
आई-बाप, मुलगा-मुलगी, भाऊ-बहीण इत्यादी नात्यांना स्वार्थ नामक अवगुणाचा स्पर्श झाला, की नाती संपतात आणि उरतो केवळ ‘व्यवहार’ नामक पालापाचोळा.
आई-बाप, मुलगा-मुलगी, भाऊ-बहीण इत्यादी नात्यांना स्वार्थ नामक अवगुणाचा स्पर्श झाला, की नाती संपतात आणि उरतो केवळ ‘व्यवहार’ नामक पालापाचोळा. गरजेनुसार नातं जोडायचं आणि गरज संपली की लाथाडायचं, ही जगरहाटी असते. वि. वा. शिरवाडकरांचा ‘नटसम्राट’ म्हणतो त्याप्रमाणे, ‘आभाळ पाठीवर घेणाऱ्या हत्तींना विचारून पहा; ते सांगतील, कोणीही कोणाचं नसतं.’
गुरुदत्त निर्मित आणि दिग्दर्शित ‘कागज़ के फूल’ (१९५९) या भारतातल्या पहिल्या ‘सिनेमास्कोप’ चित्रपटाने हेच सार्वकालिक सत्य अतिशय विदारकपणे मांडलं होतं. कौटुंबिक जीवनातील ताणतणाव आणि आजूबाजूचं स्वार्थी जग यांच्या चक्रात सापडून एका प्रतिभावान दिग्दर्शकाच्या आयुष्याची झालेली होरपळ आणि एकाकी, कफल्लक अवस्थेत झालेला त्याचा करुण अंत या गोष्टी या शोकांतिकेत ज्या दाहकपणे समोर येतात, त्याला तोड नाही.
सुरेश सिन्हा हा यशस्वी आणि तेवढाच मनस्वी दिग्दर्शक. ‘अजंता पिक्चर्स’ या बड्या स्टुडिओची मदार गेली काही वर्षं त्याच्या हाती आहे. त्याने बनवलेल्या चित्रपटांच्या जोरावर कंपनीने नाव आणि पैसा मिळवला आहे. कंपनीत त्याच्या शब्दाला जशी किंमत आहे, तेवढीच त्याच्याविषयी प्रत्येकाच्या मनात आदराची भावना आहे. या यशाला लागलेलं एकमेव गालबोट म्हणजे त्याचं असफल वैवाहिक जीवन. गडगंज श्रीमंतीत वाढलेली त्याची पत्नी व तिचे ‘उच्चभ्रू’ आई-वडील यांना सुरेशच्या चित्रपट व्यवसायाविषयी काडीची आस्था नसते, उलट घृणाच असते. पत्नी त्याच्याशी भांडून कायमची दिल्लीला आई-वडिलांकडे राहायला गेलेली, तर या दोघांची मुलगी देहरादूनच्या बोर्डिंग स्कूलमध्ये. कौटुंबिक आघाडीवर अपयशी ठरलेल्या सुरेशने चित्रपट दिग्दर्शनात स्वतःला बुडवून घेतलेलं असतं.
