'फंक्‍शनल फिटनेस' महत्त्वाचा (स्वप्नील जोशी)

swapnil joshi
swapnil joshi

फिटनेस म्हटलं, की सिक्‍स पॅक ऍब्ज, बॉडी बिल्डिंग वगैरे वगैरे गोष्टी सगळ्यांच्या डोक्‍यात येतात; पण त्यापेक्षाही फंक्‍शनल फिटनेस हा फार महत्त्वाचा. "फंक्‍शनल फिटनेस' म्हणजेच रोजचं आयुष्य जगण्यासाठी लागणारा फिटनेस. याच फिटनेसला सर्वाधिक महत्त्व आहे.

"मुंबई पुणे मुंबई 3' चित्रपटाच्या चित्रीकरणादरम्यान माझं वजन 85 किलो होतं. शरीराचा फिटनेस कसा राखता येईल याकडं माझं लक्ष असतंच; पण कलाकार म्हटल्यावर भूमिकेच्या गरजेनुसार बदलावं लागत आणि माझ्या बाबतीतही अगदी तसंच घडलं. "मुंबई पुणे मुंबई 3'नंतर मला "मी पण सचिन' चित्रपटासाठी काम करायचं होतं. या चित्रपटासाठी मात्र मला वजन कमी करायचं होतं. भूमिकेची गरज म्हणून मला माझ्यामध्येही बदल हवे होते. त्याचदरम्यान माझी ओळख झाली ती डॉ. मुफ्फी यांच्याशी. त्यांनी मला याबाबत योग्य ते मार्गदर्शन केलं. जवळपास 15 किलो वजन मी कमी केलं. म्हणजेच चित्रीकरणादरम्यान माझं वजन 70 किलो होतं. वजन कमी करत असताना आपल्या शरीरावर त्याचा काही परिणाम होणार नाही याची खबरदारी घ्यायला लागते. आपण उत्साहानं वजन कमी करायला जातो, परिणामी त्याचे साईड इफेक्‍टस्‌ शरीरासाठी हानिकारक असतात. मी एक कलाकार आहे. त्यामुळं कोणत्या ना कोणत्या भूमिकेसाठी वजन कमी करावं लागतं अथवा वाढवावं लागतंच. यासाठी योग्य त्या मार्गदर्शकाचा हात धरावा लागतो. मी वजन कमी केलं ते शास्त्रीय पद्धतीनं. कोणत्याच प्रकारचा त्रास माझ्या शरीराला झाला नाही. माझ्या चेहऱ्यावरचं तेज कमी झालं नाही, किंवा मला अशक्तपणाही जाणवला नाही आणि हेच फार महत्त्वाचं असतं. फक्त भूमिकेची गरज म्हणून वजन कमी करणं आणि नंतर त्रास सहन करायचा हे मला अजिबात पटत नाही. वजन कमी करत असताना वेळ लागला तरी चालेल; पण सगळ्या गोष्टींची खात्री पटल्यावरच मी पुढचं पाऊल टाकतो.
माझ्या मते प्रत्येकानं आपल्या शरीराची निगा राखली पाहिजे. आरोग्याची काळजी घेतली पाहिजे. शरीर, आरोग्य नीट असेल तर इतर कामांत मन रमतं. मी फिटनेसच्या दृष्टीनं तीन महत्त्वाच्या गोष्टी नेहमी करतो. पहिली गोष्ट म्हणजे मी माझ्या कामात कितीही व्यग्र असलो, तरी तीन ते चार लिटर पाणी दिवसाला पितो. पाणी ही शरीराची सर्वांत महत्त्वाची गरज आहे. सतत पाणी प्यायल्यामुळं कितीतरी आजार दूर होतात. दुसरं म्हणजे मी आठ तास झोपतो. मला कितीही काम असलं, तरी माझ्यासाठी झोप ही महत्त्वाची आहे. झोपेबाबत मी कोणतीच तडजोड करत नाही. तिसरं म्हणजे झोपण्यापूर्वी एक तास तरी इलेक्‍ट्रॉनिक गॅजेट्‌स वापरण्याचा मोह मी टाळतो. एक तास तरी मोबाईलपासून वगैरे दूर राहण्याचा प्रयत्न मी करतो. त्यामुळं झोप शांत लागते. आठ तास झोप निरोगी शरीरासाठी गरजेची आहे. या तीन गोष्टी मला माझ्या फिटनेसच्या दृष्टीनं महत्त्वाच्या वाटतात आणि त्या मी आवर्जून म्हणजे माझ्या बिझी शेड्यूलमधून वेळ काढून करतोच. सध्या माझं फिटनेसच्या दृष्टीनं डॉ. मुफ्फी यांच्याकडंच फिटनेस ट्रेनिंग सुरू आहे. या ट्रेनिंगदरम्यान मी वेगवेगळ्या गोष्टी करतो. योगा, कार्डिओ, टीआरएक्‍स आणि वेट ट्रेनिंग अशा बऱ्याच गोष्टी मी करत असतो. त्यामुळं व्यायामाचे जवळपास सगळेच प्रकार मी प्रत्येक दिवशी करतो. मी फक्त योगासनंच करतो, असं नाही. फिटनेसच्या दृष्टीनं ज्या गोष्टी, जे व्यायाम महत्त्वाचे आहेत ते मला या ट्रेनिंगमध्ये करायला मिळतात. उदाहणार्थ, टीआरएक्‍समध्ये असं आहे, की तुम्हाला तुमचं स्वतःच वजन उचलता आलं पाहिजे. जवळपास तीन मिनिटं पायावर बसता आलं पाहिजे. पायावर बसणं आणि ते पण तीन मिनिट हे ऐकायला फार सोपं वाटतं; पण ते करणं फार कठीण आहे. फिटनेस म्हटलं, की सिक्‍स पॅक ऍब्ज, बॉडी बिल्डिंग हे पहिलं सगळ्यांच्या डोक्‍यात येतं; पण फिटनेसच्या व्याख्या फार वेगळ्या आहेत. फंक्‍शनल फिटनेस हा फार महत्त्वाचा. फंक्‍शनल फिटनेस म्हणजेच रोजचं आयुष्य जगण्यासाठी लागणारा फिटनेस आणि याच फिटनेसला सर्वाधिक महत्त्व आहे. काही फिजिकल ऍक्‍टिव्हिटी करायची वेळ आली, की बऱ्याचदा आपल्याला ते करायला जमत नाही. साधी-सरळ गोष्ट सांगतो. आपल्याला मांडी घालून फरशीवर बसायची सवय नसेल आणि एखाद्या दिवशी तासभर तरी मांडी घालून बसण्याची वेळ आली तर अवस्था वाईटच होते. हादेखील फिटनेसचाच प्रकार आहे. मांडी घालून बसण्याची सवयही हवी. अगदी छोट्या-छोट्या गोष्टींपासून फिटनेसला सुरवात होते आणि नेमक्‍या त्याच गोष्टींकडं आपण दुर्लक्ष करतो. तुम्ही तुमची दिनचर्या किती सक्षमपणे पूर्ण करू शकता आणि दिवसभराची सगळी काम आटोपल्यानंतर दिवसाच्या शेवटी तुमच्याकडं किती ताकद उरते यावर तुमचा फिटनेस अवलंबून असतो. या सगळ्याकडंच मी सध्या लक्ष देत आहे. हे वेटलॉस प्रोग्रॅममुळं शक्‍य होत नाही. यासाठी लाइफस्टाइल बदलावी लागते. दिवसभरात तीन ते चार लिटर पाणी प्यायलाच हवं, हे म्हणणं खूप सोपं आहे; पण करणं खूप कठीण आहे. साधारणतः फक्त एक लिटर पाणीच दिवसभरात आपण पितो. चार लिटर पाणी पिण्यासाठी तशी सवय करून घ्यावी लागते. लोक मला अजूनही विचारतात ः "तू अजून तरुण कसा दिसतोस? तुझ्या चेहऱ्यावर तेज कसं कायम राहतं?' मला असं वाटतं, इतकी वर्षं भरपूर पाणी, पुरेशी झोप मिळाल्याचे हे फायदे आहेत.

