वसा जबाबदार नागरिक घडवण्याचा!

‘सकाळ सोशल फाउंडेशन’च्या अंतर्गत राबविण्यात येणाऱ्या सामाजिक उपक्रमांसाठी ‘सोशल फॉर अॅक्शन’ हा ऑनलाइन वेबसाइट स्वरूपात नवा प्लॅटफॉर्म सुरू करण्यात आला आहे.
Ganesh Jhambare
Ganesh JhambareSakal
Summary

‘सकाळ सोशल फाउंडेशन’च्या अंतर्गत राबविण्यात येणाऱ्या सामाजिक उपक्रमांसाठी ‘सोशल फॉर अॅक्शन’ हा ऑनलाइन वेबसाइट स्वरूपात नवा प्लॅटफॉर्म सुरू करण्यात आला आहे.

‘सकाळ सोशल फाउंडेशन’च्या अंतर्गत राबविण्यात येणाऱ्या सामाजिक उपक्रमांसाठी ‘सोशल फॉर अॅक्शन’ हा ऑनलाइन वेबसाइट स्वरूपात नवा प्लॅटफॉर्म सुरू करण्यात आला आहे. या वेबसाइटला उत्स्फूर्त असा प्रतिसाद मिळाला. त्यातूनच स्वयंसेवी संस्था व देणगीदार यांना एकत्र आणण्यासाठी ‘सोशल फॉर अॅक्शन’ क्राउड फंडिंगसाठी नवीन डिजिटल प्लॅटफॉर्म सुरू करण्यात आला असून, ‘सोशल फॉर अॅक्शन’ या अभियानांतर्गत चांगलं काम करणाऱ्या स्वयंसेवी संस्थांच्या सामाजिक उपक्रमांची माहिती या सदरातून दिली जाते.

संकटात सापडलेल्या महिला, देहविक्रय करणाऱ्या महिलांच्या मुलांसाठी, एच.आय.व्ही.बाधित आणि प्रभावित मुलांसाठी व आर्थिकदृष्ट्या मागास आणि वंचित मुलांच्या सक्षमीकरणासाठी ‘स्वाधार’ ही स्वयंसेवी संस्था काम करत आहे.

‘स्वाधार’ ( इन्स्टिट्यूट फॉर डेव्हलमेंट ऑफ वुमेन ॲन्ड चिल्ड्रेन - IDWC ) ची स्थापना १९९५ मध्ये झाली. महिलांना विशेषतः आपल्या देशात नेहमीच कुटुंबात आणि समाजात त्यांचं हक्काचं स्थान नाकारलं गेलं आहे. महिलांना सक्षम बनवायचं असेल, तर त्यांना त्यांच्या हक्काची जाणीव करून देणं व त्यांना स्वतःच्या पायांवर उभं करणं अत्यंत महत्त्वाचं आहे. यासाठी प्रथम महिलांनी सर्वदृष्टीने सक्षम होऊन, एक सुदृढ समाज निर्माण होण्यासाठी आणि समाजात महिलांचा आदर व त्यांच्या हक्कांचं संरक्षण व्हावं या हेतूने ‘स्वाधार’ संस्थेची स्थापना दिवंगत मीनाक्षीताई आपटे यांनी मुंबईतल्या ‘टाटा इन्स्टिट्यूट ऑफ सोशल सायन्स’ येथील सामाजिक कार्यकर्त्या दिवंगत मृणाल गोरे यांच्या सहकार्याने केली.

‘स्वाधार (IDWC) संस्थेचं कार्य पुणे व पिंपरी-चिंचवड महानगरपालिका आणि पुणे जिल्हास्तरावर असून, यामध्ये संकटात सापडलेल्या महिला आणि वंचित मुलांना समाजाचे जबाबदार नागरिक बनण्यासाठी सक्षम केलं जातं. यासोबतच देहविक्रय करणाऱ्या महिलांची मुलं, एच.आय.व्ही.बाधित मुलं आणि आर्थिकदृष्ट्या मागास व वंचित मुलं अशा सर्व मुलांच्या सर्वांगीण विकासावर लक्ष केंद्रित करण्यासाठी शिक्षण, मार्गदर्शन, प्रशिक्षण आणि समुपदेशन या उपक्रमांद्वारे व्यक्ती आणि कुटुंबाचं जीवनमान सुधारण्यासाठी संस्थेकडून प्रयत्न केले जातात.

