सत्य-संभ्रमाचा थरार !

रहस्यप्रधान चित्रपटावर लिहिताना वा बोलताना एका गोष्टीची पंचाईत होते. ती ही की, या चित्रपटाचा शेवट उघड करता येत नाही. विशेषतः परीक्षणात अशा चित्रपटाचा शेवट सांगणं ‘सभ्यते’त बसत नाही.
Movie
MovieSakal
Updated on
Summary

रहस्यप्रधान चित्रपटावर लिहिताना वा बोलताना एका गोष्टीची पंचाईत होते. ती ही की, या चित्रपटाचा शेवट उघड करता येत नाही. विशेषतः परीक्षणात अशा चित्रपटाचा शेवट सांगणं ‘सभ्यते’त बसत नाही.

रहस्यप्रधान चित्रपटावर लिहिताना वा बोलताना एका गोष्टीची पंचाईत होते. ती ही की, या चित्रपटाचा शेवट उघड करता येत नाही. विशेषतः परीक्षणात अशा चित्रपटाचा शेवट सांगणं ‘सभ्यते’त बसत नाही. म्हणजे बाकी सर्व गोष्टी सांगायच्या आणि ज्यामुळे तो चित्रपट रंजक, थरारक वगैरे झाला, ते ‘रहस्य’ मात्र उघड करायचं नाही, असा हा मामला असतो. (असे चित्रपट दुसऱ्यांदा बघताना तेवढी रंगत येत नाही, ही दुसरी अडचण असते.)

अर्थात, शेवट उघड न करण्याचं बंधन चित्रपट नवा असेतोवर पाळावं लागतं. काळ उलटत जातो तसं हे बंधन शिथिल होत जातं. मग साठ-बासष्ट वर्षांपूर्वीच्या ‘कानून’वर लिहिताना तर हा संकेत पाळायचं कारणच उरत नाही.

‘कोर्टरूम ड्रामा’ ही ज्यांची खासीयत मानली जायची, त्या बी. आर. चोप्रा यांनीच १९६० मध्ये निर्मिती केली होती ‘कानून’ची! फाशीची शिक्षा असावी की नसावी या मुद्द्याला तो स्पर्श करत असला, तरी खुनाच्या रहस्याची रंजकतेने उकल करणारी ती ‘मर्डर मिस्टरी’च होती. फक्त या रहस्याला ‘कोर्टरूम ड्रामा’ची जोड दिल्याने चित्रपट आणखी थरारक बनला.

या रहस्यात प्रेक्षक एवढा गुरफटून जातो की या चित्रपटात एकही गाणं नाही हेही त्याच्या ध्यानात येत नाही. ‘नौजवान’ (१९३७) आणि ‘मुन्ना’ (१९५४) यानंतरचा तिसरा गीतविरहित चित्रपट म्हणून चोप्रा यांच्या ‘कानून’चं नाव घ्यावं लागेल. पन्नास-साठ वर्षांपूर्वी गाण्यांशिवाय चित्रपट काढणं हे धाडसाचं होतं. (‘कानून’नंतर नऊ वर्षांनी चोप्रा बंधूंनी ‘इत्तेफाक’द्वारे पुन्हा हाच प्रयोग केला, तोही तेवढाच यशस्वी ठरला.)

बद्रिप्रसाद (अशोक कुमार) या न्यायाधीशांवर अनपेक्षितपणे आलेला खुनाचा आळ, त्यातून निर्माण झालेला रहस्याचा गुंता आणि शेवटी या गुंत्याची सोडवणूक, असा रोमांचकारी अनुभव ‘कानून’ या चित्रपटाने दिला. यातील विशेष हे की, नायकाप्रमाणे प्रेक्षकांनासुद्धा बद्रिप्रसाद हा खुनी आहे, असं खात्रीने वाटत असतं. चित्रपटाची सुरुवात एका खटल्यानेच होते. एका ‘न झालेल्या’ खुनाच्या घटनेत दहा वर्षांपूर्वी जन्मठेपेची शिक्षा झालेला कालिदास (जीवन) हा कैदी तुरुंगातून बाहेर आल्यानंतर खरोखरच ‘त्या’ व्यक्तीचा खून करतो आणि पोलिसांच्या स्वाधीन होतो. न्यायालयात तो खुनाची कबुलीही देतो. मात्र या गुन्ह्यासाठी आपल्याला शिक्षा होऊ शकत नाही, असा युक्तिवाद तो करतो. ‘‘याच व्यक्तीच्या खुनाबद्दल मी दहा वर्षांची शिक्षा भोगलेली असून, एका व्यक्तीचा दोन वेळा खून होऊ शकत नाही... आणि जर मला शिक्षा द्यायचीच असेल तर न्यायालयाने माझी ती दहा बहुमोल वर्षं मला परत द्यावीत, जी माझ्याकडून न केलेल्या गुन्ह्यासाठी हिरावून घेतली गेली... या दहा वर्षांत माझं घरदार देशोधडीला लागलं... त्या वेळी मी आक्रोश करून सांगत होतो की मी खुनी नाही, मी खुनी नाही... पण माझा आवाज कायद्याच्या तटबंदीपर्यंत पोहोचला नाही...’’ न्यायालयासमोर पोटतिडकीने हा मुद्दा मांडता मांडताच कालिदास कोसळतो आणि मृत्युमुखी पडतो. त्याने केलेला बिनतोड सवाल त्याच्या मृत्यूने अनुत्तरितच राहतो.