जेवणाच्या वेळा पक्‍क्‍या
बिझी शेड्यूलमुळं खाण्यापिण्याच्या वेळा सांभाळता येत नाहीत; पण वेळेवर खाल्लं पाहिजे या प्रयत्नात मी असतो. आता माझ्या टीमलाही माहीत झालं आहे, की रात्री साडेआठ वाजता मला जेवायला लागतंच. फक्त टीमलाच नव्हे, तर दिग्दर्शकांनाही माहीत असतं. मग ते साडेआठच्या दरम्यान माझा शॉटही ठेवत नाहीत. एखादी गोष्ट आपण मन लावून केली, की आपल्या आजूबाजूचे लोकही आपल्याला साथ देतात. जेवढं शक्‍य असेल तेवढं घरी बनवलेले पदार्थ खाल्ले पाहिजेत. मला फारसं जमत नाही; पण घरगुती पदार्थ खाण्याकडंच माझा जास्त कल असतो. डाएट प्लॅननुसार माझी दिवसभराची मील्स ठरलेली असतात. जेव्हा मला वजन वाढवायचं असतं, तेव्हा मी सहा ते सात मील्स खातो. डाएटप्रमाणं सगळं बदलत राहतं. मी प्रचंड फूडी आहे. मला वेगवेगळे पदार्थ खायला खूप आवडतात. डाएटमध्ये तुमचं खाणं बंद होत नाही. तुम्ही काय खाता याला महत्त्व आहे. मी वजन कमी केल्यानंतर मला एक गोष्ट लक्षात आली आहे, की वजन कमी करणं म्हणजे उपाशी राहणं हे समीकरणच चुकीचं आहे. वजन कमी करणं म्हणजे योग्य खाणं आणि चांगलं खाणं. उपाशी राहिलात तर उलट वजन वाढतं.

कामाचा स्ट्रेस असेल, तर मी योगा आणि मेडिटेशन म्हणजेच नामस्मरणाचा मी पर्याय निवडतो. मला स्वतःला याचा खूप फायदा होतो. यामुळं मन शांत होतं, सकारात्मक विचार आपण करू लागतो. कुठलंही फॅट डाएट करायला नको. लाइफस्टाइल स्वतःची बदलली पाहिजे. आरोग्याच्या दृष्टीनं छोटे-छोटे बदल केले, की आपल्यामध्ये मोठा बदल दिसून येईल.
(शब्दांकन : काजल डांगे)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News
www.esakal.com