कलेतिहासाचे लसीकरण!

प्रागैतिहासिक ते आधुनिक काळापर्यंत, म्हणजे साधारण दोन हजार वर्षांचा महाराष्ट्राच्या सांस्कृतिक कलाप्रवासाचा साक्षेपी आलेख...
कलेतिहासाचे लसीकरण!
Updated on

- सुनील महाडिक

प्रागैतिहासिक ते आधुनिक काळापर्यंत, म्हणजे साधारण दोन हजार वर्षांचा महाराष्ट्राच्या सांस्कृतिक कलाप्रवासाचा साक्षेपी आलेख... असंख्य प्रवासचित्रांचा निःपक्षपणे केलेला ऊहापोह आणि सोबतीला जवळजवळ अडीचशे दृकनमुने...

अठराव्या शतकाचा उत्तरार्ध ते एकविसाव्या शतकाचा पूर्वार्ध असा साधारण दोनशे वर्षांचा तीनशेहून अधिक कलाकारांच्या कलाकृतींचा कालखंड रेखाटणारे ‘संचित’ असलेलं आणि चित्रकारांचा, कलाकारांचा तसेच त्यांच्या कलेचा लेखाजोखा ‘एन्सायक्लोपीडिया : व्हिज्युअल आर्ट ऑफ महाराष्ट्र’ हा ग्रंथ कलाप्रेमींसाठी कलेतिहासाची लस ठरणार आहे.

Some people are so poor, all they have is money...

गावच्या घराला मोठ्ठं अंगण आणि दोन्ही बाजूंनी छप्पराला छेदत जाणारे, देशावरून आणलेल्या डौलदार खिल्लार बैलांच्या शिंगांसारखे बाकदार दोन नारळ. समोर गावाची गोड्या पाण्याची चिऱ्यात बांधलेली आखीव रेखीव गोलाकार विहीर... विहिरीला विस्तृत वर्तुळाकार सुंदर घाट आणि त्याला वळसा घालून आवाजाच्या दिशेने जाणारा, एखादा लहानगादेखील सहज धावत एका दमात पोहोचेल, एवढ्या अंतरावर असलेल्या, केवड्याची दाटी ओलांडल्यावर नजरेत भरून उरणाऱ्या समुद्रापर्यंतचा रस्ता...

अंगणाला जोडून मुख्य घराची, शनी शिंगणापूरची आठवण येईल अशी, दरवाजा नसलेली ओटी. डाव्या बाजूला बसता येईल अशी खिडकी, घरात जायला समोर दरवाजा, उजव्या बाजूच्या भिंतीत कोनाडा, त्याच्या दोन्ही बाजूला खुंट्या... आणि ओटीच्या वरच्या तिन्ही बाजूंना, भिंतींवर, लाकडी छपराला टेकलेली, चित्रांची आरास... उभ्या गावात, कुठल्याही घरात नसेल अशी ही चित्रसंपत्ती...

पणजोबांनी, एकोणिसाव्या शतकाच्या पूर्वार्धातील, जर्मनीत छापलेली, पौराणिक विषयांवर आधारलेली कॅलेंडर्स, त्यांचे पणजीबरोबरचे तैलरंगातील पोर्टेट, त्यांच्या पश्चात आजोबांनी करून घेतलेले पणजोबांचे अप्रतिम पोर्टेट... सर्व व्यवस्थित फ्रेम करून लावलेली ही ओटी मी मान वर करून तासन् तास बघत असे.

वयाच्या पाचव्या वर्षी मुंबईला येईपर्यंत आणि नंतर दरवर्षी सुट्टीमध्ये गावी गेल्यावर, पुन्हा पुन्हा या सुंदर ओटीला मनाच्या कुपीत साठवून घ्यायचे...!

हे सगळं ‘संचित’ बरोबर घेऊन, यथावकाश मी सर जे.जे. स्कूल ऑफ आर्ट्‌सची पायरी चढतो...

