तयारी ‘गगन’भरारीची

‘चांद्रयान ३’ आणि ‘आदित्य’ या मोहिमांच्या यशानंतर भारतीय अवकाश संशोधन संस्थेनं (इस्रो) गगनयान मोहिमेवर लक्ष केंद्रित केलं आहे.
isro
isrosakal

‘चांद्रयान ३’ आणि ‘आदित्य’ या मोहिमांच्या यशानंतर भारतीय अवकाश संशोधन संस्थेनं (इस्रो) गगनयान मोहिमेवर लक्ष केंद्रित केलं आहे. या मोहिमेद्वारे २०२५ मध्ये मानव अवकाशात पाठवण्याचं उद्दिष्ट आहे. भारताचं स्वतंत्र अवकाशस्थानक २०३५ पर्यंत, तर २०४० मध्ये भारतीयाला चंद्रावर घेऊन जाण्याचं उद्दिष्टही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जाहीर केलं आहे.

भारताचे पहिले अंतराळवीर होण्याचा मान राकेश शर्मा यांच्याकडे जातो. रशियाच्या ‘सोयूझ टी-११’ यानाद्वारे ते अंतराळात गेले होते. रशियाच्या ‘सॅलयूट-७’ अवकाशस्थानकात ते सात दिवस २१ तास आणि ४० मिनिटे होते. एकूण ४३ विविध प्रयोगांत त्यांनी भाग घेतला.

तब्बल ४० वर्षांनी भारत गगनयान मोहिमेद्वारे स्वबळावर व स्वदेशी तंत्रज्ञानाच्या आधारे मानव अंतराळात पाठवणार आहे. रशिया, अमेरिका आणि चीन या तीनच देशांनी आतापर्यंत ही किमया साधली आहे. भारताची मोहीम यशस्वी झाली, तर स्वतःच्या प्रक्षेपक व यानाद्वारे मानवाला अंतराळात पाठवणारा भारत चौथा देश ठरेल.

पहिली चाचणी

गगनयानाचे प्रमुख दोन भाग आहेत. क्रू एस्केप सिस्टिम (सीईएस) आणि क्रू मोड्यूल व सर्व्हिस मोड्यूल यांचं एकत्रितपणे ऑर्बिटर मोड्यूल. यातील क्रू मोड्यूलची म्हणजेच गगनयान मोहिमेत मानवाला घेऊन जाणाऱ्या कुपीची पहिली यशस्वी चाचणी (टीव्ही-डी १) नुकतीच (२१ ऑक्टोबर २०२३ रोजी) घेण्यात आली.

अंतराळ प्रवासात काही अडचण आली, तर मोहीम अर्ध्यावर सोडून सुरक्षितपणे पृथ्वीवर परतता येईल का (एस्केप सिस्टिम) हे या चाचणीतून पाहण्यात आलं. या मानवरहित चाचणीत १७ किलोमीटर उंचीवर यान गेल्यानंतर तांत्रिक अडचण निर्माण करण्यात आली व कुपीच्या अग्निबाणापासूनच्या सुरक्षित विलगीकरणाची चाचणी घेण्यात आली. या चाचणीच्या वेळी काही अडचणी आल्या. पहिली अडचण प्रतिकूल हवामानाची, दुसरी अग्निबाणाचं प्रज्वलन ठरल्याप्रमाणे न झाल्याची.

दुसऱ्यावेळी इंजिन योग्य पद्धतीनं सुरू झालं नाही; पण तो दोष लगेचच दूर करण्यात आला व ठरलेल्या दिवशीच चाचणी यशस्वीपणे घेण्यात आली. प्रक्षेपकाद्वारे कुपी अवकाशात सोडण्यात आल्यानंतर ठरलेल्या वेळी कुपीचं विलगीकरण करण्यात आलं. नंतर ती कुपी पॅराशूटच्या साह्याने बंगालच्या उपसागरात पडली. भारतीय नौदलानं ती सुरक्षितपणे बाहेर काढली. ही संपूर्ण प्रक्रिया नऊ मिनिटांत पार पडली.

अशा प्रकारच्या आणखी किमान दोन चाचण्या अधिक उंचीवर घेण्यात येणार आहेत. त्यानंतर यंत्रमानवाची चाचणी होईल व प्रत्यक्षात २०२५ मध्ये तीन भारतीय अवकाशात जातील.