अशा वातावरणात सुरेशच्या जीवनात शांती नावाची एक नवखी अभिनेत्री येते. खरंतर ती सुरेशचंच ‘फाइन्ड’ असते. सुरेश तिला घडवतो, तिच्यातील कलागुणांना पैलू पाडून एक समर्थ अभिनेत्री बनवतो. सुरेशचं दिग्दर्शन आणि शांतीचा अभिनय या आगळ्या रसायनातून बनलेले चित्रपट कमालीचे गाजतात. स्वाभाविकपणे त्या दोघांत एक नाजूक भावबंध निर्माण होतो. मात्र, दोघांविषयी फिल्मी मासिकांमधून छापून आलेल्या ‘गॉसिप’मुळे सुरेशच्या खासगी आयुष्यात वादळ येतं. या ताणापायी शांती अभिनयाला सोडचिठ्ठी देऊन निघून जाते. तिच्याविना बनविलेले लागोपाठ दोन चित्रपट तिकीटबारीवर अपयशी ठरतात. त्याचा ‘भिकार’ चित्रपट पाहून प्रेक्षक पडद्यावर चपला फेकतात, थिएटरमध्ये आलेल्या सुरेशला मारायला धावतात. कंपनी सुरेशला बाहेरचा रस्ता दाखवते. कुटुंब आणि व्यवसाय या दोन्ही आघाड्यांवर अपयश वाट्याला आलेला सुरेश दारूच्या पेल्यात मानसिक आधार शोधू पाहतो आणि व्यसनाधीन होऊन कफल्लक होतो. घरादाराचा लिलाव केला जातो. शांतीने स्वतः विणून दिलेल्या लोकरीच्या स्वेटरचीच त्याला आता सोबत असते. तिकडे कंपनीही अडचणीत आलेली असते. शांती आणि सुरेश या दोघांना पुन्हा एकत्र आणण्याचे प्रयत्न केले जातात. शांती परत यायला राजी होते; मात्र सुरेशचा ‘अहं’ दुखावला गेल्याने तो नकार देतो. पत्नी, मुलगी, एवढंच काय शांतीपासूनही दूर दूर जात एक प्रकारचं भणंग आयुष्य तो जगू लागतो.
‘दुर्दैवाचे दशावतार’ अनुभवलेल्या सुरेश सिन्हाची एवढ्यावर सुटका होणार नसते. धरणी दुभंगून आपल्याला पोटात सामावून घेईल तर बरं, असं वाटायला लावणारा आणखी एक प्रसंग त्याच्यावर गुदरतो. अन्नाला मोताद झालेला सुरेश एके दिवशी त्याच स्टुडिओमध्ये ‘एक्स्ट्रा’ कलाकार म्हणून काम मागायला जातो, जिथं कधीकाळी त्याने कर्तृत्वाच्या बळावर वैभवाचं शिखर गाठलं होतं. देवळासमोरच्या एका भिकाऱ्याची फुटकळ भूमिका करण्यासाठी निर्मात्याला ‘एक्स्ट्रा’ नट हवा असतो. जमलेल्या इच्छुकांमधून नेमकी सुरेशची निवड केली जाते. खोटी दाढी, मिशा आणि जटा लावलेला सुरेश त्याला मिळालेला दोन वाक्यांचा संवाद पाठ करून कॅमेऱ्यासमोर ‘शॉट’ द्यायला सज्ज होतो; पण जोगिणीच्या भूमिकेत त्याच्यासमोर आलेली दुसरी-तिसरी कुणी नव्हे, तर शांतीच असते. जिची कारकीर्द त्याने घडवली, जिला कीर्तिशिखरावर नेलं, त्याच शांतीसमोर एका य:कश्चित भूमिकेत तो उभा असतो. तिला पाहून तो संवाद विसरून जातो. ‘कोण हा नवशिक्या आणलाय?’ म्हणत त्या भूमिकेतून त्याला डच्चू दिला जातो. अंगावरची कंपनीची शाल खेचून घेताक्षणी त्याच्या अंगावरचा स्वेटर शांतीला दिसतो. तिनेच विणलेला; पण आता विरून जीर्ण झालेला. त्याला ओळखून ती हाक मारते, ‘सिन्हा साहब... सिन्हा साहब!’ पण सुरेश तिला टाळत तिच्यापासून दूर निघून जातो. पार्श्वभूमीवर शोकार्त गीत तरळत असतं, ‘उड उड जा प्यासे भंवरे... रस ना मिलेगा खारों में... कागज़ के फूल जहाँ खिलते हों, बैठ न उन गुलज़ारों में... नादान तमन्ना रेती में उम्मीद की कश्ती खेती है... एक हाथ से देती है दुनिया, सौ हाथों से ले लेती है... ये खेल है कब से जारी... बिछडे सभी बारी बारी...’
