esakal | नागरीकरणाच्या प्रक्रियेचा नेटका वेध (सुनील माळी)
sakal

बोलून बातमी शोधा

book review

नागरीकरणाच्या प्रक्रियेचा नेटका वेध (सुनील माळी)

sakal_logo
By
सुनील माळी

झपाट्यानं वाढणाऱ्या नागरीकरणानं निर्माण होणाऱ्या समस्यांना यशस्वीरित्या तोंड देण्यासाठी नगरनियोजनाची शास्त्रशुद्ध अंमलबजावणी करण्याचे प्रयत्न जगभर होत आहेत. या अंमलबजावणीबाबतचा जागतिक पातळीवरील धावता आढावा घेत त्याचे पडसाद आपल्या देशात कसे उमटले जाणं आवश्‍यक आहे, याचं चांगलं विवेचन अभियंता अनिरुद्ध पावसकर यांनी आपल्या पुस्तकात केलं आहे. नागरीकरणाच्या प्रक्रियेच्या विविध पैलूंचा त्यांनी घेतलेला वेध रंजक आणि संग्राह्य असल्याचं नमूद करावं लागेल.

"एकविसाव्या शतकातील नगरनियोजन' हे पावसकर यांचं पुस्तक म्हणजे त्यांनी वेळोवेळी बहुतांशानं "सकाळ'मध्ये लिहिलेल्या लेखांचं संकलन आहे. त्यातले अनेक लेख प्रासंगिक विषयांवरचे असले, तरी त्यांचं सुयोग्य वर्गीकरण लेखकानं केल्यानं पुस्तकाला सूत्रबद्धता आली आहे.

या लेखांचं एकूण चार भागांत वर्गीकरण करण्यात आलं आहे. त्यातल्या "नगरनियोजनाचे उत्कृष्ट नमुने' या भागात नवी दिल्ली, चंडीगड, अमरावती, नया रायपूर या भारतीय शहरांबरोबरच पॅरिस, पुत्रजया आणि सिंगापूर यांच्या नियोजनाची कथा पावसकर यांनी सादर केली आहे. ल्युटिन्स आणि बेकर या नियोजनकर्त्यांनी आखलेल्या नवी दिल्लीमध्ये विशाल रस्ते-पदपथ, हरितीकरणाबरोबरच विस्तीर्ण मोकळ्या जागा आदी वैशिष्ट्यं चांगली असली तरी निवासी-व्यापारी आदी विविध क्षेत्रांचा एकाच भागातला मिश्र वापर वर्ज्य केल्यानं व्यापारी विभागात संध्याकाळनंतर शुकशुकाट होतो. त्यामुळं असुरक्षिततेची भावना वाढते. दिल्लीतल्या वाढत्या गुन्हेगारीला आणि निर्भयावरच्या बलात्कारासारख्या घटनेला सदोष नगरनियोजन कारणीभूत असल्याची लेखकानं केलेली मीमांसा विचार करण्यायोग्य वाटते. ली कारबुझियर यांनी चितारलेलं आखीव-रेखीव चंडीगड, मृतप्राय पॅरिसचा जॉर्ज हाऊसमननं केलेला कायापालट, आकर्षक इमारती-फुलवलेला निसर्ग आणि आधुनिक तंत्रज्ञान यांचा सुरेख मेळ असलेलं मलेशियातलं पुत्रजया, दर्जेदार जीवनमान देणारं सिंगापूर यांचं पुस्तकातलं वर्णन रोचक आहे. नगररचनाशास्त्रातल्या अनेक संकल्पना किचकट असल्यानं त्या सर्वसामान्यांना समजत नाहीत; मात्र नागरिकांवर थेट परिणाम करणाऱ्या असल्यानं त्या समजून घेणं आवश्‍यक ठरतं. पावसकर यांनी अत्यंत सोप्या भाषेत नगररचना योजना (टाऊन प्लॅनिंग स्किम), नेबरहूड संकल्पना, ट्रान्सपोर्ट ओरिएंटेड डेव्हलपमेंट (टीओडी), ग्रीन बिल्डिंग, ऍमिनिटी स्पेस, विकास नियंत्रण नियमावली, स्मार्ट सिटी, गार्डन सिटीज, परवडणारं घर आदींचं विवेचन केलं आहे. माहितीच्या पातळीवर तो मजकूर संग्राह्य ठरेल.