संस्थेअंतर्गत राबविण्यात येणारे उपक्रम

मोहोर प्रकल्प

या उपक्रमांतर्गत विशेष काळजी आणि संरक्षणाची गरज असलेल्या मुलांसाठी व वेश्या व्यवसाय करणाऱ्या महिलांच्या १ ते १४ वर्षं वयोगटातील मुलांसाठी बुधवार पेठ, पुणे इथे महानगरपालिकेने दिलेल्या जागेत पाळणाघर आणि २४ तास निवारा केंद्र चालविण्यात येतं. या प्रकल्पाच्या माध्यमातून चार हजार मुलांना लाभ मिळाला आहे.

रेज ऑफ होप प्रकल्प

संस्थेकडून हा उपक्रम मागील १८ वर्षांपासून राबविला जातो. या उपक्रमाच्या माध्यमातून जन्मतः ते १८ वर्षं वयोगटातील एच.आय.व्ही. (HIV) बाधित आणि प्रभावित मुलांचं पुनर्वसन केलं जातं. यामध्ये अशा मुलांना व कुटुंबांना अन्नधान्य (रेशन किट) व जीवनावश्यक वस्तूंचं वाटप करणे, मुलांना शिक्षणासाठी आर्थिक मदत करणे, मुलांची व कुटुंबातील व्यक्तींची आरोग्य तपासणी करणे, मुलांसाठी करिअर मार्गदर्शन कार्यशाळा आयोजित करणे आदी उपक्रम राबविले जातात. या प्रकल्पाच्या माध्यमातून एक लाखपेक्षा जास्त मुलांना लाभ मिळाला आहे.

गर्ल्स एज्युकेशन सपोर्ट प्रोग्राम

या उपक्रमांतर्गत वस्तीपातळीवरील व कमी उत्पन्न गटातील मुलींना शालेय व महाविद्यालयीन शिक्षणासाठी आर्थिक मदत दिली जाते. या प्रकल्पाच्या माध्यमातून ६ हजार २१ मुलींना शिक्षणासाठी आर्थिक मदत देण्यात आली आहे.

महिला सक्षमीकरण

या उपक्रमांतर्गत वस्तीपातळीवरील, संकटात सापडलेल्या महिलांसाठी व समस्याग्रस्त महिलांसाठी आणि त्यांच्या कुटुंबीयांसाठी कौटुंबिक सल्ला मार्गदर्शन केंद्र चालवलं जातं. या प्रकल्पाच्या माध्यमातून सदोतीस हजार आठशे पंचेचाळीस लोकांनी लाभ घेतला आहे.

फुलोरा (शाळेतील मुलींसाठी जीवनकौशल्यं व प्रौढ मुलींसाठी व महिलांसाठी व्यावसायिक प्रशिक्षण उपक्रम)

या उपक्रमांतर्गत शहर परिसरातील व वस्तीपातळीवरील आणि दुर्बल घटकांतील १० ते १८ वर्षं वयोगटातील मुलींसाठी जीवनकौशल्यं शिकविली जातात. तसंच, १८ ते ३५ वयोगटातील महिलांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी विविध व्यावसायिक प्रशिक्षण दिलं जातं.

अक्षरदीप प्रकल्प

या उपक्रमांतर्गत पुणे आणि पिंपरी-चिंचवड येथील शहरी आणि वस्तीपातळीवरील कमी उत्पन्न गटातील व दुर्बल घटकांतील मुलांच्या सर्वांगीण विकासासाठी शैक्षणिक मदत, सपोर्ट वर्ग, बालवाडी, ई-लर्निंग प्रकल्प, शिक्षण हक्क कायदा जनजागृती आदी उपक्रम राबविले जातात.

अक्षरस्पर्श - वाचन वर्ग प्रकल्प

या उपक्रमांतर्गत मुलांना अक्षरओळख होण्यासाठी व मुलांचं वाचनकौशल्य विकसित करण्यासाठी महानगरपालिका आणि खासगी शाळांमधून अक्षरस्पर्श - वाचन वर्ग प्रकल्प राबविला जातो.

