वाग्दत्त वधू

Sunil-Deshpande
Sunil-Deshpande

गेल्या शतकाच्या ऐन मध्यावरच्या काळातलं कलकत्ता शहर. तिथं राहणाऱ्या गुरुचरण आणि नवीनचंद्र या दोघांची घरं शेजारी-शेजारी लागून अशी. गुरुचरण सामान्य परिस्थितीतले, सत्शील गृहस्थ, तर नवीनबाबू गडगंज श्रीमंत. पैशाची लेन-देन करणारे, कायम संपत्तीच्या गुर्मीत वावरणारे. मात्र या दोन कुटुंबांत एवढा घरोबा की दोन्ही घरांमधल्या भिंतीत एकमेकांकडे येण्या-जाण्यासाठी वाट केलेली. सामान्य कारकुनाची नोकरी करणारे गुरुचरण घर चालवताना मेटाकुटीला आलेले. त्यात मोठ्या मुलीच्या लग्नासाठी त्यांनी नवीनबाबूंकडे घर गहाण ठेवून कर्ज काढलेलं. या कर्जाचं मुद्दल सोडाच, पण व्याजही फेडता न आल्यानं नवीनबाबूंचा सतत तगादा सुरू असतो. खरं तर गुरुचरण कर्जाची एक पैही फेडू शकणार नाहीत याची नवीनबाबूंना खात्री असते. त्यामुळेच एक दिवस त्यांचं घर बळकावण्याचा त्यांचा डाव असतो. नवीनबाबूंचा मुलगा शेखर मनमिळाऊ स्वभावाचा असतो. गुरुचरण यांच्या घरात ललिता ही त्यांची अनाथ भाची लहानपणापासून राहात असते. घरकामात कुशल असलेली, विनम्र, लाघवी ललिता दोन्ही कुटुंबांतल्या प्रत्येकाला लळा लावून असते. मामा-मामींची सेवा करण्याबरोबरच शेजारी शेखरच्या आईला घरकामात मदत करणं, शेखरची खोली आवरून ठेवणं ही तिची दररोजची कामं. कोणत्याही कामासाठी शेखरच्या कपाटातून पैसे काढून घेण्याइतका अधिकार तिला असतो. शेजारी दुसऱ्या बाजूला राहणाऱ्या चारुलताच्या घरी पत्त्यांचा डाव खेळण्यासाठीही ललिताचं जाणं-येणं असतंच. घरात बाहुला-बाहुलीच्या लग्नाचा खेळ सुरू असताना गंमत म्हणून ललिता शेखरच्या गळ्यात फुलांचा हार टाकते. शेखर तोच हार उलट तिच्या गळ्यात घालतो.

चेष्टामस्करीत काय करून बसलो हे ध्यानात आल्यानंतर ललिता वरमते खरी, मात्र त्याच क्षणापासून ती शेखरशी आपलं लग्न झाल्याचं मानू लागते. आपण ‘परिणिता’ असल्याचं मनोमनी निश्‍चित करते.

इकडे ‘सात दिवसांत माझे पैसे परत न मिळाल्यास घरावर जप्ती आणेन,’ अशी धमकी नवीनबाबूंनी दिल्यानं गुरुचरणवर मोठंच संकट येतं. त्याच सुमाराला शेजारच्या चारुलताचा मामा गिरीन कलकत्त्यास येतो. पैशानं श्रीमंत असलेला गिरीन ललितावर भाळतो. कर्जापायी ललिताचे मामा अडचणीत असल्याचं पाहून तो स्वत:हून त्यांना मदत करायला तयार होतो.

