जगण्याचं ‘सार’... जीवनाचा ‘अंश’!

सरकारी खात्याकडून आलेलं ते पत्र बघून बी. व्ही. प्रधान घाईघाईने विमानतळावरच्या कस्टम विभागात पोचतात. न्यूयॉर्कहून त्यांच्या नावाने आलेलं सामान त्यांना ताब्यात घ्यायचं असतं.
saaransh movie
saaransh moviesakal
Summary

सरकारी खात्याकडून आलेलं ते पत्र बघून बी. व्ही. प्रधान घाईघाईने विमानतळावरच्या कस्टम विभागात पोचतात. न्यूयॉर्कहून त्यांच्या नावाने आलेलं सामान त्यांना ताब्यात घ्यायचं असतं.

सरकारी खात्याकडून आलेलं ते पत्र बघून बी. व्ही. प्रधान घाईघाईने विमानतळावरच्या कस्टम विभागात पोचतात. न्यूयॉर्कहून त्यांच्या नावाने आलेलं सामान त्यांना ताब्यात घ्यायचं असतं. व्ही.सी.आर., कलर टी.व्ही., शिवाय एक खास पार्सल त्यात असतं. याच कामासाठी आलेल्यांची तिथं प्रचंड गर्दी आणि भलीमोठी रांग. एक एजंट थोड्या पैशांत वस्तू सोडवून आणायची तयारी दर्शवतो; पण तत्त्वनिष्ठ प्रधान सर त्याला नकार देत रांगेत उभे राहतात. तीन तासांनी त्यांचा नंबर लागतो आणि काउंटरवरचा माणूस ‘अमुक तमुक कागद कुठं जोडलाय? सगळी कागदपत्रं घेऊन या’ असं म्हणत त्यांना दूर व्हायला सांगतो. हताश झालेल्या प्रधान सरांच्या डोळ्यांत पाणी यायचंच बाकी राहतं. त्यांनी ज्याला टाळलं तो एजंट त्यांना बघून छद्मी हास्य करतो. उद्विग्न होत प्रधान सर तिथल्या वरिष्ठ अधिकाऱ्याच्या कक्षात घुसत त्याच्याकडे दाद मागतात. ‘कुणाला विचारून तुम्ही आत आलात?’ तो अधिकारी हटकतो. संताप, उद्वेग, हताशा, अगतिकता अशा सर्व भावना एकाच वेळी उचंबळून आलेल्या प्रधान सरांचा संयम आता सुटतो. पाणावलेल्या डोळ्यांनी ते ताडताड बोलू लागतात, ‘मी टी.व्ही. न्यायला आलो नाही, त्या वस्तू मला नकोत. न्यूयॉर्कमध्ये मरण पावलेल्या माझ्या मुलाच्या अस्थी न्यायला मी आलोय. मुलाच्या अस्थींवर बापाचा हक्क आहे की नाही? की त्यासाठीदेखील मला लाच द्यावी लागेल?’

प्रधान सरांचा पवित्रा बघून तो अधिकारी वरमतो. त्यांच्या हातातलं पत्र पाहून तो स्वतः त्यांचं पार्सल आणून हातात देतो, वर त्यांना झालेल्या त्रासाबद्दल क्षमा मागतो. दिलासा मिळालेले प्रधान सर बोलून जातात, ‘‘तुम्ही नव्हे, मीच माफी मागायला हवी. आमच्याच हातून चूक झाली असावी. चांगल्या पद्धतीने शिक्षण देण्यात कुठंतरी आम्ही कमी पडलो...’

