शब्द वाहतात सुख-दुःखाचे ओझे!

नुकतंच ‘कॉफी विथ करण’ शोमध्ये दीपिका पदुकोण आणि रणवीर सिंह यांनी आपला भूतकाळ अन् आताच्या नात्याबद्दल दिलखुलास गप्पा मारल्या.
dipika padukon ranveer singh
dipika padukon ranveer singhsakal

नुकतंच ‘कॉफी विथ करण’ शोमध्ये दीपिका पदुकोण आणि रणवीर सिंह यांनी आपला भूतकाळ अन् आताच्या नात्याबद्दल दिलखुलास गप्पा मारल्या. आपल्या ‘एक्स’बद्दल दीपिका जरा जास्तच मनापासून बोलली आणि सोशल मीडियावर टीकेचा पूर आला. शब्दांना सुख-दुःख नसते... ते फक्त आपलं भावनिक ओझं वाहत असतात. प्रसंगी ते कटू वाटतात, तरीही समजून घ्यावे लागतात. ‘आमच्याकडे आनंदावर विरजण घालून मिळेल’ अशी पाटी घेऊन बसलेल्या ट्रोलर्सनी तर त्याकडे दुर्लक्षच करायला हवं...

परवा घरी पोहचताच माझ्या बायकोने तिला झालेल्या एका प्रचंड आनंदाची बातमी मला दिली. काय तर म्हणे, शेजारची ‘काळी मैना’ भुऽऽर्र उडून गेली. (माझ्यासाठी ती ‘ब्लॅक ब्युटी’ होती, असो!) बायको भलतीच खूश होती. आनंदाच्या भरात तिने माझ्यासाठी चक्क माझ्या आवडीच्या बटाट्याच्या कापा केल्या होत्या. मी पदोपदी विनवणी करूनही तिने फार झंझट होते म्हणून त्या कधी केल्या नव्हत्या... तेव्हाच लक्षात आलं, मामला भलताच गंभीर दिसतोय.

एका अनामिक आणि ‘अलॉजिक’ भीतीने मी उगाच घाबरलो आणि मूग गिळून बसलो. खरं तर काही दिवसांपूर्वी गवसलेला नवीन पोपट त्या ‘काळ्या मैने’शी मिठू मिठू बोलायला लागला तेव्हापासूनच ती डोलायला लागली होती, याची कल्पना माझ्यापेक्षा इतरांनाच जास्त होती... मला फक्त एकच बाजू दिसत होती. असो, अनपेक्षितरीत्या ओढवलेल्या दुःखाच्या वेदनेची चादर घेऊनच मी झोपून गेलो.

सकाळी जाग आली. आन्हिकं उरकताना मी रात्रीच्या दु:स्वप्नांना बायकोच्या नकळत तिलांजली दिली. मोबाईल हाती घेतला नि पहिलं नोटिफिकेशन दिसलं, ‘अभिनेत्री दीपिका पदुकोणच्या कन्फेशनवर पती रणवीर सिंह नाराज...’ सोशल मीडियावर त्याचीच चर्चा होती. काय झालं एवढं म्हणून मी ‘गुगली’ टाकला तेव्हा कळलं जोहरांच्या करणचे उद्योग होते ते... कोणतंही ‘एक्स्ट्राऑर्डिनरी’ प्रकरण नव्हतं.

‘एक्स’ इज ऑर्डिनरी असाच सारा मामला होता! पण इथे पुन्हा ट्रोलर्सनी आग लावली होती नि त्यात दीपिकावर टीकेची झोड उठवली होती. काय बोलायचं अशा पद्धतीच्या ट्रोलिंगला...? नैतिकतेच्या मुद्द्यावरून एखाद्याच्या विरोधात बोलताना तरी आपल्या कमरेखालचं सोडू नका. विशेषतः जेव्हा ती एखादी महिला असेल.

मी मागेही म्हटलं होतं, ट्रोलर्स तुमचा निशाणा चुकतोय. कशाला जगाची दुखणी घरी आणता? आता दीपिका लग्नाच्या आधी काही ‘प्रेमळ’ व्यक्तींशी संपर्कात होती, तर तुमचं काय जातं? तुम्ही तुमच्या पायाखाली काय जळतंय ते बघा... थोडं प्रॅक्टिकल बना. सोशल मीडियावर अत्यंत गरजूंना मदत करण्याबाबतही काही पोस्ट असतात. त्यावरही कमेंट्सचा पूर असतो.