बद्रिप्रसाद हे कर्तव्यनिष्ठ आणि निःस्पृह न्यायाधीश असतात. कैलाश (राजेंद्र कुमार) हा त्यांच्याच तालमीत तयार झालेला सरकारी वकील. बद्रिप्रसादची मुलगी मीना (नंदा) आणि कैलाश यांचं प्रेम जमलेलं असून, बद्रिप्रसाद यांची त्यांच्या विवाहास संमती असते. मीनाचा भाऊ विजय (मेहमूद) हा व्यसनात पैसे उधळणारा, विलासी वृत्तीचा तरुण असतो. धनीराम (ओम प्रकाश) या सावकाराकडून त्याने कर्जाऊ रकमा घेतलेल्या असतात. या बदल्यात सावकाराने कोऱ्या कागदावर त्याची सही घेतलेली असते. ‘‘माझी रक्कम तातडीने परत न मिळाल्यास मी तुझ्या वडिलांची सारी मालमत्ता माझ्या नावावर करून घेईन,’ अशी धमकी धनीराम त्याला देतो. मीनाकडून कैलाशला हा प्रकार समजतो तेव्हा गुरूसमान असलेले आपले भावी सासरे संकटात सापडू नयेत या उद्देशाने कैलाश रात्री गुपचूप धनीरामकडे जातो. त्याला कायद्याचा धाक दाखवत तो सहीचा कागद काढून घेतो. मात्र, याच वेळी तो बद्रिप्रसादना तिथं येताना पाहतो. त्यांना कळू नये या उद्देशाने कैलाश एका पडद्यामागे लपतो.

बद्रिप्रसाद आत येतात आणि काही कळायच्या आत धनीरामच्या पोटात सुरा खुपसून त्याचा खून करतात व आल्या पावली निघून जातात. कैलाश हे पाहून हादरतो नि तिथून परत जातो. रात्री घरात शिरलेला एक भुरटा चोर धनीरामचं प्रेत पाहून घाबरून खिडकीवाटे पळ काढतो आणि खालून जाणाऱ्या पोलिसांच्या तावडीत सापडतो. या चोराला धनीरामच्या खुनाच्या आरोपाखाली अटक होते आणि त्याच्यावरील खटल्याची सुनावणी न्यायाधीश बद्रिप्रसाद यांच्यासमोर सुरू होते. तो भुरटा चोर आपण निष्पाप असल्याचं गयावया करत सांगतो. कैलाशला हे माहीत असतं. सदसद्‍‍विवेकबुद्धी त्याला जागं करते तसा सरकारी वकीलपद सोडून तो त्या चोराचं वकीलपत्र स्वीकारतो. खटल्याचं कामकाज एका निर्णायक टप्प्यावर आलं असतानाच कैलाश न्या. बद्रिप्रसादवर खुनाचा थेट आरोप करतो. बद्रिप्रसाद या आरोपाने प्रक्षुब्ध होतात; पण कैलाश आपल्या विधानाशी ठाम असतो. बद्रिप्रसादना राजीनामा देऊन आरोपीच्या पिंजऱ्यात उभं राहावं लागतं. आपण निरपराध असल्याचा ते हरप्रकारे दावा करतात; पण कैलाश त्यांच्यावरचा आरोप सप्रमाण सिद्ध करतो.