महेश भट्ट दिग्दर्शित ‘सारांश’ (१९८४) या चित्रपटातला हा अंगावर काटा आणणारा प्रसंग. हाच नव्हे, असे अनेक प्रसंग या चित्रपटात आहेत, ज्यातले काही अंगावर येतात, तर काही हृदयाला स्पर्श करून जातात. बी. व्ही. प्रधान (अनुपम खेर) हे मुंबईतील एका नावाजलेल्या शाळेचे सेवानिवृत्त मुख्याध्यापक. सत्तरीकडे झुकलेले. वृत्तीने सज्जन, कडवे नास्तिक आणि तत्त्वाला जागणारे. एकेकाळी स्वातंत्र्यलढ्यात लाठ्या झेललेले; पण त्याचं भांडवल न करणारे. छोट्या छोट्या गोष्टींवरून चिडणारे अन् तेवढ्याच लवकर शांत होणारे. त्यांची पत्नी पार्वती (रोहिणी हट्टंगडी) हीदेखील तेवढीच सुशील, सोशिक आणि मायाळू; पण देवाधर्मावर श्रद्धा असलेली, उपासतापास करणारी. दादरसारख्या भागात त्यांचा मोठा प्रशस्त ब्लॉक आहे, पण घरात या दोघांखेरीज अन्य कोणी नाही. या जोडप्याला तसा उशिरा झालेला, एकुलता एक मुलगा अजय तीन वर्षांपूर्वी न्यूयॉर्कला उच्च शिक्षणासाठी गेलेला असतो. तिथं पंधरा ऑगस्टच्या कार्यक्रमाहून परत येत असताना अचानक काही लुटारूंच्या हल्ल्यात तो मृत्युमुखी पडतो. ही बातमी अजयच्या एका मित्रामार्फत फोनवरून प्रधानांना कळते. अजयचे मित्र तिकडेच त्याचा अंत्यविधी करतात आणि त्याच्या अस्थी भारतात पाठवून देतात. त्या भीषण मृत्यूला तीन महिने उलटले तरी प्रधान दाम्पत्य त्या धक्क्यातून अद्याप सावरलेलं नसतं. प्रधानांचा जिवाभावाचा मित्र विश्वनाथ (सुहास भालेकर) याचीच काय ती त्यांना सोबत. विश्वनाथसोबत प्रधानांची दररोजची प्रभातफेरी ठरलेली, तर पार्वतीने वेळ घालवण्यासाठी एका बालवाडीत काम स्वीकारलेलं.

अजयकडून पैसे येणं बंद झाल्याने खर्च भागवण्यासाठी घरात एक पेइंग गेस्ट ठेवण्याचा निर्णय ते घेतात. त्यानुसार सुजाता (सोनी राजदान) ही नवोदित अभिनेत्री त्यांच्याकडे राहायला येते. अजयची खोली तिला भाड्याने दिली जाते. तिचा प्रियकर विलास (मदन जैन) तिला भेटायला नियमितपणे येत असतो. तो लग्नाचा विषय टाळत असल्याने त्यांच्यात धुसफुस सुरू असते. न्यूयॉर्कहून आलेल्या अजयच्या अस्थी ताब्यात मिळाल्यानंतर पार्वतीच्या श्रद्धेखातर प्रधान सर मंदिरात जाऊन तिच्याच हस्ते धार्मिक विधी पार पाडतात. स्वतः मात्र मंदिराबाहेर बसून राहतात. फक्त अजयची मूठभर राख जवळच्या बागेत विखरून टाकतात. हा त्यांच्या श्रद्धेचा भाग. विधी संपल्यावर गुरुजी पार्वतीला दिलासा देतात, ‘तुमचा अजय लवकरच तुमच्या आसपास पुन्हा जन्म घेणार आहे.’ तिचा त्यावर विश्वास बसतो.

शहरातल्या दंगली, मारामारी यांनी प्रधान सर आधीच अस्वस्थ असतात. एका घटनेत खुद्द त्यांनाही एका टोळक्याकडून मारहाण होते. जखमी अवस्थेत कसेबसे ते घरी परत येतात. नैराश्यापोटी ते आत्महत्येचा प्रयत्न करतात. मात्र, पार्वती त्यांना रोखते. काही दिवसांनी पार्वतीदेखील नैराश्याचा बळी ठरते, तेव्हा दोघेही आत्महत्या करायच्या निर्णयाला येतात. त्याच रात्री ते हा बेत तडीस नेण्याचा निश्चय करतात. प्रधान सर आपली कर्मभूमी असलेल्या शाळेत जाऊन ती डोळे भरून पाहून घेतात. पार्वती देवाधर्माचं पार पाडते. रात्री दोघेही विषाची बाटली तोंडाला लावणार तेवढ्यात बाजूच्या खोलीत सुजाता आणि विलास यांच्यात जोरदार भांडण सुरू होतं. प्रकरण हातघाईवर आल्याने प्रधान दाम्पत्याला आत्महत्येचा विचार बाजूला ठेवावा लागतो. सुजाता विलासपासून गरोदर असते आणि तिने हे मूल पाडून टाकावं असा त्याचा आग्रह असतो. तिचा याला ठाम विरोध असतो. ‘माझ्याशी तातडीने लग्न कर, मी मूल जन्माला घालणारच,’ असा पवित्रा ती घेते.

प्रधान दाम्पत्याच्या लक्षात हा प्रकार येतो. पार्वतीला त्या गुरुजींचे शब्द आठवतात - ‘तुमचा अजय लवकरच तुमच्या आसपास पुन्हा जन्म घेणार आहे.’ पार्वती नवऱ्‍याला म्हणते, ‘‘कळलं का, आपला अजय परत येतोय. आपण त्याला पुन्हा मरू द्यायचं नाही. त्याला वाचवावं लागेल. त्याचा जन्म होईपर्यंत आपल्याला मरता येणार नाही.’