मानवी अंतराळ उड्डाण मोहीम होण्याआधी तंत्रज्ञानाची चाचणी घेतली जाते, प्रात्यक्षिकं घेतली जातात. या प्रात्यक्षिक मोहिमांत इंटिग्रेटेड एअर ड्रॉप टेस्ट, पॅड अबॉर्ट टेस्ट आणि टेस्ट व्हेईकल यांचा समावेश आहे. सर्व यंत्रणा किती सुरक्षित आणि विश्वासार्ह आहेत, याची चाचणी दोन मानवरहित चाचण्या घेऊन करण्यात येईल. याआधीही २०१४ पासून विविध प्रकारच्या चार चाचण्या घेण्यात आल्या होत्या. त्या चारही यशस्वी झाल्या.

‘इंटिग्रेटेड एअर ड्रॉप’ची तयारी

‘इस्रो’ आता गगनयान मोहिमेअंतर्गत ‘इंटिग्रेटेड एअर ड्रॉप’ चाचणीची तयारी करत आहे. यानुसार गगनयानातील कुपीला हेलिकॉप्टरच्या साह्यानं विविध उंचीवर नेण्यात येणार आहे व तिथून खाली सोडून देण्यात येणार आहे. यामुळे कुपीवर काय परिणाम होतो, हे नोंदवलं जाणार आहे. या चाचणीनंतर ‘पॅड अबॉर्ट टेस्ट’ही घेण्यात येणार आहे. या पुढील काळात अशा सहा चाचण्या होणार आहेत.

पार्श्वभूमी

गगनयान मोहिमेची घोषणा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी २०१८ मध्ये लाल किल्ल्यावरून केलेल्या भाषणात केली होती. ही मोहीम २०२२ मध्ये प्रत्यक्षात आणण्याचं निश्चित करण्यात आलं होतं. मात्र, कोरोनाच्या जागतिक साथीमुळे आणि तांत्रिक क्लिष्टतेमुळे मोहीम पुढं ढकलावी लागली. आता, २०२५ मध्ये ती प्रत्यक्षात येण्याची शक्यता आहे.

खरंतर, मानवाला अंतराळात घेऊन जाण्यासाठी तंत्रज्ञान विकसित करण्याबाबतचा अभ्यास इस्रोनं ‘ऑर्बिटल व्हेईकल’ या नावानं २००६ मध्येच सुरू केला होता. दोन जणांना सात दिवस अवकाशात नेऊन पुन्हा पृथ्वीवर आणणं (कुपी समुद्रात पाडणं) याचा प्रामुख्यानं हा अभ्यास होता. प्रकल्प म्हणून २००७ मध्ये याची औपचारिक सुरुवात करण्यात आली आणि २०२४ पर्यंत पूर्ण करण्याचं उद्दिष्ट ठेवण्यात आलं.

यासाठी दहा हजार कोटी रुपये खर्च अपेक्षित धरण्यात आला. प्रकल्पाचा आराखडा २००८ मध्ये केंद्र सरकारला सादर करण्यात आला. केंद्र सरकारनं या मोहिमेसाठी फेब्रुवारी २००९ मध्ये तरतूद मंजूर केली. परंतु, प्रत्यक्षात निधी उपलब्ध होऊ शकला नाही. मानवरहित यानाची पहिली चाचणी २०१३ मध्ये निश्चित करण्यात आली, नंतर ती २०१६ पर्यंत पुढं ढकलण्यात आली.

मात्र, दरम्यानच्या काळात एप्रिल २०१२ मध्ये निधीच्या चणचणीमुळे संपूर्ण प्रकल्पच अडचणीत आला आणि अखेरीस ऑगस्ट २०१३ मध्ये हा प्रकल्प ‘इस्रो’च्या प्राधान्यक्रमातून हटवण्यात आला. प्रकल्पाचं २०१४ मध्ये पुनरुज्जीवन करण्यात आलं, त्यासाठी निधीही मंजूर करण्यात आला. त्यानंतरही प्रकल्पात फारशी प्रगती झाली नव्हती. परंतु, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी २०१८ मध्ये स्वातंत्र्यदिनाच्या कार्यक्रमात गगनयान मोहिमेची घोषणा केली आणि याला चालना मिळाली.

व्योमनॉट

भारताच्या अवकाशवीरांना ‘व्योमनॉट’ असं संबोधण्यात येणार आहे. व्योम हा संस्कृत शब्द असून, त्याचा अर्थ आकाश असा आहे. अॅस्ट्रोनॉट या शब्दावरून व्योमनॉट हा शब्द तयार करण्यात आला आहे. रशियाही आपल्या अंतराळवीरांना कॉस्मोनॉट असं संबोधते.

