सुपरस्टार राजेश खन्ना...

अमिताभ, शाहरूख खान यांनीही लोकप्रियतेचा कळस गाठला. पण तरीही १९६९ ते १९७३-७४ पर्यंत राजेश खन्नाची लोकप्रियता ‘न भूतो न भविष्यती’अशी होती
RAJESH KHANNA
RAJESH KHANNASakal

- द्वारकानाथ संझगिरी

अमिताभ, शाहरूख खान यांनीही लोकप्रियतेचा कळस गाठला. पण तरीही १९६९ ते १९७३-७४ पर्यंत राजेश खन्नाची लोकप्रियता ‘न भूतो न भविष्यती’अशी होती. त्याचं मोजमाप नाही. कुणीतरी म्हटलंय, ‘‘ उपर आका (परमेश्वर), नीचे काका,’’ हे अगदी खरं होतं. देवेंद्रालाही (देवांच्या राजाला उद्देशून बोलतोय) त्याचा हेवा वाटला असता. दिलीप चित्रे या जान्यामान्या इंग्लिश आणि मराठी साहित्यिकाला राजेश खन्नावर निबंध लिहावासा वाटला. ते वर्ष होतं १९७१.

राजेश खन्ना हा हिंदी सिनेमाच्या पडद्यावरचा एक चमत्कार होता. खरंतर त्याचं आयुष्य हे एखाद्या हिंदी चित्रपटाच्या पटकथेसारखंच होतं. परमेश्वराच्या दरबारात कुणीतरी ‘मनमोहन देसाई, सलीम-जावेद’ वगैरे असले पाहिजेत.

मनमोहन देसाईंच्या सिनेमात मुलं जन्मतः हरवायची किंवा जन्माला यायची एका ठिकाणी आणि वाढायची दुसरीकडं. राजेश हरवला नाही पण वाढला दुसरीकडं. त्याचं नाव जतिन. छान सुखवस्तू कुटुंब. भाऊ, बहीण असलेल्या घरात जन्माला आला. पण लहानपणी तो काकांना दत्तक गेला. त्या गोकुळात तो यशोदेकडं वाढला. पण पुढे क्वचित प्रसंगी यशोदेचा उल्लेख केला. किंबहुना तो बालपणाबद्दल फारसं कधी बोलला नाही.

पहिले चार चित्रपट आपटले. पण ‘आराधना’नं त्याच्या हातावरची भाग्यरेषा इतकी मोठी केली, की तिला एक हात पुरला नसावा. ती दोन हातांवर उमटली असेल. पुढले पंधरा चित्रपट सुपर हिट झाले. हिंदी सिनेमात प्रथमच कुणाला तरी ‘सुपरस्टार’ म्हटलं गेलं. त्याच्या त्या छोट्या धडपडीच्या काळात गर्दीतल्या कुणीतरी बारीक डोळ्याचा नेपाळी दिसतो अशी काॅमेंट केली होती. पण आराधनानंतर त्याच राजेशनं डोळे मिचकावले, की भारतातल्या तरुण मुली आपलं हृदय त्याला देऊन टाकत.

आशा पारेखच्या आईनं तिला आधी विचारलं होतं, ‘‘ तोंडावर मुरुमाचे खड्डे असलेल्या मुलाबरोबर काम का करतेस?’’ तोच मुलगा यशस्वी झाल्यावर देशातल्या कैक ‘आशा पारेख’नी त्याच्या चेहऱ्याची दृष्ट काढली. त्याच्या एका स्मितामध्ये करोडो लोकांना आपलं दुःख विसरायची ताकद होती. मग यश त्याच्या डोक्यात गेलं.

अहंकार वाढला. त्याचे चित्रपट कोसळायला लागले. गर्दी कमी झाली. घरी येणारे फुलांचे ताटवे सुकले. जवळची माणसं दुरावली. आकाशातून जमिनीवर येईपर्यंत बरंच आयुष्य निघून गेलं. पण शेवट मात्र असा झाला, की एकेकाळचा गर्दीतला हा माणूस दहा लाखांच्या गर्दीतून परलोकी गेला.

तसं पाहायला गेलं तर हिंदी चित्रपटांतील अनेक नट-नट्या कमालीचे लोकप्रिय होते. दिलीपकुमार एकेकाळी एवढा लोकप्रिय होता, की त्या काळात एकदा पंतप्रधान पंडित नेहरूंनी त्याच्या खांद्यावर हात ठेवून त्याला म्हटलं होतं, ‘‘ सुना है कि तुम मुझसे भी ज्यादा पॉप्युलर हो.’’ राज कपूर, देव आनंदचीही लोकप्रियता उदंड होती.