पार्वतीच्या या भाकड समजुतीवर खरंतर प्रधानांचा विश्वास नसतो. मात्र, तत्त्वासाठी म्हणून ते सुजाताच्या पाठीशी खंबीरपणे उभं राहायचं ठरवतात. तिला घेऊन ते विलासच्या वडिलांना भेटायला जातात. विलासचा पिता गजानन चित्रे (निळू फुले) हा गुंड प्रवृत्तीचा राजकारणी. विलास आणि सुजाता यांचं लग्न लावून द्यावं ही प्रधान सरांची मागणी चित्रे धुडकावून लावतो. हे मूल विलासचं नाहीच, असा पवित्रा घेऊन तो सुजातावरच घाणेरडे आरोप करत त्यांना धक्के मारून घरातून हाकलून देतो.

निराश झालेली सुजाता गर्भपात करायचं ठरवते; पण प्रधान पती-पत्नी तिला यापासून परावृत्त करतात. प्रधान सर चित्रेला फोन करून सुनावतात, ‘सुजाता तिच्या मुलाला कोणत्याही परिस्थितीत जन्म देईल, विलास तिच्यासोबत असो अथवा नसो.

तुमच्या वर्तनाद्वारे तुम्ही मला जगण्याचं कारण मिळवून दिलंत याबद्दल आभार.’ ‘स्वातंत्र्याच्या लढाईनंतर आज पुन्हा तीच भावना मनात जागी झालीय...’ प्रधान सर पार्वतीजवळ बोलून दाखवतात.समाधानाची बाजू एवढीच की, विलास पूर्णतः सुजाताच्या बाजूने असतो. दरम्यान, महापालिकेच्या निवडणुकांची रणधुमाळी सुरू होते. चित्रे उमेदवार असतो. सुजाता प्रकरण निवडणुकीत अडचणीचं ठरू शकेल हे ध्यानात आल्याने चित्रे यातून सुटका करून घ्यायच्या प्रयत्नाला लागतो.

सुजाताचा गर्भपात घडवून आणायचा त्याचा डाव असतो. पण, प्रधानांच्या दक्षतेमुळे तो उधळला जातो. चित्रे प्रधानांच्या घरी गुंडांना पाठवून धमक्या देतो, त्यांच्या घरातली वीज तोडतो, त्यांना दूध व अन्य वस्तू मिळणार नाहीत असं पाहतो. सर्व बाजूंनी त्यांची कोंडी केली जाते, तरीही प्रधान पती-पत्नी डगमगत नाहीत. चित्रे आता पोलिसांना हाताशी धरून वेगळा डाव खेळतो. सुजाताकरवी प्रधान आपल्या घरात वेश्याव्यवसाय चालवत असल्याचा गलिच्छ आरोप ठेवत पोलिस सुजाताला पकडून नेतात. महिलाश्रमात तिची रवानगी केली जाते. हताश झालेले प्रधान सर थेट मंत्रालयाचा दरवाजा ठोठावतात. मुख्यमंत्र्यांच्या दालनात घुसून आपली व्यथा मांडतात. मुख्यमंत्री शशिकांत (आकाश खुराणा) प्रधानांचे माजी विद्यार्थी असतात. ते तातडीने या प्रकरणात लक्ष घालून सुजाताची सुटका करण्याचा आदेश देतात.

प्रधान दाम्पत्याच्या लढ्याला यश येतं. आपल्या मुलास जन्म देण्याचा सुजाताचा मार्ग निर्वेध होतो. मात्र, याच टप्प्यावर प्रधान सर एक वेगळा निर्णय घेतात. सुजाता आणि विलास या दोघांना ते सांगतात, ‘पार्वतीला अजूनही वाटतं की अजय पुन्हा जन्म घेणार आहे. वस्तुतः तसं काही होणार नाही. तिचा हा भ्रम आणखी वाढत जाऊन वेगळं रूप धारण करण्याआधी तुम्ही हे घर सोडून दुसरीकडे जावं असं मला वाटतं. तुम्ही आज रात्रीच निघून गेलात तर अधिक चांगलं.’ विलास आणि सुजाता या दोघांना त्यांचं म्हणणं पटतं. ते त्याच रात्री पुण्याला जाण्याची तयारी करतात. पार्वतीला हे कळू नये, अशी प्रधानांची इच्छा असते; पण सुजाताला ते मान्य नसतं. तिच्या आग्रहामुळे प्रधान सर पार्वतीला याची कल्पना देतात. सुजाता निघून जाणार हे कळताच पार्वती रडून गोंधळ घालते; पण प्रधान तिला समजावतात, ‘‘त्या दोघांना त्यांचं आयुष्य जगू दे. तुझा अजय पुन्हा जन्म घेणार नाही. तो मरण पावल्याला तीन महिने उलटून गेले. हे मूल सुजाता आणि विलास यांचं आहे, हेच अंतिम सत्य आहे....’ सुजाता अन् विलास निघून जातात. पार्वती आक्रोश करत असते, ‘अजय, जाऊ नकोस...’