आरोपी बद्रिप्रसाद न्यायालयाची अनुमती घेऊन साक्षीदाराच्या पिंजऱ्‍यात उभ्या असलेल्या कैलाशसमोर जाऊन त्याला म्हणतात, ‘माझ्याकडे बघत, माझ्या डोक्यावर हात ठेवून शपथेने सांग की, मी धनीरामचा खून करताना तू मला पाहिलं आहेस.’ कैलाश जड अंतःकरणाने पण निग्रहाने तशी कबुली देतो. निरुपाय झालेले बद्रिप्रसाद शांतपणे आपल्या जागेवर जात म्हणतात, ‘युवर ऑनर, मला आता स्वतःच्या बचावाखातर काहीही सांगायचं नाही.’ आपण काही केलेलं नसताना आपल्यावर खुनाच्या आरोपाचं बालंट यावं, त्याहून दुर्दैव म्हणजे ज्याला आपण स्वतःच्या मुलासारखं वाढवलं, एक कार्यक्षम वकील बनवलं, त्या भावी जावयाने हा घृणास्पद आरोप आपल्यावर करावा याचं वैषम्य त्यांच्या चेहऱ्यावर दिसत असतं. निराश मनाने ते मिळेल त्या शिक्षेला सामोरं जायला तयार होतात.

सुनावणी पूर्ण झाल्यानंतर न्यायाधीश ज्युरींकडे निर्णय सोपवतात. शिक्षेच्या सुनावणीचा दिवस उजाडतो. ज्युरींच्या निर्णयानुसार बद्रिप्रसाद दोषी ठरलेले असतात. आता शिक्षा सुनावण्याचा क्षण येतो आणि तेवढ्यात, न्यायालयात अचानक एक नाट्यपूर्ण घटना घडते. सरकारी वकील एक खास बाब न्यायालयासमोर मांडण्याची अनुमती मागतात. न्यायाधीश खरंतर नाखूष असतात. पण हा एकाच्या जीवन-मरणाचा प्रश्न असल्याचं सांगून सरकारी वकील ती परवानगी मिळवतात.

न्यायालयात एका स्ट्रेचरवर ठेवलेलं प्रेत आणलं जातं. मेलेल्या व्यक्तीने धनीरामचा खून आपणच केला असल्याचं एका चिठ्ठीत लिहून ठेवलेलं असतं. त्यानंतर पळून जाताना एका अपघातात तो जबर जखमी होतो. मृत्यूपूर्व जबाबात त्याने धनीरामच्या खुनाची कबुली दिलेली असते; पण कैलाश हे मान्य करत नाही. ‘खून करणारे बद्रिप्रसादच होते, हे मी माझ्या डोळ्यांनी पाहिलंय!’ तो निक्षून सांगतो.

‘मग आता त्याच डोळ्यांनी या प्रेताकडे पहा,’ असं म्हणत सरकारी वकील प्रेताच्या चेहऱ्‍यावरचं कापड बाजूला सारतात. ते पाहिल्यानंतर केवळ कैलाशच नव्हे, तर कोर्टात हजर असलेले सारेच हादरतात. कारण स्ट्रेचरवरच्या मृत माणसाचा चेहरा हुबेहूब बद्रिप्रसादसारखा असतो. मुळात हा मृत माणूस एक अट्टल गुन्हेगार असतो. धनीराम त्याला ब्लॅकमेल करत असल्याने तो त्याचा खून करतो. ही घटना कैलाशने पाहिलेली असल्याने बद्रिप्रसाद हेच खुनी असल्याचा त्याचा पक्का ग्रह होतो. पण, या नव्या कलाटणीमुळे सर्व गुंता मोकळा होतो. बद्रिप्रसादच नव्हे तर तो भुरटा चोरदेखील आरोपातून मुक्त होतो. शेवट अर्थातच गोड.

एकही गाणं नसताना संगीतकार सलील चौधरी यांच्या पार्श्वसंगीताने साधलेला परिणाम, बद्रिप्रसादच्या भूमिकेत अशोक कुमारने भरलेले अस्सल रंग, अख्तर उल इमान यांचे प्रभावी संवाद आणि दिग्दर्शक बी. आर. चोप्रा यांची सफाईदार हाताळणी या गुणांनी ‘कानून’ हा थरारक अनुभव ठरला. रहस्याचा गुंता मोकळा करणारा त्याचा शेवटही तेवढाच रोमांचक ठरला.

(सदराचे लेखक हिंदी-मराठी चित्रपटांचे अभ्यासक आणि सुगम संगीताचे जाणकार आहेत.)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com