सर्वजण तुमचं स्वागत का करत आहेत? तुम्ही कोण आहात?''
मी स्पष्ट केलं ः ""या विमानकंपनीच्या दृष्टीनं मी एक नेहमीचा प्रवासी आहे. म्हणजे एक निष्ठावान ग्राहक आहे.''
तो म्हणाला ः ""अरे बाप रे! तुम्ही नेहमी प्रवास करता म्हणजे तुम्ही नक्कीच कुणीतरी आहात. तुम्ही नक्की कोण आहात?''
मी म्हणालो ः ""या विमानकंपनीच्या लेखी मी ग्राहक आहे. भारत देशासाठी मी एक नागरिक आहे. माझ्या दोन मुलांसाठी मी त्यांचा सर्वात जवळचा मित्र आहे.''
सहप्रवासी म्हणाला ः ""ते सर्व कळतंय; पण तुम्ही कोण आहात?''
मी थोड्याशा रागानं म्हणालो ः ""अहो, किती वेळा एकच प्रश्‍न विचारताय? बरं, आता उत्तर देण्याचा प्रयत्न करतो. मी एक प्रवासी आहे. म्हणजे या विमानातल्या प्रवासाबद्दल मी बोलत नाहीय. तर आयुष्यात जास्तीत जास्त सुख, समाधान व आनंद कसा मिळावा, ज्यांच्याबद्दल मला काहीएक जाणीव आहे त्यांना आनंद कसा देता येईल व माझं आणि इतरांचं दुःख कमी कसं करता येईल याचा मार्ग शोधणारा मी एक प्रवासी आहे. ते एक हिंदी सिनेगीत आहे ना, "जिंदगी इक सफर है सुहाना...' ''
तोही रागानं म्हणाला ः ""काय कंटाळवाणे विचार आहेत हो तुमचे! तुम्ही कोण आहात म्हणजे तुम्ही डॉक्‍टर, उद्योजक, सीईओ, नेता, अधिकारी असे कोण आहात?''
त्या प्रवाशाला माझा व्यवसाय, पद व प्रतिष्ठा यांचा निर्देशांक पाहिजे होता; पण त्यानं मला "तुमचा व्यवसाय काय?' किंवा "तुम्ही कोणत्या पदावर आहात?' असे प्रश्‍न विचारलेले नव्हते, तर "तुम्ही कोण आहात?' हेच तो सातत्यानं विचारत राहिला होता.
भारताच्या उच्चभ्रू वर्गाचा गोंधळ झालेला दिसतो. एखादी व्यक्ती म्हणजे "शरीर, मन व त्या व्यक्तीची मूल्यं यांचा गुणाकार समजण्याऐवजी व्यक्ती म्हणजे केवळ "व्यावसायिक पार्श्‍वभूमी व पद आणि प्रतिष्ठा यांचा निर्देशांक' असते, असंच हा वर्ग समजतो.

मी एक चांगल्या अथवा वाईट विचारांचा, सकारात्मक अथवा नराकात्मक नाती असणारा, सक्रिय अथवा निष्क्रिय नागरिक आहे का यात
त्या सहप्रवाशाला रस नव्हता. संवादाकरिता काही विषयावर बोलण्यासाठी म्हणून कला, क्रीडा, इतिहास, प्रवास अशा आवडी-निवडींबद्दल जाणून घ्यायची त्याची इच्छा नव्हती. त्याला माझा व्यवसाय, पद व प्रतिष्ठा या बाबींपुरतीच माहिती हवी होती.
आपल्याला सगळ्यांनाही असा अनुभव आला असेल. "मी संगणकक्षेत्रातला इंजिनिअर आहे', "मी डॉक्‍टर आहे', "मी आमदार आहे', "मी प्रोफेसर आहे', "मी बिझनेसमन आहे' अशी ओळख त्या त्या व्यक्तींनी पहिल्या भेटीतच तुम्हाला करून दिली असेल. तसंच तुमच्याकडूनही त्याच माहितीची विचारणा केली गेली असेल. संपूर्ण आयुष्याचं सार हे केवळ पद, पैसा, प्रतिष्ठा यात पाहणाऱ्या त्या सहप्रवाशाची मला कीव आली.
मी पुढं काही न बोलता वर्तमानपत्र वाचायला घेतलं. निवडणुकांचे दिवस होते. प्रमुख नेत्यांच्या भाषणांचे वृत्तान्त त्यात छापून आलेले होते. त्या वृत्तान्तांनुसार, एक नेता म्हणत होता ः "तुम्ही हिंदू आहात म्हणून मला मतं द्या.' दुसरा म्हणत होता ः "तुम्ही मुस्लिम आहात म्हणून मला मतं द्या.' एकानं जाहीर केलं होतं ः "तुम्ही अमुक अमुक जातीचे आहात.' अजून एका नेत्यानं आव्हान केलं होतं ः "तुम्ही अमुक तमुकभाषक आहात...'

समाजातले संकुचित मनोवृत्तीचे लोक, मी एक डॉक्‍टर अथवा उद्योजक अथवा साहेब अथवा कर्मचारी आहे म्हणून माझी व्याख्या करणार. समाजातले नेते मला धर्म, जात, प्रांत, भाषा ही परिमाणं लावून माझं अस्तित्व ठरवणार. मात्र, मी एक माणूस आहे हे सर्वजण विसरलेले दिसतात.
-मी एक मित्र, नातेवाईक, सहकारी आहे यात कुणालाच रस नाही.
मी एक नागरिक आहे असं मानणंही त्यांच्यासाठी अडचणीचंच. पैसा आणि प्रतिष्ठेच्या शोधात असणाऱ्या, धर्म-जातीचं बंधन माणुसकीच्या गळ्याभोवती आवळणाऱ्या या समूहात मी कोण आहे?

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com