पहाटेच्या प्रहरी पार्वती पुन्हा एकदा विषाची बाटली आणून त्यांच्यासमोर धरते; पण आता प्रधान ती बाटली बाजूला सारतात. ‘त्या वेळी मी म्हटलं होतं, आत्महत्या करायला मोठं धाडस लागतं; पण माझं चुकलं, धाडस आत्महत्येसाठी नाही, तर जगण्यासाठी लागतं. जे मरण पावलेत त्यांच्यासाठी आपण मरून चालत नाही. आपल्याला जगावं लागेल. सुजाताचं मूल वाचवून आपण एक जीवन वाचवलं हे काय कमी आहे? चल, आजपासून तूही माझ्यासोबत फिरायला ये.’

अंधूक प्रकाशात दोघं फिरायला बाहेर पडतात. बागेतल्या वेलीवर ताजी फुलं उमललेली पाहून ते तिला म्हणतात, ‘बघ, अजयची राख किती छान रूप घेऊन आलीय! ही फुलं हातात घेऊ नको, नुसतं पहा त्यांच्याकडे. ही फुलं म्हणजे साक्षात जीवन! तुझा आणि माझा अंत ठरलेला आहे; पण जीवनाला अंत नाही, ते अंतहीन आहे...’ दोघेही त्या फुलांचा स्पर्श अनुभवत असताना चित्रपटाचा शेवट होतो.

लेखक-दिग्दर्शक महेश भट्ट आणि अभिनेता अनुपम खेर या दोघांची सर्वोत्कृष्ट कामगिरी म्हणून ‘सारांश’ चित्रपटाचा उल्लेख बिनधास्त करता येईल. (पटकथेत सुजित सेन आणि संवाद लेखनात अमित खन्ना यांची भट्ट यांना लाभलेली साथही मोलाची.) नवोदित अनुपम खेरऐवजी संजीव कुमारला मुख्य भूमिका द्यावी असा निर्मात्यांचा आग्रह होता; पण स्वतः संजीव यांनीच ही भूमिका नाकारल्याने अनुपमला त्याच्या या पहिल्याच भूमिकेचं सोनं करायची संधी मिळाली. (६५ वर्षांचा बी. व्ही. प्रधान रंगवताना अनुपमचं वय होतं केवळ २८.) रोहिणी हट्टंगडी यांनी पार्वतीच्या भूमिकेत दिलेली साथ केवळ अप्रतिम! अजित वर्मन या वेगळ्या पठडीच्या संगीतकाराने केलेली ‘अंधियारा घिर आया’ (भूपेंद्र) आणि ‘हर घडी ढल रही’ (अमित कुमार) ही दोन्ही गाणी चित्रपटाच्या गंभीर आशयाला साजेशी होती.

‘राजश्री’ या निर्मितीसंस्थेच्या ‘परंपरेला’ न शोभणारा हा चित्रपट बनवून या संस्थेने मोठंच धाडस केलं होतं. चित्रपटातील काही ‘बोल्ड’ सीन, शिवराळ भाषा आणि हिंसक दृश्यं ‘राजश्री’ या नावाशी मेळ खाणारी नव्हती. अर्थात, या गोष्टी असूनही आशयदृष्ट्या एक नितांतसुंदर चित्रपट म्हणून ‘सारांश’चं स्थान आहेच. जन्म आणि मृत्यू, जीवनाची इतिकर्तव्यता, समाजात विनाकारण होणारी हिंसा यांसारख्या गोष्टींवर हा चित्रपट सहज भाष्य करून जातो. गंभीर हाताळणीतूनही एक सकारात्मक संदेश देण्याचं काम ‘सारांश’ने केलं, हे मात्र निर्विवाद.

(सदराचे लेखक सुगम संगीताचे जाणकार असून, हिंदी-मराठी चित्रपटांचे अभ्यासक आहेत.)

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com