निमित्त... येणाऱ्या कित्येक पिढ्यांची मनं समृद्ध होतील अशी चित्रसंपदा, महाराष्ट्रातल्या आणि एकूणच पूर्ण देशाच्या कलेच्या विकासाला दिशादर्शक ठरलेल्या चित्रकारांचा, कलाकारांचा आणि त्यांच्या कलेचा लेखाजोखा मिरवत आलेले इंग्रजीतले जाडजूड पुस्तक..!

Encyclopaedia : Visual Art of Maharashtra

(एन्सायक्लोपीडिया : व्हिज्युअल आर्ट ऑफ महाराष्ट्र)

सुहास बहुळकर, दीपक घारे आणि त्यांच्या नावाजलेल्या असंख्य सहकाऱ्यांनी संपादित केलेले आणि दादिबा पंडोल यांच्या पंडोल आर्ट गॅलरीने प्रकाशित केलेले, अठराव्या शतकाचा उत्तरार्ध ते एकविसाव्या शतकाचा पूर्वार्ध... अशा साधारण दोनशे वर्षांच्या कालखंडातील, दखल घ्यायलाच हवी अशा तीनशेहून अधिक देश विदेशातून, राज्याच्या कानाकोपऱ्यातून येऊन इथे महाराष्ट्राला आपली कर्मभूमी मानलेल्या चित्रकार, शिल्पकार, उपयोजित कलाकार आणि कलेच्या विविध शाखांतील आविष्कारांनी कलेचे प्रांगण देदीप्यमान केलेल्या कलाकारांच्या विस्तृत नोंदी, सोबत खूप कष्टाने मिळवलेली, संकलित केलेली त्यांची अगणित चित्रसंपदा हे या कोशाचे अनन्यसाधारण महत्त्व...

या कोशाचे एक मूलभूत वैशिष्ट्यं म्हणजे या ग्रंथाचे प्रयोजन आणि महत्त्व सांगणारे एक स्वतंत्र पुस्तकच होऊ शकेल, अशी विस्तृत प्रस्तावना... प्रागैतिहासिक ते आधुनिक काळापर्यंत, म्हणजे साधारण दोन हजार वर्षांचा महाराष्ट्राच्या सांस्कृतिक कलाप्रवासाचा साक्षेपी आलेख. कातळशिल्पे, आदिमानवाची गुहाचित्रे, आदिवासी ग्रामीण कला ते अभिजात कला, अभिजात कलेतील विविध प्रवाह, वास्तववादी शैलीपासून सुरू झालेली चित्र-शिल्पकला, युरोपियन कलेचा तरुण चित्रकारांवर झालेला प्रभाव, प्रोग्रेसिव्ह ग्रुपची नवीनतम शोधण्याची धडपड... हा सगळा प्रवास अमूर्ततेकडे होत असतानाच वाढत्या औद्योगिकीकरणातून नव्याने उदयाला आलेली उपयोजित कला.., त्यातील जाहिरात कला, प्रकाशन कला, संकल्पन (डिझाईन), प्रदर्शन कला, दृक्-श्राव्य माध्यम कला आणि आधुनिक काळातील इंटरनेटचा सर्वदूर प्रसार आणि त्यातून एकूणच दृश्य कलेचे बदललेले संदर्भ...! या प्रवासचित्राचा निःपक्षपणे केलेला ऊहापोह आणि सोबतीला जवळजवळ अडीचशे दृकनमुने हे या सर्वव्यापक प्रस्तावनेचे नोंद घ्यायलाच हवे असे वैशिष्ट्यं...

कुठेही हात आखडता न घेतलेली तीनशेहून अधिक दुर्मिळ चित्रशिल्पांची १३२ पानांची रंगीत पुरवणी..! इथे ही चित्रशिल्प कलाकारांच्या जन्मतारखेनुसार मांडल्यामुळे समकालीन चित्रप्रवाह आणि त्या-त्या कलाकाराचा तारखेनुसार मांडलेला, अचंबित करणारा वैयक्तिक चित्रप्रवास एका दृष्टिक्षेपात आपल्यासमोर उलगडतो.