व्योममित्र

गगनयानाच्या मानवरहित चाचण्या झाल्यानंतर पुढील वर्षी रोबोच्या चाचण्याही घेतल्या जातील. यासाठी तयार करण्यात येत असलेल्या, मानवीय चेहरा असलेल्या रोबोचं ‘व्योममित्र’ असं नामकरण करण्यात आलं आहे. मानवाला अंतराळात पाठवण्यापूर्वी व्योममित्र अवकाशात पाठवण्यात येणार आहे. कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर करून हा रोबो तयार करण्यात येत आहे. यानाच्या उड्डाणाच्या वेळी जाणवणारी कंपनं किंवा झटके यांच्या नोंदी करण्याची क्षमता व्योममित्रमध्ये असेल. २२ जानेवारी २०२० मध्ये पहिल्यांदा व्योममित्र सर्वांना दाखवण्यात आला. याला महिलेचा चेहरा देण्यात आला आहे. मात्र, या रोबोला पाय नाहीयेत. पुढे-मागे किंवा आजूबाजूला वाकण्याची क्रिया हा रोबो करू शकतो.

मानवी प्रक्रिया समजण्यासाठी व्योममित्रला सेन्सर, कॅमेरा, स्पीकर, मायक्रोफोन आणि अॅक्च्युएटर यासाठी उपकरणं लावण्यात आली आहेत. अक्चुएटरच्या साह्यानं हात हलवणं, वाकणं आदी क्रिया रोबोला करता येतात. सेन्सरच्या साह्यानं आपल्या आजूबाजूच्या वातावरणाची माहिती गोळा करता येते.

मोहिमेदरम्यान व्योममित्र आजूबाजूचं वातावरण आणि यंत्रसामुग्रीची माहिती गोळा करेल आणि नियंत्रण केंद्राकडे पाठवेल.

हवेचा दाब, ऑक्सिजन यांची तपासणी करणं, कार्बन डायऑक्साईडचा सिलिंडर बदलणं, आपत्कालीन स्थितीत मदत करणं अशा गोष्टी व्योममित्रला ‘शिकवण्यात’ येत आहेत. अधिक तापमानातही काम करण्याची व्योममित्रची क्षमता आहे.

इतर देशांचे मानवीय रोबो

- ऑगस्ट २०१९ मध्ये रशियानं ‘फेडोर’ रोबो आंतरराष्ट्रीय अवकाश स्थानकावर पाठवला होता. या रोबोची उंची पाच फूट ११ इंच, तर वजन १६० किलो होतं. आंतरराष्ट्रीय स्थानकातील रशियाच्या अंतराळवीरांना त्यानं मदत केली होती

- अमेरिकेची कंपनी एअरबसनं तयार केलेला ‘सायमन’ नावाचा रोबो २०१८ मध्ये आंतरराष्ट्रीय अवकाश स्थानकावर पाठवला होता

- त्यापूर्वी अमेरिकेची अवकाश संशोधन संस्था ‘नासा’नं २०११ मध्ये ‘रोबोनॉट-२’ अंतराळात पाठवला होता

- जपाननंही २०१३ मध्ये ‘किरोबो’ नावाचा केवळ १३ इंचांचा रोबो आंतरराष्ट्रीय अवकाश स्थानकावर पाठवला होता. कोची वकाटा यांचा सहकारी म्हणून त्या रोबोला पाठवण्यात आलं होतं

अवकाशवीरांचं प्रशिक्षण

गगनयान मोहिमेसाठी अवकाशवीरांची निवड करण्यात आली आहे. यासाठी भारतीय हवाई दलातील वैमानिकांची निवड करण्यात आली आहे. रशियात त्यांचं प्रशिक्षण सुरू झालं आहे. त्याचबरोबर शारीरिक स्वास्थ्य, सिम्युलेटर आणि अवकाशवीरांसाठीचे विशिष्ट पोशाख याबाबतचं प्रशिक्षण बंगळूरमध्ये देण्यात येणार आहे. गुरुत्वाकर्षणरहित किंवा अत्यंत कमी गुरुत्वाकर्षणात वावरण्याचं आणि कुपी परत येतानाची प्रक्रिया याबाबतचं प्रशिक्षणही देण्यात येणार आहे.