पण त्यातील ९० टक्के ‘मदत’ फक्त, ‘ऑल द बेस्ट’, ‘देव तुमच्या पाठीशी आहे’, ‘देवावर विश्वास ठेवा’, ‘अमूक अमूक ठिकाणी संपर्क करा’... अशा स्वरूपात कामचलावू असतात. इथे तुमची ‘सो कॉल्ड’ जाणीव-जागृती कुठे जाते? ज्या आवेशात ट्रोलिंगसाठी तुमची बोटं चालतात ना तशी ती इथे वापरा. अशा गरजूंना फक्त सहानुभूतीची गरज नसते, तर चार पैशांचा ‘खारीचा वाटा’ हवा असतो.

करणच्या शोमध्ये दीपिका आणि रणवीर आपल्या नातेसंबंधांबाबत मनमोकळे बोलले. ‘रणवीरसोबत डेट करताना मी इंडस्ट्रीतील इतरांनाही भेटत होते. माझ्यासाठी योग्य जोडीदार शोधत होते, पण शेवटी माझे विचार रणवीरपाशीच येऊन थांबायचे. मी तेव्हा सिंगल होते. मला तेव्हा कोणामध्येही मानसिकरीत्या गुंतायचं नव्हतं, फक्त मजा करायची होती... कारण ते वयच तसं असतं. त्यानंतर माझ्या आयुष्यात रणवीर आला.

त्याने मला लग्नासाठी प्रपोज केलं नव्हतं तोवर मी त्याला काहीही कमिट केलं नव्हतं...’ असं दीपिका म्हणाली. झालं, सगळ्या डिजिटल खबऱ्यांनी आणि ट्रोलर्सनी तिला फैलावर घेतलं. तिच्या सगळे ‘एक्स’ बॉयफ्रेंड, त्यांचे फोटो आणि प्रोफाईलसह अवतरले. तिच्या ‘पोस्ट’वरून निगेटिव्ह कमेंट्सचा पूर आला. कहर म्हणजे, परवा विजय मल्ल्यांचा मुलगा सिद्धार्थने साखरपुडा उरकला. नॉर्मली त्याची बातमीही झाली नसती.

झालीच असती तर, हेडिंग असतं, ‘सिद्धार्थ मल्ल्याने की सगाई’ अशा आशयाचं. पण झाडून सगळीकडे ‘दीपिका पदुकोण के एक्स बॉयफ्रेंडने की सगाई’ अशी बातमी व्हायरल झाली होती. सोबत होता सिद्धार्थचा फोटो... काय ही कल्पकता! दीपिका करणच्या शोमध्ये स्वतःहून व्यक्त झाली. तेही पती रणवीरसमोर. मी वर उल्लेख केलेली ‘काळी मैना’ खरंच ‘चवचाल’ होती. ती एका दिलफेक आशिकसोबत पळून गेली.

सोन्यासारख्या नवऱ्याला मागे सोडून. तिची नियतच खराब होती. अनेकांच्या संसारात तिने विष कालवलं होतं. ते तिच्या नवऱ्यालाही माहीत होतं आणि आम्हा सर्वांनाही... म्हणूनच ती गेल्याचा आनंद माझ्या बायकोने साजरा केला ना, तेव्हा मला त्यात काही वावगं वाटलं नाही. कारण समाजाला लागलेली एक कीड मेल्याचं सेलिब्रेशन तिने केलं होतं.

आता प्रश्न निर्माण होतो, की दीपिकाच्या प्रामाणिक मतावरून तिचं शाब्दिक वस्त्रहरण करण्याची गरज होती का? मान्य आहे, की तिचं अशा प्रकारे ‘नॅशनल लेव्हल’वर व्यक्त होणं वाह्यात कॅटेगिरीत मोजता येईल, कारण शेजारी तिचा नवरा बसला होता. दीपिकाचे अचाट विचार ऐकून ‘माझा पार देवदास झालाय’ असं त्याचा चेहरा ओरडून सांगत होता, पण ते कोणालाच ऐकू जात नव्हतं. कारण दीपिकासारखी सेलिब्रिटी ‘तन आणि मन की बात’ करू लागली होती.

‘मी नाही त्यातली...’ असा तिचा अॅप्रोच बिलकूलच नव्हता. तरीही तिचं बोलणं अनेकांना खटकलं. ट्रोलर्सनी नेहमीप्रमाणे आपली व्हाईट कॉलर ताठ ठेवून पार तिच्या चारित्र्यावरच शिंतोडे उडवले. तिच्या बोलण्याचा अर्थ जारकर्म, व्यभिचार किंवा बाहेरख्यालीपणाच्या तराजूत तोलला गेला. तेच पूर्णसत्य असं म्हणता येणार नाही. दीपिकाच्या वक्तव्याचं समर्थन करायचा इथे बिलकूल हेतू नाही, तरीही तिच्या बोलण्यामागे दुसरी बाजूही असू शकते...