अशी मिळाली आयुष्याला दिशा

१६ वर्षांची मीनल (नाव बदललं आहे) HIV+ve अतिशय गोड व होतकरू मुलगी. वडील एड्सने वारले आहेत. तिला प्रत्येक महिन्याला अन्नधान्य किट व पौष्टिक आहार संस्थेकडून मिळतो. तसंच, मीनलला शिक्षणासाठी व इतर शैक्षणिक कोर्सेससाठी लागणाऱ्या शुल्कासाठी संस्थेकडून मदत दिली जाते. संस्थेच्या माध्यमातून तिने ब्यूटिपार्लरचा कोर्स, स्कीन थेरपी व हेअर थेरपीचे कोर्सेस केले आहेत. आता ती भोसरी येथील खासगी हेअर व स्कीन थेरपी सेंटरमध्ये नोकरी करत असून, तिला महिना पाच हजार मानधन मिळतं. ती बाहेरून बारावीची परीक्षा देण्यासाठी तयारी करत असून, तिला स्कीनकेअरमधून शिक्षण घेऊन डॉक्टर व्हायचं आहे.

पंधरा वर्षांचा अविनाश (नाव बदललं आहे) हा एच.आय.व्ही.बाधित मुलगा स्वाधारच्या रेज ऑफ होप प्रकल्पात २०१७ मध्ये दाखल झाला. त्या वेळी तो खूप कुपोषित व आजारी होता. तो ३ वर्षांचा असताना त्याने त्याची आई गमावली. त्याचे वडीलदेखील HIV+ve असून, त्यांना अस्थमाचा त्रास आहे, त्यामुळे ते काम करू शकत नाहीत. अविनाशची परस्थिती खूपच बिकट होती. संस्थेच्या कार्यकर्त्यांनी गृहभेट करून त्याला कमिटीच्या संमतीने अन्नधान्य किट, वैद्यकीय मदत आणि शैक्षणिक मदत देण्यास त्वरित सुरुवात केली. तसंच, त्याच्या कुटुंबीयांचं समुपदेशन करण्यात आलं. संस्थेच्या सामाजिक कार्यकर्त्यांच्या चार वर्षांच्या अथक प्रयत्नांनंतर व सातत्याने औषधोपचाराने अविनाशची तब्येत चांगली झाली. त्याने १२ वीची परीक्षा उत्तीर्ण केली असून, आता अविनाशला एका कंपनीत प्रतिमहिना पाच हजार पगारावर अर्धवेळ नोकरी मिळाली आहे. शिवाय, त्याचं वाणिज्य शाखेत पुढील शिक्षण सुरू आहे.

हवी आहे आर्थिक साथ...

‘स्वाधार’ संस्थेच्या रेज ऑफ होप या प्रकल्पाच्या माध्यमातून ‘सेव्ह द चिल्ड्रन कॅनडा’ यांच्या सहकार्याने जून २००५ मध्ये एचआयव्ही/एड्सबाधित, प्रभावित व कुपोषित बालकांसाठी पोषक आहार, योग्य औषधोपचार व शैक्षणिक मदतीबरोबर सर्वांगीण विकास करण्याचं उद्दिष्ट ठेवून २ वर्षांसाठी पायलट प्रोजेक्ट सुरू करण्यात आला; परंतु समाजातील वाढत्या व विशेष गरजा लक्षात घेता हा प्रकल्प गेल्या १७ वर्षांपासून, पुणे व पिंपरी-चिंचवड विभागात कार्यरत आहे. एचआयव्ही/एड्स आजारपण व कुपोषणाचं वाढतं प्रमाण यामुळे ही बालकं विविध प्रकारच्या संधिसाधू आजारांना सामोरं जातात. तसंच, एड्समुळे पालक मृत्यू पावल्याने अनाथपण आणि समाजाकडून अनुभवाला येणारं नाकारलेपण, घरातील बेरोजगारीने होणारी उपासमार व शिक्षण थांबणं, शिक्षण सोडून अर्थार्जनास लागणं, सततच्या आजारपणामुळे शिक्षणात तसंच आर्थिक साहाय्यास अडथळे निर्माण होणं, या सर्व बाबींचा विचार करून व इतक्या वर्षांच्या अनुभवातून संस्थेने रेज ऑफ होप प्रकल्प सुरू ठेवला आहे.