त्यानं लिहिलं होतं,‘‘आज कुणाचं वलय किंवा करिष्मा पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्यापेक्षा जास्त असेल, तर ते आहे राजेश खन्नाच. लाखो रसिक थिएटरबाहेर मोठमोठ्या रांगा लावतात ते त्याचं गोड हास्य पाहण्यासाठी, नशेत बुडलेला किंवा कुणावर तरी चिडलेला पाहण्यासाठी किंवा नायिकेच्या कानात गुदगुल्या होतील, असं कुजबुजताना पाहण्यासाठी आणि अर्थात त्याची पार्श्वगायकानं गायलेल्या गाण्यावरची अदाकारी पाहण्यासाठी.

’’ हा निबंध पुढं मुंबई विद्यापीठाच्या अभ्यासक्रमात समाविष्ट केला गेला. राजेश खन्नाला एकदा लकी ड्रॉ काढायला बोलावलं होतं. जावेद अख्तर एका सिनेमाच्या पटकथेवर चर्चा करण्यासाठी त्याच्याबरोबर गेला होता. तो सांगतो, ‘‘आम्ही त्या समारंभाला पोहोचलो, तेव्हा तिथे पन्नास हजार लोकं होती. राजेश खन्नाला पाहिल्यावर त्या पन्नास हजार लोकांनी एकाच वेळी काढलेला चित्कार ऐकू आला. तो जणू ‘ज्युलियस सीझर’ होता. ते सगळं अविश्वसनीय होतं.’’

त्या प्रसंगाबद्दल राजेश खन्नाने म्हटलं, ‘‘ I felt I was next to God.’’ ती समोरची माणसं पाहून मला रोमन काळातलं, स्डेडियम आठवलं. मी लहान मुलासारखा रडलो.’’ १९६९ ते १९७२ मध्ये एकच घोडा रेसमध्ये होता तो म्हणजे राजेश खन्नाचा.

राजेश खन्नाच्या लोकप्रियतेच्या कहाण्या या न संपणाऱ्या कहाण्या आहेत. राजेश खन्नाचा पीए प्रशांतकुमार सांगतो, ‘‘ त्याला रोज हजारो पत्र यायची. त्यातली दोन तृतीयांश तरी रक्ताने लिहिलेली असत. त्यांना उत्तर म्हणून राजेश खन्नाची स्वाक्षरी असलेला फोटो पाठवला जाई.’’

एकदा ‘दाग’ सिनेमाच्या शूटिंगच्या वेळी त्याची मोठी पांढऱ्या रंगाची गाडी पूर्ण गुलाबी झाली होती. शूटिंग पाहायला आलेल्या मुलींनी पांढऱ्या गाडीचा रंग लिपस्टिकने गुलाबी केला होता. इतकी गाडीची चुंबनं घेतली गेली, तिथल्या इतर गाड्या राजेश खन्नाच्या गाडीचा हेवा करायला लागल्या असतील.

एकदा नवीन निश्चल ‘ताज’मध्ये एका लग्नाच्या रिसेप्शनला गेला होता. तो आत शिरत होता आणि राजेश खन्ना बाहेर पडत होता. त्याच्या मागे अख्खा हाॅल होता. तो, ते दृश्य पाहून हबकला. आत गेला तेव्हा त्याच्या लक्षात आलं नवरा-नवरी आणि मूठभर माणसं आहेत. अशी लोकप्रियता मी कधी पाहिली नाही.

ही लोकप्रियता पीआर एजन्सीने तयार केली नव्हती. आजची लोकप्रियता ही नेत्यांपासून नटांपर्यंत सोशल मीडिया आणि इतर माध्यमातून तयार केली जाते. त्यात आर्टिफिशियल काही नव्हतं.

राजेश खन्नाची लोकप्रियता हा न संपणारा विषय आहे. एकदा तर कहर झाला. सार्वजनिक गणपतीच्या वेळी मुंबईत वेगवेगळे देखावे केले जातात. ते लोकप्रिय व्यक्ती आणि त्या त्या वेळच्या लोकप्रिय घटनांवर आधारित असतात.

७० च्या सुरुवातीच्या काळात एकदा एका सार्वजनिक गणपतीला राजेश खन्नाच्या गुरुशर्टात दाखवला गेला होता. आपल्या बाप्पाचं नशीब थोर, की त्याच्या नाकावर गाॅगल ठेवलेली मूर्ती बनवली गेली नाही. राजेश खन्नाची लोकप्रियता वादातीत होती पण त्याच्या अभूतपूर्व यशात एका माणसाचा वाटा नक्की मोठा आहे तो म्हणजे किशोरकुमारचा. ‘आराधना’नंतर राजेश खन्ना आणि किशोरकुमार यशाच्या पायऱ्या चढत नाही तर लिफ्टने वर गेले.