गुरुचरण यांचं संपूर्ण कर्ज फिटेल एवढी रक्कम त्यांना बिनव्याजी देतो. गुरुचरण एकरकमी कर्ज फेडून स्वतःचं घर सोडवतात. गिरीनची परोपकारवृत्ती बघून गुरुचरण यांना त्याच्याविषयी ममत्व वाटू लागतं. ललिताचं लग्न ते त्याच्याशी ठरवतात. गिरीनही राजी होतो. घर हातचं गेल्यानं दुखावलेले नवीनबाबू गुरुचरण यांच्यावर पैशासाठी ललिताचा सौदा केल्याचा आरोप करतात. एका ‘ब्राह्मो समाजी’ मुलाशी भाचीचं लग्न ठरवल्याबद्दल गुरुचरणवर बहिष्कार टाकत नवीनबाबू दोन्ही घरांमध्ये भिंत बांधतात. कडाक्‍याच्या भांडणात हृदयविकाराचा झटका आल्यानं नवीनबाबू मृत्युमुखी पडतात, तर त्या धक्‍क्‍यानं आजारी पडलेले गुरुचरणही जगाचा निरोप घेतात. मधल्या काळात ललिताविषयी गैरसमज होऊन शेखरही दुखावला जातो. पण शेवटी गैरसमजाचं धुकं दूर होऊन शेखर आणि ललिता यांचं शुभमंगल होतं. गिरीन सन्मानानं या दोघांचा मार्ग मोकळा करून देतो.

प्रख्यात बंगाली लेखक शरत्‌चंद्र चट्टोपाध्याय यांच्या ‘परिणिता’ या कादंबरीचं हे रुपेरी पडद्यावरचं रूप. ‘परिणिता’वर बंगालीत व हिंदीतही अनेक सिनेमे निघाले. परंतु निर्माता अशोककुमारसाठी बिमल रॉय यांनी दिग्दर्शित केलेला १९५३ सालचा हा कृष्ण-धवल चित्रपट शरत्‌बाबूंच्या मूळ कथेशी सर्वाधिक प्रामाणिक व परिणामकारक असा मानला जातो. (विधू विनोद चोप्रानिर्मित व प्रदीप सरकार दिग्दर्शित हिंदीतला चौथा व अखेरचा ‘परिणिता’ २००५मध्ये आला. त्याची तुलना इथं न करणंच योग्य.) शरत्‌बाबूंची कथा पडद्यावर आणणं हे अतिशय कठीण काम असल्याचं मानणाऱ्या बिमल रॉय यांनी प्रत्यक्षात या लेखकाच्या तीन कादंबऱ्यांवर प्रत्ययकारी चित्रपट बनवले. (‘बिराज बहू’ नि ‘देवदास’ हे अन्य दोन.) बंगाली, त्यातही शरत्‌ साहित्यातल्या नायिका बव्हंशी कोमलहृदयी, हळव्या, त्यागी, आत्मक्‍लेशी स्वभावाच्या असतात. बिमलदांची ‘परिणिता’ ही त्यातलीच. अशोक कुमारसारखा कसलेला अभिनेताही ‘डावा’ ठरावा अशी कामगिरी मीनाकुमारीनं इथं बजावली. लहान चणीची, बुटकी- तरीही गोड चेहऱ्याची, तुरू-तुरू चालणारी ललिता तिनं ज्या सहजतेनं साकारली त्याला तोड नाही. शेखरच्या घरातला तिचा सहज वावर, त्याची खोली-कपाट आवरणं, शेखरच्या जहरी वाग्बाणांनी डोळे पाणावणं हे तिच्याकडून एवढ्या सहजतेनं घडतं की हा ‘अभिनय’ आहे, यावर चटकन विश्‍वास बसत नाही. ‘शोकनायिका’ हे बिरुद मीनाकुमारीला मिळालं ते नंतरच्या काळात.

तोवरच्या तिच्या भूमिकांमधून तिला न्याहाळणं हा विलक्षण आनंददायी भाग असतो. ‘नुसता मीनाकुमारीच्या चालण्यासाठी ‘परिणिता’ पाहावा,’ असं तिच्या एका चाहत्यानं म्हटलंय, ते उगाच नव्हे!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com