एक लक्षात घ्यायला हवं, आपल्या देशाची संस्कृती जगात श्रेष्ठ आहे. एका सर्व्हेनुसार काश्मीर ते कन्याकुमारीपर्यंतच्या भारतीयांचा आजही प्रेमविवाहापेक्षा अॅरेंज मॅरेजवर विश्वास आहे. प्राचीन काळी लग्नाची संकल्पना कर्तव्य, सुरक्षा, स्थैर्य आणि वंशाचा दिवा एवढीच सीमित होती. त्यात प्रेम, वेड किंवा रोमान्स अपेक्षितच नव्हता. कालांतराने नावीन्य, प्रेम, ओढ, वेड, आपुलकी, काळजी, भावभावना, रोमान्स, निष्ठा आणि विश्वास असे कंगोरे त्यात येत गेले.

आपल्या जोडीदारात ते शोधले जाऊ लागले. ते सापडेनासे झाल्यावर मग मात्र राग, द्वेष, मत्सर, हेकेखोरपणा, चीड चीड, मालकी हक्क, अपराधीपणा, अज्ञान, अबोला आणि दुरावा अशी रावणाची दहा तोंडं जे सांगेल ते आपण हलक्या कानांनी ऐकू लागलो. त्यातून लग्नबंधनाचा घट्ट धागा विरळ होत गेला आणि त्यातूनच आधी विवाहबाह्य संबंधाची अन् आता ‘लिव्ह इन रिलेशनशिप’सारखी दूषित संकल्पना जन्मास आली.

काही जणं लग्न करतात नि ते टिकवतात. त्याला आपण ‘अॅडजेस्टमेंट’ असं गोंडस नाव देतो. मुळात ती स्त्रीच्या वाट्यालाच अधिक येते. मन मारून जगायचं तर तिनेच. पुरुषांनी नाही. कारण तो ४० किलो वजनाचा आणि हाडामासाचा सापळा असला तरी ‘वाघ’च. स्वच्छंदी जगायचा अधिकार त्यालाच. महिला मात्र गरीब गाय. सध्याच्या तरुणी मात्र आर्थिक आधार आणि स्थैर्याच्या पलीकडे गेल्या आहेत.

परावलंबनाचं जोखड त्यांनी कधीच भिरकावून दिलंय. लग्नाच्या नात्यातील खंडीभर एकतर्फी अपेक्षा एकटीने पूर्ण करत बसण्यात त्यांना आता रस नाही. माझ्या काही इच्छा-आकांक्षा पूर्ण होत नसतील आणि मला आनंद मिळतच नसेल तर त्याचा पर्याय शोधण्यात काही गैर नाही, असं मानणारी आजची पिढी आहे. कूल माईंडवर जगणारी... त्यांना जोडीदाराला फसवायचं नसतं. ‘मी केलं, पण तुला कुठे अंतर दिलं’ असा कॅलक्युलेटेड विचार आजची पिढी करते.

दीपिका अशा पिढीचं प्रतिनिधित्व करते. म्हणूनच ती दुतोंडी ठरते. कारण ‘आय डिझर्व्ह बेटर’वर तिचा विश्वास आहे. ‘कमिटेड असतानाही मी काही जणांना भेटले. योग्य जोडीदार शोधत होते, पण माझं मन फिरून फिरून रणवीरपाशीच यायचं’ असं ती म्हणाली... सततच्या हार्ट ब्रेकनंतर वैराग्य आलं होतं, असा अर्थ दीपिकाच्या बोलण्यातून निघू शकतो. ‘शब्दांना नसते दुःख... शब्दांना सुखही नसते. ते वाहतात जे ओझे... ते तुमचे-माझे असते’ असं कवी सुधीर मोघे यांनी म्हटलंय.

मग दीपिकाने काय वेगळं सांगितलं. तिचे बोल समाजमान्य नसतीलही, पण म्हणून ते खोटे ठरत नाहीत. प्रत्येकाला आपल्या दुःखाचा भार वाहायला एक खांदा लागतो. तो बाहेर शोधू नका. घरातच असतो, फक्त भूतकाळाचे दरवाजे तेवढे बंद करावे लागतात. प्रेमविवाह असो की अॅरेंज मॅरेज. जेव्हा तुम्ही सात फेऱ्यांमध्ये अडकता तेव्हा ती ‘लव्ह स्टोरी’ राहत नाही, तर ‘लाईफ स्टोरी’ होऊन जाते. तिचा क्लायमॅक्स सुखदच व्हावा लागतो.

sushil.amberkar@esakal.com

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com