संस्थेकडून प्रकल्पांतर्गत कुपोषित, एच.आय.व्ही. एड्सबाधित/ प्रभावित मुलांना त्यांच्या आरोग्याची स्थिती लक्षात घेता त्यांना प्रत्येक महिन्यात पौष्टिक आहार, अन्नधान्य किट, वैद्यकीय उपचार आणि शैक्षणिक मदत केली जाते. त्याचबरोबर त्यांच्या सर्वांगीण विकासासाठी दर महिन्याला विविध कार्यशाळा व उपक्रम राबविले जातात. याशिवाय कुटुंबातील सदस्यांचं समुपदेशन, वैद्यकीय उपचारांसाठी संदर्भसेवा दिल्या जातात. संस्थेअंतर्गत राबविण्यात येणाऱ्या सर्व प्रकल्पांसाठी आर्थिक मदतीची आवश्यकता असून, संस्थेला सामूहिक मदतीची गरज आहे.

कशी कराल मदत

‘स्वाधार’ ही संस्था समाजातील दानशूर व्यक्तींच्या पाठबळावर उभी आहे. संस्थेला आपलं कार्य वाढविण्यासाठी सामूहिक मदतीची व निधीची गरज आहे. सकाळ माध्यम समूहाच्या ‘सोशल फॉर अॅक्शन’ या डिजिटल क्राउड फंडिंगच्या प्लॅटफॉर्मवर ‘स्वाधार’ या संस्थेच्या उपक्रमाची माहिती मिळेल. समाजातील दानशूर व्यक्ती, माहिती-तंत्रज्ञान कंपन्या, सीएसआर कंपन्या व परदेशी-भारतीय नागरिक https://socialforaction.com/ या वेबसाइटला भेट देऊन, ‘स्वाधार’ या संस्थेअंतर्गत चालविण्यात येणाऱ्या उपक्रमांची माहिती घेऊन ‘डोनेट नाऊ’ या बटनवर क्लिक करून थेट वेबसाइटद्वारे देणगी देऊ शकतात. या क्राउड फंडिंगद्वारे देणगी देणाऱ्या प्रत्येक देणगीदारास देणगीची पावती व ८० जी हे प्राप्तिकरात ५० टक्के सवलतीचं प्रमाणपत्र मिळेल. अधिक माहितीसाठी संपर्क : ६०५०१७३६६

संस्थांनी असं व्हावं सहभागी

महाराष्ट्रात विविध सामाजिक क्षेत्रांत कार्यरत असणाऱ्या स्वयंसेवी संस्था आपल्या सामाजिक उपक्रमांची माहिती https://socialforaction.com/ या वेबसाइटवर एनजीओ फंडरेझिंग या सेक्शनमध्ये जाऊन, स्वयंसेवी संस्थांसाठी असणारा फॉर्म भरून आपल्या संस्थेसाठी ऑनलाइन क्राउड फंडिंगसाठी फंडरेझिंग अभियान सुरू करू शकतात. स्वयंसेवी संस्थेसाठी नोंदणी प्रमाणपत्र, ८०-जी प्रमाणपत्र व १२-ए प्रमाणपत्र आवश्यक आहे.

गणेशला मिळाले नवजीवन...

गणेश झांबरे या ३२ वर्षीय अपघातग्रस्त तरुणाच्या डोक्याच्या कवटीच्या शस्त्रक्रियेसाठी ‘समाजभान’ सदरातून मदतीसाठी आवाहन करण्यात आलं होतं. ‘सोशल फॉर अॅक्शन’च्या आवाहनाच्या माध्यमातून मिळालेली देणगीची रक्कम गणेश झांबरेला देण्यात आली. तसंच, मित्रपरिवार व नातेवाईक यांच्या मदतीमुळे गणेशवर शस्त्रक्रिया झाली असून, तो आता व्यवस्थित जीवन जगत आहे. गणेशवर कवटीचा भाग बसविण्याची शस्त्रक्रिया काही दिवसांत करण्यात येणार आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com