‘मेरे सपनो की रानी कब आयेगी तू ’ हे गाणं त्या लिफ्टचं पहिलं बटण होतं. मुळात बर्मनदांनी किशोरकुमारचा आवाज राजेशसाठी वापरला. याबद्दल अनेक प्रवाद आहेत. आराधनाच्या संगीताचं क्रेडिट काही आर.डी फॅन्स, आर.डी ला देतात.

पण त्या वेळी तिथं असलेले केरसी लाॅर्ड, मनोहारीसिंग स्पष्टपणे सांगतात, की आराधनाची गाणी पूर्णपणे बर्मनदांचीच होती. बऱ्याचदा रेकॉर्डिंगच्या वेळी आर. डी नसायचाच. बरेचदा यशाचे तीर्थरूप नेहमीच अनेक असतात.

जेव्हा किशोरकुमारला गाण्यासाठी पाचारण करण्यात आलं, तेव्हा त्याने विचारलं, ‘‘ हीरो कोण आहे?’’ त्याच्यासाठी राजेश खन्ना नवा होता. त्याने राजेश खन्नाला घरी बोलावलं आणि त्याच्याशी गप्पा मारल्या. ‘‘ तू फिल्म इंडस्ट्रीत का आलास? तुझं ध्येय काय ? वगैरे...’’

राजेश खन्नाने त्याला चांगली उत्तरं दिली. राजेश खन्ना म्हणाला, ‘‘ लहानपणापासून मी नट होण्याचं स्वप्न पाहत होतो. मला लोकांची सेवा करायची आहे.’’ किशोरकुमार त्याला म्हणाला, ‘‘ तू ॲक्टिंग करून लोकांची काय सेवा करणार ? ’’ राजेश म्हणाला, ‘‘ कष्ट करणाऱ्या, दुःखाचा सामना करणाऱ्या गरीब जनतेसाठी दुसरं मनोरंजनाचं साधन कुठे आहे? त्यांना क्षण दोन क्षण मला आनंद देता येईल.’’

राजेश बोलत असताना किशोरकुमार त्याला न्याहाळत होता. त्याची बोलण्याची ढब, स्टाईल वगैरे..., असं राजेशचं म्हणणं होतं. मग किशोरकुमारनं ‘ मेरे सपनो की रानी’ गाणं रेकाॅर्ड केलं. हे गाणं ऐकल्यावर राजेश म्हणाला, की ते गाणं मीच गातोय असं मला वाटलं इतकं ते माझ्यात मिसळून गेलंय.

या गाण्याचा किस्सा सांगतो. हे गाणं पडद्यावर राजेश गातो आणि सुजितकुमार माउथ ऑर्गन वाजवतो. पहिल्या कडव्यात माउथ ऑर्गनचा पिस आहे पण दुसऱ्या कडव्यात माउथ ऑर्गनऐवजी गिटारचा पिस आहे आणि तरी तो माउथ ऑर्गन वाजवताना दाखवलाय. जेव्हा बर्मनदांनी हे गाणं पाहिलं, तेव्हा ते वैतागले.

शक्ती सामंतानी त्यांना सांगितलं, गाणं हिट होईल आणि लोकांच्या हे लक्षात पण येणार नाही आणि तसंच झालं. या गाण्यानंतर किशोरकुमारबरोबर राजेशची जोडी जमली, मैत्री झाली. जेव्हा राजेश खन्नाने स्वतःचा ‘अलग अलग’ सिनेमा काढला, तेव्हा पैशावर विलक्षण प्रेम असणाऱ्या किशोरकुमारने राजेशकडून फक्त एक रुपया घेतला आणि गाणी म्हटली.

किशोर मुलखाचा हट्टी आणि लहरी. पण तो राजेशचं ऐकायचा. एकदा एक गाणं गायला त्याने नकार दिला आणि त्याने लक्ष्मीकांत प्यारेलालना सांगितलं,‘‘हे गाणं कव्वाली स्टाईल आहे. रफीकडून ते गाऊन घ्या. रफी त्याला चांगला न्याय देईल.’’ ते गाणं होतं, ''वादा तेरा वादा''.

राजेशला हे कळल्यावर तो किशोरकडे गेला आणि म्हणाला ‘‘आप गाना नही गायेंगे?’’ त्यानं खूप आग्रह केल्यावर किशोर तयार झाला. आपल्या कम्फर्ट झोनच्या बाहेर जाऊन राजेशसाठी तो हे गाणं गायला आणि ते तुफान गाजलं. एकाच ‘आराधना’ सिनेमात राजेशचा जन्म झाला आणि किशोरचा पुनर्जन्म. दोघेही जानी दोस्त झाले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com