आणखी वर्षं सरतात. वृद्धावस्थेत स्टुडिओमध्ये हिंडणाऱ्या सुरेश सिन्हाला हा भूतकाळ आठवतो. आता त्याची जगण्याची इच्छा संपलीय. कुठं तरी डोकं टेकवून त्याला चिरविश्रांती घ्यायची आहे. शूटिंगच्या फ्लोअरवर कुणी दिसत नाही हे पाहून, तो ‘दिग्दर्शक’ अशी पाटी लावलेल्या रिकाम्या खुर्चीवर बसतो. जेवणाची सुटी संपवून शूटिंगसाठी आलेल्या लोकांना प्रश्न पडतो, ‘डायरेक्टरच्या खुर्चीवर हा भिकाऱ्यासारखा कोण माणूस बसलाय?’ लोक जवळ जाऊन पाहतात. खुर्चीवरचा इसम निश्चलपणे डोळे सताड उघडे ठेवून बसलेला. गर्दीतला एक जण ओळखतो, ‘सिन्हा साहब’ म्हणत त्याला जागं करू पाहतो. सुरेश मान टाकतो. हातातली काठी खाली पडते. तो केव्हाच जगातून निघून गेलेला असतो. शूटिंगच्या ठिकाणी नको तितकी गर्दी पाहून प्रॉडक्शन मॅनेजर सगळ्यांना हुसकावतो, ‘काय गर्दी केलीय इथं? आज हिरोईनची शेवटची तारीख आहे. संध्याकाळपर्यंत शूटिंग संपवावंच लागेल. हटवा याला इथून. कधी प्रेत बघितलं नाही काय? चला, हलवा त्याला. लाइट्स फुल्ल ऑन...!’ डोळे दिपवून टाकणाऱ्या प्रकाशझोताच्या पार्श्वभूमीवर पडद्यावर अक्षरं उमटतात – THE END.
हिंदी चित्रपटांमधल्या अजरामर कलाकृतींमध्ये गणना केली जाणाऱ्या ‘कागज़ के फूल’चा हा सुन्न करून सोडणारा शेवट. तिकीटबारीवर सपाटून मार खाल्लेल्या अन् त्या काळात समीक्षकांनीही दुर्लक्षिलेल्या ‘कागज़ के फूल’ची भविष्यात एक नितांतसुंदर कलात्मक चित्रपट अशी नोंद होईल; एवढंच काय, देश-विदेशांतल्या चित्रपट अभ्यासकांपुढे तंत्रशुद्ध व आशयप्रधान कलाकृतीचा मानदंड म्हणून तो ठेवला जाईल, असं कुणाला वाटलं असेल? पण तसं झालं खरं. याला नियतीचा काव्यगत न्याय म्हणावा काय? दिग्दर्शक गुरुदत्त यांच्या मते हा चित्रपट प्रेक्षकांच्या डोक्यावरून गेला, तर लेखक अबरार अल्वी यांच्या म्हणण्यानुसार, खाण्यापिण्याची कोणतीही ददात नसलेल्या नायकाचा बौद्धिक कोंडमारा ही भारतातल्या सरासरी सिनेप्रेक्षकांच्या आकलनापलीकडची गोष्ट होती, हे या अपयशामागील एक कारण होतं. असो, हा चित्रपट का पडला, याची चिकित्सा या ठिकाणी नको. ‘कागज के फूल’नंतर गुरुदत्त यांची निर्मिती असलेल्या एकाही चित्रपटाला ‘दिग्दर्शक’ म्हणून त्यांचं नाव लागू शकलं नाही, हे मात्र खरं.
(सदराचे लेखक हिंदी-मराठी चित्रपटांचे अभ्यासक व सुगम संगीताचे जाणकार आहेत.)
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.