पुस्तकातल्या "भारतीय नगरनियोजनकारांचं प्रभावी योगदान' या भागामध्ये नवी मुंबई वसवणारे चार्ल्स कोरिआ, चंडीगडमध्ये रॉक गार्डन वसवणारे नेकचंद सैनी यांचा परिचय आणि कार्य देण्यात आलं आहे; मात्र बाळ दोशी, अच्युत कानविंदे, शिरीष पटेल आणि ख्रिस्तोफर बेनिंजर आदींची छायाचित्रं पुस्तकात समाविष्ट करण्यात आली असली, तरी त्यांचा परिचय का करून देण्यात आला नाही, असा प्रश्‍न पडतो.
जगातील स्थापत्यकलेचे उत्कृष्ट नमुने म्हणून ओळखण्यात येणाऱ्या काही वास्तूंची माहिती "अचाट निर्मितीची यशोगाथा' या अखेरच्या भागात आहे. दुबईमधलं पाम आयलॅंड्‌स, स्वीडन आणि डेन्मार्क जोडणारा ओरेसुंड पूल, अबुधाबीमधली शेख झायेद मशीद, लंडनचा प्रसिद्ध ऑक्‍सफर्ड चौक, अतिरेक्‍यांनी विमानं घुसवलेल्या अमेरिकेतल्या वर्ल्ड ट्रेड सेंटरच्या जुळ्या इमारतींची पुनर्उभारणी, प्रत्येक मजला फिरता असणाऱ्या डायनॅमिक टॉवरची उभारणी आदींची रंजक माहिती लेखकानं दिली आहे.

शहरे आडवी वाढवण्याच्या पारंपरिक पद्धतीऐवजी चटई क्षेत्र निर्देशांकाचं बंधन सैल करून ती उभी वाढवण्याची आणि त्यायोगे अधिक घनतेची छोट्या आकाराची शहरं वसवण्याची संकल्पना प्रगत देशांत रुजू पाहते आहे. अर्थात त्यामुळं येणारे प्रदूषण-वाहतूक कोंडीसारखे प्रश्‍न सोडविण्याकरता मजबूत पायाभूत सुविधा, जाणीवपूर्वक राखलेले हिरवे पट्टे; तसंच सायकलीसारख्या मोटारविहीन वाहतुकीची व्यवस्था आवश्‍यक ठरते. प्रागतिक शहरांनी अंगिकारलेलं हे सूत्र या पुस्तकाद्वारे ठसवण्यात लेखक यशस्वी झाले आहेत.

असं असलं, तरी या पुस्तकातल्या काही त्रुटींचीही नोंद करावी लागेल. प्रासंगिक लेख म्हणून यातले बरेच लेख उत्तम माहिती देणारे आहेत; परंतु माहितीबरोबरच तिच्या योग्यायोग्यतेबाबतचं विश्‍लेषणही गरजेचं होतं. नवी दिल्लीवरच्या लेखाचा अपवाद वगळता ते पुस्तकात फारसं आढळत नाही. उदाहरणार्थ, स्मार्ट सिटी, बुलेट ट्रेन यांबाबतच्या वादाच्या दोन्ही बाजूंचा परामर्श आवश्‍यक होता. तसंच लेखांना पुस्तकाचं स्वरूप देताना आवश्‍यक असणाऱ्या संपादनाकडंही लक्ष द्यायला हवं होतं. वृत्तपत्रांमधल्या लेखांमध्ये "नुकत्याच झालेल्या निर्णयानं' अशी शब्दरचना योग्य ठरते; मात्र त्या लेखाला पुस्तकात समाविष्ट करताना "डिसेंबर 2017 मध्ये झालेल्या निर्णयानुसार' अशा पद्धतीचा काल-उल्लेख आवश्‍यक असतो. तसंच एखाद्या अपूर्ण किंवा काम सुरू असलेल्या प्रकल्पाच्या पूर्ततेची मुदत संपल्यानंतरही "त्याचं काम सुरू आहे' असा मजकूर वाचावा लागतो. तिथं संपादनाचं कौशल्य वापरण्याची गरज होती. पुस्तकातले बहुतांश लेख पुण्यातल्या वाचकांना डोळ्यांसमोर ठेवून लिहिले गेल्यानं पुण्यातील स्थितीचा उल्लेख क्रमप्राप्त होता; मात्र पुस्तकात राज्यातल्या काही शहरांमधल्या स्थितींचीही माहिती दिली असती, तर राज्य पातळीवरील नागरीकरणाच्या प्रक्रियेशी ते जोडलं गेलं असतं आणि राज्य पातळीवरील वाचकवर्गासाठीही ते उद्‌बोधक ठरलं असतं.

अशा काही त्रुटी असल्या, तरी या पुस्तकामुळे मराठी वाचकांना एकविसाव्या शतकातल्या नगरनियोजनाची वाटचाल कशी असावी, याबाबत दिशादिग्दर्शन निश्‍चितच होईल. नगरनियोजनाच्या मूलभूत संकल्पना त्यामुळे स्पष्ट होतील. मराठीत नगरनियोजन, नगररचना या विषयावरच्या पुस्तकांची ठळकपणे जाणवणारी उणीव भरून निघण्यास या पुस्तकामुळं सुरवात होईल, एवढं समाधान मात्र हे पुस्तक नक्कीच देतं.

पुस्तकाचं नाव : एकविसाव्या शतकातील नगरनियोजन
लेखक : अनिरुद्ध पावसकर
प्रकाशक : उत्कर्ष प्रकाशन, पुणे (9689931324)
पृष्ठं : 168 / मूल्य : 250 रुपये

loading image
go to top