सर जे. जे. स्कूल ऑफ आर्ट, बॅाम्बे आर्ट सोसायटी, आर्ट सोसायटी ऑफ इंडिया, आर्टिस्ट सेंटर या चार महत्त्वाच्या कला संस्थांचे, कलेचे शिक्षण आणि कलेचे प्रसारण यातील योगदानाची सविस्तर नोंद या कोशात घेतली गेली आहे, हेही महत्त्वाचे.

दोनशे वर्षांचा कलेतिहास सांगताना थोडेसे मागे जाऊन या कोशाच्या निर्मिती प्रवासाबाबत सांगणेदेखील इथे उचित ठरावे..!

वरील नमूद केलेल्या इंग्रजी कोशाचा संकल्प करण्याआधी साधारण सात वर्षांपूर्वी, हिंदुस्थान प्रकाशन संस्थेने सुहास बहुळकर, दीपक घारे णि सहकाऱ्यांनी अथक प्रयत्नाने संकलित केलेला मराठीतला पहिला साडेसातशे पानांचा दृश्यकला चरित्रकोश मुंबईत प्रकाशित झाला. त्या वेळी दादिबा पंडोल व्यासपीठावरून म्हणाले, की असा ग्रंथ इंग्रजीतून येणे, ही काळाची गरज आहे आणि आपण त्याचा पूर्ण आर्थिक भार घेण्यास तयार आहोत. हे आवाहन प्रत्यक्षात उतरवणे म्हणजे सर्व काही नव्याने पुन्हा एकदा सुरू करण्यासारखे होते..!

हे आव्हान संपादक सुहास बहुळकर, दीपक घारे, सहसंपादक सुधीर पटवर्धन, दिलीप रानडे, सोबतीला शांता गोखले, रंजन जोशी आणि मौलिक मदतीला निवडलेल्या तज्ज्ञांच्या मधल्या भक्कम फळीने यशस्वीपणे पेलले आहे. मनापासून भरभरून दाद देण्यासारखे..! संग्राह्य करण्यासारखे..!

मराठी कोशाच्या पहिल्याच पृष्ठावरील ‘जेम्स कझिन्स’चे वाक्य इथे उद्‍धृत करतो.., ‘‘राष्ट्राचा खरा इतिहास हा लढायांच्या आणि राजघराण्यांच्या दस्तावेजांपेक्षा कलावंतांच्या कलाकृतीत अधिक आढळतो.’’

गावाच्या त्या चित्रांनी भरलेल्या ओटीने किती जणांच्या जाणिवा समृद्ध केल्या असतील, किती जणांना जगण्याचे नक्की भान दिले असेल, हे मला माहीत नाही...

विश्वकोशाच्या स्वरूपात आलेले हे मौल्यवान भारतीय कलासंचित कधी, कुणाला, येणारी किती वर्षे आणि किती जणांचे मन समृद्ध, सुसंकृत करेल... जगणे म्हणजे नक्की काय... याचे संभाव्य उत्तर किती णांना सापडायला मदत करेल, हे येणारा काळच जाणो; पण अशा पुस्तकाने आधी आपली आणि आपल्या कुटुंबाची ‘ओटी’ मात्र आपणच भरायला हवी..!

...माझ्याकडे जर ‘तीन’ पैसे असतील, तर त्यातील एक पैसा मी उद्यासाठी ठेवीन. दुसऱ्या पैशाने मी घरात अन्नधान्य आणीन आणि तिसऱ्या पैशाने मी घर फुलांनी भरीन. अन्नधान्य मला जगवेल; पण फुलं मला सांगतील की मी कशासाठी जगावे..!

(जपानमधील जीवनमूल्य सांगणारी एक विचारधारा.. पैसा हेच सर्वस्व आणि तो जास्तीत जास्त मिळवणे.. मग तो कुठल्याही मार्गाने का असेना, हेच जीवनाचे आद्यकर्तव्य मानण्याच्या प्रवृत्तीच्या युगात जीवनातील सौंदर्याचे, निसर्गाचे, कलेचे महत्त्व आपल्या सर्वांनाच या कोशाच्या निमित्ताने उमजावे यासाठी हा अल्प प्रयत्न...)

ssmahadik60@gmail.com

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com