मोहिमेची उद्दिष्ट्यं

- मानवी अवकाशमोहिमा, वैज्ञानिक संशोधनासाठी अधिक चांगलं तंत्रज्ञान विकसित करणं

- आंतरराष्ट्रीय अवकाशस्थानकाच्या विकासात सक्रिय सहभागी होण्यासाठी क्षमता विकसित करणं

- स्वतंत्र अवकाशस्थानक विकसित करण्यासाठी तंत्रज्ञानाच्या चाचण्या घेणं

- दीर्घकालीन व परवडणाऱ्या मानवी आणि रोबोटिक मोहिमांसाठी वैज्ञानिक चाचण्या करणं, आवश्यक तंत्रज्ञान विकसित करणं

- शैक्षणिक संस्था आणि उद्योग यांच्यातील सहकार्य वाढवणं, यासाठी व्यापक धोरण निश्चित करणं

- अवकाश संशोधनाच्या क्षेत्रात रोजगारनिर्मितीच्या संधी उपलब्ध करून देणं

- संशोधनासाठी युवकांना प्रोत्साहन देणं

- अवकाश संशोधनात आंतरराष्ट्रीय सहकार्य वाढवणं

- मानवी मोहिमा आखण्यासाठी अत्याधुनिक तंत्रज्ञानाची क्षमता तपासणं

- अवकाशात वैद्यकीय, जैवअवकाशीय आणि अभियांत्रिकीचे प्रयोग करणं

- अवकाशातील यानांचं प्रक्षेपण आणि एखाद्या अपेक्षित ठिकाणी यान पोहोचवणं व थांबवणं असे प्रयोग करणं

- अवकाशस्थानकाची निर्मिती आणि अन्य ग्रहांवरील मानवी मोहिमांसाठी आंतरराष्ट्रीय अवकाश संस्थांबरोबर सहकार्य वाढवण्यास मदत

अशी आहे मोहीम

  • गगनयान मोहिमेअंतर्गत तीन भारतीयांना तीन दिवस अंतराळात नेण्यात येणार आहे

  • यासाठी जिओसिंक्रोनस लाँच व्हेईकल (जीएसएलव्ही-मार्क ३, आताचे एलव्हीएम-३) हा प्रक्षेपक वापरला जाईल

  • लो अर्थ ऑर्बिटमध्ये मानवाला पाठवणं हे प्रमुख उद्दिष्ट

  • संपूर्ण स्वदेशी तंत्रज्ञानाचा वापर करून भारतीय अवकाशवीरांना ४०० किलोमीटर उंचीवर नेणं व तीन दिवसांनी सुरक्षितपणे पृथ्वीवर परत आणणं

  • खर्च अंदाजे ९० अब्ज रुपये

  • कुपीची निर्मिती हिंदुस्थान एरोनॉटिक्स लिमिटेडनं केली आहे

  • अवकाशवीरांसाठीचे खाद्यपदार्थ, त्यांच्या आरोग्याची काळजी, उत्सर्जनाचं मोजमाप आणि त्यापासून सुरक्षा, परतताना आवश्यक पॅराशूट, अग्निरोधक यंत्रणा आदी गोष्टींसाठी संरक्षण संशोधन व विकास संस्थेचं (डीआरडीओ) साह्य

करण्यात येणारे प्रयोग

  • गुरुत्वाकर्षणरहित अथवा मायक्रोग्रॅव्हिटीच्या स्थितीत चार जैविक आणि दोन भौतिक प्रयोग करणार

  • इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ स्पेस सायन्स अँड टेक्नॉलॉजी, कृषी विज्ञान विद्यापीठ धारवाड, टाटा मूलभूत संशोधन संस्था, आयआयटी पाटणा, इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ केमिकल टेक्नॉलॉजी आणि जवाहरलाल नेहरू सेंटर फॉर ॲडव्हान्स्ड सायंटिफिक रिसर्च या संस्थांनी तयार केलेली उपकरणं गगनयानात असतील

  • मूत्रपिंडातील खड्यांची निर्मिती, फ्रूट फ्लायवर होणारा ‘सिरटुइन १’ प्रथिनाचा परिणाम, इलेक्ट्रॉनिक उपकरणांद्वारे बाहेर पडणाऱ्या उष्णतेचं (हीट सिंक) नियंत्रण, स्फटिकनिर्मितीची प्रक्रिया, द्रवांचं मिश्रण करण्याच्या पद्धतींची वैशिष्ट्यं याबाबतचे प्रयोग करण्यात येतील

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com